पी. एस. आय. मुलाचे बाबास पत्र
ती.स्व. बाबांना
कमलचा साष्टांग दंडवत
आज माझ्या डोळ्यासमोर अशी एक घटना घडली ज्यामुळे मला आपणांस पत्र लिहून कळवावे वाटत आहे. आमच्या पोलीस स्टेशनमध्ये एक आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या एका तेरा वर्षाच्या मुलाची केस आली. वडिलांनी त्याला हॉस्टेलला ठेवल्यामुळे त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला असे कारण पुढे आले. त्याचे वडील खाली मान घालून रडत होते. त्या मुलांच्या बाबामध्ये मला माझे बाबा दिसत होते. मुलाला हॉस्टेलमध्ये ठेवण्यामागे बाबाचे काय काळीज असू शकते हे मी अगदी चांगल्या प्रकारे समजू शकतो. बाबा, मला आज ही आठवते. मी जेमतेम बारा तेरा वर्षाचा असेन तेंव्हा मला तुम्ही घेऊन गेलात आणि गावापासून खूप दूर असलेल्या हॉस्टेलमध्ये मला टाकलात. मी घर सोडून जाताना आईच्या डोळ्यातून गंगा-यमुना वाहत होत्या. ती माऊली तुमच्या निर्णयापुढे काही बोलू शकत नव्हती. हॉस्टेल ची फिस भरण्याऐवढं पैसा सुद्धा तुमच्या जवळ नव्हता. शेजारी, पाजारी, सोयऱ्याकडे, मित्रांकडे पैसे मागून तुम्ही मला हॉस्टेल ला नेऊन ठेवलात. त्यामागे तुमचा एकच दृष्टिकोन होता की, मला चांगलं शिक्षण मिळावे, मी एक चांगला यशस्वी व्यक्ती व्हावं म्हणून तुमची धडपड असायची. माझे सारेच मित्र नुसते उनाडक्या करणारे, रिकामटेकडे फिरत राहणारे, अभ्यास न करणारे होते असा तुमचा पक्का समज झाला होता. या मित्रांसोबत राहिलं तर मी बिघडून जाईन या विचाराने तुम्ही हा निर्णय घेतला होता. खरंच सांगतो बाबा, ती मुले हुशार नव्हती मात्र अभ्यासात मागे नव्हती. सर्व अभ्यास करून इतर कामे करत होती. दुसऱ्या दिवशी अगदी पहाटे उठून हॉस्टेल ला जायचे होते म्हणून कोणालाही रात्रभर झोप लागली नाही. मी आईपासून दूर जाणार या काळजीने मधल्या मध्ये रडत होतो तर आई देखील त्याच काळजीने रडत होती. दुपारनंतर तुम्ही मला हॉस्टेलला सोडून गावी जाण्यास परत निघालात. त्यादिवशी मला रात्रभर झोप लागली नाही. दोन दिवस खाणे देखील गोड वाटले नाही. परिस्थिती सोबत जुळून घेतल्याशिवाय पर्याय नव्हता म्हणून चार दिवसांनी वातावरणात मिसळून गेलो. शाळा खरंच खुप चांगली होती. मुलांच्या प्रत्येक कौशल्याचा विकास झाला पाहिजे या गोष्टीकडे त्यांचे खास लक्ष होते. अभ्यासासोबत तेथे मैदानी खेळ व इतर क्रियेकडे लक्ष दिले होते. माझा अभ्यास जेमतेम राहायचा मात्र मैदानावर मी आपलं नाव गाजविले होते. दिवाळी आणि उन्हाळी या दोन सुट्टीमध्ये घरी जाण्यास मिळायचे. पाच वर्षात शाळेचा खूप लळा लागला आणि चांगल्या मार्काने दहावी पास झालो. या पाच वर्षांच्या काळात घराची खूपवेळा आठवण यायची पण बाबांनी सांगितलेलं एक वाक्य मला नेहमी आठवत राहायचं, जीवनात यश मिळवायचं असेल तर विद्यार्थी दशेत थोडंस कष्ट सहन करावे लागेल. बाबा, तुम्ही कमी शिकलात पण तुमच्याकडे जी दूरदृष्टी होती, ती खरोखरच ग्रेट होती. आपल्या मनावर मोठा दगड ठेवून तुम्ही मला 15 वर्षे दूर ठेवलात. पदवी घेतल्यावर तुम्ही मला पुण्याला पाठविलात. माझ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण केलात म्हणून तर मी पहिल्याच प्रयत्नात पी एस आय ची परीक्षा उत्तीर्ण झालो आणि तुमच्या स्वप्नातील पोलीस झालो. कदाचित मी देखील परिस्थितीला समजून न घेता असे या मुलांसारखे केलो असतो तर आज कुठं राहिलो असतो ? हे मला ही माहीत नाही. आज दिवसभर याच गोष्टीचा विचार डोक्यात घोळत होता. मन हलके करावे म्हणून हे पत्र लिहिलं आहे. आईची काळजी घ्या. तुमची सर्वांची खूप आठवण येते. लवकरच मी आपल्या भेटीसाठी येणार आहे महिनाभराची सुट्टी घेऊन. तेंव्हा दोघे ही एकमेकांची काळजी घ्या. कळावे लोभ असावा.
तुमचाच आज्ञार्थी मुलगा
पी एस आय कमल
- नागोराव सा.येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद, 9423625769