“लक्ष्मी आमची, जबाबदारी तुमची!"
पूर्वी सासरचे लोक सुनेला लक्ष्मी मानायचे,
तिचे स्वागत करायचे,
लग्नासाठी अधिक खर्च नव्हते करीत,
पण जिव्हाळा मात्र असायचा,
तिला जपायचे,
स्वतःची जबाबदारी समजायचे!
मग आला पैसा,
स्वार्थपायी लग्न पद्धतीत झालाय बदल,
पैश्याशिवाय लग्न नाही,
बरं तेवढ्यावरच भागत नव्हते,
म्हणे गाडी नाही दिली, रुसून बसायचे,
बरं तेही देणे सुरु झाले!
आतातरी पुरेसे झाले असे वाटायचे,
नाही, काळ बदलला,
मुलगी शिक्षित, नोकरी करीत असलेली,
अशी भूमिका आली,
बरं तेही ठीक, असे वाटायचे!
मग मात्र स्वार्थ वाढतच गेला,
म्हणे सून घरात पैसा देत नाही,
घर खर्च तिनेच करावा,
बरं तेही ठिक आहे,
असे वाटायचे,
म्हटलं झाले समाधान एकदाचे,
नाही, म्हणे तिने कष्ट करावे,
दर महिन्याला पैसे आमच्याजवळ देत नाही,
बरं तेही ठिक आहे, एकदाचे
पण नाही, त्यातही समाधान नाही!
म्हणे पैसे आमच्याकडे द्यावे,
तिने माहेरी राहावे,
आमची काही जबाबदारी नाही,
लक्ष्मी आमची,
पण जबाबदारी तुमची,
तुम्हीच पालनपोषण करावे!
बरं एकदाचे नाते तरी तोडावे,
तर तेही नाही,
आम्ही पैसा कसा सोडावा,
आई वडील गेल्यावर,
घेऊन येऊ तिला, पैशासकट!
आमचीच हक्काची लक्ष्मी नां!
असा कसा स्वार्थ हा,
मला वाटले, पैसा मोठा की सून,
जबाबदारी मोठी की स्वार्थ महत्वाचा,
कशी ही मानसिकता,
आम्ही सुशिक्षित झालो कां?
की अधिक अडाणी झालो!
सून म्हणजे केवळ लक्ष्मी नव्हे,
तीसुद्धा कुणाची तरी लेक असते,
तिच्या कष्टांवर हक्क सांगण्यापेक्षा,
जबाबदारी महत्वाची असते,
तिच्या भावनांची जपणूक महत्त्वाची असते!
दि. 12 नोव्हें., 2026.
प्रा. डॉ. विनोद राऊत,
से. नि. प्राध्यापक,
अमरावती.