ज्याचं कोणी स्वप्नही पाहू शकणार नाही असं आहे माझं घरकुल. माझ्या प्रेमाने आणि वात्सल्याने मी माझ्या घरात शांतता आणि सुखाचा झरा निरंतर वाहत राहिल याची काळजी घेते. माझं माझ्या घरावर अगदी बारीक लक्ष असतं. इथली सजावट, स्वच्छता आणि दुरुस्ती अगदी वेळच्या वेळी व्हायला हवी याकडे माझं सजगपणे लक्ष असतं. आपला निवास नेहमी आपल्या मनाला तजेला देणारा असावा असं मला वाटतं. मला घरात घाण केलेली बिलकुल नाही खपत. सगळ्या वस्तू कशा जागेवर आणि नीट ठेवलेल्या असल्या पाहिजेत असं माझं म्हणणं आहे. मी तशी वागते आणि घरातल्याना पण तसंच वागायला सांगते. ऐकतात ते माझं. ऐकावंच लागतं. नाहीतर या बाबतीतला माझा रुसवा त्यांना माहिते. मी रुसले की मग घर रुसून बसतं हे हि त्यांना माहिते.
मी लग्न होऊन या घरात आले त्याला आता..अं!! आठवतं नाही किती वर्षे झाली. जेव्हा या घरात आले मी त्याच्या प्रेमातच पडले. टूमदार सुबक हवेशीर प्रसन्न जागा असलेलं माझं घर. हो माझंच. मी आता त्याची स्वामींनी होते. लग्नानंतर अगदी दोनेक वर्षातच मी माझ्यातल्या शिस्तीने सगळ्यांना माझ्या मनाजोग घरात छान राहायला शिकवलं. हो.. शिकवलं. आधी माझ्या सासूबाई फारच बाई इकडे तिकडे वस्तू करायच्या. इकडे बोळे कोंब तिकडे फडकी ठेव. किचनची स्वच्छता नीट नव्हती. वाणसामान कुठं हि कसं पण भरलेलं असायचं. शी मला नाही आवडली त्यांची ती पद्धत. मग हळूहळू त्यांना सांगत गेले. तर त्यांना आवडेना. त्यांनी माझ्या ह्यांना आणि सासर्यांना माझ्याबद्दल उगाच खोटंनाटं काहीही सांगायला सुरुवात केली.
कायतर म्हणे एकेक तास किचन ओटा पुसत असते. फरशीवर दहा वेळा पाणी ओतून कोपरे सतत खरडून खरडून स्वच्छ करते. भिंतीना खालून ओल आलीये पाणी ओतून ओतून. लाकडी वस्तूना बुरशी चढतीये ओलाव्याने. अहो मी म्हणते भिंती नीट करता येतील किंवा वस्तू.बदलता येतील. पण अस्वछतेने आरोग्य खराब होते त्याचं काय. मग स्वच्छता नीट नको का?
एकदा मी सफाई करत होते बाथरूमची तर बाहेरून दार ठोकू लागल्या म्हणे "दोन तास झाले.आत आहेस काय करतीयेस?"
"बाथरूम धुवत होते.अंघोळी आधी हि स्वच्छता रोजची रोज नीट नको का करायला? " मी पण ओरडले, मला तर बाई रागच आला.
ओरडून मी पण म्हणाले मग ,"असेल तुमचं घर आधी. पण आता मी आलीये ना. मग माझ्या मनाप्रमाणे स्वच्छता नको का व्हायला."
कितीतरी वेळ दार ठोकून ओरडत होत्या शेवटी मी दार उघडले तर मला बाहेर खेचायला लागल्या.
"मूर्ख कुठली. डोक्यावर परिणाम झालेली आवदसा. वेडी."
असलं मला काहीही बोलू लागल्या.
मूर्ख म्हणा. बावळट म्हणा. अति स्वच्छता करते म्हणा.
पण "वेडी?"
हा शब्द माझ्या डोक्यात जातो. त्यांनी असं नव्हतं म्हणायला हवं. खूप लागतो हा शब्द मला. अचानक काय झालं आठवत नाही, पण...
दुपारी हे आणि सोबत पोलीस आलेले.
मी बोलले, "सासूबाई अंघोळ करताना बाथरूममध्ये पाय घसरून पडल्या. हिटर पण सुरु होता. तो सगळ्या बाथरूम मध्ये पसरलेल्या पाण्यातच बादली उलथून पडला. बिचाऱ्या माझ्या सासूबाई शॉक बसून भाजून भाजून गेल्या. मला तर ते पाहूनच भोवळ आलेली."
