सदावर्ते विद्यालयाच्या प्राथमिक विभागासमोर छोट्या व्हरांड्यात मला सुनी दिसली होती. बालवाडीचा पहिलाच दिवस आणि माझी आई मला शाळेत घेऊन आली. समोर पाहतोय तर अंगणात खेळत दिवस काढलेले आम्ही बालमित्र मैत्रीण एकाच शाळेत असण्याचा उलगडा मला झालेला.
मी खुश होऊन ओरडलो होतो.
"थुनी..!! "
"जालू..ss!!" तिने मला बघताच तिचे डोळे चमकले आणि तीही हसून टाळ्या पिटत आनंदाने ओरडली.
आम्ही दोघांनी धावत येऊन एकमेकांना घट्ट मिठी मारली होती. आमच्या आया आमच्याकडे पाहून खूप हसत होत्या. वर्ग सुरु झाला. एवढं स्पष्ट आठवत नाही आता, मात्र काही वेळाने सुनी मला खिडकीच्या गजात तोंड खुपसून उभी असलेली दिसली. जवळ जाऊन बघितलं तर डोळे मिटून रडत होती. गालावरचे ओघळ तिच्या युनिफॉर्म वर ठिपकत होते.
" काय झालं थुनी?!" मी विचारलं.
मी विचारेपर्यंत तुडुंब तलावागत भरून बसलेली सुनी माझ्या आपुलकी भरल्या प्रश्नाने प्रसरण पावली.
"घली जायचं ssss" असं म्हणून तिने पसरलेलं भोकाड मला आजही आठवतं.माझा खांदा तिने घट्ट बोचकारून धरला होता.
तीला शिक्षिकेने कसबसं शांत केलं. तरीपण ती तोंड पाडूनच बसली होती. मग तीला खुलवण्यासाठी मी मधल्या सुट्टीत बसायला अंथरलेल्या सतरंजीवर कोलांट्या उड्या मारून दाखवल्या, माकडाची मिमिक्री केली, त्या पप्पू खोमण्याची विजार ओढली आणि भांडणं ओढवलं. पण सुनीला खुलवलं. ती रडू नये म्हणून माझ्यात आलेल्या ह्या शहाणपणाचा उगम मला अजूनही सापडत नाही. कदाचित आपापल्या घरी आम्ही एकुलते असल्यामुळे एकमेकांना दुकटे करण्यात आणि आधार देण्यात कुठेही कमी पडत नव्हतो. ती सवय फार आधी बालमनावर कोरलेली होती.
चौथीपर्यंत एकत्र एका वर्गात राहिलेलो आम्ही, पाचवीला मात्र विभागलो गेलो. कारण आम्ही शाळा बदलली. माध्यमिक साठी आम्ही मोठ्या शाळेत आलो. जरा admission घ्यायला मला उशीर झाल्यामुळे आमची तुकडी एकत्र आली नाही.
तिथे शाळेत दुरावा आला पण घरी आम्ही एकत्र खेळून, अभ्यास करुन ती कसर भरून काढायचो. सुनी माझ्यासोबत माझ्या मामाच्या गावाला कित्येक वेळा आलेली. तर मी, ती आणि तिच्या आईसोबत तिच्या मावशीकडे गावाला बऱ्याचदा जाऊन राहिलोय.
तिचे सगळे नातेवाईक मला ओळखतात तर माझे सगळे तीला. मुली मुलांपेक्षा लवकर कळत्या होत असल्यामुळे असेल कदाचित.. सुनी आपोआप आमच्यात थोरली होत गेली. तर मला माझं धाकटेपण सुनीच्या सानिध्यात जपावं वाटत होतं.
