Lights across distance in Marathi Moral Stories by Arjun Sutar books and stories PDF | पणती

Featured Books
Categories
Share

पणती

आज पुन्हा ऑफिसमधून यायला उशीर झाला होता. बाहेर सगळीकडे दिव्यांची रोषणाई आणि लाइटिंगमुळे दिवाळीचं एकदम आनंददायी वातावरण झालं होतं.
पण मी मात्र “उद्या परत ऑफिसलाच जावं लागणार” या विचारात बिल्डिंगमध्ये प्रवेश केला. मोबाईलच्या स्क्रीनकडे बघतच रूमच्या दिशेने निघालो आणि रागाच्या भरात दरवाजा जोरात ढकलून दिला.
सोफ्यावर बसलो आणि मनात एकच विचार आला — कशाला आलो एवढ्या लांब?
ही पहिलीच दिवाळी होती की सोबत कोणीच नव्हतं — अगदी बोलायलासुद्धा कोणी नव्हतं.
दुबईत येऊन फक्त तीन महिने झाले होते आणि त्यामुळे सगळंच नवीन — ऑफिस, घर, आणि शेजारीदेखील ओळखीचे नाहीत.
बिल्डिंगमध्ये फक्त आमचा सिक्युरिटी गार्ड “जेकब” एवढाच एक चेहरा ओळखीचा होता. तो दक्षिण भारतातील असल्यामुळे आम्हा दोघांमध्ये इंग्रजीतच संवाद व्हायचा. तोही जेवढं शक्य होईल तसं, कामापुरतंच बोलण्याचा प्रयत्न करत असे.
ऑफिसमधील लोक कामाशिवाय कोणाशी फारसं काही बोलत नव्हते, त्यामुळे तिथे कधीच कामाव्यतिरिक्त गप्पा मारता येत नव्हत्या.
त्यात दिवाळी म्हटलं की घरची साफसफाई, फराळाचा खमंग वास, नवीन कपडे, आईची लगबग, लहानपणचे किल्ले, फटाके, मित्रांच्या भेटीगाठी आणि गप्पांचा तो उत्साह — सगळं डोळ्यासमोर उभं राहतं.
पण इथे मात्र शांतता होती, आणि त्या शांततेत एकटेपणाचा प्रतिध्वनी जास्त मोठा वाटत होता.
“हे पण दिवस निघून जातील…” असं स्वतःशी पुटपुटत थोडी समजूत काढली आणि बाहेर फेरफटका मारावा म्हणून दरवाजा उघडला.
पाहतो तर काय — दारात दोन पणत्या ठेवलेल्या!
मी लॉबीमध्ये पाहिलं, पण कोणीच दिसलं नाही. कोण ठेऊन गेलं असेल? या विचारातच खाली फिरायला गेलो.
त्या दोन पणत्या आणि त्यांचा तोच प्रकाश पाहून असं वाटलं की माझ्या घरीही दिवाळी आहे. वातावरण प्रसन्न झालं आणि मनात सतत एकच विचार येत होता — कोण ठेऊन गेलं असेल त्या दोन पणत्या?
सकाळी ