बी. एड्. फिजीकल भाग १६
मराठी मेथडचा गट माझ्याशी आदराने वागायचा. हा या गटात तीस प्रशिक्षणार्थी होते. रोज सरावाच्या वेळी कोणी ना कोणी मला चहा,नाष्टा आणून देत असे. ईशस्तवन, स्वागत गीत, दोन देश भक्तीपर गीतं, तीन छोटे नाट्य प्रवेश,नाच रे मोरा गाण्यावर नृत्य आणि टिपरी नृत्य असा भरगच्च कार्यक्रम होता. त्यानी नाट्य प्रवेशासाठी भाड्याने ड्रेस आणले होते. त्यांची गाणी बसवून दिली. आठ - दहा दिवस वेळ मोडून त्यांच्या तालमी घेतल्या. गटाच्या सादरी करणाच्या वेळी नाट्यप्रवेशातल्या पात्रांचा मेकपसुद्धा मी करून दिला. सगळ्यानी व्यवस्थित सराव केलेला असल्यामुळे कार्यक्रम अप्रतिम झाला. शेवटी मार्गदर्शनपर भाषणात प्राचार्यानी माझं भरभरून कौतुक केलं. नंतर मराठी ग्रूपची पार्टी झाली त्यातही मला कॉण्ट्रिब्युशन न घेता सहभागी करून घेतलेलं होतं.
त्या नंतर विनोदबाला आणिचावरे यांचा हिंदीचा गट होता. त्या गटातही संगीत अभिनययाची जाण असणारं कोणीच नव्हतं. त्या गटात चावरेकर नी विनोदबाला दोघं सिनीयर होती. कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी त्यानीही माझ्यावरच सोपवलेली होती. त्यांच्या मार्गदर्शक नाईक मॅडम प्राचार्यां इतक्याच सिनीयर होत्या. नी त्याना रोज सराव घेणंही जमणारं नव्हतं. त्यानी तर माझ्याऐवजी काळे आहे असं समजा. कोणी त्याना क्रॉस केलेलं माझ्या कानावर येता नये अशी तंबीच दिलेली होती. त्यांच्या गटाकडून ज्योती कलश छलके, साथी हाथ बढाना आणि समारोपाचं आनंद मठ मधलं वंदे मातरम् ही समूह गीतं अप्रतीम सादर झाली.
आमच्या इंग्रजीच्या गटात फक्त बारा प्रशिक्षणार्थी होते. आम्ही तीन कार्टून मुव्हमेंटवर इंग्लिश गाणी बसविलेली होती.त्यावेळी पाठ्य पुस्तकात सिंड्रेलाची स्टोरी होती. त्याच नाट्य रुपांतर आम्ही सादर केलं. त्या नाटकात महात्मे राजकुमार होता त्याने दादरहून भाड्याने ड्रेस आणवूनघेतलेला होता. दुर्गा खराटे सिंड्रेला झालेली होती. तिच्यासाठी वसईच्या ज्युलियाला सांगून ड्रेस पैदा केलेला होता. कथेतल्या गाडीसाठी रद्दी पेपरच्या लगद्याचे सुंदर उंदराचे मुखवटे मी बनवले होते. बॅग्राउंडला लिटील मॅच गर्ल गोष्टीचं वाचन करून स्टेजवर पात्रानी त्या प्रमाणे अॅक्शन्स करायच्या असा आयट्म होता. आमच्या गटातला टी.बी.पाटील मुख दुर्बळ नी त्याच्याकडे काडीमात्रही सभाधीटपणा नव्हता. पण त्याने घोगऱ्या आवाजात कथेचं अभिवाचन अफलातून केलं. अर्थात मॅथ्सच्या ग्रूपचा टर्न येईलतेव्हा त्यांचा संपूर्ण प्रोग्राम सेटकरायला मी मदत करायची या बोलीवर ज्युलियाने पाटीलला दहा बारा वेळा फोनेटिक्सची संथा देवून त्याचं अभिवाचन एवढं पॉलिश्ड करून घेतलं होतं की त्याचं प्रेझेंटेशन ऐकून आम्ही अक्षरश: उडालो होतो. त्याने एवढी मन लावून तयारी केली होती की,त्याची ती गोष्ट अक्षरश: पाठच झाली होती.
