Kondan Parva One - Part 16 in Marathi Love Stories by Shabdbhramar books and stories PDF | कोंदण पर्व एक - भाग 16

Featured Books
Categories
Share

कोंदण पर्व एक - भाग 16

"विरह"


"अरे बटणच सापडत नाहीत मला. F आणि J वर बोटे ठेवायची. पण मग जर बाकीची बटणं दिसलीच नाही तर मग न बघता कशी दाबायची?" पल्लवीचे निर्बुद्ध बडबडने गेले आठवडाभर मला सहन करावे लागत होते आणि पुढले तीन आठवडे पण तेच सहन करावं लागणार होतं.


तिने पण कॉम्प्युटर चा क्लास जॉईन केला होता.
आमचा गाव तसा बऱ्यापैकी बरा आधुनिक होता. सगळ्या सोई हळूहळू वाढत होत्या. कॉम्प्युटर क्लास उघडून दोन वर्षे झाली होती. मला interest होताच. पण मागल्या वर्षी उन्हाळ्यात नातेवाईकांमध्ये असणाऱ्या दोन जवळच्या लग्नामुळे पुढे ढकलला आणि या वर्षी लावून टाकला. 

पहिल्यादिवशी मी क्लास मध्ये आलो. सरांनी मला एका कॉम्प्युटरवर बसवले. त्यावेळी Ms Dos ऑपेरेटेड system असलेले टायपिंग कमांड वाले कॉम्प्युटर्स असायचे. ज्यामध्ये सगळं ms dos मध्यें कमांड type करुन काम करावं लागायचं. आम्हाला फार basic शिकवलं जाणार होतं. मी यात खुश होतो की नवं काही करायला मिळतंय आणि कॉम्पुटरच्या क्षेत्रात काही शिकतोय.

"पुढल्या वर्षी मी नक्की लावेन तू लाव यावेळी." असं म्हणत सुनी गेली मामा मामीकडे. 

मी तीला बोललो होतो. "मी तूला शिकवेन त्यातलं. दिवाळीच्या सुट्टीत लाव तू पण."

तर.. त्या दिवशी मला कॉम्प्युटर क्लास मध्यें बसलेला असताना....
"ऐय्या आलायस तू क्लासला?? " असा अति टिपिकल सुरातला पण ओळखीचा आवाज ऐकू आला.
मागे वळून पाहतोय तर आमच्या वर्गातली आणि सुनीचं शेपूट असलेली तिची मैत्रीण पल्लवी साने.

"हिने पण लावलाय का? असेल आपल्याला काय? क्लास आहे कोणीपण लावू शकतं." मी मनात म्हणालो.

" सुनी मला म्हणाली होती, तू हा क्लास लावणारेस. मग मी पण ठरवलं टॉपर लोकं जे करतात ते करायचं. म्हणून मी ही इथे आले बाबांच्या मागे लागून लागून. यार!! तुझ्या आणि सुनीच्या डोक्यात बरोबर सुटीत काय करायचं सगळं रेडी असतं.."ती बडबड करत म्हणाली आणि शेजारच्या system वर बसली.

" स्नेहा म्हणत होती कराटे लावू. पण मला कुठं कोणाला टोले द्यायचेत.. लाव बाई म्हणलं तूच. मला हुशार मुलांच्यात राहून तसच बनायचंय.. उगाच नाही ते शिकून काय उपयोग..." 
एखाद्या पेडल मारलेल्या शिवणयंत्रासारखी ती बडबडत होती.
घडघडघडघड.... थांबणं तीला माहीतच नव्हतं.

" अगं मग सुनिसारखं लाठी काठी शिकायचं, शिवाय कथक.. ते लावलंस की नाही? " मी ताबा ठेवण्याची पराकाष्ठा करत विचारलं.

" ते नंतर.. आधी कॉम्प्युटर क्लास. इथे तू आहेस ना काही अडलं तर विचारायला. सुनी आली की शिकेन तिच्याकडून कथक. लाठी वैगरे नको बाई मला नाही जमायचं ते. ए!! मला सांगशील बरं का काही अडलं तर. मी बाबांना पण म्हणाले आमच्या वर्गात पहिला येणारा मुलगा आहे तिथे.. ते तयार झाले मग. बोलता बोलता सुनी म्हणाली होती. तू कधी वेळ नाही वाया घालवत.. आणि हो अजून काय ते?? हा नेहमी फोकस असतो तुझा नवं शिकण्यावर..." ती दंतपंगती विचकत बडबडत होती होती.

