"मिलाप"
Results लागले. मी आणि सुनीने आमची पोजिशन जपली होती. सचिनचा मामा आला होता result घ्यायला. चेहऱ्यावरून आनंदी दिसला म्हणजे सचिनने आणखी प्रगती केली होती. पल्लवी मला अभिनंदन करताना नको इतकी हसत होती. किंवा लाजत होती. मलाच कळेना काय ते.. सगळ्या शिक्षकांनी माझी पाठ थोपटली.
सुनीच्या बाबांनी माझ्यासोबत येऊन तिचा result घेतला. घरी येताना पहिला आल्याबद्दल मला त्यांनी icecream खाऊ घातलं.
आई बाबांना पुन्हा आनंदाच्या क्षणाचे भागीदार बनलेले बघताना मला आभाळं ठेंगणे झाले होते.
🍁🍁🍁🍁
Result नंतर एक आठवड्याने मी सुनीच्या दारात हजर झालो.
"काकू!! सुनी कुठंय?" मी म्हणालो.
"अरे!! ये.. किती वेगळा दिसलास एकदम, मी म्हणाले कोण आहे सुनी म्हणून विचारणारे? व्यायाम जोरात सुरु आहे वाटतं? उंच झालायस केवढा तो. आणि नेहमी प्रमाणे तुझं खूप खूप अभिनंदन.. असाच यश मिळवत रहा." काकू म्हणाल्या.
काकूंनी मला दोनेक महिन्यांनी बघितले होते. परीक्षा सुरु व्हायच्या आधी पाहिले असेल ते आत्ताच. मध्यें सुनी घरी नसल्यामुळे मी गेलोच नव्हतो.
" नक्की काकू." मी पाया पडलो
"आली का सुनी? " मी परत विचारलं.
" अरे तिच्या मामाचा फोन आला होता यांना ऑफिसमध्यें. अजून पंधरा दिवस थांबतीये म्हणाली ती." त्या म्हणाल्या.
" ओह.. बरं.. ठीके." मी जरा निराश आवाजात बोललो.
" आणि काय रे? सुनीचं राहते की काय इथे? आम्हाला भेटायला नाही येऊ शकत का तू? किती दिवसांनी आलायस? काकूच्या हातचं पन्ह आवडत नाही वाटतं आता. " त्या म्हणाल्या.
काकूंचे लाड मला नवे नव्हते. त्यांना मी खूप आवडायचो. अगदी आईसारखंच सेम वागायच्या माझ्यासोबत.
" बस बघू. मी पन्ह आणते तूला. " त्या म्हणाल्या.
मी बसलो. दोन मिनिटात त्या पन्ह घेऊन आल्या.
" हम्म काय म्हणतो कॉम्प्युटर क्लास? आई भेटली होती तुझी मागल्या आठवड्यात सांगत होती. तू लावलायस म्हणून. " त्या म्हणाल्या.
" संपत आलाय. हा शेवटचा आठवडा आता. बरंच काही शिकलो. " मी म्हणालो.
" छानचं!! तुझं असं एकेक विचारपूर्वक गोष्टी करणं पाहिलं की वाटतं, तू भविष्याबद्दल बरंच काही ठरवून चाललायस. " त्या म्हणाल्या.
" काकू पुढलं नाही माहित. पण सध्यातरी माहिती आणि ज्ञान वाढवत न्यायचं एवढं ठरवलंय. त्या बेस वर तर पुढे ठरवता येईल ना, की काय करायचंय. " मी म्हणालो.
" कुठून येत रे एवढं शहाणपणाचं बोलणं तुझ्यात. सुनी नेहमी बोलते तुझ्याबद्दल की तू तिला काय म्हणतात ते.. हो प्रेरणा देतोस." त्या कौतुकाने म्हणाल्या.
" काकू असं नाहीये हा!! अहो सुनीचे निम्मे गुण माझ्यात आले तरी माझ्यात खूप सुधारणा होतील. " मी म्हणालो.
"तुम्ही दोघे सतत एकमेकांच्या पाठीशी असता हे बघून समाधान वाटतं. भांडता की नाही कधी? सुनी नक्कीच कारणे देत असणार भांडायला." त्या म्हणाल्या.
" भांडणं!! उम्म्म.. आमचं?? नाही झालं कधी." मी म्हणालो.
" सुनी तुझ्या खोड्या तर नक्कीच काढत असणार. तरी नाही होत ? " त्या कुतूहलाने विचारत होत्या.
" नाही होत. हा!! तुम्ही मारामारी विचारत असाल, तर होते.. भांडणं नाही होत." मी म्हणालो.
