शाळेत असताना एक गाणं खूप गाजलं होतं – "ए नजमीन सुनो ना", ‘दिल ही दिल में’ या चित्रपटातलं.
ते गाणं अजूनही लक्षात आहे... पण त्याचं खरं कारण? सोनाली बेंद्रे!
त्या काळात गाण्याचे बोल आणि संगीत यामुळे गाणी अजरामर झाली आहेत आणि कितीही ऐकले तरी पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटतात. आणि त्या गाण्यातली सोनाली बेंद्रे – यांना कोण विसरणार?
त्या गाण्यात कुणाल सिंगही होता, पण त्याच्याकडे फारसं कुणाचं लक्ष गेलं असेल असं वाटत नाही… विशेषतः मुलांचं. 😄
मी तो चित्रपट आजतागायत पूर्ण पाहिलेला नाही. पण हे गाणं मात्र रविवारी दुपारी दूरदर्शनवरील गाण्यांच्या कार्यक्रमात किंवा 'चित्रहार' या कार्यक्रमात हे गाणं लागत असायचं. पण छतावर जाऊन अँटेना फिरवायला लागत असे आणि टीव्हीला सिग्नल येऊ पर्यंत एक-दोन गाणी हमखास चुकायची. पण त्यामध्येही एक वेगळाच आनंद होता.
पण ते गाणं पुन्हा आठवण्याचं कारण होतं – कुणाल सिंगचे ते लांब, झुलणारे केस!
ते केस पाहून वाटायचं, “वा! काय भारी केस आहेत याचे! काय झकास केशरचना!”
तेव्हाच स्वतःलाही वाटलं – आपणही कधीतरी असे मोठे केस ठेवू.
पण आमच्या घरात? केस जर कानावर गेले, तर थेट कानाखाली शिक्षा मिळायची आणि एवढं बोलणं ऐकून घ्यावं लागत, जणू काय आपण खूप मोठा अपराध केला आहे. एवढी कडक शिस्त असायची.
'कोंबडा स्टाईल' तर दूरच राहिला... आणि जर सारखं डोक्यावर हात फिरवायला लागलो, तर रविवारी बाबा स्वतः घेऊन जायचे सलूनमध्ये –
आणि सांगायचे, “हाताला येणार नाहीत एवढे बारीक करा!” त्यावेळी समोर फक्त एकच पर्याय – घरचे सांगतील तीच केशरचना. आणि वरून डोक्यावर नारळाचे तेल . कधी कधी उन्हात तेच तेल कपाळावरसुद्धा यायचं.
नंतर शाळेतील नॅशनल कॅडेट कोर (NCC) साठी निवड झाली आणि तिथे गेल्यावर तर शिस्तीचा कळसच गाठला.
‘सोल्जर कट’ हा नियम नव्हे, तर धर्म होता आमच्यासाठी.
दर पंधरा दिवसांनी केस एवढे बारीक करायचे, की डोक्यावर केस आहेत की नाही याचीच शंका यायची.
थंडीत पहाटे सायकलवर परेडला जाताना वाऱ्याचा थेट मार लागत असे.
तेव्हा जाणवायचं – केस असते तर बरं झालं असतं.
मग ठरवलं – कॉलेजला गेल्यावर मोठे केस ठेवायचे.
पण आमच्या नशिबात आलं ‘तेरे नाम’ चं वादळ.
सलमानच्या त्या लुकमुळे लांब केस म्हणजे थेट "छपरीपणा"!
घरचे नियम तसेच – “एक इंचापेक्षा मोठे केस नकोत.”
कॉलेजमध्ये केस इतके बारीक ठेवायचे, की कंगवा ठेवायचीही गरज नव्हती.
खरं तर घरच्यांनी कधी कंगवा दिलाच नाही – बहुतेक आधीपासूनच माहिती असावं, की याला गरज पडणारच नाही!
नंतर नोकरी लागली. विचार केला – आता तरी मनासारखे केस ठेवू.
पण कॉर्पोरेट कल्चरचं वेगळंच राज्य असतं.
कंपनीमधील HR मॅनेजरकडून प्रत्येक वर्षी ई-मेल हमखास येणार – “आठवड्यात फक्त एक दिवस T-shirt, बाकीचे दिवस फॉर्मल्स अनिवार्य!”
मोठे केस? दाढी? – “ऑफिसच्या वातावरणास अजिबात मान्य नाही.”
नियम मोडलास, तर थेट हेड ऑफ डिपार्टमेंटसमोर उभं करायचं, आणि कधी कधी वॉर्निंग लेटरसुद्धा भेटायचं.
कंपनी बदलली, शहरं बदलली, कंपनीमधलं पदसुद्धा बदललं –
पण नियम मात्र जणू जन्मभरासाठीच लागू झाले आहेत असं वाटू लागलं.
आणि त्याच दरम्यान केस मात्र हळूहळू विरळ होत गेले...
आज परिस्थिती अशी आहे, की केस इतके थोडे उरले आहेत, की कंगवाच बेरोजगार झाला आहे.
आता कंपनीत मनासारखी केशरचना करण्याची मुभा आहे – पण डोक्यावर केसांची ‘कृपा’ उरलेली नाही!
शाळेत भीती, कॉलेजमध्ये नियम, नोकरीत शिस्त – केसांना कधीच वाव नव्हता.
अर्धं आयुष्य दुसऱ्यांचं ऐकण्यात गेलं... आणि उरलेलं केसांकडे बघण्यात!
पूर्वी वाटायचं – केस पांढरे नको व्हायला!
पांढरे दिसले, की आरशात उभं राहून एकेक करून उपटून टाकायचे.
पण आज वेळ अशी आहे, की – कुठलाही रंग असो, फक्त केस तरी डोक्यावर राहू देत! 😁
आज कितीही महागडं तेल लावलं, शॅम्पू केला, विग बसवला किंवा ट्रान्सप्लांट केलं –
शाळेतले ते केस परत येणार नाहीत – हेच खरं!
काही स्वप्नं अधुरीच राहिली...
आणि काही केसांबरोबरच उडून गेली! 😂
आता ही पोस्ट वाचून, ज्यांच्या डोक्यावर अजूनही Amazonचं जंगल डौलात उभं आहे, ते म्हणत असतील –
“आपणच खरे राजकुमार आणि कुबेराचे अवतार!”
पण झालं असं की – जगभरातील सर्वात आकर्षक पुरुष हे टकले असतात, असं एका सर्वेमध्ये म्हटलंय...
फक्त त्या सर्वेचा नेमका स्रोत अजून मला सापडलेलाच नाही! 😄