Ardhvat - 4 in Marathi Love Stories by Shabdbhramar books and stories PDF | अर्धवट - भाग 4

Featured Books
Categories
Share

अर्धवट - भाग 4

"विराज!! खूप मोठी चूक झाली रे माझ्याकडून.. मी तिला खूप शिव्या दिल्या.. नाही तसलं बोललो. खूप त्रास होतोय रे मला.." तो नशेत बरळत होता. रात्रीचे साडेबारा झालेले.. त्याने मला कॉल केलेला.

" सुम्या? अरे.. काय?? कुठयस तू? पिलायस की काय? " मी विचारलं.

"अरे तीन beer फक्त.. पिलो नाय काय... पण.. तू म्हणालेलेला.. ना.. की क्लिअर करुन घे.. ते.. खरं होतं भावा.. तो.. तिला घेऊन... गेला... गेला आणि.." पिल्यामुळे त्याची वाचा लोळत होती 

"तिला धमकवून रितेशने तुला कॉल करायला लावला. म्हणजे ती तुझ्याकडे येते हे ठाऊक झालं त्याला.  हे सुद्धा तिने रितेशपासून लपवून ठेवलेलं. मूर्ख आहे ही पूर्वा. उद्या बघतो तिला. " मी चिडून बोललो.

"अरे..तू खरा मित्र.. आय लव्ह यु... झोप झोप तुझी झोप मोलडी.. मी.. झोप.. मी पण झोपतो... " असं बरळत तो शांत झाला.

मी सकाळी उठून पाहतोय तर एका अनोळखी नंबरवरून मला तीन कॉल्स होते. रात्री फोन सायलेंट करुन झोपलेलो आवरून ऑफिसला निघालो. बसमध्ये बसल्यावर त्या नंबरला फोन लावला. उचलल्या गेला.

" हॅलो!" मी बोललो.

" hi!! विराज.. मी रितेश.. पूर्वाचा.. " तो बोलला.

" हॊ आलं लक्षात. माझ्याकडे काय काम काढलंस? " मी विचारलं.

" अरे.. ती पूर्वा फार विचित्र वागतीये रे.. मला कळत नाहीये.. माझ्याशी गेले आठ दहा महिने तिचं सुरु आहे. मी तिला कमिटमेन्ट दिलीये आणि ती आता त्या सुमितसोबत.. भेटते वैगरे.. मला माहिते की तुमची मैत्री असताना मी आक्षेप घेतला होता. पण तुझ्याशी कॉल वर बोलत असताना मी वेटिंगला असलो तरी ती कॉल्स घ्यायची नाही. शिवाय दोन तीनदा मला खोटं कारण देऊन, टाळून ती तुझ्यासोबत गेली होती. कोण बॉयफ्रेंड असलं सहन करेल? " तो बोलला.

" हे सगळं ती करतीये. ती तसं का करतीये हे तू तिला विचार ना? माझ्याकडून काय अपेक्षित आहे तुला? " मला ह्या पूर्वामुळे विनाकारण यात खेचलं जात होतं असा फील यायला लागलेला.

" तू एकटाच आहेस ज्याचं ती ऐकेल. माहित नाही का पण तुझ्या बाबतीत तिला खूप काही वाटतं हे तिच्या बोलण्यातून नेहमी आलंय... प्लिज तिला समजावं.. मी आधी timepass वैगरे करणारा होतो मुलींसोबत. पण पूर्वा आल्यापासून तसं नाहीये. मी तिच्याशीच प्रामाणिक आहे. तिला सांग.. त्या सुमितला भेटू नकोस प्लिज. अरे आज सकाळीच तिच्या हॉस्टेलवरून ती गेली त्याला भेटायला. " तो बोलला.

" म्हणजे? ती तुमच्याकडे राहत नाही? " मला आत्ताच कळले होते की अंनत सरांचे घर तिने सोडले होते.

" दोन आठवडे झाले तिने सोडून...कदाचित सुमितला भेटता यावं म्हणून. पण मला कळत नाहीये का? हा कुठून आला. माझी का अडचण आहे तिला. प्लिज तिच्याशी बोल. " तो ही विव्हळू लागला.

" ठीके बघतो प्रयत्न करुन." एवढं बोलून मी कॉल कट केला.

" call me. " एवढाच मेसेज मी पूर्वाला केला आणि माझ्या कामात गुंतलो. 

लन्च अवर मध्यें पूर्वा माझ्याकडे आली. "जेवायला जायचं? तिने विचारलं.