सासरे माझे एकटे पडले बिचारे. एकटे एकटे राहायला लागले. काही बोललं तर उत्तर न देता नुसतं. हं. हं करायचे. सासूबाई गेल्या त्यादिवशी बाथरूम जवळ झालेला आमचा वाद त्यांनी ऐकला होता. काय माहित का पण मला बघून त्यानंतर त्यांच्या नजरेत एक प्रकारच भेदरलेपण आलं. काय बघितलं त्यांनी काय माहित. पण हा सासूबाईंच्या तेराव्या नंतर मात्र त्या बाथरूम मध्ये त्या भाजल्या अवतारात, येऊन बसलेल्या दिसतात मला. माझ्याकडे रोखून बघतात. पण मजाल आहे काही बोलतील? शान्तपने माझं काम चाललेलं असतं.
आता माझ्या मागे टुमणे नव्हते कोणाचे. मी माझं घर माझ्या मनाप्रमाणे ठेऊ लागले. स्वच्छ. सगळा दिवस कसा घर आवरण्यात जात होता. हे कामाला गेले की मी माझं कामं सुरु करत. अगदी तन्मयतेने. सासरे त्यांच्या पहिल्या मजल्यावरच्या खोलीतच असायचे. मी सफाई करताना फरशीवर पाय ठेवायचा नाही हे त्यांना माहित होतं म्हणून ते पलंगावरच बसलेले असायचे. एकदा काय झालं मी त्यांची खोली पुसत होते. फरशीवर जरा जास्तच मळ होता. रोज इतका मळ येतो कुठून कळत नव्हतं. खूप वेळ झाला असावा. सासरे बसून बघत असावेत. मी मधेच वर पाहिलं तर त्यांची दृष्टी माझ्याकडे होती. पण ते घाबरलेले दिसतं होते.
"काय झालं मामंजी?' विचारलं तर काही बोलेनात. मग उठून बघते तर त्यांनी अंथरून ओलं केलेलं.
बाई बाई बाई.. इतका कसा घाणेरडेपणा अंगात या माणसाच्या. वरून तिथंच बसलेत.
"मामंजी!! हे काय केलंत? " असं विचारलं. तर उत्तर देईनात नुसतंच हू हू करत होते. हि असली घाण मला नाही बाई खपत.
"उठा.. उठा तिथून." मी ओरडलेच.
तर ते उठले आणि अजूनच घाबरले. परत एकदा पुसलेल्या फरशीवर तोच प्रकार.
"ई ssssss!! घाणेरडे कुठले. " मी आणखी जोरात ओरडले.
"सकाळ... पासून गेलो... न... नव्हतो.. दुपार.. झाली तरी.. तू.. खोलीतच.. पुसत..."असलं काही बरळत होते.
मला ऐकवलंच नाही.
"बाथरूम मध्ये जा..." मी ओरडून त्यांना बाथरूमकडे ढकललं.
ह्यांनी आणि पोलिसांनी आत्महत्या अशी नोंद केली. अस पण सासूबाई गेल्यानंतर मानसिक अवस्था ठीक नव्हती त्यांची.
मला तर बाई कळत नाहीये नीट. बाथरूमची दिशा चुकली कशी. माझ्याकडून ते गॅलरीच्या दाराकडे ढकलल्या गेले होते. आणि वरून खाली तुळशी वृंदावनावर पडले. दगडी वृंदावनावर आपटून डोकं फुटलं त्यांचं. नाही मी त्यांना बाथरूमकडेच... जाऊ देतं कशाला उल्लेख मी आपली गप्प बसले. बिचारे सासरे. वृंदावनाभोवती चकरा मारतात आता. तर केव्हा केव्हा पलंगावर बसलेले असतात डोळे विसफारून बघत.
"हं!! पण त्यांची हिम्मत नाही होतं मी फरशी पुसताना खाली पाय ठेवायची. "
त्यानंतर काही महिन्यांनी एकदा मी जेवण करुन रात्रीची झोपायला निघाले. हे त्यांच्या स्टडी मध्ये बसले होते. त्यांनी काही लिहितांना कागदाचे बोळे अस्ताव्यस्त पणे सगळीकडे भिरकावले होते. सिगारेटची थोटके पण. मी इथे दिवसभर मरमर करुन राबते आणि हे खुशाल असा बेदरकारपणा करत आहेत. अशी तिडीक गेली गेली डोक्यात.
"काय हो. काय खोलीचा उकिरडा करुन ठेवलाय. सगळीकडे कचरा किती घाण झालीये." मी ओरडले.
