Koundan Parv ek - 10 in Marathi Love Stories by Shabdbhramar books and stories PDF | कोंदण पर्व एक - भाग 10

Featured Books
Categories
Share

कोंदण पर्व एक - भाग 10

सुनीचे आईबाबा संध्याकाळी घरी आले होते. काकूंनी मला जवळ घेत माझं खूप कौतुक केलं. 


" मला तुझ्याबद्दल जे वाटत होतं तू अगदी तसाच आहेस. नेहमी अपेक्षाना खरा उतरतोस तू.. आपल्या या गुणी पोरांना दृष्ट लागायला नको कोणाची." माझ्यावर मायेची उधळण करत त्या म्हणाल्या. 


सुनीचं पण माझ्या आईबाबांनी कौतुक केलं. माझ्या पाठीशी नेहमी असण्याबद्दल आधीच त्यांना तिचं कौतुक होतं. तिचा माझ्यावरचा जीव माझ्या आईबाबांना चांगलाच माहित होता.


बाबांनी मला त्याचवेळी surprize दिलं. नवी कोरी त्याकाळी खूप फेमस असणारी "hercules MTB Canon barrel" cycle दुकान वाल्याने आमच्या घरी आणली. मी त्यांना मागितली नव्हती. मी म्हणालो पण तसं त्यांना.


पण बाबा म्हणाले, " तू मागत काहीच नाहीस. सर्व मिळवतोस." सगळ्यांनी याला दुजोरा दिला.


आता तर मी ढगात होतो. सुनीला घेऊन चांगल्या चारपाच चकरा मारून मी माझा आनंद व्यक्त केला. सुनीला पण खूप आवडली ती सायकल. माझ्यावरच्या कौतुक वर्षावात ती पण मनापासून सामील होती याचा मला खूप आनंद वाटत होता.


🍁🍁🍁🍁🍁


थन्डीचे वारे वाहू लागले. तसे शाळेतल्या गुण प्रदर्शन करायच्या संधी सर्वांना दिसू लागल्या. स्पर्धा, गॅदरिंग आणि सहलींचा हा काळ असतो. परीक्षेईतकाच हाही महत्वाचा. कारण त्यात आपण एका वेगळ्या प्रकाराने स्वतःला गवसत असतो. काहीतरी करुन बघायचं असतं. नवं प्रदर्शित करुन स्वतःला अजमावायचं असतं. मी कशात पार्ट घेणार हा प्रश्नच होता. 


विविध गुण प्रदर्शनात सुनीने एक ग्रुप डान्स बसवला होता तिच्या चार वर्गमैत्रिणी सोबत. दलेर मेहंदीच "हायो रब्बा" गाणं चांगलंच गाजलं होतं त्यावेळी. त्यावर तिने डान्स बसवतं प्रॅक्टिस सुरु केली होती. Sports च्या तारखा आल्या होत्या. कबड्डी, खोखो आणि धावणे यात सचिन आणि समर असणार होते. माझं काही ठरत नव्हतं.


" बरं का समर.. आपण जितकं भारी खेळू ना तितकं आपलं नाव ग्राउंड वर सगळेच जणं ओरडतात. ही मजा असते खेळात भारी असणाऱ्यांची.. या वेळी तर स्पेशल व्यक्ती आहे बाबा मला cheer करायला.. बघ तू मी कसा परफॉर्मन्स देतो ते." मला ऐकू जाईल अशा पद्धतीने सचिन त्याला सांगत होता.


" नुसतं पुस्तकात बुद्धी खपवली म्हणजे हवं ते मिळतं असल्या भ्रमात काही भोपळे जगतात. पण त्यांच्यात बाकीचं असं काही नसतं. बाकीचे गुण नसतात कसलेच ज्याच्यामुळं लोकांना ते भारी वाटतील. " तो पुढे म्हणाला.
मी शांतपणे ऐकून घेतलं. मनाशी काही ठरवत मी निघून गेलो. 


🍁🍁🍁🍁


खेळाच्या स्पर्धा पार पडल्या सचिन ने कबड्डी आणि खोखो मध्यें आमच्या वर्गाला फायनल मध्यें जिंकून देत हिरोगिरी केली. धावण्याच्या शर्यतीत तो दुसरा आला. त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याला सुनीने खरंच ओरडून ओरडून cheer केलं. तसातर सगळा वर्गच ओरडत होता. पण ह्याला ऊत सुणीमुळे आला होता. 


