B.Ed. Physical - 23 in Marathi Moral Stories by Prof Shriram V Kale books and stories PDF | बी.एड्. फिजीकल - 23

Featured Books
  • THIEF BECOME A PRESEDENT - PART 5

    भाग 5 (मजेदार मोड़): एक सनकी हसीना का आगमन टिमडेबिट ने सब सच...

  • बेवफा - 44

    ### एपिसोड 44: नई सुबह की ओरसमीरा की ज़िन्दगी में सबकुछ बदल...

  • सर्वथा मौलिक चिंतन

    भूमिका मित्रों उपनिषद कहता है सर्व खल्विदं बृम्ह,सबकुछ परमात...

  • Zom-Bai - 1

    EPISODE #1Episode#1 First Blood"लेफ्ट राईट, लेफ्ट राईट लेफ्ट...

  • शोहरत का घमंड - 155

    सोमवार का दिन........अरुण वकील को जेल ले कर आ जाता है और सार...

Categories
Share

बी.एड्. फिजीकल - 23

बी. एड्. फिजीकल  भाग 23  

 उपसंहार                                                                                                           

 

 रामानंद उर्फ नंदू लिमये, सदाशिव चावरेकर आणि आत्माराम रावूळ यांच्या  आठवणींवर आधारित – 

     लिमयेला शालेय जीवनापासूनच खेळाची आवड होती. आदर्श क्रीडा शिक्षक होणं हे त्याचं  स्वप्न होतं. म्हणून कांदिवली वास्तव्यात तिथल्या रुटीनचा त्याला कधी  कंटाळा आला नाही किंवा त्रासही जाणवला नाही. रोज सकाळ संध्याकाळी होणाऱ्या असेंब्लीत काही ना काही नवीन शिकायला मिळायचं. म्हणून रोजची असेंब्ली चुकवणं दूरच, त्याला तर सुटीच्या दिवशी  कंटाळा  यायचा. विविध उत्तेजक हालचाली, टेबल ऑफ एक्झरसाईझ, घाटी आणि देशी लेझिम, डंबेल्स, करेल्स, घुंगूर काठी, योगासने असे जे विविध प्रकार इन्स्ट्रक्टर  शिकवीत त्यांची काऊंट नुसार कृती लिमये डायरीला नोंद करून ठेवीत असे. रूमवर मोकळ्यावेळी त्या प्रकारांचा सराव करीत असे. त्यामुळे त्याला   सगळे साधनसहित प्रकार व्यवस्थित अवगत झाले होते. वर्षअखेरीला अनेक लोकानी   त्याच्या डायरीतून साधनसहित  व्यायाम प्रकाराच्या कृतींची  टिप्पणी  उतरून घेतली. पुढील आयुष्यातही या डायरीतल्या नोंदींचा  संदर्भ म्हणून चांगला  उपयोग झाला.  

    महाविद्यालयाच्या गेटजवळ एका बाजूला एक डेरेदार आंब्याचं झाड होतं नी आजू बाजूला  झाडी होती. म्हणून तिथून येता जाता  त्या आम्रवृक्षाच्या आडोशाला बरेच प्रशिक्षणार्थी हटकून लघवी करायला जात. हे सगळं एवढं अंगवळणी  पडलं होतं की तिथून जाताना निसर्गत: लघवीची भावना व्हायची. वेळी अवेळी तिथून जाता येता आंब्याच्या आडोशाला जावून लघवी करणं हा कित्येकांचा परिपाठच झाला होता म्हणाना.  त्यादिवशी  आमच्या ग्रूपमधल्या कुंटे आणि महात्मे यांचे उत्कर्ष मंदिर मालाडला लेसन लागले होते.मला त्यादेवशी पाठ नव्हता पण खोलीवर रिकामं बसून राहण्यापेक्षा सरावपाठांची निरीक्षणं पुरी करण्यासाठी म्हणून मीही  निघालो होतो. मालाडला पाठ असले की  कांदिवली रेल्वे स्टेशनवर न जाता आम्ही तेवढ्या चालीत  सरळ डोंगरीतून शॉर्ट कट्ने मालाडला चालत जात असू.  

