पाहता पाहता 4-5 वर्षांचा काळ लोटला होता. माझंही एका सुस्वभावी परिसोबत जमून उरकलं. मी माझ्या खाजगी आयुष्यात विरघळून गेलो. पूर्वाच्या लग्नानंतर काही महिने ती कॉन्टॅक्ट मध्यें होती. नंतर तिचे डिपार्टमेंट शिफ्ट झाले होते. त्यामुळे आमचं एकमेकांना दिसणं जवळ जवळ बंद झालं आणि नंतर तर ती तिच्या संसारात गुंतली असावी. कॉल्स.. Mails वैगरे सगळंच बंद होत गेलं. माझी सुमितशी बोलण्याची इच्छा होत नव्हती. त्याने internal job opportunity घेऊन दुसरीकडे बदली करुन घेतली. आता फक्त अपर्णा दिसायची. तिचही वर्षभरात लग्न झालं. ती मात्र ओळख द्यायची, बोलायची.
एकदा तिच्याकडून कळाले की पूर्वाने कम्पनी सोडलीये आणि ती दुसरीकडे निघाली आहे. मग मात्र मला कॉल करावाच लागला. ती मला म्हणाली की नोटीस पिरियडच्या शेवटच्या दिवशी संध्याकाळी थोडा वेळ काढ आणि मला भेट. तर त्या दिवशी संध्याकाळी तिच्या डिपार्टमेंटमध्यें तिचा सेंड ऑफ झाला. मी तिला तिच्या कॅम्पसच्या बाहेर भेटतो म्हणालो होतो.. सगळ्यांना बाय वैगरे करुन ती एकटीच मला भेटायला आली. मला तिला पाहून खूप आश्चर्य वाटले.
लग्नाआधीची पूर्वा आणि आत्ताची पूर्वा जमीन असमानाचा फरक झाला होता. ती टवटवीत, कन्फयुज पण आनंदी, अवखळ आणि मिश्किल पूर्वा जाऊन तिथे एक अकाली अति प्रौढ झालेली स्त्री बसली होती. तिचा चेहरा कसल्यातरी दडपणाने ओढला गेला होता.
मी आणि ती जुजबी गप्पा मारत जवळच्या एका रेस्टोरंट मध्यें गेलो. कॉफ़ी ऑर्डर केली.
"कम्पनी का सोडलीस? कुठे चाललीस वैगरे मला काहीही interest नाहीये हे विचारण्यात. तू अशी का दिसतियेस? मला याचं उत्तर दे बस." मी तिला सरळ प्रश्न केला.
तिने डोळे झाकले. नंतर मान खाली घालून पापण्या बोटानी पुसल्या. रुमालाने परत डोळे पुसले.
"सुखाचे मार्ग कधीच निश्चित करता येत नाहीत हे शिकलीये मी इतक्या वर्षात. आता ही कम्पनी सोडून चाललीये त्यातून पण काय साध्य होणारे देव जाने. नवं रुटीन, काम यामुळे काहीतरी पॉजिटीव्ह बदल घडेल असं वाटतंय." ती बडबडली.
" तू चाललीयेस त्यात तुझी betterment असणारं यात शन्काचं नाहीये. पण तुझं हे दिसणं, वागणं आणि बोलणं यातली विसंगती मला कळत नाहीये. काय झालंय?"मी विचारलं.
" खूप काही झालंय. खूपच... तुला भेटून बोलायचं होतंच मला. कारण मी इतकी comfort कुठंच नसते काही बोलायला जितकी तुझ्यासोबत असते. पण संधी मिळत नव्हती. आज धीर गोळा केला." ती म्हणाली.
" मला भेटायला धीर गोळा करावा लागला? का बरं? तुझ्या लग्नानंतर तर मला वाटलं होतं सगळं सुरळीत झालं असेल. तू त्यावेळीही बरीच सावरली होतीस...तो सुमित... परत वैगरे... " मी शंका काढली.
