१४/१२/२०१८
चाळीशी
तुझं आयुष्य
विषय: माझी ओळख
आजकाल तू आरशात फारशी बघत नाहीस. मग अचानक कधी अस्वस्थ होशील म्हणून आधीच तुला जाणीव करून द्यायला हा खटाटोप.
तुझ्या डोक्याच्या उजव्या बाजूच्या केसांत मी माझं रंग काम सुरू केलंय. मागे तू विचार करत होतीस केस पिकले की चॉकलेटी ब्राऊन रंग द्यायचा की फंकी पर्पल. फायनल निर्णय आता लवकरच घेऊन टाक.
आजकाल तुला जाणवलं असेल तू संयमी आणि सोशिक झाली आहेस. हा तुझ्या बौद्धिक पातळी किंवा समंजस पणातला विकास नसून केवळ माझ्या आगमनाचा आविष्कार आहे.
ज्या तुला सहन ही होणार नाहीत अशा घटना तुझ्या चेहऱ्याच्या त्वचेवर स्पष्ट उमटण्या पूर्वीच सांगते... मी येतेय...काळजी कर...
काळजी कर की मनसोक्त येथेच्छ खाऊन पिऊन ज्या शरीराचा पसारा तू वाढवतेयस ते पुढे मागे तुला स्वतःला झेपेल का. काळजी कर की नियमित तुझ्या तब्बेतिचा आढावा सुरक्षित पातळीत राहील.
थकवा जाणवला तर प्रदूषणाचा दुष्परिणाम समजून त्या थकव्याला स्वीकारशील... अशी गल्लत करू नकोस. कधीतरी सुरू करेन म्हणून न्यू इअर रेझोल्युशन मध्ये फक्त डोक्यात जोशात होणारा तो व्यायाम आता तरी प्रत्यक्षात कर.
एकदा जन्माला आल्यावर थर्टीज जगलीस की मी काही टळत नाही. तुला कितीही नको वाटलं तरी मी तुला जीवनाच्या नव्या टप्प्याची ओळख करून देऊन तुझी प्रगल्भता वाढवायचा प्रयत्न करत येइनच.
आनंदाने आणि प्रेमाने माझा स्वीकार कर असं हक्काने सांगून मी शब्द आवरते
तुझीच अटळ
चाळीशी
https://m.facebook.com/unexpressed.writing