The wedding was that night. in Marathi Horror Stories by Shabdbhramar books and stories PDF | त्या रात्री लग्न होतं

Featured Books
Categories
Share

त्या रात्री लग्न होतं

"धप्प.. त्या रात्रीच्या शांततेला भन्ग करणारा आवाज झाला.. एखादी जड गोणी पडल्यासारखा.. पण.. अगदी तसाच नाही.. सोबत ओला चिखल पडल्याची संभावना देणारा.. आणि.. सोबत कटकन काही मोडलंय असंही दर्शवणारा..."

बंगल्याच्या दुसऱ्या मजल्याच्या खिडकीतून रक्तरंजीत असं शव  तीस फूट खाली बंगल्याच्या बागेत पडल. त्याचाच तो आवाज होता.. खाली पडल्यावर शरीरातल्या सांगड्याची असेम्बली तुटली असेल.. त्याचं मान्स त्वचा फुटून बाहेर आलं असेल त्याचाही चिखलाच्या राळासारखा आवाज... 

नंतर.. नंतर एक थंड हवेचा पांढरा झोत त्याच खिडकीतून बाहेर गेला. बंगल्यात आता फक्त.. फक्त एका मुलीच्या श्वासाचा आवाज येत होता.. भेदरलेला श्वास.. शून्यात हरवलेल्या नजरेने डोळे मोठे करुन बघत, ती मुलगी थरथरत कोपऱ्यात बसली होती.. आजचा दिवस तिचा होता.. ती नवरी होती... पण.."

****


" रमा..!! रमा.. कुठे गेली गं..? " ढवळेबाई रमाच्या नावाने आवाज देत होत्या.

"आहे की इथंच मोठ्या मालकीणबाई. सांगा की काय करायचंय." रमा खोलीत येत म्हणाली.

" वर तिसऱ्या मजल्यावरती टॉवेल टोप्याचं एक गठुडं राहिलंय तेवढं घेऊन ये. जा.. " त्या म्हणाल्या.

ते लगीन घर होतं. ढवळे आणि कुटे कुटुंबात लग्न लागणार होतं. ढवळ्यांचा अमित आणि कुटेंची अक्षदा. अमित US वरून मास्टर्स करुन आलेला तर अक्षदा BSc झालेली होती. अमितला आवडली. अमित पण कुटेना आणि अक्षदाला आवडला. लग्न जमलं आणि आजचा तो दिवस होता. तीन चार दिवस नीट झोपा नव्हत्या दोन्ही कुटुंबाना. खरंतर तयारीचा उत्साहच त्यांना झोपून देत नव्हता.

ढवळे कुटुंबाकडे गेल्या महिन्यात रमा आली होती. तीला काम हवं होतं आणि यांना तरणी, खमकी मोलकरीन. दोघांची गरज भागली. पण खरा फायदा झाला ढवळेना. रमा म्हणजे ऊर्जेची अक्षय कोठी होती. कधीही.. कुठलंही काम सांगा. त्वरित होणारं. आळस किंवा थकणं तीला माहित नव्हतं. 35-40 वय वाटत असलेली रमा. विधवा होती. तीला मुलबाळ नव्हतं. सासरकडच्यानी नवरा वारल्यावर हकलून दिलेलं. अशीच कामे करुन पोट पाळत होती. ढवळे कुटुंबानी तिच्या कामावर समाधान दाखवत तीला बन्गल्यामागे राहायला एका स्टोर रूम जागा देऊ केली. खरंतर तर चोवीसतास ती दिमतीला असावी हाच हेतू होता त्यामागे. पण तीला तशी गरज नाहीये असं बोलुन तीने ते टाळलं.

ती सकाळी साडेपाचला हजर होतं असत आणि रात्री नऊ साडे नऊला निघून जातं असे. खाडा किंवा उशीर दोन्ही तिच्या कडून कधीच होत नव्हतं. घरातल्या सगळ्यांच्या तोंडी तिचं नावं आता बसलं होतं. रमाला एका वेळी दोन तीन हाका ठरलेल्या असत. पण ती सगळ्यांना पुरून उरत होती. लग्न तोंडावर असताना तर तिने दाखवलेली चुणूक समजदारी यांमुळे रमावर सगळे खूप खुश होते.

लग्न समारंभात तिने व्यवस्थित ठेवलेल्या चीज वस्तूंमुळे गहाळपणा किंवा हरवा हरवी झाली नाही सगळं वेळेवर आणि बिनचूक मिळालं. अगदी शेवट्पर्यंत तिच्या पायाची भिंगरी थांबत नव्हती. तिचा वावर जणू ती ढवळे कुटुंबाची सदस्य असल्यासारखा होता. एकदा दोनदा कोणी बोलले देखील.

" रमा अगदी घरचं असल्यासारखं करते.. मोलकरीन वाटतंच नाही. "

लग्नवेदीवर नवरा नवरी चढलेले असताना एक प्रसंग घडला होता. अक्षदाचे आई बाबा आणि अमितचे आई बाबा काही वेळ एका खोलीत गेले आणि काही मिनिटांनी बाहेर आले. कुटे
दाम्पत्य जरा तणावात दिसत होतं. ते बाहेर आले आणि ते ज्या खोलीत गेले होते तिथून एक थंड हवेचा झोत ही दाराखालून बाहेर आला. 

