नेदरलँड
बेल्जियम नंतर आंम्ही निघालो नेदरलँड कडे ..ब्रुसेल्सचा शेजारी असणारा हा देश खुप देखणा आहे .याला हॉलंड पण म्हणतात ट्युलिपचा देश ..विन्सेंट चा देश . सायकलचा देश ...!!नेदरलँड आणि सायकल म्हणजे एकअजोड’ साथ आहे . अगदी फेविकॉल जोड सारखी 😀
तशी सायकल चालवायची पद्धत सगळ्याच युरोपीयन देशात आहे . प्रदूषण कमी होतं म्हणून इथं खूपजण सायकल चालवतात .
सायकल घालवण्यात कमीपणा मानत नाहीत. चांगली शिकलेली उत्तम पगार असणारी माणसंही सूटबुट घालुन सायकल चालवतात .
कार असतात पण कार्समागे सायकली बांधुन , कार्सवरही सायकली रचुन फिरतात . प्रदूषण कमी व्हावं म्हणून सरकार सायकलचा पुरस्कार करतं . महापौर पण सायकलने ऑफिसात जातात. रस्तेही तसेच चकाचक आणि मुलायम आहेत !!नेदरलँड मधली “सायकल फिरवण्यात मग्न पब्लिक बघण्यासारखी असते .
फॅमिलीज सायकलवर फिरायला निघतात. सायकलवर पुढे छोट्या बास्केटीत गुटगुटीत गोरी बाळं बसलेली असतात आणि आई किंवा बाबा सायकल चालवत असतात.
नेदरलँड मधे प्रवेश केल्या केल्या डेनहॅग गावात गेलो .युद्धात कामी आलेल्या जॉर्ज मदुरो नावाच्या सैनिकाचं स्मारक म्हणून मदुरोडॅम नावाची एक जागा उभारली आहे त्या सैनिकाच्या एकंदर कार्याविषयी पंधरा मिनिटाची एक छान फिल्म पण इथे दाखवली जाते
.इथे देशातील सगळ्या महत्वाच्या जागांची मिनीएचर्स (मोठ्या गोष्टी लहान रूपात)आहेत . सोबत नेदरलँचे खास असे शेतकऱ्याचे सुंदर लाकडी बूट आणि ट्यूलिप्सचेही बिगएचर्स ( बिगएचर म्हणजे लहान गोष्ट मोठ्या स्वरुपात दाखवणे )आहेत. “बनी” नावाची बाहुली पण आहे. ही जागा बघताना आपण “गलिव्हर “च्या दुनियेत आलोय असं वाटू लागत .
इमारतीच्या छपरावर हात फिरवता येत होता.सगळ्या महत्वाच्या जागा हात लावून पाहता येत होत्या .जणू काही हे ठेंगू लोकांचं जग आहे वाटत होतं .
इथे एक छानसा मॉल होता जिथे एक युरोपासून चांगल्या वस्तू मिळत होत्या .आम्ही पण एक युरोत ट्युलिप ची प्लास्टिक फुले .एक स्कार्फ काही किरकोळ खरेदी केली .
इथे एक सुंदर सुसज्ज कॉफी शॉप होते जिथे आत खुप जुनी चित्र काढलेल्या केबिन्स होत्या .ट्युलिप फुलांच्या डिझाईन ची टॉयलेट्स मात्र कमालीची देखणी होती .नेदरलँड हा व्हिन्सेंट व्हॅन गॉग सुंदर देश ...
त्याच्या चित्रातल्या पवनचक्क्याची आतुन आणि बाहेरून केलेल्या प्रतिकृती ट्यूलिपच्या गार्डनमधे पाहिल्या .
ट्यूलिप गार्डन म्हणजे रेखा अमिताभचे सिलसिला मधील ये कहा आ गये हम...हे रोमँटिक गाणे आठवत होते अनेक हिंदी चित्रपटातल्या गाण्यांचे इथे शुटींग झालेय.
ट्यूलिप हे फुल अतिशय सुंदर, नाजुक आणि देखणे असते . ट्यूलिपचे अनेक रंग आणि भरगच्च फुलांच्या रांगाच रांगा इथे होत्या त्यांच्या देखण्या रूपाने मन प्रफुल्लित होऊन गेले
दरवर्षी ट्यूलिपचा बहर केवळ २१ मार्च ते १९ मे पर्यंत असतो . जवळपास दोन महिने टिकणारे हे सौंदर्य,... त्यामुळे या ट्यूलिपवर सगळेजण फार प्रेम करतात .
”क्युकेनाहोफ “नावाचं हे ट्यूलिप गार्डन सरकार चालवतं आणि अत्यंत उत्तम रितीने प्रोफेशनल पद्धतीने चालवतं. हे गार्डन प्रचंड मोठे आहे. आतमध्ये ट्यूलिपच्या बागांसोबत सुरेख साकूरा , मोठमोठाली झाडं, विपींग विलोज, पाण्याचे निर्मळ प्रवाह , कारंजी फॉरेस्ट केबीन, बसायला राखलेल्या सुरेख जागा , दोन तीन माफक दर असलेली दुकाने आणि कॉफीशॉप्स आहेत .
एक दोन युरोपासून भरपूर वस्तू मिळतात. हे ट्यूलिप इतकं सुंदर फुल असूनइथे ते तोडायचा मोह कुणाला होत नाही. सगळीकडे काही पहारेकरी नाहीत.पण शिस्त आहे.
अगदी कुणी लहान मुले सुद्धा ही फुले तोडताना दिसत नाहीत
यानंतर एमस्टरडॅम या शहरात कॅनाल क्रूझमधून भ्रमंती केली. क्रुझ चे नाव पण लवर्स कॅनाल क्रुझ होते ..गंमत वाटली .या क्रुझ मधुन संपूर्ण अॅमस्टरडॅमला गोल चक्कर मारता येते .या क्रुझ मध्ये प्रत्येक टेबलला जोडलेल्या इअरफोन मधुन या भागाची सर्व माहिती सांगितली जाते .त्यात तुम्हाला इंग्रजी ,हिंदी ,अथवा इतर काही भाषांचे निवड स्वातंत्र्य होते .यात एकूण सहा भाषा होत्या .
वाटेत अॅनफ्रँक चे घर आहे, ज्या छोट्या मुलीने दुसऱ्या महायुद्धात घराबाहेर घडणाऱ्या घटना विषयी आपल्या डायरीत नोंदी केल्या होत्या ज्याच्यावर अनेक कादंबऱ्या लिहिल्या गेल्या आणि सिनेमे काढले गेले आहेत
विकेंड असल्याने सगळ्या शहरभर कॅनालच्या कडेने अनेक लोकं निवांत खात पित बसलेले दिसत होते . काहीजण किनाऱ्यावरच आपले कपडे काढून त्यांच्या छोट्या बोटीत बसत होती अशा दोन आणि चार माणसांच्या लहान लहान बोटी कॅनालमधे फिरत असतात.
अॅमस्टरडॅमला येऊन व्हिन्सेंट व्हॅन गॉग म्यूझियम आणि अॅनफ्रँक टूर प्रोग्रामच्या शेड्युल मुळे नाही बघता आले.----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------