ताटे घेऊन आम्ही कॅन्टीन मध्यें बसलो होतो. सुम्याला आणि माझ्या ग्रुपच्या मित्तूरड्याना टांग दिल्याचं त्यांनी लांबून पाहिलं आणि दोन चार जणांनी. "हे वाया गेलंय." अशा अर्थाचे भाव दाखवले. सुम्यापन बघत होता. पण आमच्याकडे आला नाही.

"काय चाललंय तुझं? त्या सुमितला कमिट केलंयस. रितेशला लटकवलंय? सुधरत नाहीये तुला तू काय करतीयेस? " मी म्हणालो.

" तू समजवायला नव्हतास काय करावं?  मग माझं असंच होणारं होतं." ती म्हणाली. 

"काय गरज आहे माझी? तुझा तुला काही आतला आवाज नाहीये का?" मी.

" हे बघ माझ्या आयुष्यात जे घडतंय ते सर्व काही पहिल्यांदा आहे. मी खूप शिस्तीच्या वातावरणात वाढले आहे. मला असे निर्णय कसे घ्यायचे कोण सांगणार? इथे मी कोणावर विश्वास ठेऊ तेच कळत नाही. ती अपर्णा पूर्णपणे त्या रितेशच्या आहारी गेलीये. चूक बरोबर काही कळत नाही तिला. तिला मनाची अवस्था कशी सांगू? मग तुझ्या सोबत बोलले की मला मार्ग दिसायचे. मला खूपदा तुला सांगावं वाटत होतं की मी रितेश ला हॊ म्हणून चूक केलीये, मला यातून बाहेर काढ. पण त्यात घाई होतीये का? असं ही वाटायचं. अन धीर एकवटत आणला तोवर तू रागावलास. मी काय करणार होते? आता दोन्हीकडून ओढाताण होतीये माझी. तुला फक्त सुमित दिसतो. त्याच्याआधी मी तुझी मैत्रीण आहे हे कसं विसरलास तू? केवळ मी मुलगी आहे म्हणून तू तुझी तत्व जपण्यासाठी मला दूर केलंस. मैत्रीची काहीच किंमत नाहीये का?" तिने सविस्तर सांगितलं पण शेवटचे तिचे प्रश्न खरे होते आणि उत्तर द्यायला अवघड ही.

मला समजलं होतं. तिला थोडा वेळ मी दिला असता तर तिला सुमित यायच्या आधीच मी बाहेर काढू शकलो असतो. माझी चूक झाली होती आणि थोडा उशीर झाला होता खरा. पण वेळ गेलेली नव्हती. 

"बरं..! सॉरी मी दूर झालो तुझ्यापासून कळलं मला आत्ता. तुला काय हवंय ते आपण पहिलं ठरवू. तू काय म्हणतेस तसं होईल यासाठी प्रयत्न करू. बोल." मी विचारले.

" सुमित खूप हुशार आणि एक क्लास असलेला मुलगा आहे. शांत वृत्तीचा आहे. गैरसमज करुन घेतो पण प्रेमळ सुद्धा खूप आहे. मेहनती आहे. स्वबळावर उभा आहे. तोच आयुष्यात योग्य आहे मला. शिवाय आम्हाला घरच्यांची पण साथ आहे. मला त्याच्यासोबत रहायची इच्छा आहे." ती म्हणाली.

" fix आहे तूझं? " मी विचारलं.

" हॊ. "

" सुम्याला बोललीस हे? "मी 

" सकाळीच. " ती मान खाली घालत म्हणाली.

" नको तोंड लपवू आता. आणि माझ्यासमोर तर नकोच. " मी तिची खेचत म्हणालो.

ती हसली.
"रितेशच्या घरी काही माहित आहे का की तुमचं... " मी विचारलं.

" त्याच्या आईला डाऊट आलाय. मला त्यांच्या वागण्यातून जाणवू लागलं. टोमणे मारायला लागल्या. मग मी ती रूम सोडली." ती म्हणाली.

"अच्छा. म्हणजे त्यांना ते मान्य नाहीये तर." मी विचारलं.

" कसं होईल. ह्याला स्वतःची अक्कल नाही अजून. कोण लग्न करेल याच्याशी. त्याच्या घरच्याना कळतंय की. " पूर्वा म्हणाली.

"मग सोपय. मी सांगतो तसं कर. " मी म्हणालो.

"काय करू? " तिने विचारले.

मी पाण्याचा ग्लास हातात घेतला आणि तिच्याकडे पाहून हसू लागलो.

- क्रमशः

शब्दभ्रमर 🍁🍁