टाळ्या आणि शिट्ट्याच्या गजरात सुनी आणि तिच्या ग्रुपचा डान्स परफॉर्मन्स पार पडला. नेहमीप्रमाणे उत्कृष्ट झाला होता. छान दिसत होती पंजाबी भांगड्याच्या पेहरावात. मजा आली गॅदरिंगलापण. नंतर मग विविध गुणदर्शन हा एक विशेष कार्यक्रम शाळेने आयोजित केला होता. वक्तृत्व, गायन आणि वाद्य वादन जर कोणाला येत असेल तर त्याने करावं अशी ती स्पर्धा होती. गायन आणि वादनामध्ये अगदी तीन चारच मुलांनी भाग घेतल्यामुळे ती लवकर आटोपली. 


वक्तृत्व स्पर्धेची घोषणा करण्यात आल्यावर ती सुरु झाली. पहिले दोन स्पर्धक भाषण करुन गेले. नववी आणि दहावी मधले दोघे होते. मग एक नाव घेण्यात आलं आणि काही क्षणात मी स्टेजवर होतो. सुनी मला अचंबित दिसत होती. कोणालाही न सांगता मी स्वतःला त्यात झोकले होते. स्वतः टिपण काढून भाषण तयार केले होते. 


विषय होता -


श्रद्धा आणि अंधश्रद्धा


मी सरसावलो.. भाषण काय? पण कधी ग्राउंड वर साधं समुहगान नं गायलेला मी सरळ सर्व शाळेसमोर भाषणाला उभा होतो.


अगदी तीनच सेकंद मोठा श्वास घेण्यात घालवले आणि मन एका ठिकाणी केंद्रित करत केलेली तयारी आठवली. बाबांनी घरी दिलेला आत्मविश्वास परत जागा केला. मी मिळवू शकतो. अस्खलीतपणे भाषणाला सुरुवात केली - 


"सन्माननीय प्राचार्य, समस्त शिक्षकवृंद, आणि प्रिय सहाध्यायी मित्रमैत्रिणींनो,
आज मी "श्रद्धा आणि अंधश्रद्धा" या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आपल्यासमोर माझे विचार मांडणार आहे.

मित्रांनो, मानव हा निसर्गावर आणि त्याच्या भोवतालच्या गोष्टींवर विश्वास ठेवूनच पुढे आला आहे. हा विश्वास म्हणजेच श्रद्धा. श्रद्धा म्हणजे आत्मविश्वास, सकारात्मकता, आणि मनोबलाचा आधार. एखाद्या गोष्टीवर, व्यक्तीवर, तत्वावर आपण विचारपूर्वक ठेवलेला विश्वास म्हणजे श्रद्धा. ही श्रद्धा आपल्याला आशा, प्रेरणा आणि धैर्य देते.

उदाहरणार्थ, आईवडिलांवर, गुरुजनांवर, धर्मावर, संस्कृतीवर असलेली श्रद्धा आपल्या आचरणाला दिशा देते. डॉक्टरांवर असलेली श्रद्धा एखाद्या आजारी माणसाला बरे होण्यासाठी मदत करते. विद्यार्थ्याने स्वतःच्या मेहनतीवर ठेवलेली श्रद्धा त्याला यशाच्या शिखरावर पोहोचवते.

पण, ह्या श्रद्धेचा अतिरेक झाला, किंवा तिला तर्काचा, विचाराचा आधार नसला, की ती अंधश्रद्धा बनते. अंधश्रद्धा म्हणजे डोळे झाकून, कोणताही विचार न करता एखाद्या चुकीच्या गोष्टीवर विश्वास ठेवणे. आजही आपल्या समाजात अनेक अंधश्रद्धा प्रचलित आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर, एखादी मांजर रस्ता ओलांडून गेली तर पुढे जायचं नाही, एखाद्या बाबा-बुवाच्या आशीर्वादाने आजार बरे होतात, किंवा ग्रह-तारे वाईट असतील तर अपघात होतो, नुकसान होते. अशा अंधश्रद्धा अनेकदा आपल्या आजूबाजूला दिसतात.

