Kondan Parva One - Part 22 in Marathi Love Stories by Shabdbhramar books and stories PDF | कोंदण पर्व एक - भाग 22

Featured Books
Categories
Share

कोंदण पर्व एक - भाग 22

विदारक 


घरी आलो. फ्रेश होऊन सुनिकडे पळालो.


" काकू? सुनी? " घरात पाऊल ठेवतंच मी विचारलं.

" अरे ती तिच्या बाबांसोबत शहरात गेलीये. त्यांचं काही काम होतं. हिने हट्ट केला मी पण येते. मग नेलं त्यांनी. " काकू म्हणाल्या.

" किती वाजेपर्यंत येतील? " मी विचारलं.

" रात्र होईल यायला त्यांना. का रे? काही अर्जंट काम होतं का? " त्यांनी विचारलं.

" नाही!! असंच. " म्हणून मी सटकलो.

सुनीने आजचा दिवसच टाळला होता. मला तर ती कधी एकदा भेटतीये असं झालं होतं. पण बहुतेक आज शक्य नव्हतं. खूप आठवण येत होती तिची. काल तिच्यावर ओरडलो त्याचा मला त्रास होत होता आता. मला जे करायचं होतं ते करुन झालं. मी सुनीचा शब्द पण मोडला नव्हता. पण तिचं मन ओरडून दुखावलं होतं. मला त्याची माफी मागायची होती. पण ती जवळ नव्हती. असंच पाहिजे मला.. थोडीतरी शिक्षा नको का?

संध्याकाळी मला जरा मोकळ्या हवेत जावं वाटत होतं. आता व्यायाम फक्त सकाळीच. संध्याकाळचा सराव बंदच करणार होतो. चालत टेकडीकडे निघालो. गारठा होताच. अंधार लवकर पडायचा. माऊलाई मंदिराच्या कट्ट्यावर जाऊन बसलो. तिथले गुरव दिवा लावून गेले. मी टेकडीवरून दूर क्षितिज पहात होतो. माझ्या गावातून शहराच्या बाजूला दिसणारा एअरपोर्टचा देखावा दिसतं होता. तिथं विमान उतरताना किंवा उडताना दिसायचं. ते विहंगम दृश्य मी आणि सुनीने बऱ्याचदा पाहिलं होतं. सुनी तिकडेच कुठेतरी होती.

सुनी... कातरवेळेत मनात खूपच प्रखर झाली. मला सुट्टीत तिची इतकी आठवण यायची नाही तितकी गेल्या एका दिवसात छळत होती. मनात आलं. आमचा आजवर टिकलेला भाबडा निरागसपणा या वाढत्या वयासोबत असाच विरळ होतं जाणार की काय? त्या उमटलेल्या भीतीने माझं मन घाबरलं. आत्मविश्वास माणसाला भले बळ देत असला तरी काही क्षण असे असतात की, तिथं बळाची नाही तर, मायेच्या हाताची गरज असते. ती गरज मला आत्ता वाटत होती आणि कदाचित काल सुनीलाही वाटली असेल. आता मी स्वतःला दोष देत होतो. तीला तशी वागणूक देणं हे स्वतःलाच किती पोळू शकतं मला समजलं होतं. 

माझ्या डोळ्यात निर्धाराचा फुगा इतक्यावेळ रोखल्यामुळं बराच फुगला होता, तो हलकेच फुटला आणि त्याचा ओघळ पापण्यातून खाली आला. मी स्वतःच्या गुढग्यांना मिठी मारून त्यात चेहरा लपवला आणि मनसोक्त रडू लागलो. काही मिनिटं गेली. मी शांत होतं आलो. हवेत गारठा वाढला होता. कट्ट्यावर असणाऱ्या लाईटच्या खांबाखाली सोडला तर टेकडीवर आता निर्मनुष्य अंधार पसरला होता. तितक्यात...

