Saau - Unspoken Emotions in Marathi Love Stories by Arjun Sutar books and stories PDF | साऊ

Featured Books
Categories
Share

साऊ

सायंकाळच्या त्या शांत ऑफिसमध्ये, लॅपटॉपच्या स्क्रीनवर माझी नजर स्थिर होती. मी केबिनमधून बाहेर डोकावले, तर बाहेर पावसाच्या सरी कोसळू लागल्या होत्या. रस्त्यावरची वाहतूक संथ झाली होती. क्लायंट मीटिंगसाठी अजून एक तास शिल्लक होता. तोपर्यंत मेसेजेस चेक करावेत, या विचाराने मी मोबाइल उघडला..

"2002-2003 Batch Reunion WhatsApp ग्रुप!"
एक क्षणभर डोळ्यांवर विश्वासच बसला नाही—2002-2003 बॅचचा गेट-टुगेदर! अखेर तो दिवस उजाडला... ज्या दिवसाची मी कित्येक वर्षांपासून वाट पाहत होते. किती दिवस, किती आठवडे, किती वर्षं... आणि अखेर आज हा मेसेज!

जुन्या आठवणींनी मनाचा ताबा घेतला—अनामिका, अभिलाषा आणि मी... आमची घट्ट मैत्री... आणि त्या एका व्यक्तीमुळे आयुष्यात आलेलं वादळ.

ज्युनियर कॉलेजमधली ती दोन वर्षं, पुण्यातली चार वर्षं त्या काळात किती काही घडलं! काही नाती घट्ट झाली, काही नकळत सैलावली.

मी नकळत ड्रॉवर उघडला. तिथे एका जुन्या ग्रीटिंग कार्डवर नजर पडली. हळुवार बोटांनी ते उचललं, आणि मनाच्या गाभ्यात लपलेल्या आठवणी जाग्या झाल्या. डोळ्यांच्या कडा ओलावल्या.

खिडकीबाहेर आकाश काळ्या ढगांनी भरून गेलं होतं. वीजा चमकत होत्या. माझ्या मनातही विचारांचं वादळ उठलं होतं.

प्रत्येकाच्या जीवनात विलक्षण असे रहस्य असतात, पण प्रत्येकाला ते सांगायला जमतं असं नाही. काही गोष्टी खूप नैसर्गिक असल्या तरी कधी कधी आपली जीभ अडखळते. आणि आज... आज मला ती व्यक्त करावी असं वाटत आहे.

मी डोळे मिटले, आणि भूतकाळाच्या दारातून आठवणींच्या गर्तेत हरवून गेले...

त्या दिवसांमध्ये... जिथे साऊ नावाची एक मुलगी जगण्याशी झुंज देत होती.

देवाने एवढ्या कष्टाचं बालपण का दिलं, हा प्रश्न सारखा मनात यायचा. आम्ही तिघं भावंडं—मी सर्वांत मोठी, माझ्या खालोखाल माझी बहीण आणि नंतर आमचा छोटा भाऊ. आमचं संपूर्ण कुटुंब शेतीवर अवलंबून होतं, तीही कोरडवाहू.

घरात फारशी हौस-मौज नव्हती. जगण्यासाठी जे आवश्यक होतं, तेवढंच मिळायचं. पण कधी कधी मनात यायचं—आमच्याही घरी सणासुदीला नव्या कपड्यांची गोडी असती तर? बाहेर फिरायला जाणं, खाऊ घेणं, याही छोट्या गोष्टी स्वप्न वाटायच्या. मी मोठी होते, म्हणून बहिणीच्या आणि भावाच्या स्वप्नांमध्ये माझी स्वप्नं विरून गेली होती.

आई-बाबा सकाळीच शेतात निघून जायचे. घरी परत यायचे तेव्हा दोघंही पाय ओढत चालायचे. मी शाळेतून आल्यावर स्वयंपाक, घरकाम, आणि लहान भावंडांची जबाबदारी माझ्यावर असायची. अभ्यासाला पण खूप कमी वेळ मिळायचा, पण याची पण आता एक सवय झाली होती.

शाळेत मात्र मी वेगळीच असायचे. गणिताचे पाढे असोत किंवा कविता, मला अगदी तोंडपाठ असायच्या. वर्गात फक्त एकदा ऐकलं तरी विषय लगेच समजायचा. त्यामुळे शाळेतील शिक्षक माझे कौतुक करायचे. ते म्हणायचे, "ही मुलगी मोठं नाव कमावणार!" त्यांच्या शब्दांमध्ये आशेचा एक किरण असे, पण तो किरण घरच्या गरिबीच्या डोहात किती वेळ टिकणार, याचा विचार करता मनात एक भीती असायची. गरिबीमुळे मला पुढे शिक्षण घेण्यासाठी संधी मिळते की नाही, याची शंका होती

दहावीच्या परीक्षेचं वर्ष सुरू झालं, तेव्हा बाबा जरा जास्तच शांत राहू लागले. संध्याकाळी आईशी हळू आवाजात बोलताना म्हणाले, ""यंदा पीक पण कमी आले आहे आणि खतं, बी-बियाण्यांचे पैसे भरायचेत. शिवाय हिच्या शिक्षणाचा खर्च..."

त्या रात्री, चंद्रप्रकाशात अंगणात झोपताना त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले काळजीचे सावट मला स्पष्टपणे दिसून आले. पण आईच्या मनात वेगळंच गणित होतं. ती म्हणाली, "हिला शिकवून काय उपयोग? लग्न ठरवूया. निदान एक जबाबदारी कमी होईल."

