बी. एड्. फिजीकल भाग १७
प्रा.गोंदकरांचा रोल पूर्वनियोजीतच होता. याबरोबर खेळ संपवून जादुगार नी चमुरा सामान पोतडीत भरून जायला लागल्यावरजाधव म्हणतो, “ये चमुऱ्या तुज्या वस्तादालासांगून माजं हात मोकळ कर गड्या .... उद्या उत्कर्षमदी माजा ल्येसन हाय..... तितं फळ्यावर लिवू कसं? खोटं वाटत आशेल तर प्रिंशीपाल सायबास्नी इचार.....” ह्या डायलॉगवर प्राध्यापकानी उभं राहूनटाळ्या वाजवल्या. ही अॅडिशन जाधवने आयत्यावेळी स्वत: घेतलेली होती.नंतर झालेली अंकांचीगंमतगाणीही सर्वाना आवडली. मग गुजराती मुलीनी दहाचा पाढा गुजरातीतून, हिंदीतून वेगवेगळ्या हिंदी गाण्यांच्या चालीत म्हणून शेवटी मराठीत मंगलाष्टकाच्या चालीत म्हणून एकमेकींच्या गळ्यात माळा घातल्या. शेवटी कार्यक्रम संपताना प्राचार्यानी जादुगार चमुऱ्याची मिमिक्री पुन्हा सादर करायला सांगितली.कार्यक्रमाच्या शेवटी ‘वी शॅल ओव्हरकम’गीतप्राचार्यानीसगळ्या वर्गाकडून कोरसमध्ये म्हणून घेतलं.मॅथ्स ग्रूपचा कार्यक्रम अपेक्षे पेक्षाही रंगला. त्यानी या कार्यक्रमासाठी खास फोटोग्राफरही आणलेला होता.
कार्यक्रम संपल्यावर ज्युलिया आणि जाधव दोघानीही मला अगदी पायाला हात लावून नमस्कार केला. ज्युलिया म्हणाली, “काले , छोटे भैय्या, तू मला प्रॉमिस केला होतास ते पुरा केलास..... आमच्या ग्रूपचा कार्यक्रम चांगला झाला त्याचा क्रेडीट मी तुलाच देते. नायतर आमचा शो फ़्लॉप गेला असता. नी हे मॅजिक फिगर आयट्म तर एकदम सुप्रिम.....” ज्युलियाला तर त्या नंतर सगळेजण ती दिसली की, ‘बोल चमुरे’ म्हणून सलामी देत. मेथडच्या सगळ्या कार्यक्रमात मॅथ्सलाल्यांचा कार्यक्रम "एक ऩंबर" असं सगळे प्रशिक्षणार्थी च नव्हेत तर प्राध्यापक सुध्दा म्हणायचे. या ग्रूपमध्ये सगळी मुलं सधन कुटुंबातली होती. त्यानी मन सोडून बेफाटखर्च केला होता. सामुहिक गीताना ड्रेस कोड केला होता. आयटम्ससाठी सामानही मजबूत खरेदी केलेलं होतं. त्या ग्रूपने पार्टीलाही भरपूर खर्च केला. ‘ड्रिमगर्ल’ या त्यावेळी दोन दिवसापूर्वी रिलीज झालेल्या सिनेमाच्या शनिवारी रात्रीच्या शो ची स्पेशल क्लासची तिकीटं बुक करून थ्री स्टार हॉटेलमधे लंच नी मग सिनेमाअसा बेत ठरवला. त्या ग्रूपने प्राचार्य आणि सगळे प्राध्यापक, नॉन टिचींग स्टाफ या सर्वाना लंचसाठी बोलावले होते. त्याना न्यायला नी आणून सोडायला टॅक्सी बुक केल्या होत्या. मी आयुष्यात प्रथमच थ्री स्टारमध्ये लंच घेतलं.नंतर प्रभूकडून मला कळलं की, कार्यक्रम, लंच नी सिनेमा मिळून पार्टीसाठी सोळा जणानी प्रत्येकी चारशे रुपये काढले होते. तरी फोटोग्राफरचं बील जाधवने एकट्यानेच दिलेलं होतं. त्यानी पार्टीसाठी खर्च केली एवढी रक्कम मला संपूर्ण वर्षभरच्या खर्चाला सुद्धा लागली नाही.
