#काव्योत्सव (सामाजिक)
-बापू उवाच-
---------------------------------------
मी खूप विनवण्या केल्या त्यांना,
म्हणालो,
'आता छापतच आहात नवीन तर,
कृपा करून माझ्यासाठी एक करा-
आता माझा फोटो तेवढा नका छापू त्यावर.
वाटल्यास छापा कोणाचाही,
अगदी तुमचा छापला तरी चालेल.
सगळीकडे फडकतो तसा...
पण माझा अनुभव विचाराल,
तर खरंच सांगतो,
माणसाचा नकाच छापू त्यावर.
छापा एखाद्या हिंस्त्र श्वापदाचा,
किंवा अंगावर शहारे आणणाऱ्या
हरणाच्या शिकारीचा,
किंवा
असं करा ना,
छापा एखाद्या गिधाडाचाच,
प्रेताभोवती घिरट्या मारणाऱ्या.'
पण-
नाहीच ऐकलं त्यांनी माझं.
म्हणाले,
'बापूजी, तुम्ही मौनातच छान दिसता.
आणि फोटोचं म्हणाल तर,
तुम्ही गाल बदलू शकता,
तेवढं स्वातंत्र्य देऊ आम्ही तुम्हाला.
इतके वर्ष डावा होता,
आता उजवा पुढे करा.
बाकी आम्ही पाहून घेऊ.'
- नागेश पदमन