ते ऐकताच माझ्या डोळ्यांसमोर अंधारच आला.

माझ्या स्वप्नांचं काय? मला शिकायचं होतं, मोठं व्हायचं होतं. पण त्या रात्री मी काहीच बोलू शकले नाही.

"देवा, स्त्रीचा जन्म दिलास, तर निदान गरीब घरात तरी जन्माला घालू नको रे!"

बाबांनी मात्र काही न बोलता आकाशाकडे पाहिलं आणि अंगणातल्या अंधारात हरवून गेले...

बघता बघता दहावीचे पेपर जवळ येऊ लागले. विजेचं बिल बरेच दिवस भरलेलं नव्हतं, त्यामुळे घरात एक गडद अंधार असायचा. रॉकेलच्या दिव्यावर माझा अभ्यास सुरू होता. अंधाराच्या त्या कोपऱ्यात प्रकाश शोधताना मी खूप थकले होते पण एक दिवस बाबांनी मला जवळच्या मंदिरात घेऊन गेले आणि म्हणाले, "इथे बसून अभ्यास कर. इथे उजेड तरी आहे."

मी अभ्यास करत असताना ते तिथेच बसून राहायचे. कदाचित देवाकडे प्रार्थना करत असतील—"निदान या लक्ष्मीच्या रूपाने तरी प्रसन्न हो," अशी त्यांच्या मनाची इच्छा असावी.

दहावीचे पेपर जसजसे जवळ येऊ लागले, तसतसं मी जास्तीत जास्त वेळ अभ्यास करू लागले. हे सर्व बघून आईला माझ्याबद्दल अभिमान वाटला. तिने माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि हळुवार आवाजात म्हणाली, "घरची कामं मी पाहते, तू फक्त अभ्यासावर लक्ष दे." तिच्या या शब्दांत माया होतीच, पण त्याहूनही जास्त तिची माझ्याविषयी असलेली काळजी स्पष्ट जाणवत होती.

एक दिवस, जेवण झाल्यावर मी उरलेलं आवरत असताना सहज माझी नजर भाताच्या भांड्याकडे गेली. तिथे फक्त काही मोजक्या भाताच्या शीताच उरल्या होत्या. आणि अजून आईने जेवणही केलं नव्हतं! हे पाहून माझं मन प्रचंड अस्वस्थ झालं.. परिस्थिती कठीण होती, पण त्या अंधारात कुटुंबाच्या पाठीशी उभं राहणं आवश्यक होतं.

तरीही मी माझ्या अभ्यासावरून लक्ष विचलित होऊ दिलं नाही.

मी माझी पूर्ण शक्ती पणाला लावली, अभ्यास केला आणि परीक्षेला सामोरी गेले. पेपर झाल्यानंतर आता प्रतीक्षा होती फक्त निकालाची.
निकालाच्या दिवशी बाबा अंगणात काही तरी काम करत बसले होते. तेवढ्यात शेजारचा गणू पळत पळत बाबांकडे आला आणि म्हणाला, "साऊचं नाव बोर्डवर लिहिलं आहे, चौकातल्या बोर्डवर!"
हे ऐकून बाबांनी हातातलं काम बाजूला ठेवलं आणि आनंदाने हाक मारली, "साखर घेऊन ये!"

मी पण निकाल बघण्यासाठी शाळेला जाण्याच्या तयारीत होते, पण आईने सांगितलं की घरात साखर संपली आहे. मग मी गुळाचा खडा गणूच्या हातावर ठेवला आणि बाबा आणि मी शाळेच्या दिशेनं निघालो.

"मी आमच्या शाळेमध्ये दुसरी आले होते, फक्त चार मार्कांनी पहिला नंबर हुकला होता."
आमच्या शिक्षकांनी माझं खूप भरभरून कौतुक केलं त्या दिवशी.

बाबा घरी येताना पावशेर साखर घेऊन आले आणि शेजाऱ्यांमध्ये वाटू लागले.
पण त्या रात्री माने सर पेढ्यांचा बॉक्स घेऊन घरी आले. खरं तर, ते देवदूताच्या रूपाने आले होते!

घरी पेढ्यांचा बॉक्स दिला आणि माझं भरभरून कौतुक केलं. मग त्यांनी बाबांना विचारलं,

"पुढे काय करण्याचा विचार आहे?"

या प्रश्नावर बाबा काहीच बोलू शकले नाहीत. ते अगदी निरुत्तर झाले.

आई म्हणाली, "पुढे शिकवायची ऐपत नाही आमची, सर. बघू, दोन वर्षांनी एखादं चांगलं स्थळ मिळालं तर तिचे हात पिवळे करून देऊ या."

सर त्यावर हसत म्हणाले, "साऊ अभ्यासात हुशार आहे. तिच्या लग्नाचा विचार अजून नका करू. परिस्थिती कायम अशीच राहत नाही, हेही दिवस जातील. तिला शिकवा!"

मग ते पुढे म्हणाले, "आमच्या ओळखीचे एक सर आहेत, दहा किलोमीटरवर असलेल्या ज्युनियर कॉलेजमध्ये. मी त्यांच्याशी बोलेन. साऊ गरीब आहे, पण गुणवंत आहे—तिला नक्की शिष्यवृत्ती मिळेल. विज्ञान शाखेत प्रवेश मिळेल. आणि बघा, उद्या ती डॉक्टर, इंजिनीअर किंवा एखाद्या कॉलेजमध्ये प्रोफेसर होईल!"

त्या दिवशी माने सर आमच्या घरी आले आणि माझ्या जीवनाला नवसंजीवनी देऊन गेले.

