"घर"
खूप वेळ झाला मी समोरच्या बॅचवरच्या त्या माणसाकडे बघत होतो. तो हि माझ्या सारखाच भटका प्रवासी होता. वय असेल साठी पार, पायात झिजून गेलेले स्पोर्ट्स शूज, शॉर्ट, अंगावर जूना प्रिंट पुसत गेलेली टीशर्ट, एका बॅगेतुन सामान सगळ बाहेर विखुरलेले. चेहर्यावर बेचैनी, डोळ्यात अश्रू बांध होता. मला रहावल नाही. मी विचारल, काहि शोधताय का? त्याने काही ऐकलं नाही. तो शोधण्यात दंग, मला वाटल त्याला ऐकु कमी येत. पुन्हा विचारल त्याने माने वळून बघितल. दोन सेकंद बघत बसला पुन्हा बॅग धुंडाळत राहिला. सरते शेवटी त्यांने बॅगेतून फोटो अल्बम बाहेर काढला. बॅचवर बसत. त्याने फोटो पलटायला सुरुवात केले. माझ्या कडे बघितल अन हाताने बाजुला बस म्हणाला. म्हातारा तरुणपणात खूप हँडसम दिसायचा. फोटो दाखवत आठवणीत खुप मागे गेला आणि म्हणाला एकटा भटकत खूप देश फिरलो, रोज नवीन लोकांना भेटलो, कधी घनदाट जंगल तर कधी आकाशाला टेकलेल्या इमारतीची शहर, कधी दिव्यांचा झगमगाट तर कधी दुर दुर अंधार, बर्फाची थंडी अंगावर काढली, कधी पाण्याला तरसणारी, सावळी शोधणारी वाळवंट पाहिली. कधी खडकाळ, निर्जीव डोंगराच्या उंच टोकावर उभा राहिलो. कधी ओसाड खंगत जाणाऱ्या खारट जमिनी हि दिसल्या. कधी कुठे आसरा मिळाला कधी आभाळाला छत बनवल. डोळ्या समोर त्याच्या भुतकाळा सरकत होता. मी त्याचा तर फॅन झालो. आयुष्यात अस हे थ्रिल मला हि हवा होत. तो मध्येच बोलता बोलता थांबला आणि पुन्हा पुन्हा ते फोटो आलटून पालटून बघत राहिला. मी म्हटलं काय शोधताय?
तो म्हणाला "घर. "