The Download Link has been successfully sent to your Mobile Number. Please Download the App.
Continue log in with
By clicking Log In, you agree to Matrubharti "Terms of Use" and "Privacy Policy"
Verification
Download App
Get a link to download app
प्रति, महोदय मेहेरबान… तुम्ही म्हणे आता, उभारणार आहात नवीन पुतळा – महाराजांचा. तो बनावा प्रत्यक्षाप्रमाणेच, निश्र्चयाचा महामेरू l बहुत जनांसी आधारु l अखंड स्थितीचा निर्धारु l श्रीमंत योगी ll यासाठी देऊ इच्छितो आम्हीही आमचं काही योगदान. आपण फक्त द्यावी परवानगी आम्हास… देहदान करण्याची. सोनच होईल अवघ्या देहाचं आमच्या जर आलंच, प्रौढ प्रताप पुरंदर महाराजांच्या पुतळ्याच्या कामी काही ब्राँझ, पोलाद देहाचं आमच्या…! आणि करू शकत नसाल असं काही तर, अतिशय नम्रपणे सांगावस वाटतं की, नकाच भानगडीत पडू मग या पुतळ्या–बितळ्यांच्या. नाही तरी, जयंतीला हार घालण्या पुरतंच उरलंय पुतळ्याचं महत्व आता. हां, तुमच्या नावाची कोनशीलाच जर मिरवायची असेल तुम्हाला तर मग बांधा कमिशनच्या वाढीव चरबीने गलेलठ्ठ झालेल्या बजेटचे पूल, रस्ते, इमारती – धापा टाकणारे...! आणि पुतळेच बनवायचे असतील तुम्हाला, तर मग बनवा, तुमच्या विरोधकांचे… … कापडी…! ते ही बनवतील तुमचे, तसेच. निषेध-गोंगाटात जोडे मारण्यासाठी, काळं फासण्यासाठी, खूपच टोकदार असेल निषेध तर रॉकेल टाकून जाळण्यासाठी. त्यात माहीर आहातच तुम्ही… ! आमची विनंती आपण मान्य कराल अशी आशा करतो. धन्यवाद ! लिहून देणार - शहरातील सर्व पुतळे. - नागेश
#काव्योत्सव -२ (सामाजिक) ती आवरत होती, तिचं दुकान. दुकान म्हणजे काय - रस्त्याच्या कडेला विकायला ठेवलेल्या - मेणबत्त्या. मी सहजच म्हणालो, 'काय, चांगली दिसतेय विक्री सध्या, निघतच असतो हल्ली, कुठे ना कुठे - कँडल मार्च' तशी कसनुसं हसत ती म्हणाली, 'व्हय, बरं चाललंय, पन राती वाडूळ न्हाई थांबता येत, लेक दुसरीला हाय, एकलीच असती घरी. काळजी वाटती...' -नागेश./20418
#काव्योत्सव -2 (भावनाप्रधान) निःशब्द तांडव उदास आहे खिडकी आज. दिसतं आहे खिडकीतून आभाळ – काळ्याकुट्ट ढगांनी वेढलेलं आणि अंधारलेली दुपार. आडदांड वार्याशी सामना करणारी उघडी बोडकी उदास झाडी. आणि दिसताहेत ढग दूर कुठेतरी डोंगर माथ्यावर रुसून बसलेले; वार्यालाही न जुमानता. सारी धरणीच झालीय व्याकूळ पावसाच्या प्रतिक्षेत मधूनच झेपावतेय आकाशाकडे मीलनोत्सुक होऊन. खिडकीच्या बाहेर चाललं आहे तांडव – निःशब्द, मनाच्या खोल गाभार्यातील काळ्याशार डोहाला ढवळून काढणारं. आणि खिडकीच्या आत, इथे मी... नागेश पदमन.
#काव्योत्सव (सामाजिक) प्रतिमा बापुजींची या रंगाची वस्ती जाळण्यासाठी त्या रंगाने दिली सुपारी अन् अनामत रक्कम म्हणून ठेवले बंडल पाचशेच्या नोटांचे हातात त्याच्या. घेतली तपासून त्यानेही प्रत्येक नोट, आरपार पहात प्रतिमा बापुजींची... -नागेश पदमन
#काव्योत्सव (सामाजिक) -बापू उवाच- --------------------------------------- मी खूप विनवण्या केल्या त्यांना, म्हणालो, 'आता छापतच आहात नवीन तर, कृपा करून माझ्यासाठी एक करा- आता माझा फोटो तेवढा नका छापू त्यावर. वाटल्यास छापा कोणाचाही, अगदी तुमचा छापला तरी चालेल. सगळीकडे फडकतो तसा... पण माझा अनुभव विचाराल, तर खरंच सांगतो, माणसाचा नकाच छापू त्यावर. छापा एखाद्या हिंस्त्र श्वापदाचा, किंवा अंगावर शहारे आणणाऱ्या हरणाच्या शिकारीचा, किंवा असं करा ना, छापा एखाद्या गिधाडाचाच, प्रेताभोवती घिरट्या मारणाऱ्या.' पण- नाहीच ऐकलं त्यांनी माझं. म्हणाले, 'बापूजी, तुम्ही मौनातच छान दिसता. आणि फोटोचं म्हणाल तर, तुम्ही गाल बदलू शकता, तेवढं स्वातंत्र्य देऊ आम्ही तुम्हाला. इतके वर्ष डावा होता, आता उजवा पुढे करा. बाकी आम्ही पाहून घेऊ.' - नागेश पदमन
#काव्योत्सव (आध्यात्मिक) पसायदान (आमचे) अवतरली इथे | विश्वाची माऊली | देण्यास सावली | आनंदाची ǁ१ǁ विशीत विश्वाची | माऊली खंबीर | आमुचे शंभर | वाया गेले ǁ२ǁ विश्वबंधुत्वाचे | मागणे तुमचे | संबंध कलहाचे | जगामाजी ǁ३ǁ दुरिताचे तिमीर | घालवाल तुम्ही | अंधारात आम्ही | सोयीस्कर ǁ४ǁ विश्व घर एक | गेले दूर फार | इथे चुली चार | घरामाजी ǁ५ǁ जो जे वांछील | तया ते लाभावे | इतुकेच मागावे | पसायदान ǁ६ǁ आहे सारे यात | उगा का मागणे | सद्गुरुस सतावणे | व्यर्थची ǁ७ǁ नको ज्ञानराया | होऊ कष्टी वृथा | कोडगे सर्वथा | आम्ही इथे ǁ८ǁ -नागेश पदमन
#काव्योत्सव (सामाजिक) तो अन् मी ------------------------------------------------------- तो विचारत होता मला बरंच कांही. बरंचसं मला न समजणारं. तो विचरत होता स्टार हॉटेल्स विषयी, उंची मद्याविषयी, धुंद रात्रीं विषयी. तो विचारत होता मला कॅसिनो विषयी, डर्बी विषयी, डिस्को विषयी, तो विचारत होता असंच कांही-बाही मला न समजणारं. पाण्यासाठी जमीन खोदताना नखात गेलेली माती काढत मी म्हणालो, ‘दुष्काळानं भेगाळल्या भुईला कारंजे उडवण्याचे स्वप्न बघणं परवडत नसतं.’ तसा तो पहातच राहिला माझ्याकडे आश्चर्याने, जणू कांही मी नव्हतोच त्याच्या ग्रहावरचा... -नागेश पदमन
Copyright © 2024, Matrubharti Technologies Pvt. Ltd. All Rights Reserved.
Please enable javascript on your browser