मग पुढं लग्न लागलं. एक तेवढं सोडलं तर सगळं अगदी स्वप्नवत पार पडलं. अमित अक्षदा घरी आले. बरीच रात्र झाली होती. सुनेचं स्वागत करण्यात आलं. सगळे सुनमुख पाहण्यात, चेष्टा मस्करीत रमले होते. जवळचे एक 35-40 पाहुणे होते.

तेवढ्यात धाडकन मोठा आवाज झाला. सगळे दचकले. आवाज बंगल्याच्या मुख्य दरवाजाचा होता. एवढ्या जोरात कोणी बंद केले असं म्हणत सगळे बघू लागले तर दारापाशी रमा उभी होती.

" रमा? काय गं? काय झालं? दार का आपटलंस? आणि बंद का केलंय.. उघड.. पाहुणे जा ये करत राहणार.. " ढवळेबाई म्हणू लागल्या. 

त्या पाहुण्यांशी बोलायला वळल्याच होत्या तितक्यात रमाकडून मोठ्याने प्रश्न आला.
" हुंडा का घेतलाय लग्नात?" अनपेक्षित होतं हे सर्वांसाठी.. 

" काय?!! तुझी हिंमत कशी झाली असलं काही विचारायची?" ढवळेबाई ओरडून म्हणाल्या.

" बघा की.. चांगलं चांगलं म्हणून डोक्यावर बसायला लागली ही.. " कोणीतरी बाई म्हणाली.

" म्हणून या लोकांना पायरीने वागवावं.. नाहीतर डोक्यावर बसू बघतात.. लायकी सोडून स्वतःची... निघ इथली.. कामे आटपून घरी जा.. मूर्ख.. कुठं काय बोलावं काही कळतं की नाही. " अजून एक नात्यातली बाई ओरडली.

" नीट विचारतीये.. उत्तर हवंय. " रमाचा स्वर जरा घोगरा झाला आणि चेहरा अजूनच कठोर.

" बस झालं हा आता.. अहो!! हिचा पगार द्या आणि हकला हिला. आसरा दिला तर घर बळकवण्यापर्यंत मजल जाईल हिची. हाकला हिला...  आणि हो अजून जास्त काही बोलशील आता तर पगार पण नाही मिळणार... समजलीस!!
चल चालती हो...!!" ढवळेबाई उठून तिच्याकडे जात ओरडत म्हणाल्या.

रमाने डोळे मिटले. ती खाली मान घालून उभी राहिली. तिचा उर जोर जोरात वर खाली होतं होता. श्वास जोरात चालले होते. चेहरा मानेपासून वर हिरवट काळा होत चालला होता.
" सांगत आहात की नाही...? का हुंडा घेतला? घेतलाय हे मला माहित आहे.. कारण हवंय मला.. सोडणार नाही मी एकेकाला.." एखादं जनावर गुरगुरल्या स्वरातलं ते बोलणं ऐकून ढवळेबाई थिजल्या.

" अगं बाई!! असं का बोलतीयेस तू.. काय झालंय? कसा आवाज येतोय ओ हिचा.." असं म्हणे पर्यंत ढवळेबाईंचे यजमान पण तिथे आले.

" रमा काय होतंय? असं का बोलतीयेस..? तूला काम नको असेल तर ठीके.. पण हा उद्धटपणा का चालवलाय तू आजच्याच दिवशी लग्नघरात? .. घरी जा.. उद्या ये.. पगार घेऊन जा तुझा.." ते म्हणाले.

" हुंडे घेऊन लग्न करणारे नीच लोकं तुम्ही.. तुमचा पगार ठेवा तुमच्यापाशी.. " रमा म्हणाली.

" ए.. नालायक बाई.. नीच कोणाला म्हणतेस?" असं म्हणत चिडलेले ढवळे तिच्यावर चालून गेले.

अचानक किंकाळ्यांनी अख्खा बंगला भरून गेला. 
रमाने ढवळे्नच्या गळ्यातून आरपार स्वतःच्या हाताचं एकफुट लांब आणि जाडजूड असं बोटं घातलं होतं. रक्ताचा फवारा उडाला होता. ढवळेबाईचं डोकं दुसऱ्या हाताने रमाने 180 अंशांत उलटं फिरवलं होतं. शरीर तिच्या बाजूलाच होतं. सर्व पाहुण्यांकडे ढवळे बाईंची नजर वळली होती. पण त्यातला प्राण उडाला होता.

मग सुरु झालं कत्तलिचं सत्र.. पुढच्या तासभर चाललेल्या त्या गोंधळात त्या अमानवी रमाने घरातल्या सर्व लोकांचा फडशा पडला होता. वरपासून खालपर्यंत रक्ताने न माखलेली जागा शिल्लक नव्हती.

रमा रक्ताने माखून त्याच अवस्थेत अक्षदा समोर आली. 
" तू..!! तूला मी नाही मारणार.. पण.. सांगून ठेवते.. हुंडा देऊन परत लग्न करशील तर मी परत भेटू शकते.. " सगळ्यांना संपवल्यावर त्याच राक्षसी आवाजात घाबरून भिंतीला दबून बसलेल्या अक्षदाला रमाने सांगितलं. 

लग्नरात्र संपली होती.. लग्नही संपलं होतं.

रमा गेली होती. लग्न ठरवण्याच्या बेतात असलेल्या घराकडे.. हुंडा घेण्याचं कारण शोधत. 

एकतर हुंडा घेऊन लग्न करू नका किंवा मोलकरीन नीट चौकशी करुन ठेवा. न जाणो रमा, भामा किंवा जना काम मागत येईल.

- शब्दभ्रमर 🍁🍁