पण त्यानंतर माझ्या डोक्यात वेगळेच विचार सुरू झाले.
"कॉलेजला जायचं म्हणजे बाहेर गावी जावं लागणार… नवीन मुली-मुले असतील… एक वेगळं जग असेल… कसं जमेल हे सगळं?"

माने सर यांच्या मदतीने मला कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला आणि माझं कॉलेज जीवन सुरू झालं.

कॉलेजची भव्य इमारत पाहून, तिथले शिक्षक आणि एवढे सगळे मुलं-मुली बघून मी थोडीशी भांबावले. मनात धडधडही होती—हे नवं जग माझ्यासाठी आहे का? पण एक गोष्ट चांगली वाटली—सगळ्यांसाठी एकसारखा ड्रेसकोड होता!
माझ्याकडे मोजकेच ड्रेस होते. ते किती दिवस पुरतील? उगाच नवीन ड्रेस घ्यायचा म्हटलं तर खर्चही वाढला असता आमचा

आयुष्यात अशी संधी पुन्हा मिळणार नाही!" या विचाराने मी कॉलेजमध्ये पूर्ण लक्ष देऊन शिकायचं ठरवलं. सर आणि मॅडम जे शिकवत, ते मी काळजीपूर्वक ऐकत होते.  बघता बघता सहा महिने कधी निघून गेले, ते समजलंच नाही.

माझ्या परिस्थितीमुळे माझ्यावर एक वेगळंच दडपण होतं. बाकीच्या मुलींकडे पाहून कधी कधी हेवा वाटायचा. त्या खूप बिनधास्त असायच्या—नवनवीन हेअरबँड, हातात घड्याळ, काहींनी नखांना विविध रंगाचे नेलपेंट लावलेले. काही मुली तर गाडी घेऊन कॉलेजला यायच्या. त्यांच्या डब्यांमध्ये रुचकर पदार्थ असायचे, आणि माझा साधा डबा उघडताना मला लाजल्यासारखं वाटायचं. त्यामुळे मी फार कोणाशी बोलत नसे.

एक दिवस अनामिकाने मला भौतिकशास्त्राच्या नोट्स आहेत का असं विचारलं. ती दोन दिवस आली नव्हती, म्हणून नोट्ससाठी तिने मला विचारलं. मी वेळेवर अभ्यास पूर्ण करायचे, त्यामुळे माझ्या नोट्स सुद्धा पूर्ण असायच्या नेहमी. मी तिला वही दिली. शेवटच्या पानावर माझी कविता होती. ती पाहून तिने विचारलं, "अगं, तुला कविता खूप आवडतात वाटतं?"

त्या कवितेच्या निमित्ताने आमचं बोलणं वाढलं. हळूहळू आम्ही चांगल्या मैत्रिणी झालो. अनामिकासोबत तिची अजून एक मैत्रीण होती—अभिलाषा.
अनामिका आणि अभिलाषा एकाच ठिकाणी राहायच्या, त्यामुळे त्या दोघी नेहमी एकत्र यायच्या कॉलेजला.
अभिलाषा म्हणजे जणू काही राजकन्या! सुंदर, मोहक रूप आणि घरच्या श्रीमंतीमुळे तिचं व्यक्तिमत्त्व खूप आकर्षक वाटायचं. ती खूप बोलकी होती, पण कधी कधी तिच्या बोलण्यातून मोठेपणाचा अभिमान जाणवायचा. लहानपणापासून ती ऐश्वर्यसंपन्न वातावरणात वाढली होती. तिच्या घरी घरकामासाठी माणसं आहेत, असं मी ऐकले होते

अनामिकेमुळे माझी अभिलाषासोबतही चांगली मैत्री झाली. 

मी कॉलेजला लागल्यापासून बाबांनी जवळच्या एका कारखान्यात काम शोधलं होतं. महिन्याला पगार घरी येत असल्याने घराचा खर्च सुरळीत चालू होता. आईही बाहेर कामाला जायची, त्यामुळे तिचाही हातभार लागत असे. सगळं सुरळीत सुरू होतं. माझं कॉलेज संपेपर्यंत हे असंच सुरू राहावं, अशी मनोमन प्रार्थना करत होते.

एक दिवस, दुपारच्या सुट्टीत आम्ही जेवत होतो. तेव्हा अभिलाषा एका मुलासोबत बोलताना दिसली.
अनामिकाने मला सांगितलं, "त्यांची जुनी ओळख आहे, काही नवीन नाही."
दिसायला तो अगदी राजकुमारासारखा होता. त्याचं नाव मी खूप मुलींच्या तोंडून ऐकलं होतं, पण कधी त्याच्याकडे लक्ष दिलं नव्हतं. त्याला बायोलॉजीच्या प्रॅक्टिकलसाठी काही डायग्राम्स पाहिजे होते.
त्यावेळी अभिलाषाने माझं नाव घेतलं आणि म्हणाली, "साऊचं जर्नल घेऊन जा, तिचे डायग्राम्स खूप छान आहेत."
"अभि" सोबत झालेला माझा पहिला संवाद.
दोन दिवसांनी तो परत आला आणि त्याने माझ्या सुंदर हस्ताक्षराचं कौतुक केलं. विशेष म्हणजे, त्याने खास सांगितलं की त्याला जर्नलमध्ये कुठेही खाडाखोड दिसली नाही.
त्याचे हे शब्द ऐकून मला खूप आनंद झाला. मनापासून केलेले कौतुक तर प्रत्येकालाच आवडते.