" नाही.. तसं नाहीये काही.. पण.. माझ्या गतआयुष्याची काळीक मात्र माझ्या वर्तमानाला फासली जातीये त्याचा फार त्रास होतोय." ती म्हणाली.
"कसली गत आयुष्यातली काळीक. काहीही काय बोलतीयेस पूर्वा. जरा सविस्तर सांग." मी मुद्द्यावर येण्यासाठी म्हणालो.
" माझ्या नवऱ्याला जो माझ्या गावाकडचाच आहे. त्याला ते रितेश आणि सुमितचं प्रकरण माहित झालं. तेव्हापासून तो बिथरलाय." ती म्हणाली.
" काय? बिथरलाय म्हणजे? अगं ते तुझं लग्नाआधीच होतं, जे काही असेल ते. त्यावरून बिथरायचा त्याचा काय संबंध? तू त्याच्यासोबत आहेस, त्याची पत्नी आहेस. आता तसं काही नाही एवढं पुरे ना? माझ्या पत्नीचा कॉलेजमध्ये बॉयफ्रेंड होता. त्याने काय फरक पडतो. कोणाचं असत कोणाचं नाही. त्या वयातल्या गोष्टीचा आत्ता काय संबंध?" मी वैतागून म्हणालो.
"विराज.. तुझ्या सारखी मेन्टॅलिटी नाहीये त्याची. एवढा शिकलेला असूनपण अति पुरुषीपणा आणि मागासलेला आहे तो. खूप डोमीनेट करतो.. त्याचं म्हणणं आहे की, मी... मी उष्टी.. "
" गप गं..!! कसली हलकी आणि नीच विचारसरणी आहे ही.. "मी जवळ जवळ ओरडलोच.
मला राग आश्चर्य दोन्ही वाटत होतं तिच्या नवऱ्याचं. त्या मानाने रितेश आणि सुमित बरे होते मग.
"ह्या गोष्टीमुळे तो सरळ वागत नाही माझ्यावर. सतत संशय घेतो. माझी वेळ, पैसा, काम, ऑफिस मधले लोकं, फोन कॉल्स यावर सतत त्याची चौकशी असते. समाधानकारक उत्तरे नाही मिळाली तर मग शिव्या देतो आणि कधी कधीतर माराने... "
"काय बोलतीयेस पूर्वा आणि हे सगळं तू का सहन करतेस? तू स्वतंत्र आहेस, कमावती आहेस. तुला तो असं दाबतोय हे कळत असताना तू खुशाल दबली जातीयेस. मला हे आधी का नाही बोललीस? मी काय केलं असतं, आत्ता सांगू नाही शकत पण काहींना काही मार्ग नक्कीच काढला असता. " मी म्हणालो.
"मला त्याची खूप भीती वाटते रे. त्यादिवशी अपर्णाच्या मुलाच्या पहिल्या वाढदिवसाच्या पार्टीला आम्ही गेलेलो. माझ्या गावीही नव्हतं की रितेश तिथे असणारं. तो होता. माझ्या नवऱ्याला अपर्णाने सांगितले. हा रितेश आमचा जुना मित्र. तिने अनावधानाने केलं की मुद्दाम मला माहित नाही. तो तिथे आहे हा माझा दोष कसा असेल? पण घरी आल्यावर माझ्या नवऱ्याने माझा खांद्यातून हात ढिला केला अरे. मीं खूप घाबरले होते. माझ्या जीवाची फिकीर नाही मला. पण 2 वर्षांच बाळ आहे रे माझं. त्याला बघून हिंमत होतं नाही माझी पलटून उत्तर द्यायची. घरचे फार सपोर्ट करत नाहीत. त्यांना वाटतं परत काहीतरी वेडं वाकडं व्हायचं. जसं चाललंय तसं चालू दे म्हणतात. " ती म्हणाली.
मी डोक्याला हात लावला.