सत्यानाश!! सुनी जाता जाता मुद्दाम करुन गेली असणार हे. आल्यावर बघतो तीला. असं मनात म्हणत प्राप्त परिस्थितीला समोर जायला मी सज्ज झालो. 

पण परिस्थिती फार बिकट आहे हे प्रत्येक गोष्टीत मोठ्याने "ऐय्या!!" ऐकताना समजू लागलं होतं.

एकदा तर कॉम्प्युटर च्या CPU मध्यें "मदर बोर्ड" असतो हे सर सांगून गेले. 

"ऐय्या तर मग "फादर बोर्ड" कुठे असतो ते कधी सांगणारेत?" असं ही बाई अतिशय निष्पापपणे म्हणालेली.

" ABCD सरळ का नाही लिहिलं याच्यावर, Tv ला हा कीबोर्ड आणि CPU लावला की झाला ना कॉम्पुटर? कॉम्पुटरचा CPU त्याचा मेंदू आहे तर मग त्याला आपण का कमांड देत बसतो. त्याचा तो विचार करुन करेल की काय करायचं ते.. " या आणि या सारख्या अनेक विचित्र प्रश्नानी तिने माझा कॉम्पुटरचा क्लास सुखद (?) बनवला होता. 

त्यात तिचं ते "ऐय्या" नारळाच्या झाडावरून धपकन नारळ पडल्यासारखं अवचित पडायचं. 

कमांड लिहून घ्यायला आणलेल्या वहीत सर सांगत असले तरी त्यांचं ऐकून न लिहिता तीला माझं बघत लिहायचं असायचं.

" अरे तू चुकणार नाहीस ना? म्हणजे माझं पण चुकणार नाही. असं तिचं म्हणणं होतं.

"सतत आपलं असं सरक तसा हो.. मला दिसेल अशी ठेव वही.." असं बोलत राहायची.

मी कमांड type करायला घेतली की. " आता कोणतं बटण दाबलंस. थांब थांब मागे जाणार बटण दाब ना.. परत दाखव ना कसं केलंस? " माझी एकाग्रता भन्ग करायचा चंग बांधलेली ही चेटकीण माझा छळ करत होती. माझा संयम ताणून ताणून तुटत आला होता. 

एकदा सरांना मी विचारलं हिला चुकवून. "उशिराची बॅज देता का?" 

तर ते म्हणाले, "तेव्हा ऍडव्हान्स वाल्या बॅच असतात. तूला एकट्याला बेसिक कसं शिकवणार त्या time मध्यें." 

माझी दुसऱ्या आठवड्यात चीड चीड व्हायला लागली. ही सुनी त्या पल्लीला कसं झेलत होती कोणास ठाऊक? नुसती भुणभुण.. भुणभुण.. जरा शांत नाही. 

एकदा सर एका डायरेक्टरी मधून दुसऱ्या डायरेक्टरी मध्यें जाऊन तिथे नवी डायरेक्टरी कशी तयार करायची ते शिकवत होते. त्यांनी समजवून सांगितलं. मी माझ्या पद्धतीने टिपणं काढत, वहीत त्याची प्रोसेस लिहिली.

सरांनी करुनही दाखवलं. मग आम्हाला त्यांनी process प्रमाणे प्रॅक्टिकलं करायला सांगितलं. मी सुरु केलं.

डिरेक्टरी मध्यें जाण्यासाठी कमांड टाकतंच होतो तितक्यात हिचा आवाज आला. 

"ए थांब थांब!! मला पण दाखव. काय केलंस? काय केलंस?" पल्लवी म्हणाली.

" अजून काहीच केलं नाहीये.. आणि आज करणार पण नाहीये मी? " मी शांतपणे श्वास भरून घेत म्हणालो. माझ्या संयमाने उत्तर पत्रिका ठेवली होती.

" का रे?? कर ना!! नोट्स लिहिल्या न तू कमांडच्या? त्यात बघून कर ना..मग मी पण करेन.. तू दाखवलंस की." ती म्हणाली.

" तू माझ्याकडे क्लास लावलायस का?" मी विचारले.

" अरे तसं नाही.. समजलं नाही म्हणून म्हणाले तू दाखव करुन." ती म्हणाली.

" प्रत्येक वेळी नाही समजत तूला. कसं काय? " मी विचारलं.

" अरे अवघड आहे. मला त्या इंग्लिश मधल्या कमांड नाही कळत." ती म्हणाली.

