“रमा” — द इन्स्पिरेशन
(भूमिपुत्र ब्लॉग)
✍🏻 विवेक शिंदे | कोल्हापूर.
@chefvivekshinde
ती स्वतःसाठी फारसं जगत नाही…
कारण तिचं आयुष्य इतरांच्या स्वप्नांनी विणलंय.
ती थकते… कधी तुटतेही…
पण तिच्या डोळ्यांत आशेचा दिवा कधीच विझला नाही.
ती शांत दिसते… पण तिच्या शांततेत वादळ दडलंय.
ती साधी वाटते… पण तिच्या पावलात डोंगर हलवायची ताकद असते.
ती म्हणजे — रमा.
रमा…
हे नाव उच्चारलं की
प्रत्येकाच्या मनात एक वेगळी प्रतिमा उभी राहते.
कुणासाठी ती आई आहे…
कुणासाठी बहीण…
तर कुणासाठी घराचा निःशब्द आधार.
ही रमा थोडी वेगळी आहे.
तिच्या हातांना पीठाचा गंध आहे…
डोळ्यांत चुलीच्या धुराचा चटका आहे…
आणि पायांत दिवसभर उभं राहिलेल्या आयुष्याचा थकवा आहे.
पहाटे ती चुलीपाशी उभी असते,
दुपारी शेताच्या बांधावर,
आणि संध्याकाळी शहरातल्या कॅटरिंगच्या गडबडीत हरवलेली दिसते.
तिचा एक दिवस…
जो पहाटेच्या अंधारात सुरू होतो
आणि अनेकदा मध्यरात्रीच्या थंडगार पाण्यात संपतो.
तो दिवस !!
जो रोज उगवतो…
पण ज्याची कथा
जगाच्या गोंधळात
बहुतेक वेळा कोणी लिहीतच नाही.
पहाट अजून काळोखातच असते.
कोंबडा आरवायच्या आधीच
रमा उठलेली असते.
घड्याळाची गरजच नाही,
शरीरच तिचं घड्याळ झालेलं असतं.
ती चुलीजवळ बसते…
राखेतून निखारे कुरवाळून काढते…
शेन्या लावते.
थोड्याच वेळात चुल पेट घेते.
धुराचे लोळ घरभर पसरतात.
डोळे पाणावतात…
घशात धुराचा खाट आणि कधी उबळ…
पण रमाच्या हाताची गती मात्र कमी होत नाही.
अंगणात जाते.
ओल्या मातीचा लोंब घेत
अंगण सारवते.
गोठ्यात जाऊन
म्हशींच्या पाठीवरून हात फिरवते.
“खा ग माऊ… निवांत खा…”
कधी कोंबड्यांच्या शिबड्यातून अंडी उचलते,
कधी वैरनाची घडं डोक्यावर टाकते.
चुलीवर तवा तापायला लागतो.
रमा हातात पीठ घेते…
आणि भाकरी थापायला लागते.
एक हाताने भाकरी…
दुसऱ्या हाताने कालवन…
आणि मनात घरच्या लेकरांच्या पोटाची कळवळ.
तिचं स्वतःचं जेवण…?
बहुतेक वेळा
दोन घास उभ्याउभ्याच..
दुपारच्या उन्हात
ती शेताच्या जाते.
हातात विळा…
डोक्यावर फडकी चुंबळ
डोक्यावर गाठोडं…
खांद्यावर जळण…
घरी परत येते.
दोन घास खाते.
आणि जरा कुठं पाट टेकते.
तेवढ्यात
मोबाईल वाजतो.
“रमा… आज कॅटरिंगला काम आहे. येणार काय?”
ती डोळे चोळते…
आणि शांतपणे म्हणते —
“येतो… पोचतो की !!”
आता सुरू होतो
रमाचा दुसरा प्रवास.
गावाच्या चौकात
वडाप रिक्षा उभी असते.
आधीच माणसांनी गच्च भरलेली.
दहा माणसांच्या जागी पंधरा.
धक्का-बुक्की…
कुणाच्या मांडीवर कुणाचं गाठोडं…
कुणाच्या खांद्यावर कुणाचं पोर…
रमा कसंबसं आत शिरते.
कोपऱ्यात जागा मिळते.
रस्त्याची धूळ…
घामाचा वास…
आणि खडबडीत रस्त्यावर रिक्षेची कुस्करलेली धाव.
पण तिच्या मनात एकच विचार —
“आज काम मिळालं…
म्हणजे आज घरात चूल पेटेल.”
⸻
कॅटरिंगच्या ठिकाणी पोचल्यावर
रमासाठी कुठलाही स्वागत समारंभ नसतो.
तिला मिळतो तो —
खरकट्या भांड्यांचा डोंगर.
कामाला सुरुवात होते.
