तुझा पाऊस माझा पाऊस
तडतडताशा उनाड पाऊस
अंगणातल्या तळ्यात ताई
बघ कसा नाचतोय पाऊस
नको क्षणात मोहरुन जाऊस
नकोच माझी भजी चोरुस
नको इतका चहा ढोसूस
माझा पाऊस तुझा पाऊस
नको पाण्यात होड्या सोडूस
चल पागोळीला उभे राहू
ओली गाणी दोघे म्हणू
चुलीतल्या धगीभोवती
चल मुरी मारुन बसू
चल आजीच्या गोधडीत शिरु
भुताटकीच्या गोष्टी ऐकू
ऐकता ऐकता क्षणात दोघे
चल स्वप्नांच्या दरीत जाऊ
तेथे असेल दाट धुके
थोडे तुझे थोडे माझे
चल वाटून वाटून घेऊ
धबधबच्या पाण्यात मग
इंद्रधनुची रंगपंचमी खेळू
हिरव्या गवतावरती निजू
चल पुन्हा हाती हात घेऊ
मोरासवे करुन दोस्ती
चल थोडासा पदन्यास करु.☺️
--गीता गरुड.