" पण मग तुझा तू प्रयत्न करताना पण दिसत नाहीस. सतत मलाच विचारतेस. थोडा तरी प्रयत्न कर ना. मी पण शिकतोय. मला disturb नाही होतं का? एकतर सतत बडबड चालू असते तुझी. वरून मला माझं शांतपणे प्रॅक्टिकल सुद्धा करुन देत नाहीस. तूला जमेल तसं कर आधी.. आणि नाही जमलं तर विचार. उगाच सारखं सारखं काय करतो? म्हणून भुणभुण नको लावू मागे. " मी तीला जरा चिडूनच बोललो.

मग मी माझं काम सुरु केलं. माझं प्रॅक्टिकल झालंच होतं. तेवढ्यात शेजारून नाकं ओढल्याचा आवाज येऊ लागला.
मी पल्लवीकडे बघितलं तर बारक्या रुमालाने डोळे पुसत तिने नाकाचा शेंडा लाल केला होता.

कल्याण!! ही रडायला लागली.

" रडतीये तू? " मी विचारलं.

" सुनी असती तर असं वागली नसती, किती समजून घेते ती. तू कसला रागीट आहेस. कसं बोललास माझ्याशी तुसड्यासारखा. आपण एका वर्गात आहोत ना? मग असं वागतं का कोणी वर्गातल्या मुलीसोबत. " ती फुसफूसत म्हणाली.

" हे बघ!! मी सुनी नाहीये, आणि मी तुझ्याशी नीट बोलायला तू पण सुनी नाहीयेस. मुळात इथं सुनी नाहीये म्हणून तू तिचं नाव घेऊन उगाच विषय ताणू नकोस. " मी वैतागून बोललो.

" म्हणजे? सुनी सोडून तू इतर कुठल्याही मुलीशी असंच वागतोस का?" तिने विचारले.

क्षणात मी निरुत्तर झालो होतो. 
सुनी सोडून..?? सुनी सुटतच नाही कधी. ती सोडून इतर कोणी माझ्या गिणतीत नाहीचे. मला माहीतच नाही इतर कुठल्याही मुलीशी कसं वागायचं. कारण सुनीने मला कधी इतर कुठल्याही मैत्रिची गरज पडूनच दिली नाहीये. माझ्याशी कसलीही बाष्कळ बडबड करणं.. मला खोड्या काढून सतवणं हे तर तिचे आवडते प्रकार होते. पण मी तीला कधीच वैतागलो नाही.

इतरांशी सहज वागण्यात सुनीला तशी अडचण नाही येत. कारण मानसिक पातळीवर ती बरीच सर्वसमावेशक आहे. हा गुण आपल्यात नक्कीच नाही. सुनिसारखं नाही पण किमान मी स्वतःमध्ये थोडं तरी सौजन्य नक्कीच आणायला हवं असं मला त्यावेळी वाटलं.

" बरं!! सॉरी.. आता रडणं थांबव. मी सांगतो तूला कसं करायचं ते. पण सर शिकवताना थोडं शांतपणे आणि लक्षपूर्वक ऐकत जा गं. थोडा तू पण खोलात जाऊन विचार करायला शिक, की हे कसं करू शकतो आपण. तूला स्वतःला सुधारायचे असेल तर पाहिले स्वतः भरपूर प्रयत्न करत जा. अगदीच लिमिट संपलं की मग मदत माग. Ok? " मी शान्तपणे तीला म्हणालो.

" ठीके!!" ती म्हणाली. ती रडका चेहरा सरळ करण्याच्या प्रयत्नात गमतीशीर दिसत होती.

मला भसकन हसायलाच आलं. मला हसतांना बघून ती पण हसायला लागली. 

" तू खूप गंभीर असतोस बाबा.. पण खडूस अजिबात नाहीयेस. सुनी लकी आहे." ती म्हणत होती.

सुनी सोडून पहिल्यांदाच कोणी दुसरी मुलगी माझ्याबद्दल काही बरं बोलत होती. पण सुनी लकी आहे हे तिचं वाक्य मला जरा कोड्यात टाकून गेलं. मी खरंतर आज सुनीला खूप miss करत होतो. तिच्यासाठी माझ्याकडे पर्यायच नव्हता.

🍁🍁🍁🍁

बेजोड असं जवळ असल्यावर
का तमा ठेवली जाईल स्वर्गाची?
नकोच तो दुसरा विचार कोणाचा.
कशालाच सर नाही तुझ्या नखाची.

- क्रमशः

शब्दभ्रमर