#रोजचाच_स्वयंपाक
🌿पोकळ्याची भाजी
आणि देठी
🌿पोकळा ही तांदुळजा, माठ आणि राजगिरा यांच्याशी साधर्म्य असणारी एक पालेभाजी आहे.काही भागात याला पोकळी या नावाने ओळखतात
पोकळा प्रामुख्याने खान्देशातील धुळे नंदुरबार आणि जळगाव तसेच कोल्हापूर या ठिकाणी आढळतो.
हिरवा पोकळा व तांबडा पोकळा असे या पालेभाजीचे दोन प्रकार आहेत.
🌿पोकळा थंडावा देणारा,सहज पचन होणारा भूक वाढविणारा व त्रिदोशनाशक आहे.
भरपुर लोह आणि प्रथिनांचा साठा असणारी ही चवीष्ट पालेभाजी आहे
🌿कोल्हापुरात पोकळ्या ची भाजी अतीशय ताजी आणि अगदी बारा महिने मिळते
लाल पोकळ्याच्या लाल देठाची देठी म्हणजे एक प्रकारची कोशिंबीर केली जाते
🌿या भाजीची चव भाकरी सोबत खाल्ली असता द्विगुणित होते
भाकरी करून झल्यावर त्याच तव्यात ही भाजी फोडणीला टाकायची
🌿शक्यतो पालेभाजी लोखंडी तव्यात केली असता भाजीचे पोषणमूल्य व चव दोन्ही वाढते
🌿भाजीसाठी
एक पेंडी पोकळ्याची
एक मोठा कांदा
पाच सहा लसूण पाकळ्या
फोडणीचे साहितय
तिखट, मीठ ,हळद
🌿कृती
प्रथम पोकळ्याची भाजी निवडून स्वच्छ धुवून घेणे
व नंतर चिरुन घेणे
ही भाजी फार बारीक चिरायची नाही
(शिजायला अत्यंत सोपी असल्याने काही ठिकाणीं ही भाजी न चिरता अख्खी पाने सुद्धा फोडणीला टाकतात )
🌿कांदा चिरून लसूण बारीक तुकडे करून घ्यावा
पसरट तव्यात तेल घालून हींग मोहरीची फोडणी करून त्यात प्रथम लसूण थोडा परतून नंतर कांदा घालावा
🌿कांदा थोडा पारदर्शक झाला की चिरलेली भाजी घालावी
भाजी पाच सात मिनीटे नुसती हलवली की छान शिजते
🌿यावर झाकण ठेवायची गरज नाहीं
शिजली की तिचा रंग बदलतो व आकारमान कमी होते
एका पेंडी भाजी शिजल्यावर एक ते दीड वाटी होते
🌿देठी
साहित्य
भाजीची देठे आठ दहा
एक मोठा चमचा दाण्याचे कुट
अर्ध चमचा साखर
दोन मिरचीचे तुकडे
मोहरी हींग हळद
🌿याच भाजीची निवडताना पाने काढल्यावर जे देठ राहतात त्याची देठी करता येते
यासाठी देठ फार बारीक अथवा फार जाड नसावेत
🌿ह्या लाल देठांचा बुडखा कापून
उरलेल्या देठाच्या शिरा सोलून घ्यायच्या
देठ निबर नसतील तर शिरा पण जास्त निघत नाहीत
या पोकळ्याच्या देठांचे चिरुन तुकडे करायचे
🌿तुकडे सुद्धा फार बारीक नकोत मध्यम करायचे
पातेल्यात हे तुकडे बुडतील इतकेच पाणी घालून झाकण ठेवून शिजवून घ्यायचे
पाच मिनीटात शिजतात
🌿परत पाच मिनीटे झाकण काढायचे नाही
शिजलेले तुकडे गार झाले की
एक चमचा दाण्याचे कुट
अर्धा चमचा साखर चवीपुरते मीठ घालायचे
🌿छोट्या कढल्यात मोहरी, हींग घालून फोडणी करायची दोन मिरचीचे तुकडे व किंचित हळद घालून
ही फोडणी शिजलेल्या देठांच्या तुकड्यावर घालायची
🌿बारीक चिरलेली कोथींबीर व
दोन तीन चमचे दही घालून चांगलें कालवून घ्यायचे
अतीशय चवदार देठी तयार होते