"खबलक खबलक घोडोबा घोड्यावर बसले लाडोबा
लाडोबाचे लाड कलतंय कोण?
दादाशिवाय आहेच कोण?
खबलक खबलक..."
खाडकन विजेचा आवाज आसमंतात दुमदूमला आणि आनंदची झोप स्वतःच्याच स्वप्नाच्या आवाजाने दचकून मोडली. तो नेहमीसारखा उठून बसला. ते जीवघेणं स्वप्नं त्याची झोप कितीदा कुरतडायचं?.. त्याचं त्यालाही आठवत नव्हतं आता. पहाट झालेली होती. अजून चारेक तासांनी सकाळी तो तिथून निघणार होता. ती जागा.. जिथे त्याने आयुष्यातली महत्वाची अशी घडवणूकीची वर्षे घालवली.
गेली सात वर्षे तो रिमांड होम मध्यें होता.पाच वर्ष लहानपणी केलेल्या गुन्ह्यामुळे आणि पुढली दोन वर्ष स्वतःच्या सोज्वळ, कष्टाळू आणि लाघवी स्वभावाने सर्वाना जिंकून घेत त्याने तिथेच दोन वर्ष नोकरीं करत व्यतित केली. नोकरीं कसली एक प्रकारची समाजसेवाच करत होता तो. कोणलाही विश्वास वाटत नव्हता की आनंद सारखा मुलगा हत्या करू शकतो. ते पण... एका.. झरकन सगळं परत डोळ्यांसमोरून सरकलं आणि खिडकीच्या गजाला धरून उभा असलेला आनंद विजेचा धक्का बसल्यासारखा मागे सरकला. ते अघटित इतक्या वर्षानीही मनातून पुसलं जाणं अशक्य होतं.
तिथेच उभे राहून काहीवेळ गेल्यावर, शेवटी त्याला वाटले की, आता ती वेळ आलेली आहे. आज तो तिथून जाण्यासाठी तयार झाला होता. सर्व ठरलं होतं.
वय वर्षे वीस. आयुष्यात पुढच्या पर्वाला सुरुवात करण्याआधी एक अतिशय महत्वाचा असा दुवा होता जो त्याला तोडायचा होता. तो दुवा त्याच्या भूतकाळ आणि भविष्याला जोडत होता. त्याला ते आयुष्यात असणं नको होतं. त्या नकोशा भावनांचे ओझे बोलून, मोकळं होऊन, आणि जमलं तर...? काहीही असो.. त्याला ते झुगारून द्यायचे होते. रिमांडहोम मधून सर्वांचा निरोप घेत बाहेर येत तो सरळ निघाला. तरी निघेपर्यंत बरीच दुपार उलटली होती.
आनंदला एक माहित होतं की बाहेरच्या जगात त्याचं असं कोणी उरलं नव्हतं जे स्वागतासाठी समोर येईल. पण त्याने रस्ता पकडला. शहराच्या एका टोकाला असणारे ते कारागृह दूर पडत गेले. मुख्य रस्त्याला येत त्याने टॅक्सीला हात केला. टॅक्सी थांबली. तो बसला.
" सातनळ" तो म्हणाला.
टॅक्सीवाल्याने मागे मान वळवत एकदा त्याच्याकडे बघितले. त्याच्या नजरेत कुतूहल होते. जे आनंद ने दुर्लक्षित केले.
ड्रायवरने गियर टाकला. गाडी निघाली. आनंदचे विचारचक्र सुरु झाले. गाडी कशी कुठून किती वेळात तिथे पोहोचली. त्याला त्या विचारात कळले नाही. त्याला ना त्या रस्त्याशी घेणे होते न त्या प्रवासाशी.. कारण परत काही तो प्रवास घडणार नाहीये हे त्याला माहित होतं.
" सातनळ!!" ड्रायवर म्हणालेला त्याने ऐकले. दीड दोनशे मीटर अलीकडेच त्याने गाडी थांबवलेली.
तो पैसे देऊन उतरला. ड्रायवरने शक्य तितक्या लवकर रिवर्स घेत गाडी उलट्या दिशेला पिटाळाली.
