सकाळचे सात वाजलेले. लोकं भक्तीगीतानी, भूपाळ्यांनी उठतात. मी फोनच्या रिंगने उठलो. पूर्वा होती.
" हा बोल पूर्वा. " मी म्हणालो.
" विराज!! संपलय सगळं. माती झाली सगळी. " ती रडत रडत म्हणू लागली.
" काय झालं? अगं तू ठीकेस ना? आहेस कुठे तू? " मी काळजीने विचारू लागलो.
तिने मला सांगितलेली हकीकत ती अशी.
'रितेश आणि अपर्णाला तिने एका सुट्टी मध्यें त्यांच्या गावी नेले होते. हे मला माहित नव्हतं. तिथे त्याला अजित भेटला होता. जो पूर्वाच्या अत्याचा मुलगा होता. पूर्वा त्याची क्रश होती. त्याला वाटायचं मामाची मुलगी म्हणजे आपलीच बायको. त्याला तसं घरात पण चिडवायचे. पण त्याच करियर वैगरे काही नव्हतं. उनाडक्याचं करायचा तो पण. त्यामुळे तिचे आई वडील काही तसलं मनात आणत नव्हते. रितेश तिकडं गेल्यावर हे जरा खार खाऊन होतं त्याच्यावर. त्याच्यासोबत थोडी शाब्दिक चकमक पण झाली होती रितेशची. पण पूर्वाने तिथे घरी अजून राडा नको म्हणून वेळ मारून न्यायला त्याला सांगितले होते की रितेश फक्त तिचा मित्र आहे.
तर त्या अजितला रितेशने कॉन्टॅक्ट करत सांगितले की माझं आणि पूर्वाचं होतं ते तोडून, दुसरा जरा चांगला मिळतोय तर ती त्याच्या सोबत लग्न करतीये. मला आता नकोय काही, पण तिचं हे लग्न मोडलं म्हणल्यावर गावात तिची बदनामी होईल. तुला चान्स आहे मग. पण त्याने तिचं अफेअर रितेश सोबत आहे एवढी खबर कसंही करुन सुमितच्या वडिलांपर्यंत पोहोचवावी. असं अजितला सांगितलं. तो माथेफिरू होताच. आपल्याला नाही मिळाली तरी ठीक पण तिच्याही मनासारखं होऊ द्यायचं नाही असं त्यालाही वाटलं. मग अजितने शोधून शोधून सुमितच्या मामाची ओळख काढली, आणि ही गोष्ट त्याच्या कानावर घातली. त्यात रितेश गावाला आल्याचे आणि दोघे एकत्र फिरण्याचे किस्से ही रंगवले.
गावाकडे असल्या गोष्टी जरा जास्त गम्भीरतेने घेतल्या जातात. मामानी वेळ न घालवता सुमितच्या वडिलांना कळवले. रात्रीच सुमितच्या वडिलांनी सुमितला कॉल केला. तो त्यांना समजवत होता की ही गोष्ट त्याला माहित आहे. त्याला प्रॉब्लेम नाही. पण त्याचे कडक स्वभावाचे वडील हे ऐकायला तयार नव्हते. सुमितला निर्लज्ज वैगरे म्हणतं त्यांनी बडबड केली. आज ती तुझ्यासाठी एकाला सोडतीये उद्या दुसऱ्यासाठी तुला सोडेल. आपल्या घरात असली मुलगी सून म्हणून चालणार नाही असंही ते म्हणाले. नंतर त्यांनी सरळ पूर्वाच्या घरी कॉल करत हे लग्न अमान्य असल्याच सांगितलं. कारण दिलं ते तेच जे त्यांना कळलं होतं.
पूर्वाच्या घरच्यांनी प्रयत्न करुन पाहिला एका लिमिट पर्यंत. पण जास्त झाल्यावर त्यांनीही सोडून दिले. तिला वडिलांनी कॉल करुन हे लग्न मोडल्याच सांगितलं.
पूर्वा सगळ्यांच्या म्हणण्याला झिडकरायला तयार होती. तिला काय ते सुमितकडून ऐकायचं होतं. ती त्याच्याकडे सकाळी सकाळी पोहोचली आणि त्याला त्याचं म्हणणं विचारलं.
तर हा प्रेमावीर वडिलांच्या समोर शस्त्र ठेऊन गुढग्यावर बसला असल्याच त्याने कबूल केलं. त्याला मी कॉल वर असतानाच पूर्वाने प्रचंड बडबड केली. खूप सुनवलं. शेवटी रडत तिथून ती निघून गेली.
दिवसभर मला कोणाचाही कॉल आला नाही. सुमित कामावर नव्हता. पूर्वा दिसली. पण बोलण्याच्या मनस्थिती मध्यें नव्हती. संध्याकाळी मी होऊन सुम्याकडे गेलो. तो रूमवर होता.
त्याला म्हणालो, "वडील ऐकत नाहीयेत तर मग तू का ऐकतोयस. तुला भरवसा आहे ना पूर्वावर? "
" लहानपनापासून वडलांची दहशत बसलीये रे मनावर. त्यांचं म्हणणं डावलण्याची हिंमतच करू शकत नाही मी. मला सांगितलेलं काम केलं नाही म्हणून कपडे काढून घराबाहेर तासभर हकलून लावणारा बाप पाहिला आहे मी. त्यांनी नाही म्हणलं की माझे हातपाय अजूनही गळतात. मला शक्यच नाहीये त्यांच्याशी वाद घालणं. " तो बोलला.
