" अरे.. सगळा सत्यानाश केला तिने.. वाट लावली.. घाण केली .. अरे तिला मी फक्त समजावं म्हणलं होतं.. तू काय बोललास तिला माहित नाही. पण बघ काय करुन ठेवलंय तिने... "
फोनवर रितेश ओरडत होता. मी फक्त शांतपणे ऐकत होतो.
त्याचं तोंड चालू होतं. नाही नाही ते बरळत तो पूर्वाला बोल लावत होता. त्याचं कारण होतं मी तिला सांगितलेली युक्ती.
झालं असं होतं.
संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर पूर्वा शांतपणे रूमवर गेली. तिने आवरलं आणि मी सांगितल्याप्रमाणे संध्याकाळी सात वाजता ती अनंत सरांच्या घरी गेली. सर आणि काकू घरी होत्या. रितेश ही योगायोगाने घरीच होता. रूम सोडून गेली असली तरी तिने त्यांच्याकडे जाने येणे ठेवले होते. त्यामुळे तसं तिचं तिथं स्वागत होतं. यावेळी मी तिला खूप धीर गोळा करायला लावला होता.
" नमस्कार काका!" ती म्हणाली.
" ये पूर्वा.. काय म्हणते? कशीयेस? " ते म्हणाले.
काकू भाजी निवडत होत्या. ते आणि रितेश tv बघत होते.
"काका खूप महत्वाचे बोलायचे होते." ती म्हणाली.
" बोल की.. काही अडचण आहे का? " त्यांनी विचारले.
तिला खरंतर काकांना दुखवायचे नव्हते पण दुसरा पर्याय नव्हता.
" काका... माझं रितेशवर खूप प्रेम आहे. मला त्याच्याशी लग्न करायचंय. तो तुम्हाला सांगायला घाबरत होता. म्हणून मग मीच आले. प्लिज आमचं लग्न लावून द्या. माझ्या घरच्याना हे मान्य होणार नाही. पण तुम्ही पुढाकार घेतला तर सहज हे शक्य होईल. " ती एका दमात बॉम्ब फोडून मोकळी झाली.
रितेशने कपाळावर हात मारून घेतला होता. अपर्णा दारात धक्का बसून उभी होती. अनंतसर आ करुन बघू लागले. सगळ्यात पहिल्या रिऍक्ट झाल्या त्या काकू.
" सांगत होते ना तुम्हाला मी.. बघा काय बोलतीये ही.. न जात ना गोत बघायचं .. वर तोंड करायचं आणि करायच्या भानगडी. आपलंच बीज खोटं ओ.. ह्या नालायकामुळं सगळं सहन करावं लागतंय. " त्या ओरडू लागल्या.
" काकू प्लिज.. तुम्ही तरी समजून घ्या.. आईसारखं मानते मी तुम्हांला." पूर्वा नाटकी विनवणी करत बोलली.
" पूर्वा..तू आत्ता घरी जा." अनंतसर म्हणाले.
" सर. प्लिज विचार करा. आमचं भविष्य तुमच्या हातात आहे हॊ. " असं म्हणतं ती अपर्णा सोबत वर रूम मध्ये गेली.
खालून खूप आरडाओरड ऐकू येत होती. रितेशला त्याच्या आईवडिलांनी भयंकर बडबड केली. कमी की काय म्हणून त्याच्या चुलत्याला देखील फोन करुन बोलवण्यात आलं. ते ही रितेशला बोलू लागले..
"तू थोरला आहेस.. तूच असं वागशील तर मग धाकट्याने काय करायचं. पुढं जाऊन माझ्या मुलीही तोच कित्ता गिरवतील. हे सगळं इथंच थांबव. एवढी काय घाई झालीये तुला? आपल्या समाजात एक सें एक मुलीं आहेत. तिला काय सोनं लागलंय वैगरे... "
अनंतसरांना पण मुलींना रूम दिल्याबद्दल रितेशच्या काकांनी बडबड केली.