तिच्या व्यक्तिमत्वाचा विकास मात्र तिच्या बाह्यजगात घडणाऱ्या गोष्टींत रुळण्यामुळे बहुरंगी प्रकारे होत होता. नवीन लोकांशी ओळखी, बिनधास्त मोठ्यांशी माणसांशी, शिक्षकांशी गप्पा मारणे. योग्य असल्यास जागेवर सडेतोड उत्तर देणे. आपला मुद्दा ठणकावून सांगणे. तिची हुशारी, वागणं आणि छान नीटनेटक दिसणं यामुळे ती वर्गातच काय, पण शाळेत नावाजली जात होती.
मी मात्र अगदी विसंगत आणि आतल्या गाठीचा. ती गाठ उलगडण्याचा हक्क मात्र सुनिकडे होता. ती बेधडक माझ्या अंतरंगात प्रवेश करुन हवं ते जाणून घेऊ शकत होती. जेवढा मी माझ्या आईबाबांशीपण खुलत नव्हतो तेवढा मी सुनिसमोर मोकळा होत होतो. हे अगदी सहज घडत आलेलं.
पण...
मला नेमकं माहित नव्हतं कि आमच्या या नात्याने एक वाट धरलीये का? सुनी जगात वावरत जगातलं बरं वाईट जोखणारी व्यक्ती बनत चालली होती. तर माझा प्रवास ती वगळता एकांगी होता. मला जगाचं पडलं नव्हतं. माझी संवेदना फक्त तिच्याशी निगडित होती. खरंतर मी कधीच तसा व्यक्त झालो नाही तिच्यासमोर. कारण मग तिच्या मार्गात मी अडथळा बनलो असतो. मी जरी तिच्याशी सलग्न होतो तरी तिने तसेच माझ्याशी सलग्न होणे, हा आग्रह मी धरावा. हे आता तरी चूक आहे असं मला वाटू लागलं होतं.
सचिन आणि तिची मैत्री एवढी काही घट्ट नव्हती कि मी त्याचा धसका घ्यावा. जे काही घट्ट बिट्ट वाटत असेल ते त्याच्याकडूनच. सुनी माझी जिवलग मैत्रीण होती. त्यामुळं मी आता निर्धास्त झालो होतो.
🍁🍁🍁🍁
सुनीच्या घरी गौरी गणपती दोन्ही असायचे. आमच्या गावाला काकांकडे बसत असल्यामुळे आम्ही नव्हतो बसवत. पण गौरी उद्यापनाच्या दिवशी सुनीची आई सत्यनारायण पूजा घालत असे. मी सुनीच्या घरीच असायचो त्यादिवशी. गणपती मंडळात जाने वैगरे मला नाही आवडायचे. मी आपला घरातल्या गणपतीचा पुरस्करता होतो.
त्यावर्षी नेहमीप्रमाणे तिच्या आईने हळदी कुंकू ठेवले होते. छानशी आरास केली होती. फराळ,फळे, नैवेद्य यांचा सुवास सुटला होता. पण सर्वात त्यावर्षीची वेगळी गोष्ट म्हणजे सुनीने आईच्या मदतीने चक्क साडी नेसली होती. ती तशी चांगली उंच होती. पण साडीत तर फारच मोठी दिसू लागली. मला तर विश्वास बसेना कि ही सुनी आहे. मी तीला बघतच राहिलो.
" काय जाडू?? कशी दिसतीये मी?" सुनीने स्वतःभोवती एक गिरकी घेत मला विचारले.
" तुझ्या आईसारखीच छान!" मी म्हणालो. काकूंनी माझ्या चेहऱ्यावर हात फिरवला. मग सत्यनारायणाला आणि हळदी कुंकवाला बायका येऊ लागल्या म्हणून मी तिच्याकडून निघालो. तेवढ्यात समोरून सचिन आणि अभिजित येताना मला दिसलें.
सुनीने बोलवले असणार. मी परत उलटा फिरलो आणि आत आलो. माहित नाही असं का करावं वाटलं मला त्यादिवशी.