"रंदाडांग तताडांग रंदाडांग तताडांग
रंदाडांग तताडांग रंदाडांग तताडांग ss"

अचानक कुठून तरी हलगीचा मोठा आवाज कानावर पडू लागला. अंधारातून कोणीतरी हलगी वाजवत चालत येत होते. मी निरखून बघू लागलो. पण अंधारात मला कळेना कोण आहे. आवाज जवळजवळ येत गेला आणि सोबत हलगी वाजवणारा सुद्धा उजेडात येत गेला.

कापरत्या थन्डीत बनियन आणि खाकी चड्डीत तो समोर उभा होता. डोक्यावर एक पांढरी गांधी टोपी त्याने आडवी लावली होती. नाकाखाली खोट्या काळ्या मिशा काजळानी रेखाटून तो निष्णातपणे हलगी वाजवत माझ्याकडे आला. मी फक्त बसून त्याच्याकडे बघत राहिलो. तो आणखी पाच मिनिटं माझ्याकडे बघून वाजवत राहिला. मग तो थांबला.

"जोहार ओ साहेब... 
आज परत म्होरं हुबा
कालचं तुमच्याकडनं मागून जेवलेला
आज बी नालायकागत मागतोय ओss
द्या कायतरी माह्या पोटाला
आमाला लाज न्हाई, मान न्हाई,
आच न्हाई, पेच न्हाई
पोटामंदी आग हाय,
पर इझवायला घास न्हाई
तुमी इंद्राचं नातलग
तुमी चंद्राचं मालक
तुमी धनी आमी सेवक
तुमी ओ तुमी आमचं पालक."

रंदाडांग तताडांग रंदाडांग तताडांग
रंदाडांग तताडांग रंदाडांग तताडांग ss"

परत काहीवेळ त्याने तेच वाजवलं. मग थांबला. आणि बोलायला तोंड उघडलं.

" भीक मागायची सवय हाय मला.. म्या मागू शकतो. ही सवय मला भुकेनी लावली. बा मेल्यापासनं, आईनी मजुरी धरल्यापासनं म्या भीक मागतुय. गावच्या गाडी अड्डयावर लहानपण गेलंय माझं ह्ये वाजवत आन भीक मागत.. दोष कोणावर नाय. दोष आपलाच.. जन्म घेताना घर नीट नाय बघितलं.

माझा आजा बिना औशीधाचा त्याच्या आजारी हाथरुणात टाचा घासून म्येला. जाता जाता सांगून ग्येला का, मिळव..सगळं मिळव.. ज्ये बी तूला मिळवावं वाटतंय ते सगळं.. ध्यास घे मिळवायचा... मिळवलं नाय, जमवलं नाय तर माणूस कुत्र्याच्या मरणानी मरतंय. मी मरणारे तसा.. तवा मी ठरविलं.. राबायचं, कष्ट करायचं. त्ये करुन नाय मिळालं तर हात पसरायचे.. मागायचं पण मिळवायचं. लाज नाय धरायची. 
तू मला हरवलं.. व्हय जिंकून देऊन बी हरवलं.. सगळी त्येचं म्हणत होती. एका ढेंगेत गाठला असता त्यानं तूला म्हणून... जाऊदे त्या कमीपणाचं बी काय नाय यवढं... कमीपणा घ्याची बी सवय हाय मला... पण.. पण तू मला वळखलं.. त्याचं इशेष वाटलं मला.. व्हय.. भिकमंग्या हायच मी.. माझी कातडी सोलून तू मला बघितलं. हा मी हाय वरवरचा सचिन आण आतनं भिकारी देविदास मारती गाडे.

