Bhavande (two stories) in Marathi Motivational Stories by Shabdbhramar books and stories PDF | भावन्डे (दोन कथा)

Featured Books
Categories
Share

भावन्डे (दोन कथा)

नमनपूरच्या महाराणी शलाकादेवी अंगावर अगणित जखमा घेऊन दोन्ही हातात खडग पेलवत उभ्या होत्या. त्यांच्या उरलेल्या मोजक्याच सैन्यासमोर जवळ जवळ दहा पट आणखी सैन्यबळ आक्रमन करायला सज्ज होतं. बलाढ्य शत्रू सैन्याची अर्धी संख्या संपवण्यात शलाकादेवींचं नव्वद टक्के सैन्य विरगती मिळवून संपलं होतं. आपल्या राणीच्या शौर्याने स्फूरण चढलेले सैनिक पाय घट्ट रोवून त्यांच्या मागे उभे होते. सगळीकडे वीर सैनिकांच्या देहांचा खच पडला होता. त्या कलेवरांच्या सानिध्यात इतर भावनांना श्वास नव्हता. तिथं होती ती फक्त निष्ठुर कर्तव्य भावना.


शलाकादेवीनी सुंदर शासन करतं सुराज्य बनवलेल्या नमनपूरची शत्रू राज्यासमोर संपूर्ण शरणागती आणि अन्याय्य कर वसुलीचा अधिकार शलाकादेवीनी अमान्य केला होता. स्वतःच्या प्रजेला जुलमी राजवटीच्या खाली आणणे त्यांना जिवंतपनी अमान्य होते. त्या बदल्यात शत्रू राज्याने नमनपुर वर हल्ला चढवला.


नमनपूरचा पडाव होणार होता. उरलेल्या दमल्या जखमी सैन्यासोबत आता निर्वाणीच्या भीषण समरात स्वतःला झोकून द्यायचं आणि मरण पत्करायचं हेच भाग्य समजून शलाकादेवी आक्रमन जवळ यायची वाट पाहत उभ्या होत्या. चिलखता आत वाहणाऱ्या घामाने अंगावरच्या जखमाची लाही उठवली होती. उष्ण रक्तगन्ध मिश्रित श्वास पुढल्या काही क्षणानी येणाऱ्या मरणाची चाहूल देत होते. पण मृत्यूच्या यज्ञात आहुती द्यायचा त्या विरसमूहाचा निश्चय पक्का होता. 

"मरण.. मानहानी विरहित मरण."


हाकेच्या अंतरावर शत्रू सैन्य आलं असताना. शलाका देवीनी डोळे मिटले, मोठा श्वास भरत त्यांनी दोन्ही रक्तरंजीत हातातली खडगे अजून घट्ट पकडली. शत्रूदलाचा धडकी भरवणारा आवाज काही अंतरावर आला असताना अचानक सूं सूं करतं आवाजाचे ध्वनी आसमंतात उमटले. शलाकादेवीनी डोळे उघडले. पाहतात तर सर्वत्र झाकोळून आलं होतं. तप्त सूर्याची किरणे कशानेतरी झाकली गेली. प्रकाश लयाला गेला.


अचानक शत्रू सैन्याच्या दोन्ही बाजूनी हजारोच्या संख्येने रोरावत आलेले धारदार बाण सर्वानी पाहिले आणि सपासप ते बाण शत्रू सैन्याच्या छाताडांच्या चिंधड्या उडवू लागले. त्या विलक्षण हल्ल्याला बळी पडत असताना. परत एकदा दोन्ही कडून चौखूर टापांचा भयंकर ध्वनी उमटला. धूळ ऊडवत विजेच्या वेगाने मोठ्या संख्येने दोन घोडदळे शत्रू सैन्यावर तुटून पडली. 

शलाकादेवी आणि त्यांचे उरलेले सैनिक आ वासून तो भयंकर संग्राम बघू लागले. तो संग्राम नव्हताच. ते होतं चिरडणं. त्या दोन्ही कडून आलेल्या सैन्यानी शत्रू सैनिकांच्या अगदी अर्ध्या प्रहरात ठिकऱ्या उडवल्या.