मकर संक्रांतीला सगळ्या मुलींनी पारंपरिक वेषभूषा करण्याचं ठरवलं होतं. पण मला मात्र त्याचं प्रचंड टेन्शन आलं होतं.

आता हे सगळं करायचं म्हणजे एक छानशी साडी हवी, गळ्यात काहीतरी हवं, हातात बांगड्या हव्यात... आणि या सगळ्यातलं माझ्याकडे काहीच नव्हतं, जे मी अभिमानाने मिरवू शकले असते!

अनामिका आणि अभिलाषाने माझ्या चेहऱ्यावरचं टेन्शन अचूक ओळखलं. त्या दोघी मला घरी घेऊन गेल्या आणि माझ्यासमोर साडी आणि सुंदर इमिटेशनचे दागिने ठेवले.

त्या दिवशी जेव्हा मी आरशात पाहिलं, तेव्हा अक्षरशः विश्वासच बसला नाही—"मी एवढी सुंदर दिसते?

सावळ्या मुलीही एवढ्या सुंदर असू शकतात याची मला पहिल्यांदा जाणीव झाली. उगाच मी इतके दिवस स्वतःला कोसत होते. सौंदर्य हे गोरे किंवा सावळे असण्यावर ठरत नाहीच—ते तर बघणाऱ्याच्या नजरेत असतं. अनामिका आणि अभिलाषाने माझं ते नवीन रूप पाहून अगदी भरभरून कौतुक केलं.

खरं तर, घरच्या अडचणींमुळे शृंगार किंवा नवीन कपडे घालणं माझ्या वाट्याला कधीच आलं नव्हतं. पण अभिलाषामुळे मला एक नवीन रूप मिळालं. माझ्या स्वतःच्या सौंदर्याची जाणीव झाली.
संक्रांतीच्या दिवशी सगळ्या मुली राजकन्यांसारख्या वाटत होत्या. त्या दिवशी जीवनाचे अनेक रंग असतात, याची मला जाणीव झाली. आम्ही एकमेकींना तिळगूळ देऊन छान गप्पा मारत होतो.
अन् समोरून "अभि" येताना दिसला. मी पण अभिला तिळगूळ द्यावे या विचाराने त्याच्याकडेच बघत होते. पण तो आला आणि अभिलाषासोबत थोडा वेळ बोलून, तिळगूळ देऊन निघून गेला. त्याने आमच्याकडे बघितलेसुद्धा नाही, आणि नेमके तो अभिलाषासोबत काय बोलला, हे पण समजले नाही.

त्याचं ते वागणं आणि दुर्लक्ष करणं खूप खटकले होते.
मी कधीही असा विचार केला नव्हता, पण त्या दिवशी त्याने केलेलं दुर्लक्ष मला खूप अस्वस्थ करून गेलं. जणू काही त्याने हे सगळं मुद्दामच केलंय की काय, असंही वाटू लागलं..

त्या दिवशी माझ्या मनाला एक गुपित समजलं—"स्त्रियांना पाठीमागे लागणारे पुरुष कधीच आवडत नाहीत. अशा पुरुषांकडे त्या पाठ फिरवतात."

त्याने केलेल्या दुर्लक्षामुळे आणि त्याच्या अशा वागण्यामुळे मी दिवसभर त्याचाच विचार करत राहिले.

त्यावेळी मला असंही वाटलं की जावं त्याच्या जवळ, त्याला तिळगूळ द्यावा आणि परत त्याच्याकडे जाऊन विचारावं.

पण मी स्वतःला रोखलं. माझ्यातील स्वाभिमानच मला थांबवत होता, असं वाटू लागलं.

संद्याकाळी घरी पोहोचल्यावर त्याचे विचार माझ्या डोक्यातून निघून गेले होते.

बाबांनी मला सांगितलं, "साऊ, हे तुझे महत्वाचे वर्ष आहे. माने सर भेटले होते मला गावात. तुला चांगले मार्क्स मिळाले, तर शहरातील मोठ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊया. बँक, शिक्षणासाठी कमी व्याजाने कर्ज देते असं ते म्हणाले."

"बाळा, आजपर्यंत शेतीसाठी खूप कर्ज घेतलं, पण तुझ्या शिक्षणासाठी नक्कीच मी प्रयत्न करेन. तुझे जास्त लाड करू शकलो नाही, राजकन्येसारखं सुख देऊ शकलो नाही, पण तू शिकून मोठी व्हावी, हीच माझी मनापासूनची इच्छा आहे."

बाबांचा हा शब्द ऐकून, मला माझ्या जबाबदारीची आणि परिस्थितीची जाणीव झाली. आणि मी पुन्हा जोमाने अभ्यासाला लागले.

त्यावेळी मला अभिलाषा आणि अनामिका यांनी खूप मदत केली होती . त्या दोघींनी मला वेगवेगळ्या प्रकाशनांची पुस्तके आणि नोट्स दिली, अभ्यासासाठी. अनामिका तर दुपारच्या जेवणाचा डब्बा देखील घेऊन यायची. अभिलाषा मला खूप वेळा बसचा पास काढण्यासाठी पैसे दिले. त्यावेळी कधी कधी असं वाटतं की त्यांच्या मदतीच्या ओझ्याखाली मी दबून जात होते.

संक्रांतीच्या त्या दिवसांनंतर मी ठरवलं होतं की "अभि" सोबत बोलायचं नाही. पण तो प्रॅक्टिकलसाठी नेहमी माझ्या जवळ असायचा आणि वारंवार दिसायचा. अधूनमधून माझ्याकडे बघून हसायचा आणि निघून जायचा.