"हे व्हायला काय वेळ लागणार होता?... आपलं पोरगं कसलंय माहित आहे ना तुला.." वैगरे लेकावरून टोमणे ही दिले.
रितेश बाहेर कितीही टर्रीत राहत असला तरी या बाबतीत घरचे त्याला ऐकणार नाहीत हे त्याला माहित होतं. रितेशच्या आईने तर त्याने काही बोलायला तोंड उघडलं की आगपाखड करत होत्या.
शेवटी त्या म्हणाल्या की, "मला पूर्वाच्या घरी फोन लावून द्या. तिच्या आईशी बोलायचंय." तेव्हा पूर्वा तिथून बाहेरच्या जिन्याने कल्टी मारून निघून आली.
"तुला अचानक काय झालं? का असं एकदम येऊन तमाशा घातलास. रितेशला बघ किती ऐकावं लागतंय. उगाच इथं येऊन असं केलंस तू.. आता तर मलाही बहुतेक रूम सोडावी लागणार... वैगरे.." अपर्णाचं पण पालूपद सुरु होतं.
पण मनातून पूर्वा खुश होती. तिने पेटवलेली वात एवढा मोठा सुरुंग फोडेल असं तिला वाटलं नव्हतं.
सुम्याचा मला कॉल आला.
" साल्या कसला चांडाळ आहेस तू!! काय गेम केलीस रे? त्या पूर्वाच्या घरी आई वडिलांना कॉल केला होता रितेशच्या आईने त्यांची खूप भांडणे झाली. पूर्वाच्या आणि आमच्या घरच्यांची बैठक आहे या विकेंडला. लग्नाचं ठरवायला. सगळं एका संध्याकाळी जमवलं. पार्टी तुला माझ्याकडून."
तो फोनवर उड्या मारत होता. पूर्वाने पण कॉल करुन सगळा इतिवृत्तांत ऐकवला. प्लॅन यशस्वी झालेला.
" तिचे आई वडील त्या सुमितसोबत तिचं fix करणारेत. पूर्वाला नाही करायचंय त्याच्यासोबत लग्न.. त्याशिवाय तिने घरी येऊन हा गोंधळ घातलाच नसता वैगरे.." रितेश सकाळच्या कॉल वर बोलत होता.
मी त्याला समजावलं.
" आता मला जिथपर्यंत पूर्वाला समजावता आलं मी केलं. यापुढे तुम्ही बघा यार. मी काय करू शकतो."
"मी तिला त्याच्याशी लग्न करू देणार नाही!!" एवढंच तो शेवटी बोलला. ते वाक्य न जाणो का पण मला थोडं टेन्शन देऊन गेलं.
"पूर्वा आणि सुमीत गावी गेले. दोघांचं गाव शेजारी शेजारी होतं. त्यांच्या बैठकीचा कार्यक्रम पार पडला. पसंती पत्रिका वैगरे झालंच होतं. पुढल्या महिन्यात एंगेजमेंट आणि मग तेव्हा लग्नाची तारिख काढायचं ठरलं. पूर्वाला तीन महिने हवे होते. तिचं कन्फरमेशन येणार होतं. पर्मनंट जॉब होणार होता. सुमितच्या घरच्यांना काही अडचण नव्हती. उलट ती पर्मनंट होतीये याचा त्यांना आनंदच होता. थोडक्यात सगळीकडे आनंदी आनंद पसरला होता.
पुढल्या आठवड्यात मी दहा वाजता काही कामानिमित्त एका डिपार्टमेंट ला जायला बाहेर आलो. तर दोन वाक्य ऐकू आली.
"मी कोणाच्या बापाला नाय भीत."
" मी पण कोणाच्या बापाला नाय भीत. "
कॉरिडोर मध्यें सुमित आणि रितेश समोरासमोर होते.