आनंद सातनळ म्हणून नावं असलेल्या त्या जागेच्या परिसरात आला. समोरच एका मोठ्या हवेलीवजा घराकडे जाणारा रस्ता त्या जागेच्या वेशिपासून सुरु होत होता. वेशीवर चार सहा आडदांड पुरुष वेशिलगतच्या ओट्यावर आणि बाईक्सवर बसले होते. त्यांच्या दिशेला जाणाऱ्या आनंदला त्यांनी हेरले. दोघेजण चालत त्याच्यापाशी येऊन रस्त्यात उभे राहिले. दोघांच्याही कमरेला मोठे सुरे आणि पाठीमागे देशी कट्टे खोचलेले होते. सहसा तिकडे सरकारी माणसेच काय पण कोणी साधा नागरिक सुद्धा फटकत नसत. अशी त्या जागेची दहशत होती.
" का रे? हिकडं कुठं? " एकाने आनंदला विचारले.
" कैलासनाथ अण्णाना भेटायचंय." आनंद म्हणाला.
" अय बारक्या!! अण्णा म्हणजे काय दवाखाना खोलून बसलेत का.. आला इंजेक्शन घ्यायला.. " दुसरा म्हणाला.
" माझं नावं आनंद. रिमांड होममधून आलोय. एवढंच कळवा त्यांना प्लिज. " तो म्हणाला.
एकाने मोबाईल काढून त्याच्याकडे संशयित नजरेने बघत कॉल लावला.
"अण्णांना भेटायला एक पोरगं आलंय. आनंद म्हणून नावं रिमांड होम मधून आलंय म्हणतंय. बघा इचारून." तो म्हणाला.
काहीवेळ ते तिथेच उभे होते. तोवर त्या दोघांनी आनंदवर प्रश्नाची सरबत्ती केली. पण त्यांना नीटशी उत्तरं मिळत नसल्यामुळे ते जरा खवळत चालले होते. ते त्याला शिव्या देत होते, धमकवत होते. पण आपल्या परीने आनंद शांत राहत त्या अवघड परिस्थितीतला वेळ घालवत होता.
पाचेक मिनिटात त्या माणसाच्या मोबाईल वर कॉल आला.
" जा आत!! अण्णांनी बोलवलंय.. परत ये. मग बघतो तूला." तो माणूस म्हणाला.
आनंद चालत निघाला. हवेलीच्या पोर्च मधून पायऱ्या चढत त्याने मुख्य दरवाजातून प्रवेश केला. समोरचं दिवाणखान्यात सिहासनासारख्या मोठ्या खुर्चीत. त्या सातनळ परिसराचा मालक... त्या शहराच्या संपूर्ण काळ्या गुन्हेगारी विश्वाचा बाप.. त्याच्या एका ईशाऱ्यावर कोणाचीही खांडोळी करू शकणाऱ्या पाच सहाशे गुंडांचा पावरफूल म्होरक्या पन्नाशीतला कैलासनाथ उर्फ अण्णा बसला होता. आजूबाजूला त्याचे हस्तक दहाबाराच्या संख्येने उपस्थित होते. त्यांची काही चर्चा चालली असावी.
आनंद आत येताच ती थांबली. कैलासनाथ उठून उभा राहिला. तसे सगळे अचंबित झाले. ह्या कवळ्या पोरासाठी अण्णा कसे काय उभे राहिले त्यांना कळेना. हा आहे कोण हा प्रश्न सगळ्यांना पडलेला. आनंद जसा पुढे पुढे येत चालला होता तसे कैलासनाथचे हस्तक संशयित होऊन त्याच्या समोर यायला लागले. पण कैलासनाथ ने हातानेच त्यांना थांबा म्हणून खूण केली.
आनंद सरळ आला आणि कैलासनाथच्या पाया पडला.
" कधी सुटला?" त्याने आनंदला विचारले.
" शिक्षा संपून दोन वर्षे झाली. पण तिथंच कामाला लागलो. शिक्षण पण पूर्ण केलं. आज राजीनामा देऊन आलोय.
" रंज्या!! आजचं सगळं क्यान्सल कर.. पंचवीस तीस किलो लाडू आण. सगळ्यांना वाट. म्हणावं तुमचा युवराज आलाय!"
सगळे नवल करू लागले. "अण्णांचा पोरगा!! सम्राज्याचा वारस.. कैलासनाथला मुलगा आहे हे काहींना माहित होतं तर काहींना नाही. पण कोणी त्याला पाहिलं नव्हतं. केवळ कैलासनाथ त्याला ओळखू शकत होता. काहींना आनंद वाटत होता तर काही महत्वाकांक्षी लोकं असुयेने जळू लागले. आनंद मात्र स्थिर होता.