मला काहीच समजत नव्हतं—"अभि" कधी ओळख दाखवतो, तर कधी नाही.

तरीही, तो माझ्या आसपास असला की, मनात रोमांच उठायचे. अभि, खरं तर अभिलाषाचा खूप जवळचा मित्र होता. पण त्यांचं नातं त्यापलीकडे आहे का? हा विचार वारंवार मनात येत होता.

कसंही असलं तरी, मी "अभि" कडे आकर्षित झाले होते, हे नक्की.

पण लगेचच बाबांचे शब्द आणि घरची परिस्थिती डोळ्यासमोर यायची.

मनावर नियंत्रण ठेवत, मी सगळं लक्ष अभ्यासाकडे केंद्रित केलं.

या वर्षी कॉलेजमधील शिक्षकांचीही माझ्याकडून मोठी अपेक्षा होती, असं त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं.

बोर्डच्या परीक्षेची तयारी सुरू झाली आणि कॉलेजमध्ये अतिरिक्त तास सुरु झाले. त्यावेळी, मी अनेक वेळा अभिलाषा आणि अनामिकेच्या घरी थांबत होतो. त्या दोघींनी खूप मदत केली होती.

शेवटच्या तीन महिन्यात वेळ कसा निघून गेला, ते समजलंच नाही. आणि मग परीक्षेची तारीख आली.

आई आणि बाबांनी मला अभ्यासात कसलाही त्रास होऊ नये म्हणून मला घरी कसलेही काम करू द्यायचे नाहीत.

माझा अभ्यास चांगला झाला होता, आणि मला परीक्षा सोपी गेली. अनामिकालाही पेपर सोपे गेले.

पण अभिलाषासाठी घरच्यांनी आधीच ठरवलं होतं की, पेपर कसेही गेले तरी तिचे बाबा पुण्यातील एका चांगल्या कॉलेजमध्ये तिचं ऍडमिशन घेणार आहेत. त्यामुळे ती निवांत होती. काही पेपर तिचे सोपे गेले होते, आणि तशी ती हुशारही होती, पण अभ्यासात फारसं लक्ष घालत नसे.

निकालाचा दिवस आला आणि आम्ही सगळेच त्याची आतुरतेने वाट पाहत होतो. मला बारावीच्या बोर्ड परीक्षेमध्ये चांगले गुण मिळाले आणि त्यामुळे पुण्यातील एका नामांकित कॉलेजमध्ये मला प्रवेश मिळाला. त्यावेळी कॉलेजमधील सर आणि आमच्या गावातील माने सर यांनी मला मार्गदर्शन केले.

आता मी आणि अभिलाषा पुण्यात एकत्र होतो, पण अनामिका थोड्या लांबच्या कॉलेजमध्ये गेली होती. ती कधी कधी शनिवारी आणि रविवारी पुण्यात येत असे.

अभि पण पुण्यातील एका कॉलेजमध्ये होता. आणि अभिलाषामुळे तो मला भेटत असे.
अभि माझा चांगला मित्र बनला. त्याचे कॉलेज माझ्या कॉलेजच्या जवळच होते, त्यामुळे तो अनेक वेळा भेटायला येत असे. कधी कधी उशीर झाला तरी, तो मला कॉलेजच्या गेटपर्यंत सोडायला येत असे. त्याचं बोलणं, माझी काळजी घेणं, आणि माझ्या अभ्यासाबद्दल कौतुक करणं, हे सगळं मला त्याच्याकडे आकर्षित करतंय असं वाटू लागलं.

या दिवसांमध्ये आमच्या मध्ये खूप चर्चा होत असत, कॉलेजविषयी आणि अभ्यासाविषयी. मी सतत त्याचाच विचार करू लागले होते. आणि तो मला परत कधी भेटेल असेही वाटायचं.

पण अभि ला तसेच वाटत असेल का? असा प्रश्न माझ्या मनात येत असे. मी त्याच्या प्रेमात आहे का? असं विचार मनात येऊ लागले होते.

त्यानंतर, मी त्याच्यासाठी एक ग्रीटिंग कार्ड बनवलं आणि एक कविता पण लिहिली. ती कविता वाचून, माझ्या मनातलं जे काही आहे, ते त्याला समजेल, या विचाराने मी त्याला ते ग्रीटिंग कार्ड देण्याचं ठरवलं.

खरे तर, मला अनामिकाला सर्व काही सांगावे असे वाटू लागले होते. ती मला समजून घेईल, माझ्या भावनांना आणि वेळप्रसंगी मला मार्गदर्शन सुद्धा करेल.
पण हेच जर अभिलाषाला सांगावे म्हटले तर, तशी ती तीन मानाने मोकळी आहे, पण फटकळ स्वभावाची. उगाच अभि ला जाऊन डायरेक्ट काही तरी बोलेल, याची भीती पण वाटायची.

रविवारी, अनामिका पुण्यात येणार होती आणि आम्ही सर्वांनी पु. ल. देशपांडे गार्डनमध्ये भेटायचं ठरवलं होतं. मी आणि अनामिका, आम्ही दोघी बागेत गेलो. तिथे आमचे कॉलेजचे जुने मित्र-मैत्रिणी आले होते. खूप दिवसांनी आम्ही इतक्या मोठ्या संख्येने आम्ही भेटलो होतो. पण अभि आणि अभिलाषा दिसले नाहीत.

माझ्या मनात विचार आला, "आज हे दोघं अजून का आले नाहीत? एक तास झाला आणि ते अजून आले नाहीत."