                  रूमवरून बाहेर पडल्यावर मेन गेटजवळ गेल्यावर प्रशिक्षणार्थी  नेहेमीच्या सवयी प्रमाणे आंब्याच्या झाडाखाली लघवी करायला वळले  तर त्यादिवशी  तिथे बरीच लोकं जमलेली होती. चौकशी करता समजलं की, त्या आंब्याखाली जी उभट आकाराची काळवत्री  शीळा होती ती  म्हसोबाचं स्थान मानीत असत.  कार्तिकी द्वादशीला तिथे सालाबाद पुजा वगैरे करायचा प्रघात होता. लोकानी  त्या शीळेवर फुलं हार घालून  समोर तेलाचे दिवे नी अगरबत्त्या वगैरे लावलेल्या होत्या. संध्याकाळी आम्ही लेसन वरून परत आलो तेंव्हा  सगळ्याना ही गोष्ट समजलेली होती. आमची पापभीरू मनं आम्ही केलेल्या आगळीकी बद्दल  खायला लागलेली होती. मग कोणीतरी  त्यावर उपाय सुचवला की यापूर्वी अज्ञानाने  नको ते कृत्य हातून घडलं म्हणून म्हसोबा समोर नाकतोंड घासून माफी मागायची. तिथे कायम लघवी करणाऱ्या सर्वानीच मग म्हसोबाच्या शीळे समोर  नाकतोंड घासून क्षमा मागितली. तेंव्हा जरा मन हलकं झालं. त्या दिवसानंतर मग नेहमी तिथून जाताना  चप्पल काढन म्हसोबाला वंदन करून पुढे जायचा आमचा रिवाज सुरू झाला.  

      प्रभूची एक हृद्य आठवण आमच्याकडे आहे. ती म्हणजे आमच्या संपूर्ण बॅच मध्ये बॉक्सिंग  आणि ‘पंजा’ खेळण्यात माहीर होता. बॉक्सिंग मध्ये एकदा त्याच्या हातचा प्रसाद खाल्ल्यावर कोणीही त्याच्यासमोर जावू धजावत नसे.  पंजा लढविण्यात सुद्धा  एकही मायेचा पूत प्रभूसमोर टिकू शकत नसे. खूप जणानी शिकस्त करून बघितली पण प्रभू सगळ्याना पुरून उरे. आरंभी ही  बाब लक्षात आल्यावर आबा चौधरी  दहा / वीस  रुपये  लावून चॅलेंज द्यायचा. पैशाच्या आमिषाने सुरुवाती सुरुवातीला  काही घमेंडखोर पहिलवान मंडळी  पुढे येत. अर्थात दोन अडीज मिनीटातच प्रभू त्याला नमवीत असे. प्रभू जिंकला की  मिळालेल्या पैशाची  पार्टी  व्हायची..  त्याला  थोडीफार टफ फाईट काझी देई, पण शेवटी प्रभू त्याला कायम हरवीत असे. आमच्या ग्रूप मधला गोवेकर तसा कमी पण मार्मिक बोलणारा. पंजा खेळताना प्रभू जिंकला की गोवेकर अगदी  इरसाल टिप्पणी करायचा. आता ही कान फोडलेली घाटावयली ढेलां बगा. ही काय्येक कामाची नाय..... ह्येंच्यो  बढायो  म्हंजे इतभर तोवसा नी हात भर बी  तशातली तऱ्हा..... येकेक जून म्हंजे  फुकट मिळता म्हनान गादाडभर खावन् निस्तो  रेड्यासारको चरबलेलो हा . येक जून कापून घतलो तरी गाव जेवान होयत्....... !   

                वसईचा आबा चौधरी  हा  तब्बेतीने तसा सुमार्च होता. पण  तो उत्कृष्ट  स्प्रिंटर म्हणजे धावपटू होता.  100 /200/400/ 800/ 4000  मीटर  या पाचही रनिंग इव्हेण्टमध्ये बॅच मधला  कोणीही  त्याच्या जवळपासही पोचू शकला नाही. या पाचही ईव्हेण्ट्मध्ये  त्याने कुलाला पहिला नंबर मिळवून दिला. तसेच  मांडवे  हा मल्लखांबामधले यच्चयावत्  सगळे प्रकार अगदी लीलया करीत असे. आमच्या कारकिर्दीत  सोशल मिडिया  नव्हता. तसेच  आम्ही बी.एड्. झाल्यावर  फक्त एक बॅच  भरली आणि कॉलेजला टाळं लागलं  त्यामुळे  एकदा बी . एड्. करून बाहेर पडल्यावर सर्वांशीच संपर्क तुटला. आमच्या बॅचच्या  स्मरणिकेत  सर्व प्रशिक्षणार्थिंचे घरचे पत्ते होते खरे पण बी. एड्. केल्यावर जो  तो  नोकरीसाठी  कुठे कुठे स्थायिक झाला.  त्यामुळे  स्मरणिकेतल्या पत्त्यांवर पत्र पाठवूनही  कोणाशी संपर्क करता येईल याचा भरवसा उरला नाही. आता  सगळे  फक्त  भावविश्वात  उरलेले आहेत. काही  नावांच तर पूर्णपणे विस्मरण झालेलं आहे. आम्ही चौघानीही  खुप प्रयत्न करूनही   १०० पैकी  जेमतेम   पंधरा जणांची नावं  आम्ही गठित करू शकलो.   

                                          इत्यलम् .........