Koundan Parv ek - 8 in Marathi Love Stories by Shabdbhramar books and stories PDF | कोंदण पर्व एक - भाग 8

Featured Books
Categories
Share

कोंदण पर्व एक - भाग 8

गणपतीनंतर शाळेत चाचणी परीक्षेचे वातावरण होते. त्यामुळे सचिन आणि त्याच्या ग्रुपने तशी शांतताच ठेवली होती. मी पण त्यांच्याशी अंतर ठेऊन होतो. सचिन सुनी आधीसारखेच थोडं थोडं बोलत होते. पण मला माहित होतं. हा सचिन नक्कीच काही ना काही करणार.


चाचणी परीक्षा उरकल्या होत्या. यावेळी मी तीन विषयांमध्ये पैकीच्या पैकी मार्क्स पाडले होते. गुणांमध्ये सुनीच्या अगदी जवळ येऊन ठेपलो होतो. माझी अजिबात तिच्याशी शर्यत नव्हती. पण ती मला म्हणाली होती. तू खूप मोठा होशील. तीला जर तशी अपेक्षाच आहे तर मग, मी माझ्या क्षमतांचा विकास करायला हवा असं मला वाटू लागलं. मग कंटाळ्याची धूळ झटकत मी माझ्या सुस्त मेंदूला थोडीच चालना दिली होती आणि त्याचा बराच बरा परिणाम मला पहायला मिळाला.


" तू भारी मार्क्स पाडले रे.. मी तर तूला हलक्यात घेत होतो. " समर मला एकदा भेटून म्हणाला. मी बारीक हसून त्याला दाद दिली.


सुनीला पण बरं वाटलं होतं.
"बघ जाडू लवकरच दुसरा नंबर मिळतोय मला." ती हसत म्हणाली.


त्या मार्कांमुळे मी शिक्षकांच्या नजरेत आलो. मला हल्ली एखादा प्रश्न सरळपणे त्यांच्याकडून विचारला जाऊ लागला. मी उत्तर देण्यात शक्यतो चुकत नव्हतो. माझी हुशारी शिक्षकांच्या लक्षात आली. जाणीवपूर्वक मग मी त्यांच्या पुढे पुढे करू लागलो. एखादा अवघड गृहपाठ दिला असेल तर सुनीने आणि मी तो केलेलाच असायचा. ह तुकडीतला हा जाडू आता ब तुकडीतल्या टॉपर मुलांमध्ये मोजला जाऊ लागला होता. त्यामुळे आलेली असुया सचिनच्या नजरेत अधूनमधून दिसत होती. त्यासाठी तो काही करेल असं मला सतत वाटत होतं. 


सुनीने आणि मी drawing च्या elementry exam साठी नाव दिलं होतं. माझी आणि तिची ही आवड आधीपासून होती. शिवाय elementry आणि intermidiate drawing exams ची सर्टिफिकेट असतील तर दहावी नंतरच्या पुढल्या ऍडमिशनला जरा ग्रेस मार्क्स मिळतात असं पण कळलं होतं. सुनी सुरेख चित्र काढायची. 


रविवारी सकाळी नऊ ते साडे दहा या वेळेत शाळेतच हा क्लास भरायचा. त्या क्लासला सचिन येत नव्हता. पण अभिजित आणि समर येत होते. एका रविवारी क्लास सुटत आला होता. त्यादिवशी drawing मध्यें स्टील life या विषयाचं प्रॅक्टिकल झालं. माझं चित्र होत आलं होतं सरांनी आम्हाला आपली आपली सगळी चित्र सुकवून त्यांच्या drawing रूम मध्यें नेऊन ठेवायला सांगितलं होतं. ज्याचं होईल तो ठेऊन येत होता.


माझं चित्र त्यादिवशी खूप मन लावून काढल्यामुळं छान आलं होतं. सुनी पण एकदा डोकावून गेली.
" मस्त आलंय जाडू. " असं म्हणून ती तिचं चित्र ठेवायला गेली. माझं उरकलं आणि सर्वात शेवटी मी रूम मध्यें गेलो तर तिथे समर आणि अभिजित उभे होते. त्यांच्या हातात सुनीचं चित्र होतं.


"अय काय करताय इथे आणि ते चित्र का घेतलंय हातात?" मी विचारलं.


" काहीतरी लिहिलंय यावर तू. " समर म्हणाला.


" काय? मी कुठे काय लिहिलं? " मी म्हणालो.


" नीट बघ." असं म्हणून त्याने माझ्या हातात ते चित्र दिलं.


" सुनी फक्त माझी आहे आणि मी तिचा जाडू. " ब्रशने ओळखू येणार नाही अशा अक्षरात ते लिहिलं होतं. अभिजित तिथून पळाला. मला पटकन कळलंच नाही का ते? 


" बघ सरांनी पाहिलं तर काय होईल? दोघांची बदनामी." समर म्हणाला.


" नाही नाही.. मी असं नाही होऊ देणार. अजिबात नाही.." मी बरळत होतो.


" मग बघतो काय? फाडून टाक. सरांनी बघितलं तर खलास खेळ. " समर म्हणाला.


ते मी केलं नव्हतं मान्य.. पण विनाकारण तिच्या माझ्याबद्दल काहीही उधळलं जाणार होतं. सुनीच्या मनमोकळ्या स्वभावासाठी हे अजिबात पोषक नव्हतं. तीला मला दुःखी झालेलं बघवणार नव्हतं. मी हे घडू देणार नव्हतो. मी ते drawing चूरगळलं, फाडलं आणि त्याच्या बारीक कपट्यांचा पण गोळा करुन खिडकीतून बाहेर भिरकावण्यासाठी वळू लागलो.


