#काव्योत्सव -2 (भावनाप्रधान)
निःशब्द तांडव
उदास आहे खिडकी आज.
दिसतं आहे खिडकीतून
आभाळ –
काळ्याकुट्ट ढगांनी वेढलेलं
आणि अंधारलेली दुपार.
आडदांड वार्याशी
सामना करणारी
उघडी बोडकी उदास झाडी.
आणि दिसताहेत ढग
दूर कुठेतरी
डोंगर माथ्यावर रुसून बसलेले;
वार्यालाही न जुमानता.
सारी धरणीच झालीय व्याकूळ
पावसाच्या प्रतिक्षेत
मधूनच झेपावतेय आकाशाकडे
मीलनोत्सुक होऊन.
खिडकीच्या बाहेर चाललं आहे
तांडव – निःशब्द,
मनाच्या खोल गाभार्यातील
काळ्याशार डोहाला
ढवळून काढणारं.
आणि खिडकीच्या आत,
इथे मी...
नागेश पदमन.