त्यानंतर प्रभुच्या मॅथ्सच्या गटाचा टर्न सेकंड लास्ट होता. त्यांचे तर कार्यक्रमातले टॉपिक्स ठरवण्यापासून तो संपूर्ण प्रोग्रॅम जुलियाला प्रॉमिस केल्याप्रमाणे मी अगदी जीव ओतून बसवून घेतलेला होता. मॅथ्सला सग़ळा मिक्स गट होता. पाच पैकी दोन मुली गुजराती मिडीयमच्या. इसो आणि जुलिया इंग्लिश मिडीयमचे. नी बाकीचे मराठी मिडियमचे. प्लॅनिंगची मिटींग झाली तेंव्हा प्रा. गोंदकर म्हणाले, “या वर्षापर्यंत मॅथ्स ग्रूपचे कार्यक्रम कधीच चांगले झालेले नाहीत. आताया वर्षी काळेसर काय जादू करतात बघुया.” मी गुजराती ईशस्तवन, संस्कृत मधलं स्वागत गीत बसवलं. इसो ने ‘होली होली होली लॉर्ड गॉड अल्मायटी’ हे कोरस गीत म्हटल. कार्यक्रमाचा शेवट त्यावेळी गाजत असलेल ‘वी शॅल ओव्हर कम ’ या समूह गीताने करायचा होता. कोऱ्या कार्ड वर पांढऱ्या मेणाने फिगर लिहून ठेवायची.एकाने सोपं गणित घालायचं. प्रेक्षकातल्या कोणी तरी ते कागदावर सोडवायच. मग तो कागद जाळून त्याची राख मॅजिक पेपरवर फासली की त्यावर उत्तराची फिगर उमटत असे. मॅजिक फिगर जादूचा खेळ मी बसवून घेतलेलाहोता.या जादूतलं इंगित कार्यक्रमा आधी कोणाला कळू नये याची पुरेपूर दक्षता घेतली होती.
जादूगार प्रभू नी त्याच्या बरोबर चमूरा म्हणून ज्युलिया निवडलेली होती. आरंभी गारुडी नी चमुरा यांची थोडीशी मिमिक्री बसविलेली होती. प्रक्टिसच्या वेळी प्रथम मी ही थीम सांगितली.ती सर्वानाच आवडली. त्यांच्या गटात आमच्याच हाऊसमधला एम्. आर्. जाधव हा व्हॉलिबॉल चॅम्पियन होता. तो एकटाच स्वत:ची राजदूत घेवून आलेला होता. तो एवढा प्रभावित झाला की त्याने मला अक्षरश: गळ घातली. “ल्येका काळ्या.... ह्या म्याजिक फिगर मदी मलाबी कायतरी रोल दे की रं मर्दा . मी तुला खाशील तेवढी प्वॉट भर पार्टी दीन......” मग रात्री खूप विचार करून मी त्यात तिसरं पात्र घुसडलं. रत्नागिरीत गारुड्याचा खेळ बघताना प्रेक्षकातला एक जण गारुड्याची बासरी बंद करतो. त्याची नी गारुड्याची बाचाबाची मी रत्नागिरीला असताना पाहिली होती. ही थीम मला आठवली. मी जाधवला गारुड्याची बासरी बंद करणाऱ्या प्रतिस्पर्ध्याचा रोल दिला.