माझ्या गावाकडन मी इथं आलो तवा तुझ्यासारख्या तुपाशी असणाऱ्या पोरांचं आयुष्य बघितलं. सगळं मिळतंय तरी आळसात लोळत पडलीत. बरंय.. नेत्रा दिसली. वाटलं आयुष्य जावं तर असल्या पोरीसोबतच.. हिच्या लायकीचं बनायचं...आयुष्याला भीक मागायची असली तर हिची मागायची.. पण.. तुझी नेत्राची असलेली मैत्री बघितली. वाटलं ह्यो जाडा ठोंब्या ह्याच्यात काय हाय असं.. नेत्रासाठी तू अडथळा वाटलाच नाय कधी. मी एवढा कष्ट करतो. चार काम जास्तीची यत्यात मला तुझ्यापेक्षा. खेळात पुढं हाय.. पोरात नाव हाय.. शिकून चांगले पैसे कमवीन. पुढं जाऊन सगळं मनासारखं मिळवलं की नेत्राला पण सोबत घेईन. माझ्या सगळ्या मित्रांमधी माहिते माझं तिच्याबद्दलच जे काय हाय ते..
सगळी आधार देत्यात.

पण.. तू एक एक करत पायरी चढत वर आला. यवढा वर का माझं हात पोचू शकायचं नाय आता तुझ्यापरेंत. माझा धीर खचला व्हता आज. तू भीक घातली नसती तर संपलंच व्हतं. पण जाऊंदे मिळालं. मला लाज नाय. तू नेत्राला मधी घेऊ नको म्हणला. ती मधी नायच.. ती बाजूला हाय माझ्या. तूला वाटतंय तसं न्हाय. मी तीला माझी परिस्थिती सांगतली व्हती. ती काय समजायचं ते समजून आली तुझ्याकडं, आन ज्ये भरायचं ते भरलं तुझ्यात.

माझ्या आज्यानी सांगितलंय मला. आपल्या कुळाचा उद्धार तू करायचाय. मंग ही सगळी त्येचीच सुरवात हाय. मला काय बी कराय लागू दे मी करणार. भीक मागायला लागली मागणार.. तुझ्याकडं मागायला लागली तरी मागीन.. तूला देता यती का ते बघ तू.. तुझं ते नीती नियम आपल्याला नाय लागू पडत.

येक जाणवलं पण.. तुझ्यात जे हाय ते इतर कोणाच्यात नाय. माझ्यात बी नाय. तू माझ्या जागी असता तर सचिनच असता. उन्हाळ्याच्या सुट्टीत गावाला जाऊन परत हलगी वाजवीत फिरणारा देविदास झाला नसता. मला देवीदास बनत रहावं लागणारे अजून काही दिवस. मंग एकदाचा त्याला पुरता गाडून यनार तिकडच. ह्ये फक्त तूला सांगितलंय. बाकी कोणी समजून नाय घ्यायचं. ह्यो अवतार बी तुलाच दावलाय. मी कसला भिकारी हाय आन हे भिकारपण कशी माझी ताकत हाय तूला कळण्यासाठी. 

म्या मोठा होणार. घरबी सुधारणार आन नेत्राला बी सोबत घेणार. तूला वाटतंय तसं माझ्याबरबर जिंकणं तूला बी सोपं नाय. लक्षात असू दे."

"रंदाडांग तताडांग रंदाडांग तताडांग
रंदाडांग तताडांग रंदाडांग तताडांग

रंदाडांग तताडांग रंदाडांग तताडांग
रंदाडांग तताडांग रंदाडांग तताडांग ss"

सचिन वाजवत, चालत मागं फिरला. त्याचा तो आवाज हवेत विरून संपला तरी माझ्या कानात गुंजत होता. त्या टेकडीवर रात्रीच्या प्रहरी, दिव्याखाली आज पहिल्यांदा मला इतर कसलीही नाही पण सुनीसाठी भीती वाटली. सचिनचा हा दयनीय क्रूर अवतार सुनीला किती धोकादायक असू शकतो ह्या भीतीने मन घाबरलं. सुनीसाठी मी नेहमी असणं गरजेचं होतं. तिच्या भोवताली माझं कोंदण आणखी सशक्त करणं गरजेचं होतं.

🍁🍁🍁🍁


मला लंघून संकट
तूला घेरणार नाही
नियतीला मला भेदणं
मी सहज करणार नाही..

- क्रमशः

शब्दभ्रमर 🍁🍁