"जा झोपायला. एवढा अर्ज झाला लिहून की सुटलो. तुझ्या सारख्या वेडीला इथे नाही वेड्याच्या हॉस्पिटल मध्ये असायला हवे. त्याचंच कामं चाललंय. जा निघ." ते म्हणाले.
मी झोपायच्या खोलीत आले.
"वेडी.. वेडी.. मी वेडी काय...?"
सासूबाई आणि सासरेबुआ मोठ्याने हसण्याचा आवाज मला येत होता. बघितलं तर खिडकीत उभे राहून हसत होते. तेही मला वेडी वेडी चिडवत होते. मला ओरडवेसे वाटत होते पण ओरडले नाही. शांत राहिले. उठून मामांजींच्या खोलीत आले. पलंगावर बसून या दोघांचा तोच गोंधळ चालला होता.
"वेडी वेडी!!"
मी रागाने एक कटाक्ष टाकला तसे दोघे घाबरले.
त्यांच्या कपाटातून झोपेच्या गोळ्यांचा डबा काढला. हल्ली हे माझ्या हातचं रात्री जेवत नाही पण दुधं घेऊन झोपतात असं माहित होतं मला. खाली गेले आणि सगळ्या गोळ्या ओतल्या पातेल्यात दुध गरम करुन ठेवलं.
रात्री मला जाग आली तर हे ओरडत होते. "श्वास घेता येत नाहीये."
"येत नाहीये तर का घेताय?" मी म्हणाले आणि मग त्यांच्या तोंडावर उशी दाबली. संपले त्यांचे दुखणे. बिचारे माझे पती.
वेडी प्रेमाने म्हणाले असते तर खपलं असतं. पण तो द्वेष?
झोपेच्या गोळ्यांचा ओव्हरडोस. असं काही लिहिलं गेलं रिपोर्ट मध्ये. तेही काही दिवस दिसेनासे झाले. पण मग इतर नातेवाईकांची पांगापांग झाली तसे. सुजेलेले डोळे घेऊन स्टडी मध्ये खुर्चीत अजिबात हालचाल न करता बसलेले दिसतात. नुसते पाहत असतात. सासूबाई आणि मामंजी तर आता मला पाहिलं की भेसूर रडतात. मला मोठी गम्मत वाटते.
आता संपूर्ण घराची जबाबदारी माझ्याकडे होती. मी उत्तम सांभाळलं सगळं. अगदी मनासारखं. कोणी कचरा करायला घरात धजत नव्हतं. स्वच्छ सुंदर निवांत घर.. सगळीकडे कसा आनंद विहरत होता. नंतर एका महिन्यांनी मी रात्री झोपली असताना कसलासा खडखड आवाज मला ऐकू गेला. खिडकीतले सासू सासरे माझ्याकडे पाहून हसत होते. स्टडीतून यांच्याही हसण्याचा आवाज येत होता. ते हसतायत म्हणजे माझ्यावर काही संकट हे सरळ होते.
मी उठून हॉल मध्ये आले तर. हॉलचा दरवाजा बाहेरून आतली कडी उचकटून कोणीतरी उघडला. ते चार जण होते. घरातले दागिणे घेणं. पैसे चोरणं. त्यांच्या विकारी वृत्तीने माझी अब्रू लुटणं. इथपर्यंत पण मी सहन केलं आणि सहन करुन गप्पही राहिले असते. पण त्यानंतर त्यांनी घरात जी नासधूस केली ते मला पहावेना. खूप संताप संताप झाला माझा. किचन मध्ये पळत जाऊन मी रॉकेलचा डबा उचलला. गॅस शेगड्या सुरु केल्या आणि स्वतःला पेटवून घेत एकेकाच्या अंगावर धावले. माझ्यासोबत त्यांना आगीत भस्मसात केलं. अशी सोडते की काय? माझ्या घरात मला अशी अस्ताव्यस्तता चालत नाही.
ते करताना झालं थोडं घराचं नुकसान. पण....
आता ते चार मदतनीस मी दावणीला बांधलेत माझ्या. हवं तेव्हा हवं ते करुन घेते त्यांच्या कडून. सासुसासरे आणि माझे हे. त्यांची टाप होतं नाही आता माझ्या विरुद्ध हसण्याची सुद्धा. रात्री तर मी भिंतीवर चढून आमच्या गच्चीत जाते. कोणी एखादा कीटक मला पाहून किंवा घराकडे पाहून लोभाने तिकडे आलाच तर मग माझ्याकडून चिरडला जातो. असे कैक संपलेत. माझ्या सुंदर घराकुलाकडे वाईट दृष्टी टाकणारे.
- शब्दभ्रमर 🍁🍁