माझं लक्ष सतत गेटकडे लागलं होतं. नंतर, मला अभि आणि अभिलाषा एकत्र येताना दिसले. पण त्या दिवशी मला त्यांचा खूप राग आला. एक तर, मी अभि ला ग्रीटिंग कार्ड देणार होते आणि तो त्या अभिलाषा मुळे तो पण खूप उशिरा आला होता.

आणि जेव्हा ते जवळ आले, तर अभिलाषाच्या हातात एक लाल गुलाब होता...

तो बघताच क्षणी जणू काही आपल्या आभाळ खोसळावे तसे वाटू लागले.

म्हणजे, अभि आणि अभिलाषा हे फक्त चांगले मित्र नव्हते, तर त्यांचे प्रेम होते, हे मला का समजले नाही?

हे का माझ्या वेडीच्या लक्षात आले नाही? का मी या वाटेवर गेले? असे अनेक प्रश्न माझ्या डोक्यात घुमू लागले होते.

त्या क्षणी, मला त्या बागेतून निघून जावं असं वाटायला लागलं होतं. आयुष्यात मला पहिल्यांदाच कोणी आवडलं होतं, पण नेमकी तीच व्यक्ती दुसऱ्या कोणाची तरी आहे, ही भावना मला काही स्वस्त बसू देईना.

म्हणजे, अभि ने मला पुन्हा एकदा दुर्लक्षित केले आहे ? तो फक्त अभिलाषाची मैत्रीण आहे म्हणून माझ्यासोबत आहे का? असे अनेक प्रश्नांची वावटळ माझ्या मनामध्ये सुरू होती.

अनामिकाला माझा उतरलेला चेहरा पाहून आणि माझ्या अवस्थेची जाणीव झाल्यामुळे , तिने दोन वेळा विचारले, "काय झालं आहे, साऊ?" पण मी काहीच बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते..

संद्याकाळी घरी जाताना, अभि मला सोडायला येतो असे बोलला. पण मी रागाच्या भरात त्याच्यावर ओरडले.

त्याच्या नजरेत मी स्वतःला शोधत होते, पण तिथे तर अगोदरच अभिलाषा होती, असे मला वाटू लागले. त्याच रागामुळे मी विचारांनी आंधळी होऊन गेले आणि नको ते विचार माझ्या मनात डोकावू लागले.

"असे काय आहे त्या अभिलाषात जे माझ्यात नाही? मी हुशार आहे, मेहनती आहे. अभि तिच्या श्रीमंती आणि गोऱ्या रंगावर भाळला आहे का ?"

"मी दिसायला सावळी आहे, म्हणून त्याने माझ्याकडे दुर्लक्ष तर केले नसेल ना?" असे निरर्थक विचार माझ्या मनात येऊ लागले होते.

अभिलाषा माझ्या मैत्रिणीचा मला मत्सर वाटू लागला. फक्त सौंदर्यावर भाळून आपला जीव टाकणाऱ्या अभिचा देखील मला आता राग येऊ लागला.

त्यानंतर, मी खूप दिवस कोणालाही भेटले नाही. अशा वेळी, मला माझ्या घरच्यांची खूप आठवण येऊ लागली.

या सर्वांपासून मला लांब राहायचं होतं. अभिलाषासोबत तर मी बोलायचं देखील कमी केलं होतं.

अनामिका मात्र मला अधूनमधून कधी भेटायची. अभिलाषा आणि अभि दोघांना मी पूर्णपणे माझ्या आयुष्यातून काढून टाकलं होतं.

तो दिसला तरी, मी दुसऱ्या वाटेने जायचं. एक दोनदा त्याने माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण मी त्याला टाळलं.  अनामिकाला माझे बदललेले वागणे खटकले होते. पण घरच्यांचे कारण देऊन तिला काहीच सांगितले नाही.

बघता बघता चार वर्षे कशी निघून गेली, हे समजलेच नाही. कॉलेजच्या कॅम्पसमध्ये मला एका मोठ्या IT कंपनीत जॉब लागला.
घरच्यांचा आनंद तर गगनात मावेनासा झाला."आपल्या मुलीला मोठ्या कंपनीत नोकरी लागली आहे, ते पण मोठ्या पगाराची !"  आनंदाच्या भरात ते सर्वांना गावात सांगत होते.
पण त्या दिवशी, का कोणास ठाऊक, अनामिका आणि अभिलाषाची खूप आठवण येऊ लागली.
अकरावीत असताना गणितात मला पैकीच्या पैकी गुण मिळाले होते. त्यावेळी त्यांनी मला पार्टी दिली होती.
आज मात्र, माझ्या आनंदात सहभागी होण्यासाठी माझ्यासोबत कोणीच नव्हतं.
बाकीच्या कॉलेजमधील मैत्रिणींपेक्षा अनामिका आणि अभिलाषा माझ्यासाठी खास होत्या.
त्यांनी वेळोवेळी मला मदत केली, पण बदल्यात मी त्यांना काय दिलं?
कदाचित, जे काही मी पाहिलं, ते तसं नसेलही... मी चुकीच्या समजुतीला बळी पडले असेल?
का मी त्यावेळी त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलले?
कॉलेजचं शिक्षण पूर्ण झाल्यावर, बाहेरच्या लोकांसोबत राहून आणि काम करून माझे विचार प्रगल्भ झाले आणि हळूहळू मैत्रीचं महत्त्व जाणवू लागलं. आपल्याकडून काहीतरी चूक झाल्याचंही जाणीव झाली.
मी असे वागायला नको होते," या विचाराने माझ्या मनाला लाज वाटू लागली आणि स्वतःविषयी घृणा देखील वाटू लागली. ज्या पद्धतीने मी प्रेमात आंधळी होऊन वागले होते, त्याची मला शरम वाटू लागली आणि स्वतःची कीवही येऊ लागली.
मनुष्य किती स्वार्थी असतो! स्वतःच्या आनंदासाठी तो दुसऱ्यांच्या भावनांकडे दुर्लक्ष करतो, याची तीव्र जाणीव त्या क्षणी मला झाली.

