विषय - भावना
शीर्षक - देशा
आहुतींच्या यज्ञातून
जन्म नवा घेतलास,
अत्याचारी अन्यायाचा
पाश तू मोडलास !
बेईमान शत्रूंचा
प्रतिकार तू केलास,
पुन्हा वळून पाहू नका
धडा तू शिकवलास !
झुगारून बंदीला
पोखरण तू केलास,
आम्ही कुठे कमी नाही
संदेश तू दिलास !
कारगिल जिंकून घेताना
संयम तू दिलास,
मी सुरक्षित मायभूमीत
विश्वास तू दिलास !
मंत्रांकडून तंत्रांचा
वाटसरू तू झालास,
बघता बघता दुनियेला
प्रत्युष तू दिलास !
जगाच्या नकाशावर
ठसा तू उमटवलास,
विक्रमी तेंडुलकर आणि
आनंद 'विश्वनाथ' हि दिलास !
स्काय इस द लिमिट
यास सिद्ध तू केलास,
पहिल्याच तुझ्या प्रयत्नात
मंगळ यान तू दिलास !
प्रवास ७० वर्षांचा
नेटाने तू केलास,
मी भारतीय असल्याचा
अभिमान तू दिलास..
अभिमान तू दिलास..
- अमेय जोशी
#kavyotsav