सगळेच गट गीतं बसवून घेणेनी प्रॅक्टिस करून घेण्यासाठी मलाच गळ घालीत. नी मी आखडूपणा न करता मोकळेपणाने मदत करी. प्रोग्राम सादर करताना पेटीची साथ, वेषभुषा नी मेकप करणे यासाठीही माझी मदत हा जणु अलिखित करारच झालेला होता म्हणाना. कारणप्रत्येक गटाचे मार्गदर्शक प्राध्यापक सराव करून घ्यायला आले की आवर्जून मला बोलावूनघेत असत. त्यामुळे सगळ्या मेथड ग्रूपच्या पार्ट्यांची मजाही मला लुटता आली. सगळ्यातशेवटी भूगोल मेथडचा कार्यक्रम झाला त्या मेथडलाअसलेला कोल्हापुरे उत्तम गायक होता. त्याचे नी माझे खूप मित्रत्वाचे संबंध होते.तो लेसन नोटस् काढून घ्यायला माझी मदत घेतअसे. तो आला की त्यावेळी दर खेपेला मी त्याला एखादं नाट्य गीत म्हणायला सांगत असे. तो निगर्वी होता. आणि मी जाणकार श्रोता म्हणूनही तो माझी कदर करायचा.त्यामुळे भुगोल गटाला त्यांच्या कार्यक्रमासाठी मला मदत करण भागच होतं. गटाचा कार्यक्रम पार पडल्यावर त्यांचे मार्गदर्शक प्रा. जाधव म्हणाले की, “आता काळे सराना जरानिवांतपणा मिळेल. वर्षभर सगळ्या गटांच्या कार्यक्रमाचं ओझं त्यांच्याच डोक्यावर होतं.”त्यानंतरच्या शनिवारी जाधवने मॅजेक शोच्या वेळी कबूल केल्याप्रमाणे पार्टीला बोलावलं. मी एकट्याला नको म्हटल्यावर तुझ्या सगळ्या ग्रूपला आण म्हटलं. आम्हा सातजणांच्या ग्रूपला जाधवने खरोखरच पोटभर पार्टी दिली. बरेच सहाध्यायी मला आदराने वागवीत म्हणून काही जळकटू त्यामुळे माझ्यावर खार खात असले तरी बहुसंख्य सहाध्यायींशी माझे एवढे जिव्हाळ्याचे संबंध होतेकी विंटर व्हेकेशन आणि नाताळ सुटी नंतर वीस पंचवीस मुलामुलींनी मला पिशव्या भरून खाऊआणून दिला होता.
जानेवारीत लेक्चर्स बंद झाली त्याच दिवशी दुपारी संध्याकाळी दोन वाजता कांबळे वॉचमन मला हाका मारीत आला.मी संध्याकाळी मालाडला जान्याचा तयारीत होतो. त्याच्या सोबत पोस्टमन होता. मला मुणगे हायस्कूल कडून ३४५ रुपयाची मनिऑर्डर आली होती आणि कुंभवडे हायस्कूल चे रजिस्टरपत्र होते. मी सही करून रक्कम नी स्लीप घेतली. मी ज्या मुदतीत तिथे जॉब केला होतात्या कालावधित महागाई भत्ता वाढ झाली होती. ती फरकाची रक्कम चिले सरानी दूरदर्शी पणाने कॉलेजचा पत्ता शोधून काढून मनिऑर्डर कमिशनही कापून न घेता स्वखर्चाने पाठवली होती. मग मी कुंभवडे हायस्कूलचे पत्र फोडले. तिथल्या हेड मास्तरनी मला जॉब ऑफर दिली होती. त्यांच्या हायस्कूलला इंग्रजी शिक्षकाचे पद रिक्त होते. त्या साठी मी विचार करावा. तसेच सध्या काही आर्थिक अडचण असेल तर हजार दोन हजाररुपये पाहिजे तर ताबडतोब पाठवू असेही त्यानी कळविले होते.
