Koundan Parv ek - 2 in Marathi Love Stories by Shabdbhramar books and stories PDF | कोंदण पर्व एक - भाग 2

Featured Books
Categories
Share

कोंदण पर्व एक - भाग 2

सुनी तशी जगन्मित्र होती. तिच्या खूप मैत्रिणी होत्या. ती त्यांची लीडर असल्यासारखीचं वावरायची. सगळ्या तिच्या मागे मागे. त्यावेळी मुलींना मित्र वैगरे असण्याचा प्रकार तसा अपवादात्मक असायचा. मी सुनीच्या आयुष्यातला अपवाद होतो. ती माझ्याशी तितकीच मोकळी असायची जितकी एखाद्या मैत्रिणीशी. त्याचं कारण म्हणजे मला असं वाटत होतं कि, मी तिचं सगळं ऐकायचो. स्वतःची बुद्धी स्वतःसाठी फार न वापरता. तीने सांगितलेलं करण्यात खर्ची घालायचो. 

शिवाय घराजवळ रहात असल्यामुळे अगदी बालवाडीपासूनच आम्ही एकत्र होतो. पण मोठे होत चाललो तरीही आमच्यातल्या लिंगभेदाने आमच्या मैत्रीत कधीही दुरावा आणला नाही. उलटं तो बंध एकमेकांच्या संगतीमुळे आणखी दृढ होत गेला.

त्या वर्षी सातवीच्या परीक्षा संपून निकाल लागला. मला आठ्याहत्तर आणि सुनीला पंच्याऐन्शी टक्के पडलेले. शाळेच्या नियमाप्रमाणे 75% पेक्षा जास्त मार्क्स मिळवणाऱ्या माझी आता "ह" तुकडीतून "ब" तुकडीत बदली झाली होती. खरंतर मी परीक्षेआधी अभ्यास करतच नसायचो. कंटाळा यायचा. डोक्यात ज्ञान म्हणून बरंच साचवत असायचो. इतरांसारख्या खोड्या काढणं, शिक्षक शिकवताना टंगळ मंगळ करणं मला जमायचं नाही. मी वर्गात लक्ष द्यायचो. पण परीक्षेत लिहायचा कंटाळा करायचो. माझी वृत्ती संथ पणाची होती.

पण माहित नाही का? जसं मोठा व्हायला लागलो आणि सुनिसुद्धा सगळ्यांच्यात वावरत वाढू लागली. तेव्हापासून वाटू लागलं किं किमान तिच्यासोबत तिच्या वर्गात तरी असायला हवं. न जाणो मला तिच्यापासून दूर राहणं आता नको वाटायला लागलं होतं. एक मैत्र म्हणून आयुष्यात तीच तर होती.

आता आठवीत मी संस्कृत घेतलं होतं. 
पण ते मला फारसं महत्वाचं नव्हतं. 
मी सुनीच्या वर्गात आलो होतो. आता आम्ही फक्त घराजवळ एकत्र नव्हतो तर वर्गातही एकत्र असणार होतो. हा माझा हेतू साध्य झाल्याचं मला समाधान वाटत होतं.

आणि सुनी??.. सुनी मला वर्गात आलेला पाहून माझ्याकडे काय धावली होती. 

मला अजून आठवतं. बेंचवरून दणादना उड्या मारत येणारी, वासरागत उधळलेली सुनी बघून सगळ्यांना आश्चर्य वाटले.
म्हणजे तसं हा "ह" तुकडीतला अठ्याहत्तर टक्क्यावाला जाड्या तिचा मित्र आहे, हे सगळ्यांना मला तीला काहीवेळा एकत्र बघून माहित होतं. पण एवढा खास कि वर्गातल्या सगळ्यात सुंदर आणि हुशार मुलीने त्याच्याशी एवढी सलगी दाखवावी. त्याला एवढं महत्व द्यावं. तो आल्याचा एवढा आनंद साजरा करावा. हे कोणाला पचेना असं सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसतं होतं. 

