उषा पहाटे फाकली
सूर्य क्षितिजावर आला
त्यांच्या स्वागतासाठी
कोंबड्याने पुकारा केला!
दावणं तोडून लेकरू धावले
ममतेने आईच्या कुशीत शिरले
त्याला तृप्त करुन गाय निघाली बाहेर
तिला नाही वाटला कोणताच अडसर!
झाडे सकाळी सकाळी
स्नान करुन बसली
दव पिऊन तजेली
नवी नव्हाळी ल्यायली!
पक्षीगण झाडावर
कोटरातून बाहेर
साद देती एकमेका
जोराजोरात पुकार!
सृष्टीचे कुटुंब
नियमाने उठले
त्यांच्या दिनक्रमा
नाही थांबवावे लागले!
यातून घेऊ बोध
जपू अंतरात ठेवा
रहा सौख्य समाधाने
पेटवू ज्ञानाचाच दिवा!
नको वखवख मनी
पावू आनंद मनात
व्यष्टी समष्टीचा
नका करु घात!
माय धरा सांगतसे
थोडी काढा की सवड
घरदार स्वस्थ होऊन
भरेल सुखाची कावड!