त्यावेळी माझी पुंजी संपत आलेली होती. शेवटचे फक्त वीस रुपये उरलेले होते. म्हणून पुढच्या खर्चासाठी पैसे मागून आणायचे म्हणून मी मुद्दाम जायला निघालो होतो. अकल्पितपणे माझी आर्थिक चिंता मिटली होती.मी वर्षभर अगदी जीव मारून मारून राहिलो होतो. माझ्याकडे एक चांगला ड्रेसनी दुसरा जुना होता. मी ते अगदी जपून वापरी. रात्री कपडे धुवून ते सुकल्यावर पहाटे उठून इस्त्री करून वापरी. चावरेकरची इस्त्री असल्यामुळे ही गोष्ट मला मॅनेज करताआली. आता शेपूट उरलेलं असताना आता खर्चाची तोंडमिळवणी कशी करायची? पुढे काय करायचं? हा मोठा घोर मला लागून राहिलेला होता. पण माझी काळजी परमेश्वराला.त्याने माझा मार्ग निष्कंटक केला होता. दुसरे दिवशी सुपेकरानीमला निळुभाऊंनी गोरेगावला बोलावल्याचा निरोप सांगितला. आता सगळ्या अॅक्टिव्हीटी बंद झालेल्या असल्यामूळे पूर्ण मोकळीकच होती. म्हणून मी लगेच बाहेर पडलो. मी गोरेगावला गेल्यावर नेहेमीप्रमाणे ओरपे वहिनींचा निरोप आला. मी गेलो. त्यानी मग खरे वहिनीना हाक मारली. त्या कॅरी बॅग घेवून आल्या. दोन्ही कुटूंबीयानी मिळून माझ्यासाठीरेमंडची पॅन्ट आणि शर्ट शिवून आणलेला होता. मागच्या खेपेला मी गेलो होतो तेव्हा मी झोपल्यावर माझ्या पॅन्ट शर्टची मापं त्यानी घेतलेली होती. असं नंतर नीला वहिनी बोलल्या तेंव्हा मला कळलं. भगवान देता है तो छप्पर फाडके देता है.... या उक्तीची प्रचिती मला पुरेपूर आली. अर्थात मी तो ड्रेस लगेच वापरायला न काढता घडी करून बॅगेत ठेवला. पुढे शाळेत जॉब मिळाल्यावर पहिल्या दिवशी सेवेत दाखल होताना मी तो ड्रेस घालून गेलो.
वर्षखेरीला सगळ्या अॅक्टिव्हीटीबंद खाल्यावर एकदा मालाड मधला मावसभाऊ विनायक याला मजेत होस्टेलवर घेवून आलो होतो.तो वस्तीला राहून सकाळी जाणार होता. आम्ही रूमवर गेल्यावर आमच्या बॅचमधला कोल्हापुरे नी प्रभू माझ्याकडे आले होते. विनायकलाही नाट्यसंगिताची आवड होती. म्हणून मी कोल्हापुरेला नाट्यगीत म्हणायला सांगितलं. त्याने गायन सुरू केल्यावर विनायक अक्षरश: मंत्रमुग्ध होवून ऐकत राहिला. गाणं संपल्यावर तो म्हणाला, रामदास कामत,छोटा गंधर्व अशा मोठ्या गायकांचं गाणं ऐकतोय असंच मला वाटल. माझा माझ्या कानांवर विश्वासच बसत नाहिये. तासभर गप्पा मारल्यावर आठ वाजता आम्ही मेसमध्ये जेवायला गेलो. ताटं मांडून झाल्यावर मेसमधला वाढपी दत्तू दोन फुलके वाढून गेला. वाटीत पातळ आमटी घातली. मग रंगराव उसळ घेवून आला.उसळीचा डाव ताटात उपडा केल्यावर टणाटणा आवाज करीत वाटाणे ताटभर इतस्तत: विखुरले. विनायक आवाक् होवून बघितच राहिला. त्याने फुलके उलट सुलट करून बघितले नी हात जोडून ताट बाजुला केलं. “छे रे बाबा तुम्ही लोक वर्षभर कसं काय जेवलात आश्चर्यच आहे. मला नाही हे जाणार नी रात्रभर उपाशी पोटी झोपहीनाही लागायची मला. मी जातो घरी.” असं म्हणून तो उठला नी तडक मालाडला निघून गेला. (क्रमश:)