माझं ते उत्तर ऐकून त्या हसू लागल्या.
"भारी आहात बाबा दोघे तुम्ही. बरं आता पुढला महिना काय करणारेस मग?? काही ठरवलंयस का?"
🍁🍁🍁🍁
काकूंकडे जाऊन आलो पण त्यांच्या प्रश्नाचं उत्तर अजून तरी मलाच सापडलं नव्हतं. माझं रुटीन जरी असलं तरी ते काही दिवसाला पुरणार नव्हतं. सुनी असली असती तर काही वेळ नक्कीच छान गेला असता. मग मी वेळ घालवायचा म्हणून आईची वाचनालयातून आणलेली काही पुस्तकं वाचू लागलो. हलकी फुलकी कथाची, कादंबऱ्याची पुस्तके वाचताना मला भान हरपायला होत होतं. अभ्यासाची बैठक असलेला मी तशी अवांतर वाचणाची सवय बाळगून होतो. पण ती वैज्ञानिक मासिके आणि वर्तमानपत्रापूरती मर्यादित होती.
असं वैचारिक किंवा कथाचं वाचन तसं मी फारसं करत नव्हतो. पण जसंजस वाचू लागलो तशी माझ्या विचारांची कक्षा वृंदावत जाऊ लागली. हे एक वेगळंच जग होत. निरनिराळ्या व्यक्तिमत्वांची फुले, तत्वांच्या बागा, भावनांचे प्रचंड मोठाले पर्वत, प्रसंगांच्या ओघवत्या नद्या, घडून गेलेल्या आयुष्यांचे भरगच्च सागर.. माझं मन भरमसाठ विचारांनी आणि कल्पनानी तटतटून भरून जाऊ लागलं. मला शोध लागला होता. अशांत मनाला आल्हाद देणारं जर काही असेल तर ते वाचन आणि वाचणासाठी लागणारे साधन म्हणजे पुस्तक.
सकस आणि चांगलं वाचन मनाला योग्य दिशा द्यायचं काम करतं. मला या सुट्टीत एक अतिशय जिव्हाळ्याचा छन्द जडला. वाचणाचा. घरात बसून वाचण्यापेक्षा मग मी सायकल काढून दुपारचा माऊलाई टेकडीच्या माथ्यावर जात असे. लिंबाच्या गर्द सावलीत बसून शांततेत पडून मी पुस्तक ग्रहण करतं असायचा.
आयुष्यात पौगंडावस्थेत जात असताना भावनांची ओळख योग्य पणे झाली तर घडणारी व्यक्ती सुजाण घडते. चुकीची माहिती किंवा संगत माणसाला विसंगत बनवू शकते एवढ जाणण्याइतपत प्रगल्भता मला पुस्तकांनी देऊ केली.
मी त्या काळात बरंच काही रिचवलं. स्त्री पुरुषांची स्वभावानुसार असणारी मने.. परिस्थिती नुसार त्यात येणारी स्थित्यंतरे.. समाजमान्य किंवा अमान्य असणाऱ्या गोष्टी, नैतिक अनैतिकतेचा मापदंड कसा कुठे वापरला जाऊ शकतो. यासारख्या कित्येक गोष्टींनी मला जीवनाच्या खूप साऱ्या जाणीवांशी ओळख करुन दिली. मला एकटेपणाचा विसर पडला होता. पुस्तकांमुळे मी कल्पित माणसांच्या विचारांच्या गर्दीत बुडून मग्न झालो होतो. महान लेखकांनी लिहिलेल्या शब्दांच्या राशींनी मला स्वतःत सामावून घेतलेलं.
इतकं खोल की...
" इथे पडून असतो होय जाडू तू?? " सुनीचा आवाज आल्याशिवाय ती तंद्री भंगणारच नव्हती.
मी पुस्तकातून डोकं बाहेर काढलं. सुनी कमरेवर हात ठेऊन उभी होती. तेच लोभसवाणं रूप घेऊन.
" अरे!! सुने आलीस तू?? " मी विचारले.
" येऊन तासभर झालाय. जेवले पण नाही. आधी तुझ्या घरी आले. आई म्हणाली की जातो पुस्तक घेऊन माळावर. तुकोबा झालाय म्हणे. " ती हसत म्हणाली.
" मग घरी बसून काय करू. इथे कसं शांत शांत असतं. वाचत पडायचं. त्या पानपोईतल्या रांजणाच गार पाणी प्यायचं. मज्जा!!" मी म्हणालो.
