Marathi Quote in Blog by Vrishali Gotkhindikar

Blog quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

पडवळ पुराण
खरे तर पडवळ ही फार कमी लोकांची आवडती भाजी
माझ्या बाबतीत बोलायचे झाले तर ही भाजी मी लग्ना आधी कधीच खाल्ली नव्हती

🫒माझ्या माहेरी वडलांना आवडत नसल्याने पडवळ कधीच आणले गेले नाही .
सासरी मात्र पडवळ आणि इतर वेली फळभाज्या ,जसे की दोडका ,कारली ,दुधी भोपळा ,तोंडली या अहोंच्या अतिशय आवडत्या भाज्या ..😊

🫒माझ्या सासूबाई अतिशय सुगरण होत्या
त्यांच्या हातचे पडवळा चे अनेक पदार्थ खाऊन मला ही हळू हळू पडवळ आवडू लागले .आणि मीही त्यांच्या कडून वेगवेगळे पदार्थ शिकुन घेतले
पडवळाची भाजी मनापासून आवडते असं म्हणणारा खवय्या मिळणे कठीण आहे
असे बरेच जण म्हणतात
पण आमच्या अहोंच्या रुपात मी तो अनुभव घेतला आहे ..अगदी रोज पडवळ असले तरी चालेल असे ते म्हणतात .

🫒 पडवळाचे औषधी उपयोग बरेच आहेत.
चवीला गोड व थंड असल्याने पडवळ आपल्या शरीरातील तिन्ही दोष कमी करण्यास मदत करतो.
शरीरातली विषारी द्रव्यं बाहेर टाकण्यास मदत करणारं एक नैसर्गिक अ‍ॅन्टिबायोटिक म्हणून पडवळ ओळखलं जातं.
पडवळात पुरेशी पोषक द्रव्यं असून ते शरीराची उष्णता कमी करतं, वजन कमी करायला मदत करतं आणि हृदयाचं टॉनिक म्हणून काम करतं.
उन्हाळ्यात तर पडवळ भरपूर खाण्यात असावे

🫒पडवळ आवडणारे लोक तसे कदाचित कमी आढळतील
पण ज्यांना आवडते त्यांना अतिशय आवडते.
आमच्याकडे अशीच कथा आहे
पडवळ आणले की एकाच दिवशी सगळे प्रकार केले जातात

🫒असेच काही खास प्रकार
पडवळ प्रेमी लोका साठी देत आहे

🫒पडवळ साधी भाजी

पडवळ चिरून त्याचे लहान तुकडे करून घ्यावे
पॅन मधे फोडणीत
मोहरी
हिंग घालून हे पडवळ तूकडे घालून
झाकण ठेवावे
पाच मिनिटानंतर परत थोड हलवून
फोडी बुडतील इतके पाणी घालावे
व परत झाकणं ठेवावे
पाच मिनिटात पडवळ शिजते व त्यातले पाणि थोडे कमी होते
यानंतर तिखट, मीठ, हळद , दाण्याचे कूट काळा मसाला, गूळ घालून चांगले मिसळून घ्यावे
वरती कोथींबीर, ओले खोबरे घालावे

🫒पडवळ भरीत

पडवळ चिरून थोडे लहानलहान तुकडे करून घ्यावेत
तुकडे बुडतील इतके पाणी पातेल्यात घालून
झाकणं ठेवून शिजवून घ्यावे
पाच ते सात मिनिटात पडवळ शिजते
बोटाने चेपून पडवळ शिजले का पहावे
लागलें तर थोडे पाणी घालावे
हे शिजलेले पडवळ गार झाल्यावर
थोडे कुस्करुन घ्यावे
त्यात मीठ ,साखर, दाणे कुट ,कोथिंबीर ,खोवलेले खोबरे दही घालून मिसळावे
छोट्या कढईत तेल घालून
मोहरी,हिंग, हळद, मिरच्या तूकडे याची फोडणी करून पडवळ फोडी वर ओतावी
भरीत चांगले कालवून घ्यावे


