Kondan Parva One - Part 21 in Marathi Love Stories by Shabdbhramar books and stories PDF | कोंदण पर्व एक - भाग 21

Featured Books
Categories
Share

कोंदण पर्व एक - भाग 21

वेदना 

चिंतामणी, समर, राजेश, गणेश आणि मी, असे पाच जणं आम्ही एका ग्रुप मध्यें होतो. समर ब तुकडीतला आधीपासूनचा स्टार खेळाडू. त्याला हरवणं म्हणजे सुद्धा माझ्यासाठी आव्हान होतं. कारण आधीपासून तो हे करत आलेला. ते वातावरण त्याच्यासाठी नवं नव्हतं. पण माझी सुनिसोबतच्या पकडापकडी वाल्या सोडल्या तर ही पहिलीच रेस होती. सरांनी आम्हाला पोजिशनचा स्टॅन्स घ्यायला लावला. मी जसं posture शिकलो होतो त्याप्रमाणे माझा स्टॅन्स ठेवला. 


"अरे ए समर!! त्याचं बघ जरा कसं केलंय त्याने. नीट घे की पोजिशन!!" खोत सर समरला ओरडले. त्याने मला पाहिलं. 

शर्यतीची शिटी वाजली आणि आम्ही सुटलो. मला फक्त धावायचं माहित असल्यामुळे मी समोर बघून धावू लागलो. शिकल्या गोष्टींचा सराव उत्तम झाल्यामुळे त्याचं रूपांतर सवयित झालं होतं. मला बराचवेळ आजूबाजूला कोणी दिसेना. पंचवीस सेकंद धावलो. पण मधलं काही लक्षात नव्हतं. फक्त पाय वापरले गेले होते. मन आणि डोळे शेवटची दोरी बघत होते. ती माझ्याकडून cross झाली होती. मी दुसऱ्या आणि फायनल राऊंडला मोठ्या मार्जिनने जिंकत सिलेक्ट झालो होतो. आजूबाजूला टाळ्या, cheering आणि आरडा ओरडा चालला होता. आज फक्त एकच आवाज त्यात नव्हता.
सुनीचा!

🍁🍁🍁🍁

"सुनी!? ये की, माझ्या रूमच्या दाराशी घुटमळणाऱ्या सुनीला तिथे बघून मी म्हणालो.

"काय गं एवढ्या उशिरा आज? " मी विचारलं.

"जाडू थोडं बोलायचंय.. बोलू का?" ती म्हणाली.

"नाय.. आधी माझ्या आईला विचारून ये.. जा. " मी म्हणालो.

"चं!! कसं बोलावं कळत नाही म्हणून असले विचित्र काही बडबडतीये मी." ती म्हणाली.

" एवढं काय जड सांगायचंय.. बोल की बिनधास्त. मला सांगावं लागतंय का तूला?? " मी म्हणालो.

" जाडू!! तो सचिन मला भेटला होता आज. " ती म्हणाली.

" आज?? " मी विचारलं.

" हो म्हणजे अरे हल्ली हल्ली तो असंच करतोय. मला एकटीलाच गाठतो... आधी जसं वर्गात बोलायचा तसं नाही करत. आजही तेच केलं." ती म्हणाली.

"आणि काय बोलला?" मी विचारलं.

" त्याचं म्हणणं आहे की, तू रेसमध्ये भाग घेऊ नये. " ती म्हणाली.

" तू काय म्हणालीस? " मी सरळ चेहऱ्याने विचारलं.

" सरळ आहे. तुझा काय संबंध बोलले त्याला, भाग नको घेऊ म्हणतोस." ती म्हणाली.

" मग?" मी उदगारलो.

" अरे.. तर तो विनवणी करायला लागला. प्लिज त्याला भाग घेऊ नको म्हणून सांग म्हणतोय. ही स्कॉलरशिप त्याच्यासाठी महत्वाची आहे. अकरावी बारावीचा खर्च जर त्याला मिळवता आला. तर मग तो शिकू शकेल पुढे. त्याने तुझी तयारी पाहिलीये सकाळची. तुझ्यासमोर तो नाही टिकू शकणार त्याला हे कळलंय." ती म्हणाली.

" सुनी!! मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही... तुझं काय म्हणणं आहे?" मी बोललो.

ती शांत झाली. तिने मोठा श्वास घेतला. 
"मला विचारशील तर... मी म्हणेन की.. खरचं तूला तसं करता आलं तर करशील का? त्याला त्याची मदतच होईल. " ती म्हणाली.