नमनपूरचे सैन्य फक्त उभे होते. अविश्वासात, अचंब्यात..आणि हॊ अनिश्चिततेत देखील. ज्यांनी नमनपूरच्या बलाढ्य शत्रूचा चिखल केला. ते कोण होते? त्याचं निशाण देखील नमनपूरने कधीच पाहिलेलं नव्हतं. ते नक्कीच दूर असणाऱ्या कुठल्यातरी राज्यातले होते. नमनपूरला न मागता मदत करण्यामागे त्यांचा हेतू काय होता? काहीच कळत नव्हते. शत्रूसैन्य त्या भयानक माऱ्याने गर्भगळीत झालं. जे वाचले ते पळाले. 


नमनपूर तूर्तास मोठ्या संकटातून वाचलं होतं. त्या अनोळखी राज्याच्या सैन्याने युद्ध संपल्याच आणि विजयाचं घोषणा करणारं रनशिंग फुंकलं. मोठ्या शिस्तीने संचलन करतं ते सर्व सैन्य राणी शलाकादेवीच्या तुकडीसमोर उभे ठाकले. एकही सैनिक न गमावता त्यांनी विजय मिळवला होता. इतकी प्रचंड शूर सैन्य संपदा असणारं ते राज्य आहे तरी कोणाचं हे जाणून घ्यायची उत्कंठा राणींच्या मनात दाटून आली. तितक्यात त्या सैन्याचा सेनापती पुढे आला.


मोठ्या नम्रतेने त्याने शलाकादेवीसमोर नतमस्तक होतं. गुडघे टेकले. शलाकादेवीना कळत नव्हते एवढं बलाढ्य सैन्य असलेला सेनापती माझ्यासमोर एवढ्या नम्रतेने आणि मर्यादेने कसा काय वागत आहे. हे लोकं आहेत तरी कोण?


"महाराणी शलाकादेविंचा विजय असो." सेनापतीने घोषणा देताच मागोमाग त्याच्या सैन्यानेही प्रचंड अशा जयजयकराचा नाद सुरु केला. त्यात नमनपूरचे सैन्यही सामील झाले. कितीतरी वेळ तो जयजयकार सुरु होता.


महाराणीनी हात उंचवत सर्वाना थांबण्याचा इशारा केला. तसे सर्व शांत झाले.


" हे महाबाहो! आपण कोण? मी तुमच्या राज्याचे निशाण कधी पाहिले नाही. तुम्ही कोण राज्यातले? आपल्या महान राज्यकर्त्यांचा परिचय काय?आमच्या मदतीला धावून येण्याचे उपकार करण्यामागे आपला हेतू काय? आम्ही मदतीची याचना न करताही आपण आमच्यावर आलेलं एवढं मोठं संकट दूर केलंत. आमची उत्कंठा दूर करा आणि कृपया आपला परिचय द्या." महाराणी म्हणाल्या.


सेनापती उठले.


"महाराणी सर्व सांगतो. थोडा धीर धरा. तुम्हाला आठवत असेल. नमनपूरच्या वेशीतून वीस वर्षांपूर्वी एक शोड्षवर्षीय युवक निघून गेला होता. त्याच्या मोठ्या बहिणीच्या ईच्छापूर्ती आणि तिच्यावर असणाऱ्या त्याच्या प्रेमापोटी. त्या युवकाने आम्हाला बजावले होते. नमनपूरवर आक्रमन म्हणजे त्यांच्या स्वतःवर आक्रमन. तो युवक म्हणजे दुसरे तिसरे कोणी नाही तर आमचे महाराज कुशाग्रसेन." सेनापती म्हणाले.


"कुशाग्रसेन!! कुशाग्रसेन!! म्हणजे?? म्हणजे? माझा धाकटा प्राणप्रिय बंधू.. कुठे आहेत.. कुठे आहेत तुमचे महाराज?" महाराणी भाव विवश होऊन ओरडल्या.