🫒पडवळ रिंग भजी

बटाट्याच्या भज्या सारखे पीठ भिजवून पडवळ गोल आकारात रिंग प्रमाणे कापून घेणे व भजी करणे ,सदर भजी मेदू वड्याप्रमाणे दिसतात

🫒पडवळ पीठ पेरून भाजी
पडवळ बारीक तुकडे करून फोडणीत वाफवणे लागल्यास शिजण्या साठी थोडे पाणी वापरणे .शिजले की हळद तिखट मीठ घालून त्यास थोडे भरड डाळीचे पीठ अथवा भाजणी पीठ लावणे व एक वाफ आणून कोथिंबीर खोबर यांनी सजवावे .

🫒पडवळ डाळ भाजी
यासाठी मुग अथवा हरबरा याची भिजवलेली डाळ घ्यावी .
प्रथम फोडणीत हिरवी मिरची घालून ही डाळ परतून थोडी वाफवणे
नंतर चिरलेले पडवळ घालून थोडे पाणी घालून शिजवणे व गोडा मसाला ,गुळ आमसूल मीठ हळद घालून एका वाफे नंतर खाली काढणे व कोथिंबीर खोबरे घालणे .

🫒वाल पडवळ भाजी
यासाठी मोड आलेले वाल घ्यावे
हे खुप चविष्ट असतात
प्रथम फोडणीत वाल थोडे वाफवून मग पडवळ तुकडे घालणे व शिजवणे
खोवलेला नारळ अथवा नारळाचे दूध घालावे
काळा गोडा अथवा आपल्या आवडीचा मसाला शेवटी घालावा व गुळ,तिखट ,आमसूल ,हळद ,मीठ , कढीलिंब घालून
झाकण ठेवून वाफवणे .

🫒 भरली पडवळ भाजी
पडवळ एक इंच तुकडे करणे
मधल्या बिया काढून त्यात खोबरे कोथिंबीर ,गरम मसाला तिखट मीठ असे सारण अथवा उकडलेला बटाटा मसाला मीठ असे सारण करून या डमरू सारख्या भरून घेणे ,यानंतर त्याच्या दोन्ही बाजू कोर्न फ्लोवेर अथवा ओल्या मैदा पीठाने बंद करणे
व या खालच्या बाजू एका तव्यात फ्राय करणे म्हणजे सारण बाहेर येत नाही
यानंतर याच तव्यात फोडणी करून हे पडवळ रोल ठेवणे आणि कमी पाण्यात वाफेवर कोरडे शिजवणे
अथवा पाणी घालून खोबर्याचे वाटणलावून रस्सा भाजी करणे

🫒पडवळ कढी
साजूक तुपाच्या फोडणीत जिरे हिग मिरची कढीपत्ता घालून पडवळ चे छोटे तुकडे वाफवून घ्यावे व त्यावर ताक फोडणीला टाकून नेहेमी प्रमाणे कढी करावी

🫒पडवळ बियांची चटणी
पडवळ बिया काढून थोड्या तेलात हिरवी मिरची सोबत वाफवाव्या
बियांचा रंग बदलला की खाली काढावे
प्रकार एक
या बिया ,दाणे कुट,चिंच ,गुळ,कोथिंबीर जिरे घालून चटणी करावी
प्रकार दोन
या बिया, खोबरे ,कोथिंबीर, साखर ,मीठ, घालून चटणी करावी वरून लिंबू पिळावे
व हिंग मोहरी हलकी हळद कढीपत्ता तुकडे घालून फोडणी द्यावी
मस्त होते ही चटणी
परोठा पोळी सँडविच साठी अती उत्तम

🫒इति पडवळ पुराण सुफळ संपन्न 😋�

Marathi Blog by Vrishali Gotkhindikar : 112036905
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now