भाज्या निवड…
कांदे सोल…
मिक्सर चालव…
पीठ मळ…
चपात्या थाप…
“अगं रमा, जरा इकडं हात दे!”
“ते पातेले घासून ठेव!”
“कांदे संपलेत, पळकी जरा!”
आचारींचा ताण…
कधी कधी शब्दही
तिखट मिरचीसारखे…
कधी आईचा उद्धार…
⸻
संध्याकाळ होते.
जेवणावळीतून
ताटांचा ढीग पडतो.
रमा ते उचलून
मोहोरीत आणते.
नळाला पाणी ..
हाडं गोठवून चिंद्याच्
रमाचे पाय
बघल तेव्हा निरम्याच्या पाण्यात.
तेलकट कढया…
खरखटं…
कचऱ्याचे ढीग…
हात घासत राहतात…
पाठीचा कणा दुखत राहतो…
पण भांड्यांचा ढीग
कमी होत नाही.
⸻
रमा निरम्याच्या पाण्यात भांडी घासत राहते…
हातावरची कातडी भगभगत्या…
नखांमधली जळजळ…
पाय थंड पाण्यात राहून गोठलेले…
तरीही तिच्या हाताची गती थांबत नाही.
कारण तिच्यासाठी ते फक्त भांडी नसतात —
त्या प्रत्येक ताटामागे तिच्या संसाराचा एक घास दडलेला असतो.
पण त्या क्षणी,
मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात
एक प्रश्न हळूच डोकावतो…
इतका घाम गाळणाऱ्या या रमाला
किमान एक प्लास्टिकचं एप्रन मिळायला नको का?
थंड पाण्यात तासन्तास उभं राहणाऱ्या तिच्या पायांसाठी
बूट किंवा गमबूट असायला नकोत का?
या खरकट्या भांड्यांच्या ढिगात दिवसभर काम करणाऱ्या हातांसाठी
स्वच्छता, फर्स्ट एड आणि आरोग्याची काळजी
ही काही फार मोठी अपेक्षा आहे का?
रात्रभर काम करून घरी परतताना
तिला सुरक्षित प्रवासाची सोय
मिळायला नको का?
हा प्रश्न फक्त रमाचा नाही…
तो त्या प्रत्येक हाताचा आहे
जो शांतपणे काम करत राहतो —
पण ज्याचा सन्मान
बहुतेक वेळा कुणाच्या लक्षातच येत नाही.
⸻
रात्री दीड - दोन वाजता.
काम संपतं.
रमा कोपऱ्यात बसते.
कार्यक्रमात उरलेलं जेवण
तिच्या ताटात येतं.
ती शांतपणे खाते.
तोच
त्या दिवसाचा तिचा खरा जेवणाचा घास.
⸻
पुन्हा
तीच वडाप रिक्षा.
मध्यरात्र…
घरी पोचते
तेव्हा घड्याळ साडेतीन - चार वाजलेले असते
ती झोपते तेवढ्यात उषःकाल
आणि पुन्हा सुरू होतो
रमाचा दिवस.
⸻
तुम्ही विचाराल
रमा एवढं सगळं का करते…?
का झगडते…?
का तीन-तीन कामं करते…?
⸻
कारण तिच्या आयुष्यात
एक जीवनदीप आहे.
तिचा नवरा…
ज्याच्यासाठी ती रोज लढते.
आणि कदाचित तिच्या मनात
दररोज एकच प्रार्थना असते
🎶🎵
“लेऊ लेणं गरिबीचं
चणं खाऊ लोखंडाचं
जिणं व्हावं आबरूचं..
धनी मातुर माझा देवा, वाघावाणी असू दे”
⸻
पण एक प्रश्न अजूनही उरतो
रमाला
कामाच्या ठिकाणी
थोडा सन्मान मिळायला नको का?
आचारी, सहकारी…
किंवा मालक…
किमान एक शब्द —
“रमा, छान काम केलंस.”
⸻
कारण…
आपण जेव्हा एखाद्या मोठ्या लग्नात
गरमागरम जेवणाचा आस्वाद घेतो…
तेव्हा त्या चवीच्या मागे
कुणाच्यातरी फुटलेल्या टाचांचा, थकलेल्या हातांचा आणि न बोललेल्या श्रमांचा घाम असतो.
कधी कधी
तो घाम — रमाचा असतो.
⸻
त्या रात्री
रमा एकटीच नव्हती.
कॅटरिंगच्या त्या स्वयंपाकघरात
भांड्यांचा ढीग, निरम्याचा फेस
आणि थंडगार पाण्यात उभे असलेले पाय…
या सगळ्यांमध्ये
अजून एक कथा उभी होती.
तीही एका रमाचीच कथा होती.
पण तिचा संघर्ष
थोडा वेगळा होता…
क्रमशः…