स्फ़ोट
शाळा भरली. माझा नववीचा नवा वर्ग तिसऱ्या मजल्यावर होता. हवेशीर आणि प्रकाशित. मला जाम आवडला. मी बसायला मधल्या ओळीत तिसऱ्या बेंचवर होतो. सुनी माझ्या शेजारच्या ओळीत पहिल्या बाकावर बसली होती. सर्वच मुलांमध्ये खूप बदल झाले होते. उंची, रंग, आवाज जरा जरा बदलले होते.
माझ्यातही झालाच होता. आता मी सुनीसाठीच जाडू होतो. इतरांसाठी नाही. सचिनला मी माझ्याकडे तीन चार वेळा निरखून बघताना पहिला होता. माझ्यात झालेला बदल त्याला अस्वस्थ करत होता असं मला वाटत होतं.
सगळीकडून नंबरांची आणि मार्कांची चौकशीवजा बडबड होतं असल्यामुळे मला कळले की, तो यावेळी पहिल्या दहामध्ये आला होता. त्याची मेहनत दिसत होती. तो मधल्या सुट्टीत सुनीचं अभिनंदन करुन आला. पण माझ्याकडे फिरकला नाही. रामदास आला होता. त्याने सांगितलं की यावर्षी पहिल्या पाच येणाऱ्या मुलांना दहावीसाठी विशेष मार्गदर्शन करणारे जादा तास शाळेकडून घेतले जाणार आहेत. तेव्हा नववी पण गाजवायची आहे. आमच्या इयत्तेत रामदास दुसरा होता. त्याच्याशी बोलताना मला त्याच्याकडून जराही इर्ष्या जाणवायची नाही. मी त्याचा नंबर पटकवला होता. वास्तविक त्याने माझ्याशी स्पर्धा करताना वैमनस्य ठेवणं कोणीही समजू शकलं असतं. पण तो तसा नव्हताच. मनाने छान होता. मला एवढं कळलं होतं की, सुनी आणि रामदास त्या जादा तासांना असणार होतो.
मला शाळा सुरु झाल्यापासून सचिनच्या आव्हानाचा प्रश्न डोक्यात होताच. मी माझे प्रयत्न सकाळी करत होतोच. पण मला माहित होते. कुठल्याही गोष्टी नीट करण्यासाठी त्याचे तंत्र अवगत करावे लागते. म्हणून मी आमच्या PT शिक्षक खोत सरांना भेटायला गेलो.
"ह्या वर्षी ज्या विद्यार्थ्याची सांघिक खेळातली आणि वैयक्तिक खेळातली कामगिरी चांगली असेल शिवाय त्याला दहावीला ऐन्शी टक्के किमान असावेत, त्याला अकरावी आणि बारावीसाठी गावातल्या सरपंच तालीम संघाने छोटी शिष्यवृत्ती जाहीर केलीये. अकरावी बारावीचा खर्च ते लोकं उचलणार आहेत." असं ते म्हणाले.
"सर मला फक्त रनिंगबद्दल मार्गदर्शन हवंय." मी म्हणालो.
"संध्याकाळी पाच वाजता यायला जमेल का शाळेच्याच ग्राउंडवर? " त्यांनी विचारलं.
मी संध्याकाळी पाच वाजता शाळेच्या फाटकापाशी आलो. सर ग्राउंडवर होते. तिथेच आणखी सात आठ मुले होती. नववीतले चारपाच आणि आठवीतले दोन तीन. त्यातच सचिनपण होता. सरळ होतं. PT च्या सरांचा आवडता विद्यार्थी होता तो. जरा जरा पावसाळी भुरभूर होत होती. सर वॉर्म अप घेत होते. मी मागे जाऊन उभा राहिलो. वॉर्मचे प्रकार सर सांगतील तशा पद्धतीने करू लागलो. थोड्यावेळाने सरानी धावण्याचा सराव घेतला. मला काही वेळ पळायला सांगत त्यांनी निरीक्षण केले.
तुझा स्टॅमिना चांगला आहे. अजून गती यायला लांब लांब ढेंगा पडायला हव्या. हात हालवताना ते मागे नको ठेवत जाऊ.. छाती बाहेर काढून मान सरळ ठेवायची... अशा बऱ्याच सूचना करतं त्यांनी पळायच्या वेळी ठेवले जाणारे posture कसे असावे, पावलं कशी पडायला हवी वैगरे बरंच काही कळलं. ज्याचा उपयोग मी सकाळी सुद्धा करणार होतो. डबल सरावामुळे मला नक्कीच फायदा होणार होता.