"महाराणी वीस वर्षे झाली आपण त्यांना शेवटचं बघून त्यामुळे असेल कदाचित. पण समोर उभ्या असलेल्या आपल्या धाकट्या बंधूच्या डोळ्यातले अश्रू तरी पाहायचे." सेनापती म्हणाले आणि त्यांनी डोक्यावरलं शिरस्त्रान काढलं.


सेनापती दुसरे तिसरे कोणी नसून स्वतः त्या बलाढ्य सैन्याचे स्वामी महाराज कुशाग्रसेन होते. सरळ पुढे होतं त्यांनी आपल्या मोठ्या बहिणीच्या पायांवर डोके ठेवले. त्यांनी तसं करताच त्यांचं पूर्णच्या पूर्ण सैन्य देखील गुढग्यावर बसलं. महाराणी चटकन वाकल्या आणि आपल्या जिवश्च बंधूला खांद्याला धरून उठवत उराशी कवटाळलं.


"कुशाग्र!! .. कुठे होतात ..? वीस वर्षांत किती शोधलं तुम्हाला? आणि आता असे.. समोर आलात. किती अभिमानास्पद रूपात समोर आलात. मी धन्य झाले माझ्या बंधूची तेजपूंजता आणि पराक्रम पाहून." शलाकादेवी स्वरातून कौतुकाचा वर्षाव करतं म्हणाल्या.


"का निघून गेला होता? काय चुकलं आमचं सांगा. तुमच्या जाण्याने आपल्या पिताश्रीनी हाय खाल्ली आणि काहीच वर्षात ते सोडून गेले. असं कोणतं कारण होतं. आपल्या मातोश्रीन्मागे मी तुम्हाला सांभाळण्याचा प्रयत्न केला. पण बहुदा माझ्या ममतेत कमतरता होती." त्या म्हणाल्या.


"नाही नाही असं बोलू नका महाराणी. उलट तुम्ही मला मातेचं स्मरण कधीच होऊ दिलं नाहीत. मी आपल्याला सोडून अज्ञातात जायचं कारण होतं. आपल्या महाराजांनी आपल्याला डावलून मला राज्याचा उत्तराधिकारी घोषित करण्याची तयारी केली होती. मला मोठी भगिनी असताना, जी एक उत्तम शासक होण्याची सर्व क्षमता ठेवते. मला राज्याचा उत्तराधिकारी केवळ पुरुष म्हणून बनवण्याचा निर्णय पटत नव्हता. अशाने तुम्ही माझ्यावर केलेल्या संस्कारांचा आणि माझ्या क्षमतेचा कस तरी कसा लागणार होता. मला माहित होते कि आपल्याला राज्यकार्यात किती रस आहे. आपण शस्त्र ,शास्त्र किती खोलपणे जाणता. आपण योग्य होतात. त्या योग्यतेने आपणच खऱ्या उत्तराधिकारी होता. म्हणून मी माझा मार्ग निवडला. माझ्या संघर्षाने मी माझं राज्य उभं केलं. नमनपूरची माहिती मला मिळत होती. शेजारच्या राज्याने नमनपूर बळकावण्याचा घाटघातलाआहे हे माझ्या हेरांनी सांगितलं. मी शक्य तितक्या वेगाने आलो. पण अंतर जास्त असल्यामुळे विलंब झाला. त्याबद्दल माफी असावी."


"माझा महाबाहो बंधू केवळ पराक्रमी नाही तर इतक्या विशाल हृदयाचा आहे हे मला जाणून घेताना किती आनंद होत आहे. आज मी धन्य झाले. अशा बंधूवर जीव ओवाळून टाकला तरी कमीच." महाराणी उदगारल्या.


ते दोघे राजप्रासादाकडे कूच करण्या निघाले.


ते सैन्य, तो संग्राम, ती रणभूमी त्या भावंडांच्या मिलनाची कहाणी पुढल्या कैक पिढ्याना ऐकवणार होती.