तेवढ्यात समोर बघितलं तर सुनी उभी होती. अचंबित होऊन बघणारी. अविश्वासाने.. तिने सगळं पाहिलं होतं. म्हणजे तिने जे बघायला हवं ते वेळ साधून तीला दाखवण्यात आलं होतं.


"केव्हाचा म्हणतोय मी त्याला कि तुझं चित्र भारी आहे.. का तिचं हातात घेऊन चिडून बसलाय.. पण नाही.. सतत काय हीच पुढे असते असं म्हणून त्याने तुझं चित्र फाडलं. वेडा आहे का हा? पटकन त्यासाठी तूला सांगायला आलो मी. पण याने फाडलंच. सरांना तक्रार कर याची." अभिजित म्हणू लागला.


" तू गप्प बस. " सुनी त्याला हाताने थांबवत म्हणाली.


मी तिच्याकडे पाहत तो बोळा खिडकीबाहेर भिरकवला.


" जाडू चल. " ती मला म्हणाली. 


आम्ही आमचं drawing च सामान भरलं आणि शाळेबाहेर चालत आलो. मी जवळजवळ रडवेला झालो होतो. सुनीला हादरा बसला असणार हे सरळ होतं. पण ती कोणाच्याही भरवण्याने आमच्या मैत्रीबाबतीत चळणार नाही ही खात्री पण मला होती. शाळेच्या ग्राउंडच्या कडेला आम्ही एका झाडापाशी आलो.


" असं का केलं मी विचारणार नाही. तो अभिजित काय किंवा आणि कोणी काहीही बोललं तरी मी नसते विश्वास ठेवत. तो जे म्हणत होता. तसा तू नाही हे मी कोणाच्याही शपथेवर सांगू शकते.. पण त्या मागचं खरं मला तू दाखव जाडू. जे काही असेल ते. सांग." सुनी म्हणाली.

" सुने!! मला ना तूला काही गोष्टी सांगण्यासाठी सध्या बळ नाहीये. जसं तू मला म्हणाली होतीस ना कि आपल्या सुनीवर विश्वास ठेव. तसंच मीही म्हणेन.. माझ्यावर विश्वास ठेव. जे तू बघितलं ते तेवढंच.. त्यामागे जाण्याचा प्रयत्न नको करू प्लिज. मी नाही काहीच सांगू शकणार आत्ता तूला." मी म्हणालो.


" तू मला आपलं मानत नाही ना? " ती म्हणाली.


" असं का ग बोलते? मला कोणी आहे का इथं मित्र म्हणून इतर कोणी? आत्ता मला तूला एवढंच सांगायचंय कि जे मी केलं त्यामागच कारण तूला कळवून देऊन मला तुझ्या मनात विनाकारण कसलाही अडथळा निर्माण करायचा नाहीये. जे काही चाललंय ते मी हॅन्डल करतोय." मी म्हणालो.


" अरे असं काये कि जे तू हॅन्डल करतोय.. मला सांग कि दोघे मिळून हॅन्डल करु. सुनी नेहमी तुझ्यासोबत आहे विसरलास का? " ती म्हणाली.


" ते आहेच सुने.. पण या गोष्टीत मी तूला दखल देऊ देणार नाही. प्लिज मला याउपर काहीही विचारू नको. " मी रडवेला होऊन बोललो.


माझी ती अवस्था तिने पाहिली आणि ती पुढे होत म्हणाली,
"ठीके ठीके बस.. बस.. सोडून देऊ तो विषय..तू नको मनाला लावून घेऊ.. मला नाही काही जाणून घ्यायचं. खुश? आता शांत हो आणि हस.. " असं म्हणून तिने माझ्या पोटाला बोट टोचलं. मी उडालो.. तिने परत टोचलं.. मग मी पळत सुटलो. ती मागे पळाली माझ्या. तिने मला पकडत माझ्या गळ्यात हात टाकला.


"कुठे पळशील. मला स्केच करुन दे परत ते चित्र.. मी रंगवेन.. शिक्षा तूला. फाडलंस ना माझं चित्र.. माझ्या गृहपाठच्या वह्याना पेन्सिल बॉर्डर्स पण मारून दे सगळ्या... फार शहाणा झालाय ना जाडू!!" ती माझी मान आवळत म्हणाली.


" नाही देणार जा!!" असं म्हणून मी तिचा हात झटकत पळालो.


आम्ही हसत पळत घरी निघालो. विश्वासाने कसल्याही वाईट कृतीचा किंवा विचारांचा पराभव करता येऊ शकतो याचं उदाहरण सुनी आणि माझ्यातली मैत्री होती. माझ्यावर विश्वास ठेऊन डोळ्यासमोर घडलेल्या त्या गोष्टीलाही सुनीने फाटा दिला होता. माझं महत्व तिच्या आयुष्यात तिने पुन्हा अधोरेखित केलं होतं. जसं तिने मला व्यापलं होतं तसा मी तीला व्यापू शकेन कि नाही हे येणारा काळ सांगणार होता.


🍁🍁🍁🍁


"तुझं माझ्यामध्यें असणं
जसं श्वासातला प्राण
माझ्या जिवा घोर तुझा
तू गं विश्वासाची आन"

- क्रमशः

शब्दभ्रमर 🍁🍁