"राहतं घर आम्हा दोघांच्या नावावर आहे. पण संपूर्ण हफ्ता मीं एकटी भरते. त्याला SAP चा कोर्स करायचा होता तर मला 4 लाख पर्सनल लोन काढायला लावलं. जॉब स्विच केला. भरपूर पगार मिळवतो पण फक्त घर चालवतो. इतर सगळं माझ्या अंगावर आहे. स्वतःचा पैसा सांगत नाही किती काय आहे ते. माझं मात्र 100 रुपये खर्चाच गणितही द्यावं लागतं. मी कामावते ते सगळं अपूर पडतंय, मुलाचे छोटे छोटे लाड ही मला करता येत नाहीत. म्हणून मग नोकरीं बदलून पगार वाढवण्याची खटपट चालू आहे माझी. " तिने सविस्तरपणे सर्व सांगितलं.
तिच्या आयुष्यातला तो गोंधळ ऐकून मीं परत एकदा आधीसारखा अस्वस्थ झालो.
" मी तुला मार्ग सुचवला तर फाईट देशील का? " मी विचारले.
" तुझं लग्न झालंय, तुझा संसार आहे. मी आता अशी अपेक्षा कशी धरणार असं वाटून मीं तुला काहीच कळवले नाही. पण.. आता खूप जीवावर आलंय." ती थांबली. पाणी घेतलं.
"इथून चाललीये म्हणून मग.. वाटतंय की, तू जर सुचवत असशील, तर ते ऐकायला हवं. कदाचित तुझ्याकडूनच माझं नीट व्हायचं असत. दर वेळी." ती म्हणाली.
कॉफी आली होती. मग मधल्या वाफेकडे बघत मी मोबाईल काढला. एका मित्राला.. प्रमोदला कॉल करुन त्याच्या आईचा नंबर घेतला. डायल केला.
" हॅलो!! हा मावशी मी विराज, प्रमोदचा मित्र. तुमच्या जिजाई स्त्री स्फूर्ती संस्थेत माझ्या एका ओळखीच्या एक लेडी आहेत ऑफिसातल्या. त्या येतील.. त्यांना प्लिज मार्गदर्शन करा. घरचा मॅटर आहे....
****
चारेक महिन्यांनी मला पूर्वाचा कॉल आला. तिने सांगितलं.
तिच्या नवऱ्याला जबरदस्त समज देण्यात आली होती. आठ दहा दिवस डोमेस्टिक व्हायोलन्स बद्दल जेलमध्यें जाऊन मारही खाऊन आला तो. पूर्वाच्या सासर, माहेर आणि नवऱ्याचेही नीटपणे समुपदेशन करण्यात आले होते. तिच्या आयुष्यात परत शांती पसरली. ती माझे फोनवर आभार मानत होती.
" तू सतत पाठिंबा देतोस म्हणून बिघडलेलं परत सुरळीत घडतं." ती म्हणाली.
"अगं तू लढायला तयार झालीस हे महत्वाचे. आधीच बोलली असतीस तर एवढं सहनही करावं लागलं नसतं." मी म्हणालो.
"विराज.. खरंतर सुरुवातीपासूनच मी एक गोष्ट समजून घेऊन विचार करुन बोलले असते तर मला कधीच काहीच सहन करावं लागलं नसतं.. " ती बोलून थांबली.
" म्हणजे गं. " मी विचारले.
" काही नाही.. जाऊदे.. ती गोष्ट अपूर्ण राहिली त्यामागेही काही कारण असेल.. पण तू माझी सतत पाठराखण करत राहिलास. You are the best person in my life.. असाच रहा.." ती म्हणाली.
पूर्वाचं सूचक बोलणं ध्यानी आलं होतं माझ्या. पण काही गोष्टी अपूर्ण राहण्यासाठी त्याच्या पूर्णत्वाची इच्छा तर हवी. पूर्वा माझी मैत्रीण आहे... आणि ते नातं माझ्यासाठी पूर्ण आहे. बाकी सगळं अर्धवट वाटत असलेलं... गौण...
समाप्त.
- शब्दभ्रमर 🍁🍁