अंधश्रद्धा ही केवळ अज्ञानातून नाही तर भीतीतूनही जन्म घेते. जिथे शंका असते, विवेक नसतो, तिथे अंधश्रद्धा तयार होते. आणि अंधश्रद्धेमुळे समाजात अंधकार, गैरसमज आणि अन्याय पसरतो. अंधश्रद्धेमुळे बुवाबाजी वाढते, महिलांवर अन्याय होतो, जादूटोण्याच्या नावाने हत्या होतात.

म्हणूनच, आपल्याला श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामधील सूक्ष्म पण महत्त्वाचा फरक ओळखणं फार आवश्यक आहे. श्रद्धा माणसाला उन्नतीकडे घेऊन जाते, तर अंधश्रद्धा अधोगतीकडे. श्रद्धा मनोबल देते, अंधश्रद्धा भ्रम निर्माण करते. श्रद्धा विचार करते, अंधश्रद्धा विचार कुंठवते.

यासाठी आवश्यक आहे वैज्ञानिक दृष्टिकोन. प्रत्येक गोष्टीकडे तर्काच्या आणि ज्ञानाच्या नजरेने पाहणे ही आपल्यासाठी आज काळाची गरज आहे. शिक्षण, विज्ञान, माहिती यांचा वापर करून आपण अंधश्रद्धेवर मात करू शकतो.

म्हणून, चला आपण ठरवूयात, श्रद्धा ठेवू, पण ती विचारपूर्वक. अंधश्रद्धा नको, अंधश्रद्धेविरुद्ध लढा देऊ. विज्ञान आणि विवेकाच्या आधारावर समाज घडवू. कारण, डोळस श्रद्धाच खऱ्या अर्थाने आपल्याला पुढे नेते. आपल्या पिढीची जबाबदारी आहे एक चांगला समाज घडवण्याची. तो घडला तर देश पुढे जाईल. 

आपण शान्तपणे माझे म्हणणे ऐकून घेतल्याबद्दल शतशः आभार. "

Pin drop सायलेंस मध्यें या जाड्याच उच्च रवातलं म्हणणं सर्वानी ऐकून घेतलं होतं. माझा आवाज मलाच प्रगल्भपणा ऐकवत होता. अवकाशाने का होईना धैर्याने येऊन माझ्या व्यक्तिमत्वाला गवसणी घातली होती. मी मला सापडत चाललो होतो. नंतरच्या टाळ्यांच्या कडकडाटाने माझं बक्षीस निश्चित केलं होतं. 

🍁🍁🍁🍁🍁

"छुपा रुस्तुम!! जाडू अरे काये हे? असा धक्क्यावर धक्के देत चाललायस. येतंय कुठून हा??" सुनी माझ्या आजूबाजूला उड्या मारत ओरडत बोलत होती.
" अरे तू भाषण करताना तो तू आहेस हे विसरायला होत होतं. कोणी लिहिलंय हे भाषण? " तिने विचारले.

मी खूपदा खाडाखोड करुन करुन खरडलेला माझ्या भाषणाचा कागद तिच्या समोर धरला.

" आईशपथ!! जाडू.. तू लिहिलंस?? कसं? इतकं छान? मन भरून कौतुक तुझं.. खूप माया येते तुझ्यावर तू असं काही केलंस की. मी मिरवायला रेडी आता.. तो टॉपर.. तो भाषणकार.. माझा सख्खा मित्र आहे बरं का? " ती नाचत बोलत होती. 

" सुने कसली पण नावे नको ठेऊ मला.. जाडू हे best नाव आहे माझं.. तेच असू देत.. " मी पण तीला मजेत म्हणालो.

" ते तर आहेच.. My जाडू is best!!" सुनी डोळ्यातला आनंद आणखी चमकवत म्हणाली.

🍁🍁🍁🍁

" प्रेरणा तूच आहेस
आणि बळही तूच
या दिव्याच्या प्रखर होण्याला
रुजवातीचं इंधनही तूच "

- क्रमशः

शब्दभ्रमर 🍁🍁