"प्रेमभंग आणि अपेक्षाभंग होण्यापेक्षा ते न झालेलं चांगलं, असा विचार मनात येऊ लागला होता.
आणि यात अभि आणि अभिलाषाचा तरी काय दोष? त्यांना कुठे माहिती होतं की माझं अभिवर प्रेम आहे किंवा मी त्याच्याबद्दल तसं काही विचार करत आहे??

का मी असे वागले त्यांच्या सोबत? असे अनेक प्रश्न माझ्या डोक्यात घुमू लागले होते.
माझी खूप इच्छा होती सर्वांना भेटण्याची आणि सर्व काही सांगायचं होतं, पण कॉलेजनंतर सर्वजण आपल्या विश्वात आणि जबाबदारीत मग्न झाले होते.
काही दिवसांनंतर, मी एक दिवस ऑफिसमधून अनामिकाला ई-मेल टाकला आणि तिचा कॉन्टॅक्ट नंबर मागितला.
त्या दिवशी तर तिचा काहीच रिप्लाय आला नाही. मला वाटलं, ती पण विसरून गेली असेल.
दुसऱ्या दिवशी तिने तिचा नवीन मोबाइल नंबर आणि कंपनीचा पत्ता पाठवला.
तिला कसं सांगावं हे मला सुचत नव्हतं. दोन वर्षानंतर परत मी तिच्यासोबत बोलणार होतो, पण मी धीर करून तिला फोन केला आणि कंपनीसमोर भेटता येईल का, असं विचारलं.
अनामिकाने पुण्यात एका कंपनीत जॉब मिळवला होता. पण भेटल्यानंतर, जणू काही आमच्यात काहीच झालं नाही, असं दाखवून जवळच्या हॉटेलमध्ये नाश्त्यासाठी घेऊन गेली.

खूप वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्यावर, मी अभिलाषाचा विषय काढला.
त्यावेळी ती बोलली, " अभिलाषा तर उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला निघून गेली आहे” आणि अभि त्याचं काय झालं? बरेच दिवस त्याच्याविषयी काहीच समजले नाही.
अभिलाषा होती तोपर्यंत समजत होते, पण त्यांचा काहीच कॉन्टॅक्ट नाही. मला हे सर्व ऐकून अजूनच जास्त वाईट वाटलं आणि माझं अवसान निघून गेलं.
नंतर तिने आई आणि बाबांचा विषय काढला, मग परत मी काही जास्त अभिलाषाविषयी तिला विचारले नाही.
पण अनामिकाला भेटून मन थोडं हलकं झालं होतं. पण अजूनही मनात खंत होती की आपण अभि आणि अभिलाषा यांना भेटलो नाही, काहीच बोललो नाही.
अनामिका, अभिलाषा आणि अभि यांच्यापासून मला माफी मागावी असं वाटत होतं, पण कधी भेटणार हे सगळे परत.
मी माझ्या स्वार्थासाठी आणि प्रेमासाठी चुकीचे वागले असं मला वाटू लागलं होतं.
पण त्या दिवशी शेवटी मी अनामिकाला माझ्या मनात काय चाललं आहे, ते सगळं सांगितलं... आणि मनावरचं ओझं थोडं हलकं झाल्यासारखं वाटलं. अनामिका कॉलेजमधील पहिली मैत्रीण आहे. तिने मला समजून घेतलं आणि माझी समजूत काढू लागली.
तुझी चूक नाही. खरं तर तुला कुठे माहिती होतं? 'अभिलाषा आणि अभि' यांच्यात फक्त मैत्री आहे का, की त्यांचं नातं मैत्रीच्या पलीकडे आहे? त्या दिवशी ते दोघं एकत्र उशिरा आले, आणि अभिलाषाच्या हातात गुलाब बघून तू गैरसमज करून घेतला. जे काही झालं, ते नकळत आणि गैरसमजातून घडलं.
आणि रागाच्या भरात आपण कधी कधी असे वागतोच.

तुला तर अभिलाषाचा स्वभाव माहिती आहे ना? ती कोणत्याही गोष्टीचं टेन्शन घेत नाही. तिला समजलं, तर ती, मोठ्याने हसली असती आणि स्वतःच बोलली असती, 'आगोदर सांगायचं नाही का मला?' मी बोलले असते अभि ला."
अभि आणि अभिलाषा शाळेपासूनचे मित्र आणि मैत्रिणी आहेत. त्यांची मैत्री आहे की अजून काही, हे दोघं सांगू शकतात. पण त्यांचं मैत्री खूप घट्ट आहे, एवढं मात्र नक्की.
तिचे हे सर्व बोलणे ऐकून माझी मलाच लाज वाटू लागली

अनामिका: आता हे दोघं परत कधी एकत्र भेटतील, हे सांगणं कठीण आहे. बघूया, परत कोणी आपल्या बॅचचा गेट-टुगेदर घेतला तर.

त्यानंतर, आम्ही दोघी हॉटेलमधून निघालो आणि घरच्या दिशेने वाटचाल केली.