"आयला!! इथं?? ही काय जागा आहे का एकमेकांना बापाचा आदर दाखवायची." असं म्हणत मी दोघांना बिल्डिंग बाहेर घेऊन आलो.
" हे बघ रितेश. यात आता घरचे इन्व्हॉल्व्ह आहेत. त्यांनी तिचं आणि सुमितच ठरवलंय. तुझा रोल संपलाय. तू आता याला किंवा तिला कसलाही त्रास द्यायला जाशील तर मग मध्यें मी आहे. मला वाटतंय तू माझी चौकशी करुन ठेवली असणारेस."
मी त्याला बोललो. तो ज्या बापांच्या जीवावर उड्या मारत होता त्यातले बरेचसे माझे मित्र होते त्याला माहित होतं.
तो जरा वरमला. मी सुमितला परत पाठवलं आणि रितेशला बाजूला घेऊन गेलो.
" तुझं फाटलंय कळतंय मला. पण आता काही नाही होऊ शकत. त्यांचं त्यांना आयुष्य जगू दे. वेळ जाईल तसं तू पण स्थिर होशील. काही गोष्टी ओढून ताणून आपल्या आयुष्यात आणण्यापेक्षा त्या सहज ठेवायच्या असतात. मिळाल्या तर ठीक नायतर आपल्या वाट्याला नाही म्हणून सोडावं लागतं." मी त्याला समजावत होतो. पण तो चेहऱ्यावरून तरी न समजल्यासारखा वाटत होता.
शेवटी मी त्याला एकच बोललो.
"तू त्यांच्या मध्यें यायचा प्रयत्न थांबव हे तुझ्यासाठी चांगलं आहे." आणि मी निघून गेलो.
दोघांच्या एंगेजमेंटची तयारी सुरु होती. शॉपिंग वैगरे ते दोघेच करत होते. मला अधून मधून अपडेट्स मिळत होते. एंगेजमेंट च्या आधी एक आठवडा पूर्वाचं कन्फरमेशन लेटर आलं. तीन महिन्याचा प्रोबेशन पिरियड झाल्यानंतर लग्नाचा मार्ग सुकर झाला. आम्ही दोघांनी पूर्वाला कापली. चांगली स्टार रेटेड हॉटेलमध्ये पार्टी द्यायला लावली तिला.
एक दिवस मला एक कॉल आला. मी उचलला.
" हॅलो.. मी अपर्णा बोलतीये. " ती म्हणाली.
" अपर्णा? पूर्वाची मैत्रीण? " मी विचारलं.
" हॊ. मीच. रितेश खूप डिप्रेशन मध्यें आहे. खूप त्रास होतोय त्याला. पूर्वा सोडून गेल्याच सहन होत नाहीये त्याला. प्लिज पूर्वाला समजावं.. तिने असं वागायला नको होतं. " ती बोलू लागली.
" पहिली गोष्ट. पूर्वा त्या रिलेशन मध्यें राहायला रेडी नव्हती. तू तिला रितेशच्या सांगण्यावरून भरीला घातली हे ती मला बोललीये. तुला मी उघड सांगतो. तिला त्याच्याशी काहीही करायचं नव्हतं. कसल्यातरी प्रेशर मध्यें ती हॊ बोलून गेली. पण आता तिचं क्लीअर आहे. तिच्या घरच्यांचा तिला सपोर्ट आहे. तेव्हा हे मॅटर आता तिचं फॅमिली मॅटर आहे. मी किंवा तू आपण कोणीही नाही आहोत यात पडणारे. मला परत या विषयावर कॉल करू नकोस. रितेशला म्हण बळेच एखाद्याला नात्यात ओढून घेण्यापेक्षा जिंकण्याचा प्रयत्न करायला शिक. " एवढं बोलून मीच कॉल कट केला.
दोन दिवसांनी मला पूर्वाचा कॉल आला. ती रडत होती.
- क्रमशः
शब्दभ्रमर