हितगुज
बरं का आई तुझ्या लेकीला,
आभाळापेक्षा मोठं कर !
जिथपर्यंत जात नाही,
कोणाचीही नजर वर .
स्वावलंबी कर तुझ्या लेकीला,
जरा धीट मुलीला होऊ दे !
सूर्यासारखा प्रखर प्रकाश,
तिच्या पर्यंतही पोहचू दे !
आजपर्यंत जशी वागली,
लेकीसोबत वागू नको .
उमलत्या अजाण निष्पाप कळीला,
आडबाजूला टाकू नको !
काय म्हणून तू लेकीला,
कशासाठी अडवते आहे ?
लोकांच्या तकलादू आग्रहाने,
स्वत:ची माती करते आहे ?
दे टाकून पोरखेळ अन्,
पोरीला शाळेत शिकव
स्पर्धेच्या नव्या युगामध्ये,
लेकीला स्पर्धेत टिकव !
एक दिवस घराचे तुझ्या,
लेक तुझी राखेल नाव !
तेव्हा बघंच तुझ्या दारात ,
होईल आनंदाचा गं वर्षाव !
दर्शन जोशी
संगमनेर