" बरा आहेस ना? झाडावर काही दिसलं वैगरे नाही ना कधी. लक्षण ठीक दिसेना मला तुझं." म्हणत ती माझ्याशेजारी बसली.
" गपे!! ठीके मी. " मी म्हणालो.
" कसा झाला क्लास? " ती माझ्याकडे तिरकी बघून हसत होती.
" किती किडे असतील ना तुझ्या डोक्यात सुने? " मी म्हणालो.
" बघा आता. सरळ विचारतीये तर माझे किडे म्हणे. " ती मिश्किलपणे म्हणाली.
" कशाला त्या पल्लवीला फूस लावलीस?" मी म्हणालो.
" मी?? अरे ती मागे लागलेली. मला पण त्याच्याशी मैत्री करायची म्हणून. " सुनी म्हणाली.
" काही पण हा सुने. " मी म्हणालो.
" तुझी शपथ जाडू..!! मी खोटं का बोलू? अरे तिच काय.. पण वर्गातल्या अर्ध्या पोरीं तुझ्याशी मैत्री करायला अर्ध्या पायावर तयार आहेत माहित तरी आहे का तूला? " ती ठासून म्हणाली.
" काय?! मामाकडे जाऊन कथक डोक्यावर शिकलीस की काय? कायपण बोलतेस? माझ्याशी? मला काय चॉकलेट चिकटलेत का? " मी अविश्वासाने म्हणालो.
" घ्या...!! तूला काहीच कळत नाही स्वतःबद्दल. मी सांगते तूला.. बाई गं!! माझा जाडू क्लास टॉपर, व्यायाम करुन सुबक, उंच झालाय. मुळात देखणा तर आहेच. त्यात भाषणकार, शिवाय शिक्षकांचा लाडका. बोलायला कमी आणि ऐकायला सदैव तयार. और क्या चाहिये? पोरीं इम्प्रेस तर होणारं ना?" ती म्हणाली.
" देवा!! तेवढ्यासाठी तिने कॉम्प्युटर क्लास लावून माझं डोकं खाल्लं? "मी म्हणालो.
" बघ बघ!! काय काय करायला तयार आहे ती.. आणि कळलं बरं का मला कसा वागलास तू ते? शिष्ट कुठला. " ती म्हणाली.
" कसं काय? तूला कसं माहित? " मी अविश्वासाने विचारलं.
"फोन येऊन गेला मामाच्या घरी पल्लीचा. रडवलंस ना तीला? खडूस कांद्या." ती म्हणाली.
" अगं हाता खालणं काढली नाय नशीब समज. बावळट ध्यान. तूला तिच्या एक एक बिनडोक पणाच्या गोष्टी ऐकवतो... "
आम्ही तासभर तिथं गप्पा मारत बसलो होतो. खूप हसलो. खिदळलो. मग सायकली चालवत तिच्या घरी जाऊन तिथेच मी पण जेवलो. संध्याकाळ पर्यंत सुनीने मला तिच्या मामाकडच्या गोष्टी सांगितल्या. कथक करुन पण दाखवलं. मी आणि तिच्या आईने टाळ्या पिटल्या. मी माझं पुस्तकं वाचन पुराण तीला ऐकवलं. तीला ते भारी वाटलं. पुस्तकांचं महत्व तीला पण पटलं. पण अभ्यासाची पुस्तके सोडली तर तीला माणसे वाचण्यात जास्त रस होता. हे तिच्या व्यक्तिमत्वावरून मला ठाऊक होतं. ती त्यात रमनं कठीण होतं.
तशी काही माझी ईच्छा ही नव्हती की तिने मी करत असणाऱ्या सगळ्याच गोष्टीत रस घ्यावा. सुनी ही सुनी होती. ती जशी होती तशीच perfect होती. माझ्यासाठी कधी चालतं बोलतं पुस्तक बनत होती. तर कधी माझ्यासाठी खुली असणारी आणि इतरांसाठी कुलूपबंद असणारी सुंदर रोजनीशी होती.
अशी माझी सुनी परत आली होती. शाळेच्या पुढल्या वर्षाची सुरुवात पुढल्या आठवड्यापासून होणार होती. आम्ही एकमेकांच्या संगतीने त्याची तयारी सुरु केली.
🍁🍁🍁🍁
असू दे आपला प्रवास समांतर
लागू दे कापायला कितीही अंतर
एक ना एक दिवस आपले रस्ते जुळतीलच
माझे तुझ्याकडचे क्षण मला मिळतीलच.
- क्रमशः
शब्दभ्रमर 🍁🍁