" म्हणजे तू मला माघार घ्यायला सांगत आहेस. " मी म्हणालो.

" उलटा अर्थ नको काढू रे!! मी तसं म्हणतीये का? " ती बोलली.

" एका कृतीचे अनेक अर्थ निघू शकतात ना सुनी? मी रेसमध्यें भाग न घेणं म्हणजे आजवर केलेली मेहनत उधळणं नाही का? त्याची किंमत कोण मोजणार?" मी बोललो.

" अरे पण नाही घेतलास भाग तर तुझं काय जाणार आहे? तूला अशीपण ती स्कॉलरशिप मिळणार नाहीये, कारण तू सगळे point क्लिअर करत नाहीयेस. सचिनचा वैयक्तिक खेळाचा एक गुण त्याला मिळेल. परीक्षेत ऐन्शी टक्के त्याला नक्की पडतील. मी मदत करेन त्याला!! " आणि ती गप्प झाली.

" अच्छा!! तुमचं एवढं ठरलंय ना?! ठीके तर मग. " मी बोललो.

" आमचं?!!" सुनी ओरडली आणि तिने रूम मधून बाहेर डोकवलं. पण माझे आईबाबा जेवण करुन शतपावलीला जातात. ते गेले होते.

" आमचं काय ठरलं..? काहीही का बोलतोयस?" ती म्हणाली.

" सुने!! तू माझ्याशी या विषयावर बोलायला आलीस तेव्हाच मला कळलं की, तू मला थांबवण्याचं मन बनवलं आहेस." मी म्हणालो.

" अरे असं नाहीये. त्याला त्या स्कॉलरशिप ची गरज आहे. त्याने त्याची निकड माझ्यासमोर मांडली. तू जिंकलास तर त्याला ती मिळणार नाही. म्हणून त्याचं इतकं चाललंय." ती म्हणाली.

" मग स्वतः यायचं होतं त्याने बोलायला. तूला का मध्यें घेतलं त्याने? आपल्या मैत्रीचा respect तर कुठे ठेऊ पाहत नाही. पण वापर करायला कसा काय बघतोय..? आणि विशेष म्हणजे... मला तुला ही गोष्ट सांगावी लागतीये.. तूला काय झालंय सुनी?? तू त्याच्या वतीने माझ्याशी बोलायला आलीयेस." मी तीला विचारलं.

" जाडू!! तू गैरसमज नको करुन घेऊ यार.. त्याला शिकायचंय. त्याच्या खर्चाच काही झालं नाही तर मग तो कसा शिकेल? त्याचा मामा म्हणतोय पेंटिंग शिक, पैसे कमव, आईला हातभार लावं. कुठं शिकत बसतो? पण याला तसलं करायचं नाहीये. तो कामाला नाही म्हणत नाहीये.. पण शिक्षण सोडणं त्याला नको आहे... त्याचा हा चान्स हुकला तर अवघड होईल त्याचं.. मी.. मी त्याला मदत करायचा शब्द देऊन आलीये.. तू माझं ऐकशील म्हणून तो मला बोलला. " ती म्हणाली.

" मेहनतीचा आदर करावा!! ही शिकवणं मला कोणी दिली?? तू ना? माझ्या मेहनतीचा आदर तूला आहे?? इतके दिवस मरमर करताना मला किती त्रास झाला असेल याचं तूला काही वाटतंय?? तरी पण त्याच्या कष्टाची तूला पडलीये. सुनी तू फार बदललीयेस. तू मला स्वार्थी म्हण हवंतर पण मी माघार नाही घेणार. त्याची गरिबी, त्याची मेहनत आणि त्याचा माज एकत्र नाही चालणार हे मी त्याला शिकवणार आहे. त्याचा विषय सोडून काही बोलायचं असेल तर बोल. नाहीतर मला झोप आलीये." मी सुनीच्या डोळ्यात डोळे घालून चिडून म्हणालो..

सुनी रडत रडत घराबाहेर पळाली. माझा राग तिने पहिल्यांदाच पाहिला होता.

🍁🍁🍁🍁

"अभिनंदन!! दुसऱ्या मॅचला तर असा भरकन जिंकशील. तुझा टाईमिंग सगळ्यात कमी आहे." पल्लवी मला येऊन म्हणाली.

" होका!! Thanks!" मी बोललो.