पण ती धावत येऊन माझ्या हाताला धरून ओरडली,
"Welcome to ब तुकडी जाडू."

मला नव्हतं वाटलं कि तीला एवढा आनंद होईल. तिने तो सर्व वर्गाला व्यक्त करुन दाखवला. तीला कोणाला काय वाटेल याचं काहीही पडलं नव्हतं. माझं तिच्या वर्गात असणंच मला पुरे होतं. मीही खुश होतो. त्यादिवशी मी माझ्या "ह" तुकडीतल्या वर्गातल्या मित्रांना सोडून सुनीसोबत डबा खाल्ला.

पल्लवी नावाची तिची एक मैत्रीण मला बोलता बोलता म्हणाली कि, " जाड्या तू संस्कृत का घेतलंस? " 

मी उत्तर द्यायच्या आत सुनी कडाडली.
" पल्ले त्याला फक्त मी जाड्या म्हणते.. आणि म्हणणार. इतर कोणी बोललेलं मला नाही आवडणार हा.. नावाने बोलाव त्याला. आणि हो त्याला मिळालेले मार्क्स त्याच्या बुद्धीच्या मानाने कमी आहेत. त्याचं तूला नाही माहित. मनात आणलं काय करू शकतो ते." 

तिचा माझ्यावरचा मैत्रीचा हक्क तिने सरळ दाखवला होता. माझ्याबद्दल तीला खात्रीशीर असं माहित होतं किं मी फक्त सुस्तवलो होतो. मनात आणलं तर मी आणखी चांगले मार्क्स पाडू शकतो. हे त्यामुळेच ती म्हणू शकत होती.

तिने सांगितल्यावर एक गोष्ट अधोरेखित झाली कि, सुनीला मला काहीही बोललेलं चालणार नाही. तिचा माझ्यावरचा हक्क माझ्यासाठी ओझं नव्हतं तर तो फुलांचा भार होता. तीने मला सगळ्यांच्यात असूनही वेगळेपण देत नीट ओळखणं हे मला तिच्याबद्दल आपुलकी जाणवून द्यायला सतत भाग पाडत.

त्यावेळी इतकं सगळं मनात येत नसलं तरी सुनीने माझ्यावर हक्क दाखवणं मला जराही गैर वाटत नव्हतं. खरंतर आमची मैत्री कोणाला मानवेल न मानवेल याची पर्वा ना तीला होती ना मला. 

"कारण मैत्रीत रूप, गुण नाही बघितलं जात. ती प्रकाशाने पडलेल्या वस्तूच्या सावली इतकी सहज असते." 

तशी आमची सहज मैत्री कोणाला सलणारी नव्हतीच. कारण मी तसा निरूपद्रवी आणि सुनीच्या मैत्रीच्या सावलीत वावरणारा. अशी एक गोष्ट वर्गाला माहित झाली. कमी किमतीचा जड ऐवज असं माझं अस्तित्व होतं. पण एक कोणीतरी होते जे आमच्या मैत्रीला निरीक्षत आमच्यातल्या अंतराचा अंदाज घेत होते. त्याला त्यातली गंभीरता समजतं असावी असं मला वाटत होतं. 

त्यादिवशी सुनी माझ्याकडे धावतं येताना बघणारी आणि अचंबित झालेली आणि एक नजर होती. त्या नजरेवर सुनीचं गारुड चढलं होतं. निश्चल होऊन माझ्या मागे "तो" उभा होता. सुनीच्या जीवनीवर पसरलेलं हास्य निरखत. माझा धरलेला हात हात बघून रोखलेला श्वास आणि चुकलेलं हृदयाच स्पंदन घेऊन. 

त्या वर्गात माझ्याच तुकडीतून माझ्या मागे आलेला 76 टक्के मिळवलेला सचिन गाडे. सुनिकडे बघत त्याने उभ्या अवस्थेत तिथे कितीतरी वेळ घालवला होता. 