त्यादिवशी सरांचं मार्गदर्शन घेऊन मी निघालो होतो तितक्यात मागून सचिन आला.
"का रे? इथं पण घुसलास का? " त्याने विचारलं.
"मग! अगावपणा करण्याचा मक्ता तू एकट्यानेच घेतलाय का?" मी त्याला परतवलं.
" ती स्कॉलरशिप माझीच आहे. मलाच मिळणार. हे आपलं मैदान आहे. इथं आपलाच वट चालतो." तो म्हणाला.
" हे माझं ते माझं.. तूला स्वतःबद्दल जास्तच गैरसमज आहे रे? करतो दूर मी थांब. रेसच्या वेळी भेट. दाखव तुझा वट. " मी म्हणालो.
सचिन उचकला. पण या वेळी तो अंगचटीला आला नाही. त्याला परतावा मिळाला असता. एवढं तर त्याला कळलं होतं.
" बघतो तूला. " एवढं बोलून तो गेला.
माझी दंड मारण्याची क्षमता आता वाढतं जात पाच पासून चाळीस पन्नास पर्यंत आली होती. चाळीस पन्नास दंडाचे दोन किंवा तीन सेट्स, बैठका, स्ट्रेचिंग, स्किपिंग, सपाट्या असा व्यायामाचा आवाका मी वाढवत नेला होता. फिटनेसची एकेक परिमाने गाठत मी आता माझा स्थूलपना संपूर्ण गमावला होता. शरीर पिळदार बनत चाललं होतं. कधी कधी माझे बाबा ही यायचे माझा व्यायाम घ्यायला.
चाचणी परीक्षा जाऊन आणि दिवाळीच्या सहामाही परीक्षापर्यंत चा कालावधी मी झपाटल्यासारखा घालवला. प्रत्येक वेळी सगळ्यांशी मार्कांमधलं अंतर वाढवत नेत मी अव्वल राहिलो. माझ्याशी होऊन मुलं मुली बोलायला येत होते. शिक्षक मला आवर्जून प्रोत्साहन देत होते. कुठे शाळेत दिसलो तर प्राचार्य पण हसून माझी चौकशी करत होते. सुनी माझ्यासाठी खुश होती. आम्ही elementry drawing च्या परीक्षा मागल्या वर्षी देऊन सर्टिफिकेट मिळवली होती.
दिवाळीच्या सुट्ट्या नंतर ती intermidiate drawing ची परीक्षा होती. आठवडाच शिल्लक होता. सुनी आणि मी काहीवेळा दुपारचे प्रॅक्टिस करत असायचो. कधी ती माझ्याकडे यायची तर कधी मी तिच्याकडे. पण नेमकं परीक्षेच्या दोन दिवस आधी तीला ताप भरला. मी तीला शाळेत जाताना बोलवायला गेलो तेव्हा हे तिच्या आईने मला सांगितले. तिच्या आईने मला शाळेत पण निरोप द्यायला सांगितला वर्गशिक्षकांना. हजेरी घ्यायच्यावेळी त्यांनी सुनीचं नाव घेतल्यावर मी सरांना सांगितलं तसं.
शाळा सुटली मी घरी येऊन आवरून सुनिकडे गेलो. घराबाहेर डबल स्टॅन्ड वाली सायकल मला दिसली. सचिन तिच्याकडे आला होता.
मी घरात गेलो. सुनी बैठकीवर बसली होती. एका खुर्चीत. सचिन होता.
" काय सुने? आजारी पडायला हीच वेळ सापडली का तूला? परवा drawing exam आहेत. बस कर हा आता. उद्या रेडी रहा. मी नेतो तूला. Exam बुडवायची नाहीये." मी म्हणालो.
तिने बोलायला तोंड उघडलेच होते. तितक्यात सचिन बोलायला लागला.
" नेत्रा..!! मरू देत ती exam एवढं काय त्यात? तब्येत जप. सारखं काय जीव घासत बसायचा. काही गरज नाही. दोन तीन दिवस आराम कर. बरी हो. Drawing वैगरे चा काय उपयोग आहे असा पण? " सचिन मधेच बोलला.