" ऐय्या!! तूला तर जराही दम लागला नाहीये. तुझ्यामागे धावत धावत तो समर आडवा झाला पार. आज सुनी कुठे राहिलीये...?दिसतं नाहीये.. बरं आहे ना तीला..? तूला काही बोलली होती का येणार नाहीये वैगरे..?" पल्लवी बडबडत होती. माझं तिच्या बोलण्याकडे लक्ष नव्हतं. मला शर्यतीचे वेध लागले होते.

पुढली शर्यत अर्ध्यातासाने सुरु होणार होती त्यासाठी आम्हाला थोडी विश्रांती दिली होती. शिवाय आठवीच्या शर्यती सुरु होत्या. सचिन त्याच्या ग्रुपमध्ये जिंकला होता. त्याने मला पाहिले होते. त्याचं मला बघून पडलेलं तोंड मला दिसतं होतं.

पुढली सूचना झाली. इयत्ता नववी अंतिम शर्यतीसाठी जिंकलेल्या मुलांनी खोत सरांकडे जमा व्हावं. आम्ही चौघे गेलो.
फ आणि ड तुकडीतले दोघे, मी आणि सचिन. आम्ही स्टॅन्स घेतला.

"200 मिटरच्या अंतराने ठरवावं की जाडू सचिनच्या वरचढ आहे?
त्या अंतराने ठरवावं की सचिन शिकावा की शिकू नये?
त्या अंतराने दाखवावं की मी आणि सुनी एकमेकांच्या किती शब्दात आहोत?
त्या अंतराने ठरवावं की सुनी ची निर्णय क्षमता योग्य की माझी?
का? कारण त्या अंतराला परिस्थितीने ते हक्क देऊ केले होते."

माझा अट्टहास तीला पटला नाही की, खरचं सचिनबद्दल तीला कळवळा होता? तीला इतकी कशी खात्री होती की तो मला हरवणार नाही? की सचिनने तीला माझं मन दाखवायला केलेली खेळी होती ही? कदाचित तसं सुद्धा असू शकणार होतं. पण तसं असलं तर रेस सुरु झाल्यावर ते दिसेलच. त्यात पल्लवी म्हणाली तसा माझा टाईमिंग सर्वात शॉर्ट होता. म्हणजे मी जिंकण्याचे चान्सेस जास्त होते. 
पण काय जिंकणं महत्वाचं होतं? मी? की सुनीचं दुखलेलं मन??
नक्कीच सुनीचं मन. तीला दुखवून मला काही नकोच.

स्टॅन्स घेतल्यावर काही सेकंदात शिटी वाजली आणि आम्ही वाऱ्याच्या वेगाने सुटलो. सचिन जिवाच्या आकांताने पळत होता. मी त्याच्या फक्त एक पाऊल मागे पळत होतो. त्याने गती वाढवली की मी माझी वाढवतं होतो. तो घाबरून माझ्याकडे बघत जोर लावत गती वाढवतं होता. मीही तेवढीच गती वाढवत होतो. त्याच्या पळण्यात जिंकण्याचा हव्यासयुक्त प्रयत्न कुट्टून भरलेला दिसत होता. तर मी त्याला त्याच हव्यासापोटी कष्टदायक पद्धतीने पळवत होतो.

मला समाधान वाटत होते की तो माझ्या भीतीने पळत होता. स्कॉलरशिप जाण्यापेक्षा माझ्याशी हरण्याची भीती त्याच्या तोंडावर स्पष्ट दिसतं होती. आम्ही बाकी दोघांना मागे टाकत खूप पुढे आलो होतो. त्याची कुंथून कुंथून हालत खराब झाली होती. शेवटच्या रोप आधी मी माझी गती हलकी कमी केली आणि त्याला पुढे जाऊ दिला. त्याने रोप शिवली आणि भेलकंडत पळत कसाबसा जाऊन थांबला.

"माझ्याशी जिंकणं इतकं सोपं नाही सचिन एवढं नेहमी लक्षात ठेव. परत भीक मागायला स्वतः ये. सुनीला मध्यें घेतलेलं मला नाही खपणार." मी त्याच्या जवळ जात त्याला बोललो. त्याचा धापा टाकून जीव घशात आला होता. मला तितकं जड झालं नव्हतं. मी सरळ माझी बॅग उचलली आणि सायकलवर टाकून घरी निघालो. मला सुनीकडे जायचं होतं तातडीने.

🍁🍁🍁🍁

तू सांग ना गगन फाडू की धरा 
तू म्हण छातीत भर सगळा वारा 
तू बोल की पिऊन घे सागर सारा
तुझ्या हसण्यावर उधळेन विश्वाचा पसारा. 


- क्रमशः


शब्दभ्रमर 🍁🍁