युरोप पहाणे हे फार वर्षापासून पाहिलेले एक स्वप्न होते ..युरोप पहायचं ठरवल तेव्हा आधी त्या विषयी थोडे वाचून घेतले होते .युरोपला प्राचीन इतिहास आहे त्यामुळे इथल्या प्रत्येक गावात तुम्हाला जुन्या इमारती/राजवाडे पाहायला मिळतात .प्रत्येक गावात एक तरी म्युझियम असतेच .इथली प्राचीन संस्कृती आणि इतिहास याचे अत्यंत चांगल्या पद्धतीने जतन केलेलं पाहायला मिळते .लंडन .. आमची युरोप टूर सुरु झाली ती लंडन मधुन .लंडन पूर्वी पु ल च्या अपूर्वाई पुस्तकातून भेटले होते .तेव्हापासून लंडन पाहिले पाहिजे असे वाटायचे .मुंबई लंडन साडेनऊ तासाचा प्रवास ,तशात तेथील घड्याळ साडेचार तास मागे ..एवढे असुन सुद्धा थंड हवामाना मुळे थकवा अजिबात जाणवत नव्हता .लंडनला गेल्यागेल्या तिथल्या शिस्तबद्ध जीवनाचा लगेचच अनुभव आला .हिथ्रो एअरपोर्टवर इमिग्रेशन च्या भल्या मोठ्या रांगेत तासनतास उभे राहायला लागले .एअरपोर्ट वर अतिशय शांतता होती .अनेक प्रकारची अनेक देशातील माणसे रांगेत होती पण कोणाचा अजिबात आवाज नव्हता .साहेबाच्या देशाची शिस्त कडक होती .नाहीतर आपल्याकडचे एअरपोर्ट आवाजाने नुसते गजबजलेले असतात जणू बाजारच भरलेत अवाढव्य हिथ्रो एअरपोर्ट बाहेर पडलो तेव्हा हवा एकदम स्वच्छ होती .एक सुखद गारवा हवेत होता .लंडनचे पहिले दर्शन अविस्मरणीय होते .हिथ्रो एअरपोर्ट जगातील सर्वात मोठे एअरपोर्ट आहे . इथे प्रत्येक मिनिटाला एक विमान टेक ऑफ घेते अथवा उतरत असते .त्यामुळे सतत आकाशात विमाने दिसत असतात .मागच्याच आठवड्यात इथे भरपूर पाउस व प्रचंड थंडी होती ,त्यामानाने तुम्ही लकी आहात असे टूर लीडर सांगत होता .आमच्या बस ड्रायवरने आमचे सामान रुबाबात आत ठेवले .इथे ड्रायवर ला “कॅप्टन” असे म्हणतात आणि मानाने वागवतात .नंतर युरोपात फिरताना कष्टांची कामं रूबाबात करणारी अनेक गोरी लोकं दिसली . इथं कष्टांची फार “किंमत” केली जाते. मनुष्यबळ कमी असल्याने इथं माणसाच्या कष्टांना महत्व आहे . बहुतेक बस ड्रायवर युरोपमधल्या आजूबाजूच्या उदा ..मोरक्को सैबेरिया अशा देशातून येत असतात. इथं मार्च ते जुन पर्यटकांचा सीझन असतो. तेवढ्यात ते पैसा कमावून मग आपापल्या देशात जातात. बसमधुन जाताना दिसणारी ती सुंदर चिमुकली देखणी घरं ,चित्रासारख्या इमारती , छोट्या बागा , सुरेख रस्ते देखण्या लाल बसेस आणि शहरभर तुफान फुललेला शुभ्र साकुरा सगळे सगळे मनमोहक वाटत होते .प्रत्येक घरात फायरप्लेस असल्याने त्याची धुराडी प्रत्येक घरावर पाहायला मिळत होती .घरासमोर लटकलेल्या कुंड्यातून रंगीत झाडे लावली होती .चार मजल्याच्या वर कोणतीही घरे नव्हती .घरांना लिफ्ट नसल्याने काही सामान आत न्यायचे असेल तर प्रत्येक घरावर एक हुक होते .सामान त्या हुकद्वारे खिडकीतून आत घ्यायचे .इतकी छान घरे पण माणसे अथवा कपडे घराबाहेर अजिबात दिसत नव्हते पहिल्या आणि दुसर्या महायुद्धात ज्यांनी आपले आयुष्य पणाला लावले त्यांची स्मारके बसमधुन पाहायला मिळाली .अनेक सरकारी इमारती असलेल्या भागात ही स्मारके होती . त्या स्मारकापाशी रस्त्याच्या कडेला असंख्य पुष्प गुच्छ ठेवलेले होते . नंतर लागलीच लंडन आय पाहायला गेलो . अतिशय भारी प्रकार आहे हा ! एका प्रचंड गोल चक्रातील भल्या मोठ्या क्युबिक मध्ये बसुन आपल्याला संपूर्ण लंडन शहराचे विहंगम दर्शन होते . या गोल चक्राला वेग नसतो त्यामुळे भिती वाटत नाही. अत्यंत मंद गतीने तुम्ही अफाट उंचीवर जाता आणि लंडन पहाता. यानंतर या लंडन आय निर्मितीचा एक दहा मिनिटाचा फोर डी चष्मा घालून पहायचा शो पण दाखवला जातो .खुप रोमांचक शो असतो हा .!थेम्स नदीच्या तीरावर असलेले बिग बेन नावाचे घड्याळ पाहिले .हॉटेलमध्ये पोचत होतो तेव्हा भुरभुरू पाउस पडत होता .