"चल वर चल बोलू. का आधी जेवण करायचं? अय गोप्या ताटं घे." कैलासनाथने हुकूम सोडला.
आनंदने कैलासनाथ सोबत जेवण घेतलं. तासभर गेला त्यात. कैलासनाथला त्याने रिमांडहोम मध्यें गेल्यावर घडलेल्या गोष्टींचा वृत्तांत ऐकवला. जेवण झालं. दोघेजण कैलासनाथच्या खाजगी बैठकीत बसले.
" तूला तिकडं का जावं लागलं त्याबद्दल आपण आता चर्चा नको करायला. झालं ते झालं मागं पडलं... आता तूझ्या हातून जे घडलं त्याची शिक्षा तू भोगून आलाय. माझ्या मनात आता नाराजी नाय. हे पुढं चालवायला तूला मी तरबेज करीन.. चांगला शिक.. आपलं सगळं राज्य तुझ्या पायाशी आहे.. " कैलासनाथ कौतुकाने आनंदला सांगत होता.
" बाबा हे सगळं ठीके.. पण लहानपनापासून माझी एकच गरज भागली नाही त्याचं काय? " त्याने विचारलं.
" सांग की काय पायजे तूला? " तो म्हणाला
" बाप.. वडील.. पिता.. " तो म्हणाला.
" अरे मंग मी हायचं की तुझ्यासंग.. मी कुठं जाणारे.. " तो म्हणाला.
" माझ्यासोबत चला .. हे सगळं सोडून.. नको हे आपल्याला.. आपण दोघं राहू.. मी तुम्हाला संभाळीन.. काय हवं नको सगळं पाहीन." तो म्हणाला.
कैलासनाथ गडगडाटी हसला.
" अरे.. अरे पोरा.. तू आत्ता सेम तुझ्या वारल्या आईगत बोललास.. तिचं आठवली.. तिचेच शब्द हे.. " तो म्हणाला.
" बाबा.. तीला मनापासून असं वाटायचं.. ह्या पापाच्या नगरीचा मालक बनण्यापेक्षा आपण पुण्यवन्त झोपडीत सुखाने राहू. " आनंद मवाळपणे समजवत म्हणाला.
" बाळा.. या नगरीचा मालक होण्यासाठी किती राक्षस हटवलेत माहितीये का मी? त्यो सगळा पराक्रम असा वाया जाऊ देऊ आणि तुझ्याबरोबर येऊ म्हणतो? काय मिळण त्यानी? " त्याने विचारले.
" तुमचा मुलगा.. त्याचं प्रेम.. आदर.. एक सुंदर आयुष्य..सगळं विसरून पुढं जाणारं आयुष्य.." तो म्हणाला.
" हं.. या शहरात हे वळवळणारे जंतू हायेत ना? मी आलो की वाटा मोकळ्या करतात. सलाम ठोकतात.. विनंत्या करतात मला. भेतात मला.. अजून कसला आदर पायजे? आणि तू माझा मुलगा माझ्याकड आलाय येवढं पुरं की मला.. तू उलट हे सांभाळ.. तुझा बाप म्हणून मला त्यात गर्व वाटल. " तो म्हणाला.
" बाबा.. तुमचं माझ्यावर..माझ्यावर प्रेम आहे? " आनंद ने विचारले.
" परत तुझी आई डोकावली तुझ्यात... आयला.. तू जरासा तिच्या वळणावर गेलाय...ती असलंच इचरत राहायची. " तो म्हणाला.
" आणि तुम्ही या प्रश्नापासून पळ काढायचात... का बाबा? .. एकदा तिचं ऐकून बघितलं असतं.. तर कदाचित वेगळं आयुष्य असतं आपलं.. " तो म्हणाला.
" आनंद!! कशाचं वेगळं आयुष्य.. तुझ्याकडून काय घडलंय माहितीये ना? त्याचा दोष माझ्या नाय, तुझ्या माथी आहे.. समजला... तुझ्या हाताने ती घटना घडली नसती तर आज लता जिवन्त असती आन...आन तुझा... धाकटा भाऊ पण... " कैलासनाथ कडाडला.
