तुळशी विवाह
चला तर मित्रांनो दसरा झालाआहे आणि दिवाळी पण झाली आता आपण करूया तुळशीचं लग्न. दिवाळी हि खऱ्या अर्थाने संपते ती म्हणजे तुळशीचे लग्न झाल्यावर. तुळशीचं लग्न म्हणजेच लग्नांची धाम धमाट सुरु झाली म्हणायला काय हरकत नाही. आपले पूर्वज म्हणतात कि तुळशी विवाहनंतरच घरातील इतर विवाहांना सुरुवात होते.
आपल्या हिंदू धर्मात तुळशी विवाहाला अतिशय पवित्र सोहळा मानला जातो. दिवाळी नंतर तुळशीच्या लग्नाची गडबड सुरू होते. तुळशी विवाह केल्याने कन्यादानाचे पुण्य प्राप्त होते. आता या सध्याच्या कलियुगात जो कोणी तुळशीचे रोप लावून तिची निगराणी करतो व त्याचबरोबर तुळशीची भक्ती भावाने पुजा, आराधना व स्मरण करतो, तो सर्व प्रकारच्या पापातून मुक्त होऊन त्याला भगवान श्री कृष्णाचे पवित्र धाम प्राप्त होते अशी मान्यता आहे.
विवाहाच्या अगोदर तुळशी कट्टा रंगवून सुशोभित करतात. मग ऊस, सौभाग्याचे वाण, चिंचा, आवळे, झेंडूच्या फुलांचे बाशिंग, हार व फुलांनी सजवून जणू काय नवरी मुलगीला सजवल्यासारखे सजवतात. त्याचबरोबर तुळशी भवती छान छान रंगीबेरंगी रांगोळ्या व दिव्यांची रोषणाईने आंगण अगदी झगमगून दिसून येते. आपल्या घरात असलेली प्रभू कृष्णाची मूर्ती पाटावर विराजमान केलेली, मधोमध अंतरपाट, मंगलाष्टका चे सूर अशा भक्तिमय वातावरणात व प्रथेप्रमाणे विवाह सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करतात. त्याच बरोबर व्यापारी वर्गात सुद्धा लक्ष्मीपूजनाचा उत्सव जोरात, मोठ्या थाटामाटात आणि फटाक्याच्या धाम धूम मध्ये साजरा करतात. हा सण अगदी आनंदात, मिळून-मिसळून आणि हसत-खेळत साजरा केला जातो.
Article By - Anjali Patil
Brainsmedia Solution