खाचखळग्यांची वाट, दुःख सोडेना पाठ!
साहण्या हे भोग सारे! गुरु हवा!!
मनतळाच्या आत! गूढ खोल अंधार
संसार वाटे असार! गुरु हवा!
जाणिवेच्या नेणिवेच्या हिंदोळ्याचा हेलकावा
नेति नेति शिकविण्या! गुरु हवा!!
मोक्ष कुठला,कसा मिळावा?
वाटा अनंत जीव आतुरला
धाव घेऊनी हात धरूनी
वाट दावण्या गुरु हवा!!
भोग सारे संपूनिया मार्ग तेजाचा दिसावा
लखलखत्या वाटेने जीव शिवा भेटी जावा
त्या वाटेवर उभा ठाकण्या गुरु हवा मज गुरु हवा!!
आर्या