" अरे सचिन ये.. अभिजित पण आलाय का? आई माझे वर्गमित्र आलेत. " सुनी म्हणाली.
सचिन तिच्याकडे पाहून दिपला होता असे म्हणायला हरकत नाही. आणि सुनी... सुनी जरा जास्तच हसऱ्या चेहऱ्याने वावरतीये असे मला वाटले. तिच्या देहबोलीतून तिचं अवघडलेपण मी टिपलं.. पण माझ्यासमोर साडीमध्ये येताना तीला तसा अवघडलेपणा जाणवला नाही. याचा मला आनंद वाटायला हवा कि आणखी काय मला कळत नव्हतं.
" जा रे! त्यांना तीर्थ प्रसाद दे." काकू माझ्याकडे बघून म्हणाल्या.
सचिन अभिजित माझ्याकडे प्रसाद घ्यायला आले.
" काय छोट्या? तूला बसवलाय का प्रसाद द्यायला." सचिन हळूच म्हणाला.
" मग.. ताईने सांगितलेलं काम कसा नाय ऐकणार तो? " अभिजित पण हळूच म्हणाला.
मला त्या परिस्थितीत काय बोलावं सुचत नव्हतं. पण चीड तर नक्कीच आली होती. सुनी जे समजून याला मदत वैगरे करतीये त्या लायकीचा हा मुळीच नव्हता. मी सरळ सचिनच्या मनगटावर तीर्थ सांडेल अशा पद्धतीने पळी रिकामी केली.
" छोटी मुलं चुकू शकतात ना? दादा? " त्याला खिजवत मी पण म्हणालो.
" अरे अरे हे काय केलंस रे? " काकू म्हणाल्या.
" अरे रे.. बोलायच्या नादात चूकन झालं काकू." मी म्हणालो. यावेळी मी खिल्ली उडवल्यागत बारीक हसत होतो त्या सचिनकडे बघून.
मी त्या सचिनच्या चांगल्या क्षणांची वाट लावली होती. सुनीला पाहून हुरळून गेलेल्या आणि तरीसुद्धा त्या धुंदीत मला चिडवणाऱ्या त्या दांभिक डोक्याला मला जरा अद्दल घडवावी वाटली. प्रत्येक वेळी सगळंच सहन करणाऱ्यातला मी नव्हतो. सुनीने त्याला हात धुण्याबद्दल सुचवले.
" अगं थांब.. मी नेतो त्याला. बाहेर आहे कि नळ." तिच्या अंगणात झाडांना पाणी द्यायला एक नळ होता. तिथे नेऊन मी त्याला हात धुवायला सांगितलं.
त्याने धुतला आणि परत यायला निघाला.
" आत कुठे चाललास परत?? घेतलास ना प्रसाद? जा आता? " मी त्या माझ्या मानाने बऱ्याच आडदांड असणाऱ्या सचिनला म्हणालो. तो माझ्याकडे तीक्ष्ण नजरेने बघू लागला.
" मी सांगतो तीला. निघ तू. " मी परत बोललो.
अभिजित माझ्याकडे सरसावला. तसं सचिनने त्याला हाताने नाही ची खूण केली. दोघे सरळ निघून गेले.
" गेले का ते दोघं? " आत येणाऱ्या मला बघत सुनीने विचारले.
" हो जातो बोलले आणि गेले. " मी म्हणालो.
काहीतरी येऊ घातलं होतं. कदाचित परिवर्तनाच्या आधीचा विध्वन्स... मी स्वतःचं त्याला आमंत्रण दिलं होतं. स्वत्व झटकायची वेळ आली होती.... आणि मला वेळ पाळणं कायम आवडत आलंय.
🍁🍁🍁🍁
माझं आभाळं कोरं नाहीच
त्यातही करड्या छटा आहेत
उगवत्या केशरी रंगा मागे
काळ्या ढगांचे कळप आहेत..
- क्रमशः
शब्दभ्रमर 🍁🍁