हॉटेल मध्ये सगळीकडे शेकायला शेगड्या होत्या ज्याला फायरप्लेस म्हणतात .संध्याकाळी जेवायला चला असे गाईड म्हणाला तेव्हा बघितले तर घड्याळात आठ वाजले होते .अतिशय भक्क उजेड अजूनही होता .युरोपमध्ये दिवस सकाळी साडेचारला उगवतो व रात्री दहापर्यंत चांगला उजेड असतो .दुसऱ्या दिवशी लंडन फिरताना या शहरात जगणे कसे प्रचंड महाग आहे आणि कौटुंबिक आयुष्य कसे विस्कटलेले आहे हे आमच्या गाईड कडून समजले .लंडनच्या मुख्य रस्त्यावर भारतीय वकिलातीवर आपला तिरंगा फडकत होता. गाईड म्हणाली बघून ठेवा ही तुमचा फ्लॅग असलेली इमारत, पासपोर्ट हरवला तर इथंच यायचंय. गाईड सोबत ट्रॅफल्गार स्क्वेअर, लंडन ब्रीज/टॉवरब्रीज बघितले . बकींगहॅम पॅलेसमधला चेंजिंग ऑफ गार्डस सेरिमनी पाहिला.अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात दररोज हा सेरेमनी साजरा केला जातो .देश विदेशातून आलेल्या असंख्य पर्यटकांनी परिसर भरून गेलेला असतो पिकॅडली सर्कस , अल्बर्ट हॉल , हाईड पार्क हे सारे बस मधुन पाहिले रस्त्यात मोठमोठी अवाढव्य स्टोअर्स हॅरोडस/ सेल्फ्रीजेस डोळे थक्क करणारी होती .लंडन हे जगातील आर्थिक व सांस्कृतिक गोष्टींचे एक महत्वाचे केंद्र आहे .यानंतर जगप्रसिध्ध मादाम तुसाद हे मेणाच्या पुतळ्यांचे म्युझियम पाहायला गेलो .पर्यटकांच्या प्रचंड गर्दीत जमेल तसे या सेलेब्रेटी सोबत फोटो काढुन घेतले .देश विदेशातील सुप्रसिद्ध असे असंख्य लोक येथे मेणाच्या पुतळ्याच्या रुपात उभे आहेत .शिवाय एका छोट्या रेल मधुन इंग्लंडच्या जुन्या इतिहासाचा प्रवास पण घडवला जातो. मादाम तुसाद म्युसियम पाहून बाहेर पडलोआणि समजले की पुढच्याच चौकात शेरलॉक होम्सचा पुतळा आहे .माझ्या आवडत्या रहस्य कथांचा हा नायक..त्याच्या कथांची कॉलेज जीवनापासून अनेक वेळा पारायणे केलीतसर ऑर्थोर कानन डायल यांच्या लेखणीतून उतरलेल्या कथांचा हा नायक शेरलॉक होम्स हा एक डिटेक्टिव्ह होताया कथा लेखकाने 1887 ते 1927 दरम्यान लिहिल्या होत्या पण त्या अजूनही ताज्या वाटतातत्याने एकंदर ५६ च्या आसपास लघुकथा लिहिल्या शिवाय दोन तीन कादंबऱ्या पण . लिहिल्या आहेत.ज्यात शेरलॉक होम्स या प्रायवेट डिटेक्टिवच्या बुद्धिचातुर्याच्या कथा आहेत .या कथा होम्सचे मित्र डॉक्टर जॉन वाटसन यांच्या तोंडुन सांगितल्या जातात .या घराची मालकीण मिसेस हडसन यांचाही या कथेत उल्लेख असतो .होम्स ही व्यक्तिरेखा या कथा द्वारा इतकी सजीव केली गेली होतीकी कित्येक वर्षे लोकांना वाटत होते की अशा नावाची एक जिवंत व्यक्ती आहे .हे काल्पनिक पात्र आहे हे जेव्हा सर्वाना समजले तेव्हा सर्व थक्क झाले .अतिशय बुद्धिमान ,चतुर आणि छोट्या छोट्या गोष्टीत रहस्य हुडकून काढणारा हा डिटेक्टिवआपल्या चिरूट व एका विशिष्ट टोपी द्वारा ओळखला जात असे .एलेमेंटरी डॉक्टर वाटसन ...ही त्याच्या वाक्याची सुरवात असे .अनेक रहस्यांचा खुबीने पर्दाफार्श करणारा हा डिटेक्टिव सर्व जगात लोकप्रिय झाला .जवळच शेरलॉक होम्स म्युझियम पण आहे .आमच्या लंडन च्या दुसऱ्या दिवसाच्या मुक्कामात चक्क सूर्यदर्शन झाले .इथे कायम थंडी व भुरभूर पाउस चालूच असतो त्यामुळे सूर्यदर्शन झाले की इथल्या लोकांना खुप आनंद होतो .त्याची मजा घेण्यासाठी लोक घरातून चौकाचौकात येऊन गप्पा मारत अथवा निवांत लंच घेत बसतात .या सुंदर शहराची ही दोन दिवसाची भेट अगदीच चुटपूटती वाटली .खरेतर अजून फिरायला हवे किंबहुना इथे राहायलाच हवे असे वाटले .पण लंडन मधुन निघताना पाय जड झाले होते अतिशय देखण्या, शांत शहराच्या प्रेमात पडायला झाले होते यानंतर ताबडतोब युरोस्टार रेल्वे गाठून आमचे प्रस्थान पॅरिसला व्हायचे होते .--------------------------------------------------------------------------------------------------------------------------