****



टाळ्यांच्या कडकडाटात ऑडिटोरियम दुमदुमलं. जेव्हा संजीवनी जाधव हे नाव घेऊन पुकारा करण्यात आला. हॊ. संजीवनी. तिने M. B. B. S. गोल्ड मेडल मिळवून पास केलं होतं. पदवीप्रदान समारंभात संजीवनीला गोल्ड मेडल मिळालं असं जाहीर होताच तिच्या मनात पहिलं नाव आलं ते म्हणजे "संचित ."


"संचित?!.. झोपला नाहीस अजून? अरे दीड वाजलाय." संजीवनी म्हणाली. कॉमन रूम शेअर करतं असल्यामुळे हल्ली संचित जरा जास्तच जागा राहून अभ्यास करतो हे संजीवनीला माहित होतं. 


" तू झोप. मला वेळ आहे. एवढा चॅप्टर क्लोज करतो. मग झोपतो. " संचित म्हणाला.


पण तिला ते काही पटेना. ती उठली आणि त्याच्या टेबल पाशी गेली. सहज म्हणून त्याच्या खांद्यावर हात ठेवला तर त्याचं अंग तिला चांगलंच गरम लागलं. 


"अरे तुला ताप आहे." ती म्हणाली.


"एवढं काही नाही. मी ठीके." तो म्हणाला. 


"अरे असं काय करतो. थांब मी आईला बोलावते. एवढं काय जागून आजारी पडून अभ्यास करतोय. " ती म्हणाली आणि दाराकडे गेली.


आईला बोलावून आणून तिने त्याला पॅरासिप दिली आणि झोपायला लावलं. नंतर त्यांच्या डोक्यावर पट्ट्या ठेऊन त्याचा ताप उतरवू लागली. हा तापात पण अभ्यासाचं बरळत होता. 

गव्हर्मेंट कॉलेजच फ्री सीट मिळवण्यासाठी हा इतका अभ्यास का करतं आहे संजूला समजत नव्हते.


संचित आणि संजीवनी जुळे भाऊ बहीण. दोघेही शाळेत असल्यापासून खूप हुशार होते. सतत त्यांच्यात मार्कांवरून चढाओढ चालत. संजीवनी कधी पुढे असायची तर कधी संचित पुढे असायचा. दहावीला दोघांनी ठरवलं होतं की मेडिकल ला जायचं. त्यासाठी दोघे दहावी पासूनच मेहनत घेऊ लागले. दोघांना उत्तम मार्क्स पडले. दोघांचे सगळी कडून कौतुक होऊ लागले. पुढे अकरावी आणि NEET चा क्लास लावायचा प्रश्न जेव्हा समोर आला त्यावेळी दोघांच्या बाबांना पैशाचा प्रश्न भेडसाऊ लागला.


संचित एका संध्याकाळी खेळून घरी आला. संजीवनी तिच्या मैत्रिणीकडे गेली होती. आईबाबा किचनमध्ये चहा घेत होते. 


" कसं करणारं आहात? " आई म्हणाली.


"तेच कळेना. दोघाना NEET चा क्लास लावायचं गणितच जमत नाहीये.  इच्छा दोघांचीही आहे आणि पोरं कुठं कमीपण पडत नाहीत. यश खेचूनच आणतात. पण माझीच क्षमता कमी पडते." बाबा म्हणाले.


"मी संजूला समजावते. तुम्ही संचितला क्लास लावा तो. ती घेईल समजून." आई म्हणाली.


संचित ऐकत होता. क्षणाचाही विलंब न करता तो किचन मध्ये आला.


"आज त्या रुपेश दादाला भेटलो मी. लास्ट इयर ला आहे नाही का तो. त्याचा अभ्यास पाहिला मी मेडिकलचा. बापरे!! किती भयानक आहे ते सगळं. ओ बाबा... मला नाही करायचं ते मेडिकल वैगरे. बारावी करुन CET करतो. मला इंजिनीरिंग ठीक आहे. त्या संजूलाच करू द्या ते. सेट होईपर्यंत किती वय वाढते. त्यापेक्षा इंजिनीरिंग करुन जॉब घेईन आणि मास्टर्स पण करेन नंतर... माझं ठरलंय." तो एका दमात म्हणाला.


