स्वित्झर्लंड
स्वित्झर्लंडमधे प्रवेश केल्यावर प्रथम भेट दिली ती झुरीच मधील ऱ्हाईन फॉलला हा ऱ्हाईन नदीवरील एक लहानसा फॉल आहे या ऱ्हाईन नदीत बोटीने फिरायला मजा येते कारण बोट फॉलजवळ नेताना अंगावर पाण्याचे जोरदार फवारे उडतात .तिथल्या बोटचालकाचे वैशिष्ट्य असे की फॉलच्या अगदी जवळ बोट नेऊन पुन्हा सुखरूप आणी कौशल्याने ही बोट तो बाहेर काढत असे .व असे तो ही कृती परत परत करीत असे बोट फॉल च्या जवळ गेल्यावर थरारक वाटत असे . पाण्यात गेल्यावर कडाक्याची थंडी होती त्यामुळे बाहेर आल्यावर तेथील एका इंडियन रेस्टॉरंट मध्ये गरम गरम वडापाव आणि मसाला चहा मिळाल्यावर आमचा आनंद द्विगुणीत झाला .(कारण युरोप मध्ये एकतर तुम्हाला चहा अजिबात मिळत नाही फक्त कॉफी मिळते ती सुद्धा बिनदुधाची आणि बेचव असते ) आता आमची सगळी कंपनी गोंडोला राईड मधुन माऊंट टिटलीसवर निघाली .अनेक हिंदी चित्रपटातील अनेक गाण्यांचे शुटींग इथे झालेले आहे . माऊंट टिटलीसवर बॉलीवुडचा इतका प्रभाव आहे की वरच्या ग्लेशिअर जवळ “DDLJ” च्या राज सिमरनचा (शाहरुख काजोल) कट आऊट लावलाय. अनेक पर्यटक तिथे फोटो शूट करतात आणि बर्फात मनसोक्त खेळतात . केबल कार आणि माऊंट टिटलीस संपूर्ण कोरून उभारली इमारत म्हणजे इथल्या इंजिनियर माणसांच्या चिकाटीची कमाल आहे. इंजिनिअरींगची कमाल वाटणाऱ्या केबल कारमधून दहा हजार फूट उंचीजवळ जाताना खालचे दृश्य विलोभनीय होते बाहेरचा देखावा सुद्धा प्रचंड सुंदर होता बघण्यासाठी अक्षरशः दोन डोळे अपुरे पडत होते.ही पाच मजली इमारत माऊंट टिटलीस डोंगर कोरून उभारली आहे. आतमध्ये दोन तीन अद्ययावत रेस्टॉरंट, कपड्यांची, सोविनीयर्सची, स्कीयिंग साहित्याची दुकाने आईस्क्रीमची दुकाने, पारंपारिक स्विस पोषाखांचा स्टुडिओ ,तीन चार स्वच्छतागृहे , उत्तम रेस्टींग लाऊंज अशा सोयी आहेत.येथेजास्त संख्येने येणारे फक्त जपानी आणि भारतीय पर्यटक होते . बाकी स्कीईंग करायला मोजके पर्यटक आले होते पण ते सगळे परदेशी होते माऊंट टिटलीसच्या ग्लेशिअर वर गेलो तर खुपच मस्त वाटले.आम्ही पण एकमेकांच्या अंगावर बर्फ टाकून खुप खेळलो पण नंतर हुडहुडी भरली (-2 तापमान होतं ते).भुसभूशीत बर्फावर चालणं सोपं वाटतं पण कडक झालेला बर्फाने मात्र आपली घसरगुंडी होते . मग अचानक हवामान धूसर झाले वाऱ्याचे झोत सुरू झाले आणि बर्फाचे नाजूक फ्लेक्स पडायला सुरुवात झाली. हा मात्र छान नजारा होता काही अंतरावर गेल्यावर हा नाजूक बर्फ एकदम कडक झाला आणि वेगाने तोंडावर आपटू लागला. अगदी तिथे उभं राहणं सुद्धा कठीण झालं .मग मात्र त्याच आकर्षण कमी झालं.खालची वाट अजूनच निसरडी झाली होती इथल्या हवेचा भरवसा नसतो बघता बघता निसर्गाचे रौद्र रूप समोर येऊ शकतं थोड्याच वेळात तिथून न धडपडता बाहेर कसे निघता येईल याची काळजी घेत आम्ही बाहेर पडू लागलो हातात हात घालून साखळी करीत ग्लेशियर वरून सुखरूप परत आलो.जेव्हा तो ग्लेशियर ओलांडून आत इमारतीत शिरलो तेव्हा मात्र उबदार आणि सुरक्षित वाटायला लागले.इथे फ्लायर म्हणुन एक भन्नाट प्रकार अनुभवला .एका झोपाळ्या प्रमाणे असलेल्या लांबलचक बाकावर चारपाच लोक बसतात आणि मग हा बाक बर्फात लांबवर सैर करून परत येतो इथे ११३७१ फुट उंचीवर असलेले “जोंगफ्राऊ” नावाचे आल्प्स पर्वत रांगेतील सर्वात उंच शिखर आहे .