त्यानंतर मी किती तरी वर्षे अभि आणि अभिलाषाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण माझे सगळे प्रयत्न अयशस्वी झाले. नंतर मी पण प्रयत्न सोडून दिले होते त्या दिवसाची वाट पाहत होते.

अचानक, 'May I come in, madam?' हा आवाज दोन वेळा माझ्या कानावर पडला. भूतकाळाच्या आठवणीत हरवलेली मी दचकून भानावर आले. मागे वळून पाहिलं तर ऑफिसमधला सहकारी माझ्या केबिनसमोर उभा होता, क्लायंट मीटिंगसाठी बोलवायला आला होता. मी पटकन स्वतःला सावरलं आणि कॉन्फरन्स रूमकडे धाव घेतली. मीटिंग संपताच सर्वप्रथम अनामिकाला कॉल केला.

फोन उचलताच ती उत्साहाने म्हणाली, 'साऊ, व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप बघितलास का? तू ज्याची वाट बघत होतीस, तो दिवस अखेर आला आहे! पण अजून अभिलाषा आणि अभिचे काही मेसेज आलेले नाहीत. तरीही, आपल्याला गेट-टुगेदरला नक्की जायला हवं. कोण जाणे, कदाचित ते दोघं थेट तिथेच भेटतील!

मी बाहेर बघितलं, तर पाऊस थांबला होता आणि ट्रॅफिक कमी झालं होतं. पटकन ऑफिसचं बॅग घेतली आणि घरी निघाले, पण जाताना एकच विचार होता - मला गेट-टुगेदरला जावं लागेल.

शेवटी, मी आणि अनामिका दोघीही गेट-टुगेदरच्या ठिकाणी पोचलो, पण मला अभिलाषा कुठेच दिसली नाही.. तिचं लग्न झालं आहे का, ती भारतात परतली आहे का, याबद्दल काहीच समजलं नव्हतं. अनामिकाच्या बाबांची बदली झाल्यामुळे ती तिच्या घराजवळही राहत नव्हती. त्यामुळे तिलाही काहीच माहिती नव्हते तिच्याबद्दल.

निदान अभि तरी भेटेल, अशी आशा होती, पण तोही कुठे दिसेना. गेट-टुगेदरला सुरुवात होऊन एक तास झाला तरीही, माझं लक्ष दाराच्या दिशेने होतं. शेवटी, अभिने हॉलमध्ये प्रवेश केला, आणि मला थोडं समाधान वाटलं. पण अभिलाषा का आली नाही, याचं विचार मनात सुरू होतं. ग्रुपमधील काही मुलींना विचारल्यावर समजलं की, तिच्याशी संपर्क झाला नाही. ई-मेल पाठवला होता, पण तिचा काही रिप्लाय आलेला नाही.

मी खरे तर अभि सोबत बोलण्याची संधी शोधत होती. मला खूप काही बोलायचं होतं आणि सांगायचं होतं. पण त्याने फक्त माझ्याकडे एकदाच बघितलं आणि बाकी मित्रांसोबत बोलू लागला. शेवटी मी आणि अनामिका दोघेही अभि ला भेटण्यासाठी गेलो आणि त्याला विचारपूस केली. सर्व काही छान सुरू आहे, असं त्याने सांगितलं. तो आता मॅनेजर झाला आहे, पण घर आणि ऑफिस याच्यामुळे वेळ भेटत नाही. पण बोलताना त्याने कुठेच अभिलाषा चा विषय येऊ दिला नाही, आणि मला तो टाळण्याचा त्याचा प्रयत्न जाणवला.

त्यानंतर अनामिकाला काही तरी काम आल्यामुळे ती हॉल मध्ये निघून गेली, पण मी मात्र अभि सोबत तिथेच उभी होते. शेवटी मीच त्याला विचारलं, "अभिलाषा सोबत तुझा कॉन्टॅक्ट आहे का?" त्यावर त्याच्या चेहऱ्यावर एक नकारार्थी भाव उमठला.

त्या दिवशी मला खरं तर त्या ग्रीटिंग कार्ड आणि बागेत झालेल्या गैरसमजातून झालेल्या प्रसंगाबद्दल बोलायचं होतं, पण मी अभि कडे बघितलं, तर त्याच्या डोळ्यात अश्रू होते. पण ते माझ्यासाठी नव्हते, ते अभिलाषासाठी होते, हे मला स्पष्ट जाणवले. मग मी ग्रीटिंग कार्ड बॅग मधून बाहेर काढलं नाही, आणि पुढे मला काही बोलण्याची हिम्मत झाली नाही. कोणत्या तोंडाने मी बोलणार होते मी?

माझ्या मनात एक आक्रोश सुरू झाला होता. मला त्याची माफीही मागता येत नव्हती. काहीच सुचत नव्हतं—नेमकं चूक काय आणि बरोबर काय? त्या बागेत घडलेल्या एका प्रसंगामुळे आणि त्या एका गुलाबाच्या फूलामुळे मी एक चांगली मैत्रीण आणि एक चांगला मित्र गमावला होता, याची जाणीव झाली.

त्या दिवशी मी खूप वेळ एकटीच बाहेर उभी होते. एका बाजूला अनामिकेच्या डोळ्यांत आनंदाश्रू पाहिले,तर माझ्या डोळ्यांतले अश्रू मात्र आनंदाचे नव्हते. पावसाच्या सरींमध्ये तेही वाहून गेले.

शेवटी, मनात मोठी खंत आणि व्यक्त न झालेल्या भावनांचे ओझं घेऊन, मी पुण्याला परत निघून गेले.

 

                                                      समाप्त