"ऐक ना ए झाम्या...अरे किती वेळ झालं बघतोय आपण.. यडी आहे रे ती.. तिचा बाप काय करू शकणार नाय.. हे बघ ही ट्रेन किरीटवाडीला थांबते.. हे दोघे उतरणारेत.. ऐकलं मी मघाशी...आपली गाडी हाय कि तिथंच.. 11 वाजलेले असतील... घन्टा कोणी नसणार रोडला... उचलू हिला.. मजा मारू.. आणि नंतर शोभाबाई कड नेऊ.. एक पंचवीस देते बोलतात नव्या पोरीचे... मजा पण आणि पैसा पण... काय बोलतो...??" भिका त्याच्या मित्राला जग्याला सांगत होता.
" हा.. एकदा ह्या म्हाताऱ्याला कडला लावला कि कामं सोपं." भिकाची री ओढत जग्या बोलला.
दोघे शहरातून फिरून मजा करून परत गावी निघाले होते. रेल्वे मध्ये त्यांना हा सत्तारितला वयस्कर माणूस आणि त्याच्या सोबत सोळा सतरा वर्षांची सुंदर कोवळी मुलगी दिसली. भिका आणि जग्या बेरोजगार आणि गुन्हेगारी वृत्तीचे होते. तालुक्यातल्या गावांमध्ये चोऱ्या करून त्या पैशांची शहरात जाऊन चैन करणे हा त्यांचा उद्योग होता. सकाळी एका ठिकाणी मालासहित चोरलेली एक ट्रकवजा गाडी त्यांनी किरीटवाडीला लपवली होती. त्या गाडीतला चपला बुटांचा माल त्यांनी एका व्यापाऱ्याला काही रुपयांना विकला आणि रेल्वे धरून शहरात डान्सबारला जाऊन आले. आता ती गाडी पण विकणार होते. पण रेल्वेत त्यांना नवं सावज दिसलं आणि त्यांचा कट शिजला.
म्हाताऱ्याशी बोलून ओळख वाढवून त्यांना त्यांचे काम सोपे होईल असे वाटून ते जवळजवळ निम्म्या रिकाम्या असलेल्या रेल्वेच्या त्याचं कंपार्टमेंट मध्ये ते आले जिथे तो म्हातारा आणि मुलगी होती. मुलगी खिडकीतून बाहेर बघत होती. जरा काही वेगळं पाहिलं कि "तात्या तात्या!!... ते घा ते बघा!!" म्हणून ओरडत होती. तो माणूस पण तिला समरसून कौतुकाने साथ देत होता. ते दोघे त्यांच्यासमोर येऊन बसले.
तो म्हातारा दोघांकडे बघून हसला. ते पण हसले. त्या मुलीकडे बघत बघत ते म्हाताऱ्याशी बोलत होते.
" एवढी मोठी हुन पण अशी का उड्या मारत हसत का बोलतीये आसं वाटत आसल ना तुम्हाला??" होऊनच तो बाबा बोलला.
" काय.. आता? असल कायतर अडचण.. " भिका जग्याकडे बघत म्हणाला.
" अडचण व्हती... लय मोठी अडचण व्हती." म्हातारा सांगू लागला.
हिचं आईबाप माझे शेजारी.. मी आपला कीर्तनकार बुआ... ह्यांच्या शेजारी रहात होतो.. ही तवा 2 वर्षाची असल. तवापासून यायची माझ्याकड... माझा टाळ घेऊन वाजव..तर कवा माझी एकतारी घिऊन तार छेडीत बस.. आवाजाचा लय नाद तिला... लय गोड पोर .. जीव लावलाय तवापासून पोरीनी.. हिचे आयबाप पण मला बापावानी समजायचे.. तात्या तात्या म्हणून इचारपूस कराचे. एका दिशी लय पाऊस झाला रातचा.. धाडकन आवाज झाला म्हणून जाग आली.. त्या पावसाच्या आवाजानी काय बी समजत नव्हतं का काय होतंय.. गलका झाला म्हणून भाईर डोकावलं तर ह्या पोरीचं घर कोसाळलेलं.. माझा अर्धा जीव गेला तिथंच. त्या धुमशान पावसानी काय सुधारणा..सकाळी सगळी जोर लावून मलबा काढू लागली तवा ही पोर एकली जिती दिसली. घसा ताणून जोर लावून रडत होती... मी हात लावल्या बरबर मला बिलगली.. आता तिला नं मला कुणीबी नव्हतं. आमी एकमेकांचे झालो. आम्ही अनाथ राहिलो नाय." तो म्हातारा नरम डोळ्यांनी सांगत होता.
दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि मान खाली घातली.
"ती असं यड्यागत उड्या का मारती अजून भी कळलं नाय नव्ह तुम्हाला?" तो म्हणाला.
दोघे त्याच्याकडे बघू लागले.
"दोन दिसापूर्वी तिचं आपरेशन झालंय. कीर्तन करून जमवलेली सगळी पुंजी कामाला लावली. मी जरा पण काय पुण्य केलं असल तर कामी येऊ दे म्हून पांडुरंगाला साकडं घातलं. डाक्टर म्हणून माझा पांडुरंगच धावला. एकही पैका नं घेता त्यांनी आपरेशन केलं आणि तिचं जन्मापासून असलेलं आंधळेपण घालवलं. ती काल पासून बघायला लागली हाय . पयल्यांदाच मला बघितलं तिनी. लहानपणापासणं तिनी ज्ये ज्ये काय पाहिलं नव्हतं ते ती आत्ता पाहतीया. म्हणून तर तिचा उत्साव कसा व्हातूय बघा.. बघा कसं उधाळलंय माझं वासरू. पंधरा वर्षाचं सपान खरं झालंय माझं." म्हातारा थांबला.
ते दोघे सुन्न झाले होते. लाज त्यांना मान वर करू देत नव्हती.
"माझ्या देवानू.... मी तुमचं मघाच बोलण ऐकलं.. तुमचा मनसूबा कळला.. मी म्हातारा खरंच दुर्बळ हाय.. काय करू शकणार?? ह्या लेकरानं अजून पर्येंत जगाचा त्यो चेहरा पाह्यला नाय.. कवातरी कायतरी वाईट तिला दिसल... सहन करावं लागल... पण आत्ता कुठं ज्योतीचा प्रकाश तिला मिळालाय... त्या प्रकाशातून तिला परत अंधारात ढकलू नका.. ह्या जीवावर दया करा." असे म्हणून त्याने दोघांपुढे हात जोडले.
दोघे उठून उभे राहिले. डोळ्यातले पाणी बाह्यानी पुसत तिथून निघून गेले. त्यांना उपरती झाली होती. वासनेचा मळ त्या अश्रूनी धुवून काढला होता. मन स्वच्छ झालं होतं. निर्मळ आत्म्याने दिलेला तो साक्षात्कार मन शुद्ध आणि हलकं करत होता.
- शब्दभ्रमर 🍁🍁