शकील
गेल्या दोन-चार वर्षानपासून बेंगलोरचे वास्तव्य वाढत चाललय. नगरला उन्हाळा फार आणि नातवाला सुट्या असतात म्हणून आणि गौरी गणपती साठी आम्ही (म्हणजे मी आणि बायको) असे वर्षातून दोनदा बेंगलोरला यायचो. मला बेंगलोर मानवात नाही, पण आवडते.
या वाढलेल्या वास्तव्या मुळे आता आसपास ओळखला जातोय. म्हणजे गल्लीतले श्वान पथक हल्ली माझी फारशी दखल घेत नाही! अस्तु. काही लोक ओळखीचं हसायला लागलेत. कोणी हात उंचावून 'हॅल्लो ' करतोय.
अशाच ओळखीत एक शकील आहे. आमच्या 'A ' ब्लॉकचा सेक्युरिटी गार्ड. अंगावरचा निळा युनिफॉर्म वगळता 'सेक्युरिटी गार्ड ' या शब्दाला अपेक्षित एक हि वैशिष्ट्य त्याच्यात नाही. बुटका म्हणता येणार नाही इतकी उंची, दीनपणा चेहऱ्यावर थापलेला, आणि रात्रभर जागल्या सारखे लालभडक आणि झोपाळू डोळे. दिसेल त्याला कपाळावर हात नेवून सॅल्यूट करतो. मला तर तो दिसेल तितकेदा नमस्कार घालतो. दिवसात पहिल्यांदा पाहिल्यावरच सॅल्यूट/नमस्कार करत जा, नंतर गरज नसते हे मी त्याला एकदा सांगितले. ओशट हसला. थोडी चौकशी केली. येथे आम्ही राहतो त्या,व्हाईट फिल्ड भागात बरेचसे बांगलादेशी, युपी, बिहार या भागातून आलेला बराचसा मजूर वर्ग पाहायला मिळतो. झाडू पोछा, भांडी घासणे, स्वयंपाकी, भाजी पोळ्या करून देणारे, लहान मुलांना सांभाळणाऱ्या मुली/बायका हि आणि अशीच कामे ती करतात. शकील यूपीतला असाच कामाच्या शोधात आलेला.
"शकील, आपकी आंखे इतनी जर्द क्यू रहती है? रातको निंद नही होती है, या फिर नशा ---" थोडी घसट वाढल्यावर मी विचारले.
"नहि सरजी, निंद पुरी नहि होती!'
"क्यू ?"
तो क्षणभर घुटमळला. 'सांगू? का नको सांगू?'असा भाव त्याच्या चेहऱ्यावर दिसू लागला.
"सरजी, जिसकी जवान बीवी और बुढी माँ, अकेले दूर गाव मे हो,-- उसे निंद कहा से आयेगी?"
मलाच कुठे तरी पोळल्या सारखे झाले. वणवा त्याच्या कडेच होता.
दुपारची वेळ होती. मी असाच कुठून तरी बाहेरून येत होतो. लिफ्ट मध्ये घुसणार तेव्हड्यात शकील पिलर मागे बसलेला दिसला. उच्छुकतेपोटी मी जवळ गेलो. तो समोर एका कागदाच्या डिश मध्ये पांढरा फटक कोरड्या भाताचे घास गिळत होतो.
"शकील, अरे सुखा राईस क्यू खाता है? सांबर, दाल कुछ मिलने के लिये नही है क्या?"
"नाही! कुछ जरुरत नाही है!"
"फार क्या मिळते हो ?"
" साब, भूक मिलाके खाते है! "
माझ्या अंगावर सरसरून काटा आला. 'अन्ना साठी दाही दिशा आम्हा फिरविशी जगदीशा!' या युक्त्तीची प्रखरतेने आठवण झाली.
पाणी जसे उताराकडे वाहते, तसेच गरिबी श्रीमंती कडे झेपावते. शकील असाच युपीतुन येथे ओढला गेलाय. मला राजकारण काळात नाही, उद्या या 'परप्रांतियां' विरोधात रान पेटवले जाईल. आमची मुलं परदेशी याच ओढीपायी गेलीत, हे मात्र स्वीकारायला जड जात. असो हे रोजचंच आहे!
सु र कुलकर्णी. आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय. पुन्हा भेटूच. Bye.