" अरे पण तुझी तर सर्जन व्हायची ईच्छा...? " बाबा म्हणतच होते.


" नाही.. नको.. तो अभ्यास बघूनच भीती वाटते. " तो म्हणाला.

एवढं बोलून तो तडक निघून गेला.


संजीवनी ने मात्र त्याला अभ्यासाला घाबरला म्हणून खूप चिडवलं. 


बारावी नंतर CET च्या परीक्षेत चांगला स्कोर करण्यासाठी संचित दिवसरात्र एक करू लागला. NEET साठी कोचिंग मध्ये ऍडमिशन झाल्यावर कोचिंग घेत संजीवनी पण मेहनत घेत होती. दोघांचे रिजल्ट्स आले. दोघांनी चांगला टॉप स्कोर केला होता. संचितला घसघशीत स्कॉलर शिप मिळाली होती. त्यामुळे त्याच्या शिक्षनाच्या खर्चाचा प्रश्न सुटला होता. संजीवनीला मेडिकलसाठी मात्र बराच खर्च होता. त्याची तरतूद बाबा करू शकले.


संजीवनी हॉस्टेलला निघाली. जाताना संजूकडे आली.

"काल आईने मला काही सांगितलं." ती म्हणाली. 


" काय?" त्याने विचारले.


" तू अभ्यासाला भिणारा नाहीस." ती म्हणाली.


" म्हणजे? " त्याने नजर चोरत विचारले.


" म्हणजे.. मला मेडिकल ला जाता यावं म्हणून तू करिअर लाईन चेंज केलीस? " त्याचा हात दोन्ही हातात पकडत ती म्हणाली. तिच्या डोळ्यात पाणी होतं.


" गप गं! मला नको वाटलं ते मेडिकल. हॉस्पिटल औषधाचा वास घेत आजारी लोकांमध्ये राहायचं....हं! त्यापेक्षा इंजिनीरिंग बरी.  तूचं हॊ डॉक्टर. तपासत बस त्या म्हाताऱ्या कोताऱ्यांना." तो खिल्ली उडवणाऱ्या स्वरात बोलण्याचा प्रयत्न करत होता.


" संचित.. तू माझ्यासाठी जे केलंयस ते मी आयुष्यभर विसरणार नाही. तुझं हे ऋण मी फेडणारही नाही. मला त्या ऋणाच्या छायेतच रहायचंय. आपण वयाने सारखे असलो तरी मला तुझ्यापेक्षा लहानच राहायचंय." असं म्हणून तिने त्याच्या खांद्यावर डोके टेकले. 


"संजू.. गोल्ड मिळव बरं का! मी असतो तर नक्कीच मिळणार होतो. तू मिळव." तो म्हणाला.


ती सर्व घटना शृंखला संजीवनीच्या डोळ्यासमोरून काही सेकंदात तरळून गेली.

तिने भावाची इच्छा पूर्ण केली होती.

मंचावर येत मेडल घेतलं. डायस वर आली आणि बोलू लागली,

"I dedicate this medal to my best friend, my mentor, my guide that is my beloved Brother Sanchit.."


****


काळ कोणताही असो. कर्तृत्ववान बहिणींच्या मागे उभे राहणारे., त्यांची साथ न सोडणारे भाऊ आणि त्यांच्यावर जीव ओवाळून टाकणाऱ्या बहिणी आपल्याला दिसतातच. एकमेकांसाठी त्याग आणि समर्पण दाखवणाऱ्या भावा बहिणींनी आपला समाज घडवला. उच्च मूल्य असलेलं हे नातं असंच टिकून राहो. बहरत राहो....


एका पोटी जन्म घेतला आपण 

म्हणूनच का आपल्या रुधराचा एकच रंग?

जशा स्वर्गी बनतात इतर गाठी.

का नसावा आपलाही स्वर्गीय बंध?  


- शब्दभ्रमर