नुकतंच पाऊल टाकणारं, दुडूदुडू धावणारं बाळ...
धपकन पडतं,
कावरं-बावरं होऊन चौफेर नजर टाकतं.
समोर बसलेली आई,
"काही झालंच नाही" असा अविर्भाव चेहऱ्यावर आणते,
आणि त्या निर्विकार हास्यावर,
विश्वास ठेवून ते पुन्हा उठतं...
रडव्या चेहऱ्यानेच एक किलकारी भरतं,
आणि पुन्हा पळायला लागतं.
आईकडून मिळालेला तो 'खोटा' विश्वास,
त्याला पडण्याची भीती उरू देत नाही;
उलट, स्वतःच्या चिमुकल्या पायांवर
मोठं धाडस करण्याचं बळ देतो.
अशीच काहीशी अवस्था आजही जाणवते...
बाळाच्या आईसारखेच,
खोट्या विश्वासाचे अनेक मुखवटे
हसऱ्या नजरेने रोखून बघताहेत.
पण आज... आतलं बालमन प्रौढ झालंय,
आणि हे 'प्रौढ' होणं मनाला बोचतंय.
कारण आता समज आली आहे,
म्हणून या खोट्या मुखवट्यांवर विश्वास बसत नाही.
तरीही, बालपण जपण्यासाठी
मी पुन्हा एकदा विश्वास ठेवलाय—
त्या समोरच्या खोट्या मुखवट्यांवर नाही,
तर पुन्हा एकदा... स्वतःच्या पायांवर!
- अमित पवार