मैत्रीत रूप गुण नाही बघितले जात...पण प्रेमात?
मी प्रेमाला मैत्रीच्या पुढली पायरी म्हणणार नाही. खरंतर या समांतर रेषा. मी आणि सुनी नैसर्गिकपणे मैत्रीच्या रेषेत आलो. पण इतर कोणी त्याचं रेषेत जावं असं गरजेचं नव्हतं. तसं तर माझं त्या नैसर्गिक मैत्रीच्या रेषेतच असायला हवं कि नाही हे ठरत नव्हतं. पण ती रेषा सोडण्याचं धाडस माझ्याकडून अशक्य होतं.

त्यावर्षी सचिनने सगळ्यांना आश्चर्यचकित केलं होतं. ह तुकडीत मी पाहिला आणि तो दुसरा होता. अचानक त्याने घेतलेल्या गतीने सगळ्यांना नवल दाखवलं होतं. तसा तो खेळात खूप जबरदस्त होता. खोखो, कबड्डी आणि धावणे. यात त्याचा हात धरणं अशक्य होतं. उंचपुरा सावळा सचिन ग्राउंड वर असणं म्हणजे विजयाची हमी. तो आमच्या ह वर्गाचा हिरोच होता. पण त्याची अभ्यासातली चुणूक मात्र यावर्षी दिसली होती. सरळ दहा बारा टक्क्यांची उडी घेऊन तो सुद्धा ब तुकडीत आला होता.

तो कधीच माझ्याशी बोलला नाही. कारण तो वर्गाचा हिरो होता आणि मी एक साधारण मुलगा. तो भाव मारून असायचा. माझी जाडेपणावरून काढली गेलेली खोडी ही मस्करी करुन विसरून जाण्यासारखी असायची त्यामुळं मी बऱ्याच जणांचं गिर्हाईक बनायचो. मला त्याच्याकडून कधी कसलंच महत्व मिळालं नाही किंवा कसला उल्लेख ही मिळाला नाही. तिथून निघण्यासाठी मला पण या वर्गात माझी पाठराखण करणारी सुनी होती. मला ह तुकडीतली वागणूक इथे मिळणार नाही हे सुनि इथं असल्यामुळे माहित होतं.

न जाणो का त्याचं सुनीला पाहून स्तिमीत होणं माझ्या मनातल्या संथ तळ्यात तरंग उठवणार ठरलं. कशाची तरी जाणीव झाली. कोणीतरी आपल्या सीमारेषेत घुसखोरी करतं असल्यासारखा मनोभाव होता तो. सचिन फक्त मार्क मिळवून वरच्या वर्गात संस्कृत शिकायला आला होता किं त्याच्या बुद्धीने आणखी काही हेतू पूर्ण करण्याची तयारी केली होती हे अजून समजणं बाकी होतं.

मी माझ्या स्वभावामुळे आणि व्यक्तिमत्वाच्या दुर्लक्षित अवस्थेमुळे.. मी अदृश्यच असायचो आणि म्हणूनच की काय, अवतीभवती काय चाललंय हे मी चांगलंच टिपत असायचो. तसा मनाचा चाळाच होता माझ्या. शिवाय त्यावेळी मी सुनीच्या बाबतीत जास्त विचार करतं असल्यामुळे मला तसं जाणवलं असावं. पण त्याची जराशीही दखल न घेतलेली सुनी मात्र सचिनच्या तिच्याकडे तसं पाहण्याच्या कृतिपासून अबोधच होती. 

🍁🍁🍁🍁

"मेघ तसे अबोधच असतात
त्यांना नसतंच काही माहित.
थेंबाचा वर्षाव काम त्यांचं
होणारे परिणाम मात्र त्यांचे नाहीत."

- क्रमशः

शब्दभ्रमर 🍁🍁