जगातील सर्वात उंचावरचे पोस्ट ऑफिस इथेच आहे .आणि तेथे रेल्वेने जाता येते .बर्फात चालून आणि इतक्या लिफ्ट आणि रांगांमधे उभ राहून सर्वांनाच अगदी दमायला झाल होत मग तिथली स्पेशल अशी गरम पावभाजी आणि आईस्क्रीम खाऊन बरे वाटले .यानंतर ल्यूसर्न गावातल्या रडणाऱ्या सिंह स्मारकाकडे गेलो .फ्रेंच राज्यक्रांतीत फ्रान्सच्या राजाच रक्षण करणारी स्विस आर्मी कापली गेली त्या स्मरणार्थ हा सिंह रडतो आहे असे म्हणतात त्याच्या पाठीत खुपसलेल्या बाणामुळे तो खुपच दीनवाणा वाटतो .त्या चौकातच एक मोठं इंडियन रेस्टॉरंट आहे. तिथे भारतीय तिरंगा फडकत असतो. परदेशात असा तिरंगा दिसला की भारता विषयी अभिमान वाटतोयानंतर ल्यूसर्न गावात गेलो तिथे रोलेक्स शॉप आहे आणि एक स्विस बँक असलेल्या रस्त्यावरच एक मोठ तिमजली दुकान आहे. तिथं स्विस चॉकलेट आणि स्विसबेल प्रसिध्द आहेत ती खरेदी केली .ल्यूसर्न लेक खूपच मोठे आहे .अनेक क्रुझ आणि स्टीम बोटी तिथे पर्यटकांच्या प्रतीक्षेत उभी होती .तळ्यात अनेक बदके आणि रंगीत पक्षी पोहत होते .स्थानिक लोक मुलाबाळा सोबत तिथे येऊन फिरत होते .मुले त्या बदकाना वेफर्स वगैरे खाणे खाऊ घालत होती .ते खाता खाता ते पक्षी काही वेळा चक्क पाण्याबाहेर जमिनीवर येत होते .स्वित्झर्लंड मध्ये १५०० पेक्षा जास्त तलाव आहेत .असे म्हणतात युरोपमधील ७५ टक्के पाण्याचा हक्कदार स्वित्झर्लंड आहे .इथले कोणत्याही तलावाचे पाणी आरामात पिता येईल इतके स्वच्छ आहे.दोन तलावांच्या मध्ये पण एक सिटी आहे तिला इंटरलाकेन सिटी म्हणून ओळखले जाते . लेक ल्यूसर्न टूरमधे एका क्रुझ वर आमचे डीनर ठेवले होते .लेक ल्यूसर्न इथले चौथ्या क्रमांकाचे लेक आहेएका पारंपारिक वादकाने एक वारलीसारखं मोठं वाद्य वाजवलं त्यातून वेगळेच संगीत वाजत होते स्थानिक काही गायकांनी पारंपारिक गाणी सुद्धा गायली .एका वादकाने ऑकोर्डीयन मात्र खूप छान वाजवले बाकी स्वित्झर्लंडमधे अतिशय शांतता नांदत असते . स्विस कायदे भलतेच कडक आहेत . स्विस हा शांततेचा पुरस्कर्ता देश आहे इथले नियम कडक आहेतकुत्र पाळायचं असेल तर कर भरावा लागतो. रविवारी तुम्ही तुमच्याच बागेतले गवत कापू शकत नाही. हा देश कुणालाही नागरिकत्व देत नाही फक्त चार्ली चॅप्लिन हा इथे नागरिकत्व मिळालेला एकमेव अपवाद आहे इथं मुलांबाबतही कडक कायदे आहेत. आईबाप अपत्याला विचित्र वाटेल असं नाव ठेऊ शकत नाहीत ....स्वित्झर्लंड खुपच देखणं आहे . अत्यंत श्रीमंत आणि अत्यंत महाग आहे. रस्ताभर कडेने आल्प्स वृक्षांची एकमेकांच्या हातात हात घातलेली रांग होती बाहेर अत्यंत सुरेख लँडस्केप आहेत जणू काही आपण पण एखाद्या चित्रात वावरतो आहोत असं वाटायला लागतं.मैलोमैल पसरलेले मोठमोठे हिरव्यागार शेतीचे पट्टे दिसतात , गायी ,मेंढ्या चरताना दिसतात आजुबाजूला एखादे माणूस सुद्धा दिसत नाही संपूर्ण निर्मनुष्य शांतता मोठमोठ्या शेतात गवताचे भारे प्लास्टिकमधे गुंडाळून ठेवलेले दिसतात अनेक ओंडके सुबक कापून ठेवलेले दिसतात पण माणूस मात्र तिथे कोठेच दिसत नाही इथला निसर्ग माणसांनी काबूत ठेवला आहे. कायम थंड आणि अतीथंड अशी असेच हवामान इथ असते . काटक पहाडी माणसांचा अतिशय सुबत्ता असलेला हा देश आहे या देशाचे सौंदर्य खुप नीटनेटके आणि अस्पर्श आहे जणू काही निसर्गाने रेखाटलेले एखादे सुरेख चित्र...