" बस.. गेली सात वर्ष मी याचं मुद्द्यावर बोलायची वाट पाहत होतो.. आज तुमच्या तोंडून पहिल्यांदा मला दोष लावला गेला.. आता तुम्हाला खरं काय ते ऐकवायची वेळ आलीये.. " आनंद पण ओरडला. ते आवाज ऐकून खाली कैलासनाथची माणसं गोळा झाली होती.
" कसलं खरं सांगणारे.. तीन महिन्याच माझं बाळ तुझ्याकडून पडून मेलं.. अपघात नव्हता त्यो.. तू मुद्दाम केलं..आणि म्हणाला रडत होता म्हणून उचलून खेळवायला गेलो तर हातातून पडला.. तू त्याला गॅलरीत का नेलास?.. तिथून खाली पडायला ना.. तूला वाटेकरू नको होता.. तूझ्यात भले ती तुझी आई डोकवत असल.. पण तू माझ्यागत हायेस .. लहानपणीच आपल्या भावाचा काटा काढला.. आन त्या धक्क्याने तुझी आजारी आई पण आत्महत्त्या करुन मेली..
खरं म्हणजे तूला माझं सगळं हवं होतं एकट्याला.. अरे माझं रक्त हाये तू.. तूला मी नीट ओळखू शकतो.. आता इथं युन तू साध्या आयुष्याच्या गप्पा मारतोय.. त्यामाग पण तुझ्या मनात डाव असणार.. हा पण मला खरंतर बरं वाटतंय... माझा लेक माझ्यापेक्षा पण कुटील निघाला.. तूला मी त्या गोष्टीसाठी माफ केलंय.. जाऊ दे, एक उरलाय तर एक.. पण.. माझाच वंशज हे माझं सगळं सांभाळायला हवाय मला..उगाच खेळी खेळू नको कसली माझ्याबरोबर.. शेवटी बाप हाय मी तुझा...गप गुमान माझं ऐक.. असं बी हे सगळं तुझंच हाय.. उगाच का तणाव वाढवायचा दोघात."
"माझ्यात माझ्या आईचा अंशपण आहे .. तुम्ही जिद्दी तशी ती पण.. फक्त तुमची ह्या काळ्या सम्राज्याला उभं करण्यात तुम्ही खर्ची पाडलीत... माझ्या आईची जिद्द तिच्या पोटी जन्माला आलेल्या मुलांना तुमच्यापासून सुटका मिळावी म्हणून तिने वापरली.. " तो म्हणाला.
"काय? काय म्हणायचंय तूला.. कसली सुटका..?" कैलासनाथ ने विचारले.
" सगळं आईच्या मनाप्रमाणे केलंय मी... तीला तिची मुलं राक्षस म्हणून जगायला नको होती.. तिने मला रस्ता दाखवला आणि स्वतःचीही तुमच्या तावडीतून सुटका करुन घेतली.. " आनंद म्हणाला..
" ती रां xx!!" तो पुढे काही बोलणार तितक्यात आनंद हलला.
इतका वेळ आनंदने खिशात घातलेला हात कैलासनाथला जाणवला नव्हता. त्याने पटकन तीव्रगतीने हालचाल करत कैलासनाथ वर झेप घेतली. उजव्या हातातला रुमालाचा बोळा त्याच्या तोंडावर दाबत त्याने त्याचा आवाज दाबला. दुसऱ्याहाताने बारक्या पण धारदार चाकूने त्याच्या गळ्याची नस तोडली. रक्ताचा फवारा दोघांना भिजवू लागला.
आनंदच्या डोळ्यातलं पाणी देखील कैलासनाथला भिजवू लागलं. तो तडफडत होता. सख्या मुलाने केलेल्या हल्ल्यावर त्याचा अजूनही विश्वास बसला नव्हता. आनंदने त्याला हाता पायानी मागून घट्ट मिठी मारली होती.
