#आई ,
तू साठीत पोहोचलीस तेंव्हा एकदा माझ्याशी बोलतांना म्हणालीस , खूप कठीण असतं रे म्हाताऱ्या माणसांचं सगळं करणं. म्हातारपण म्हणजे दुसरं लहानपणच असतं . मला आमच्यापेक्षा तुझी आणि मंजूचीच काळजी वाटते रे अनी ! तुमच्या नोकऱ्या , राधिका चं शिक्षण , कसं रे जमवणार सगळं तुम्ही ? म्हणजे आजारी तू आणि काळजी करतेय आमची . खरंच , हद्द झाली .
कधीतरी तुझ्या जवळ येऊन बसल्यावर तू चेहरा ओंजळीत घेऊन आपला खरबरीत हात गालावरून फिरवायचीस तेंव्हा किती रेशमी वाटायचा तो स्पर्श !
सुदैवानं आमच्याकडे रहायला लागल्यावर तुझी प्रकृती सुधारली .
काय मजा करायचो नं आपण ! दर रविवारी मी काहीतरी गोड आणलं की बाबा खूष व्हायचे . म्हणायचे - चला .फी स्ट आहे आज मेसमधे ! संध्याकाळी जेवणाला खाडा !
बाबा , तू , मंजू आणि मी , काय मजा यायची ब्रिज खेळतांना . अन हक्कानं तू ' वाफ भरला मऊ तूप मेतकूट भात अशी फर्माईश करून खायची मात्र दोन -चार घास आणि चंगळ व्हायची आम्हा सगळ्यांची .
आणि मग एक दिवस मंजू आणि मी माझ्या हृदयरोगासाठी दोन दिवस कुणाच्या तरी सांगण्यावरून कार्ल्याला गेलो काय , तर ती संधी साधून तू अचानक निघून गेलीस ! बाबांचे पाणी भरले डोळे तीन दिवस लाल सर दिसत राहिले .आम्हाला ब्रिज खेळायला बसवून स्वतः डमी झालीस , आणि बागेत फिरते डाव संपेस्तो म्हणून उठलीस , आणि नंतर ती तुझी खुर्ची रिकामीच राहिली गं आई ! त्यानंतर खरच आतापर्यंत आम्ही एकदाही ब्रिज खेळलो नाही . आई, आई , तुझ्या किती आठवणी आई , आता आयुष्यभर त्यांचीच काय ती मायेची साथ - आम्हा दोघांना _
आणि लहानशा राधिकाला देखील !