त्याचं ते बोलणं बघून माझ्याकडे त्याला समवण्यासाठी काहीच नव्हतं. हवा गेलेल्या ट्यूब मध्यें हवा भरता येते पंक्चर ट्यूब मध्यें नाही. मी त्याला फोन मागितला. त्याच्या फोन वरून मी त्याच्या वडिलांना कॉल केला. तो नको नको करत होता.
" हा बोल सुमित." पलीकडून त्याच्या वडिलांचा आवाज आला.
" नमस्कार काका. मी विराज. सुमित आणि पूर्वाचा कॉमन मित्र. माझं जरा दोन मिनिट ऐकून घ्या. " मी म्हणालो.
" हे जर त्या मुलीबाबत असेल तर माझा निर्णय मी कळवलाय. त्यात बदल नाही होणारं. " ते म्हणाले.
"ठीके! नका करू बदल तुमच्या निर्णयात. पण थोडं ऐकून घ्या. ह्या दोघांना एकमेकांशी लग्न करायचंय कारण दोघांच्या दृष्टीने ते अनुरूप वाटतात एकमेकांना. इथे शहरात दोघे एकमेकांच्या विश्वासाने राहू शकतात याची खात्री त्यांना वाटते. तेव्हा तुम्हाला तिचा विश्वास वाटणं न वाटणं गौण आहे. सुमितचा विचार बाप म्हणून तुम्ही करतचं नाहीयेत." मी म्हणालो.
"असली लफडेबाज पोरगी त्याच्या गळ्यात पडू देत नाहीये म्हणजे त्याचाच तर विचार करतोय मी." ते जरा उसळून म्हणाले.
" अच्छा! तुम्ही जे लांच्छन तिला लावत आहात ते तुमच्या मुलाच्या बुडालाही आहे मग. त्याचं पण एक अफेअर होतं आधी. हे माहित असून पण पूर्वा तयार आहे. कशावरून तो तिला सोडून दुसरीसोबत जाणार नाही? करू शकतो ना तो पण असं, काही काळ झाल्यावर? " मी पण खवळलो मग असल्या हीन वृत्तीवर.
" पुरुषांच वेगळं असतं... कळतं का तुला..." मी कट केला पुढं बोलण्यात अर्थ नव्हता.
" सुम्या!! ह्याची भरपाई कशी करणारेस? तिनी स्वप्नं बघीतलेली तुझ्यासोबत. त्याची किंमत कशी काय चुकवणारेस? थोडा धीर गोळा करशील तर अजूनही हे होण्यासारखं आहे..." मी म्हणालो. पण त्याने मान खाली घातली. माझं उत्तर मला मिळालं होतं.
पुढले काही दिवस पूर्वाला भेटून समजावून तिला मी परत रुळावर आणली. तिने काही आठवड्यानी मला सांगितलं की "घरच्यांनी पुण्यात सर्व्हिस करणारा एक मुलगा बघितलाय. आमच्या भागातलाच आहे. मी हॊ बोललीये."
साखरपुडा आणि लग्न एका महिन्यातच उरकलं. लग्नाला मी गेलो होतो. त्यात अपर्णा पण होती. तिच्याकडे एक हॅंडीकॅम होता. त्याने ती लग्नात मधून मधून शूट करत होती. मला तो बघितल्यासारखा वाटला.
तिला मी जाऊन विचारलं.
" काय गं साईड बिजिनेस का?"
" माईंड युअर्स प्लिज. " ती जरा atitude मध्यें म्हणाली. मागे मी दाखवला होता. परतफेड.
" हॅंडीकॅम ओळखीचा आहे म्हणून विचारतोय. " मी म्हणालो.
" सुमितचा आहे. त्याला रेकॉर्ड करुन देतीये. " ती म्हणाली.
" त्याची request? " मी विचारलं.
" नाही पूर्वाची. तिने मागवला माझ्याकरवी. शूट करुन दे म्हणाली त्याला. सूड म्हणून. " ती म्हणाली.
"आयला ही पूर्वा. किती किडे आहेत हिच्या अंगात." मी म्हणालो.
"मित्रच असले म्हणाल्यावर. ती पण तशीच वागणार." ती खोचक पणे म्हणाली.
मित्र कसा आहे तुझा. त्याच्यामुळेच हे लग्न होतंय. आला नाही तो? " मी विचारले.
" मला नाही माहित आता कसा आहे तो. मलाही बाहेर पडाव लागलं तिथून. तुझ्यामुळे माझी चांगली रूम गेली. हंह!!" ती वैतागून म्हणाली.
" sorry for that.. " असं म्हणून मी तिथून निघालो.
" ए ए.. थांब.. थांब.. निघालास कुठे.. जेवायला कम्पनी दे मला.. मी कोणाला ओळखत नाही इथे.. " ती म्हणाली.
" चल तर मग... "
" तू कुठला प्रॉपर... "
" पुण्याचा... तू..?
" आम्ही संत्रिवाले... "
"अच्छा.. बर्फी आण केव्हातरी संत्रा फ्लेवर...."
"हॊ.. आणेन की...
लग्न सोहळा पार पडत होता.. माझ्या आयुष्यात सुम्या आणि पूर्वाच्या रूपाने आलेली हलकी वावटळ शमली होती...
त्यांचं अपूर्ण राहिलं होतं.
जे चालू होतं ते पूर्ण करण्यासाठी...
क्रमशः
- शब्दभ्रमर 🍁🍁