#LoveYouMummy
प्रिय आई,
खर तर तुझ्याशी अस काही बोलायचा योगच आला नाही.अगदी जन्मापासून तुझ्या घरट्यात वाढलेलं तुझं बाळ शिक्षणासाठी होस्टेल ला राहायला लागलं,तेंव्हा त्याला तुझी खरी किमत कळली.बाबांना वाटलं की पोराला पंख फुटलीत ,पण खर सांगू आई तू दिलेल्या बळाच्या जोरावरच उड्डाण घेतोय.आकाश कवेत घेण्यासाठी.पंखाना तर अजून उडायचं कसं हे पण कळलेल नाही.परंतु तुझ प्रेम अन आशीर्वाद आहे ना माझ्यासोबत.अजून काय हवंय!
माझं अस्तित्वच ही तुझी देण आहे मग बाकीचा त्याग त्यासमोर तुझ्या वात्सल्याचा साक्षात्कार म्हणता येईल.तुझ्यात खरा देव पहिला मी. माझ्यासाठी जीवाच रान केलस.तुझ्या कुशीत शिरून कधी झोपायचं कळायचं पण नाही.तुझ्या त्या अंगाईची मधुरता ipod ला कुठली?तोच तुझा आवाज ऐकण्यासाठी रोज रात्रीची वाट पाहत असतो. मला होस्टेल ला पाठवताना पापण्याआड दडलेले तुझे आसव अजूनही मला सुन्न करतात.रोज तुझ्याशी बोलताना तुझा तोच चेहरा मला आठवतो.
बोलायचं तर बरंच काही आहे ग.पण ह्या शब्दांपेक्षा माझ्या न बोललेल्या भावनाच तुला आधी कळतात.मग ह्या शब्दांच्या डबक्याच भावनांच्या सागरासमोर काय अस्तित्व!
फक्त तुझाच, ‘बाळ’