कार्यक्रमासाठी जाधवने खर्च करून बॅक ग्राउंडला लावायला सॅटिनचा निळा पडदा स्व खर्चाने आणला होता. ज्युलियाने प्रोग्रॅमपूर्वी चमूरा म्हणून असं काही वेषांतर केलं की प्रभू नी ती यानी एंट्री घेतल्याबरोबर टाळ्यांचा कडकडाट झाला. तीने मळकी फाटकी हाफ् पॅण्ट आणि फाटका सद्रा घालून डोक्याला फाटका रुमाल बांधून थी आली तीच अशी काही कोलांटी उडी मारली की टाळ्यांचाअक्षरश: कडकडाट झाला. प्रभुने पोतडीतून काळी बाहुली नी कवटी बाहेर काढल्यावर एकच हशा पिकला. गारुडी चमुरा यांची थोडिशी मिमिक्री केली. 'तू कोणाला झाला मी बापाला झाला.' अशा टाईपचे संवाद ऐकून प्राचार्यांसह सगळे प्राध्यापक खो खो हसत सुटले. प्लॅस्टिकचा नाग नी मुंगूस बाहेर काढून प्रभू बासरी वाजवायला लागला नी अकस्मात बासरी वाजेनाशी झाली. त्याने “ या खेळाला कोन जादुगार आला असेल त्याने पुढे या,” म्हटल्यावर गलमिशा चिकटवलेला जाधव आखूड धोतर नी बंडी घालून पुढे येतो. पुन्हा टाळ्यांचा कडकडाट झाला.त्याची नी जादुगाराची थोडिशी बाचाबाची होते नी मग ‘मॅजिक फिगर’खेळ पुढे सुरू होतो.
खेळ सुरू असताना अधे मधे. दुसरा जादुगार बनलेला जाधव “आता मी तुजीही म्याजिक फिगर पार बदलून दावतो, आता साट ह्यो आकडा येनार” म्हणतो. नी खरोखर कार्डावर तोच आकडा येतो.मग प्रभू मंत्र म्हणून त्याची जादू बंद करून दुसरं कार्ड घ्यायला सांगून बरोबर फिगर काढतो. दुसऱ्या वेळेला गारुडी म्हणतो की मी तुजी जादू बंदकेलेली आहे. मी सांगतूया त्योच आकडा येणार..... त्यावर जाधव म्हणतो मी बी कच्च्या गुरुचा चेला न्हाई … तू बगच आता ......ह्या खेपेला कार्डावर दोघांचेही आकडे उमटतात. एक दोनदा हे झाल्यावर मात्र चमुरा सांगतो की,“वस्ताद ह्यो जादुगार काय कलकत्त्याचा अस्सल न्हाय हाय.... कांदिवलीत शिकल्याला नकली भामटा हाय.... ह्याला कायमचा ईंगा दावा हो वस्ताद.” “ओ काली कलकत्तेवाली फोड दे दुष्मनकी नली...... मी तुझे हातच बांधून टाकतो ” असं म्हणत प्रभू मंत्र घालतो. त्यावर दोन्ही पंजे खरोखरच एकमेकात गुंफले आहेत असा अस्खलित अभिनय करीत लटा-लटा कापत जाधव बाजुला जावून बसतो. मग खेळ संपेपर्यंत तो त्याच अवस्थेत बसून राहिलेला होता. खेळ पुढे सुरू होतो. प्राचार्य खासनीस सर, डॉ.जोशी यानी उत्स्फुर्तपणे पुढे येवून खेळात भाग घेतला. मध्येच जादुगार दोन तीन घनमूळाची अवघड गणित घालतो.
“ह्येचं उत्तर कुनाला बी येनार न्हाय.... हाय हिंमत तर सांगा.....म्हणतो.” त्यावर प्रा.गोंदकरच उत्तराचं चिटोरं घेवून उभे राहिले. त्यांच्या समोर जावून मान झुकवून प्रभु म्हणाला, “तुमी गुरूविद्या दिलीकी आमाला. तुमचीच परीक्षा घेतली तर माजी इद्या संपती की......” मग चमुरा म्हणतो, “ह्यो ख्येळ पोरा टोरासाटी हाये. तुमासाटी न्हायी गा....बगा पोरानो...वस्ताद नंबरी तर त्याचा गुरू दस नंबरी ” नी कोलांटी उडी मारून सरांच्या हातातला कागद जाळून त्याची राख चोळून उत्तराचा पत्ता दाखवतो नी म्हणतो,“वस्ताद आता बंद करा खेळ. न्हायतर ह्ये गुरू आमाला कुत्रं मांजार करून टाकत्याल.” (क्रमश:)