" बाबा!!.. जाता जाता सत्य काय ते आता तुम्हाला सांगतो... माझ्या आईने माझ्या निष्पाप भावाला मनावर दगड ठेऊन संपवलं .. तिच्याकडे पर्याय नव्हता.. ती तुमच्या तावडीतून सुटू शकतं नव्हती.. म्हणून मग तिने छोट्या विष्णुला.. त्याला संपवले ... माझ्या अंगावर मी तो भार घेतला. कारण तेच, तुमच्यापासून लांब रिमांडहोम मध्यें जाता येईल.. तुमचा माझ्यावर राग असल्यामुळे माझ्यासाठी तुम्ही काही हालचाल करणार नव्हता... काही दिवसांनी तिने स्वतःचा बळी घेतला.. किती भयानक यातना तिने सहन केल्या आम्हा दोन्ही भावांसाठी.. तुम्हा दोघांना मोठं करुन एकमेकाचं रक्त प्यायला लावेल हा राक्षस जे मी होऊ देणार नाही... मला या राक्षसच कुळ वाढवणारी राक्षसी म्हणून जगायचं नाहीये.. असं म्हणाली होती मला... कुढत टाचा घासत मेली माझी आई..
विष्णू... माझा जीव की प्राण होता... आईला त्याला झोपवायला जमायचं नाही तिच्या अशक्तपणामुळे.. मग मी ते आनंदाने करायचो.. त्याची नजर माझ्या मनाचा ठाव घेत झोपी जायची...अजून.. अजून ती स्वप्ने छळतात मला.. विष्णू डोळ्यासमोर येतो... त्याचा गेलेला तो निरागस जीव... मी कुठल्या मनाने तो आघात सहन केला तूला कल्पना नाहीये...सगळं संपवलं तू कैलासनाथ... तुझ्यामुळे गेले ते.. तुझ्यामुळे..आता तूही मर.. ही क्रूरता कदाचित तुझ्याकडूनच मिळालीये मला.. दबून होती.. आता तुझ्यावरच उलटलीये.."
असं म्हणत अजून एकदा त्याने चर्रकन तो चाकू कैलासनाथच्या मानेवरून फिरवला..रक्ताच्या थारोळ्यात दोघे भिजतच चालले होते. कैलासनाथचे शरीर तडफडत होते. आनंदने त्याला गुदमरून टाकला होता.
" तू तिचं ऐकलं असतं तर, माझा विष्णू, माझी आई आणि.. आणि शेवटी माझा बापही जिवन्त असता.. तू संपवलंय त्यांना..माझ्या कुटुंबाला.. तू.. " असं म्हणत त्याने त्याची मगरमीठी आणखी घट्ट केली आणि त्याचा प्राण घेतला.
बंद झालेले बोलण्याचे आवाज आणि संशयस्पद हालचालीच्या आवाजानी संशयित झालेले कैलासनाथचे लोक वर यायला निघालेच होते तेवढ्यात तिथे शंभरेक पोलिसांचा ताफा येऊन धडकला. पळापळ धराधरीला ऊत आला होता. वरती कैलासनाथ मेल्याचा मेसेज आनंदने करताच सातनळपासून काही अंतरावर तैनात ती तुकडी निघाली. पोलीस आयुक्त स्वतः वर आले आणि रक्ताच्या थारोळ्यात निष्प्राण बापाच्या डोक्यावरून हात फिरवत बसलेल्या आनंदला त्यानी उठवले.
हातात विमानाचा बोर्डिंगपास आणि पासपोर्ट घेऊन आनंद विमानाकडे निघाला होता. पोलिसांना मदतीला घेत त्याच्या बापाच्या राक्षसी वृत्तीला लगाम घालण्यासाठी आणि स्वतःच्या आयुष्याच्या वाताहातीचा बदला घेण्यासाठी आनंदने हे सर्व घडवून आणले होते. बदल्यात त्याने स्वतःचे सर्व रेकॉर्ड क्लीन करुन घेत स्वतःच्या उज्ज्वल भविष्याची वाट धरली होती. इंग्लंडला जाऊन वकिलीचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी सरकारी शिष्यवृत्ती त्याची वाट बघत होती. त्याच्यासोबत आता फक्त आई आणि विष्णुच्या आठवणींचे संचित होते. सीटवर बसत खिडकीतून त्याने सूर्यास्ताकडे पाहिले. क्षितिजापलीकडे असलेलं दुसरं जग त्याला खुणावत होतं. रात्रीकडे कललेली संध्याकाळ आणि पहाटेकडे धाव घेणारी निशा प्रवासातच संपणार होती.. येणारा नवा उष:काल त्याची वाट पाहत होता...🍁🍁
- शब्दभ्रमर 🍁🍁