#काव्योत्सव (सामाजिक)
तो अन् मी
-------------------------------------------------------
तो विचारत होता मला
बरंच कांही.
बरंचसं मला न समजणारं.
तो विचरत होता
स्टार हॉटेल्स विषयी,
उंची मद्याविषयी,
धुंद रात्रीं विषयी.
तो विचारत होता मला
कॅसिनो विषयी,
डर्बी विषयी,
डिस्को विषयी,
तो विचारत होता
असंच कांही-बाही
मला न समजणारं.
पाण्यासाठी जमीन खोदताना
नखात गेलेली माती काढत
मी म्हणालो,
‘दुष्काळानं भेगाळल्या भुईला
कारंजे उडवण्याचे स्वप्न बघणं
परवडत नसतं.’
तसा तो पहातच राहिला माझ्याकडे
आश्चर्याने,
जणू कांही
मी नव्हतोच त्याच्या ग्रहावरचा...
-नागेश पदमन