" बघ!! असं असतं. माहित काहीच नसतं पण घालायचं मधेच तोंड. Drawing सुनीचं वेड आहे. ती हॉस्पिटल मध्यें ऍडमिट असती तरी उद्या exam ला आलीच असती. हे तर किरकोळ आजारपण आहे. सुने थोड्यावेळाने फ्री हँडची प्रॅक्टिस करू. मी येतो साहित्य घेऊन." मी त्याच्याकडे बघत बोललो.
" तू हो की ऍडमिट. ती का होईल.? नीट बोल की जरा आणि काही गरज नाहीये प्रॅक्टिस करायची. आराम करू दे तीला. " सचिन म्हणाला.
"ए!? आहे कोण रे तू आमच्यात बोलणारा? कधीची तुझी बडबड ऐकतोय " माझा राग उसळत चालला होता.
"दाखवू का?" तो म्हणाला.
"हा!! बघू तरी?" मी म्हणालो.
तो उठून उभा राहिला तसा मी त्याच्या एकदम जवळ जाऊन उभा राहिलो. जवळ जवळ त्याच्या नाकाला नाक लावून.
" दोघे शांत व्हा रे!! प्लिज..मला बरं वाटेल." सुन कळवळून म्हणाली.
" याला आत्ता इथून निघायला सांग सुनी. नाहीतर मी परत तुझ्या दारात पाऊल ठेवणारं नाही. " मी म्हणालो.
"अरे काय..? असं का बोलतोयस? " ती म्हणाली.
" तू त्याला सांगतीयेस की मी जाऊ? " मी परत एकदा कणखरपणे म्हणालो.
" नेत्रा..!! असू देत. असल्या घमेंडी लोकांमुळे स्वतःचं डोकं नको खराब करुन घेऊ. जातो मी. " असं म्हणत तो गेला.
" चल निघ.. चल!!" मी त्याला हकलत म्हणालो.
" जाडू तू का केलं असं? माझ्याकडे येणार नाही म्हणालास." सुनी त्रासिक चेहरा करत मला म्हणाली.
" तूला त्याचं काहीही खटकलं नाही ना? जाऊदे, असपण त्याचा visiting hour संपला होता. आणि माझा पण संपलाय. येतो मी. उद्या drawing exam ला ये. " एवढं बोलून कोरडेपणाने मी तिच्या घरातून बाहेर गेलो.
🍁🍁🍁🍁
संध्याकाळी मी शाळेच्या ग्राउंड वर गेलो. तिथे सचिन आज सगळयांचा वॉर्म अप घेत होता. सर आलेले नव्हते. मी पण करू लागलो.
पण सचिन म्हणाला, " उशिरा आल्याबद्दल आधी दोन राऊंड मार ग्राउंडचे."
"तू सर नाहियेस. जे काम दिलंय ते कर. डोक्यावर बसायला बघू नकोस." मी त्याला म्हणालो.
भले आम्ही एका वर्गात. पण इथे तो मला सिनियर होता. त्यामुळे माझ्या अशा बोलण्याने त्याच्या अहम ला डंख बसला. तो सरांची काठी घेऊन माझ्या कडे आला. त्याने काठी उगारली. पण मी ती खाली यायच्या आतच त्याच्या जबड्यावर जोरदार अशी चपराक लावली होती. सोबतच लाथा बुक्क्याचा प्रसाद पण मी त्याला देऊ लागलो. माझ्यात इतकी ताकत असू शकते याचा त्याला अंदाज नव्हता. तो घाबरून मागे सरला. दोघांनी मला धरून बाजूला केलं.
माझ्याकडून उन्मत्तपणा घडला होता. सचिनला मार देऊन मी त्याचा कळस केला. माझं चित्त बिघडलं होतं. बेपर्वा वागण्याची किंमत असतेच आणि ती चुकवावी लागते. मला चुकवावी लागणार होती. हे मला तेव्हा ठाऊक नव्हतं.
🍁🍁🍁🍁
माझं फुलणं तुझ्यामुळं
अन कोमेजणं ही
माझं बरसणं तुझ्यामुळं
अन कोरडेपण ही.
- क्रमशः
शब्दभ्रमर 🍁🍁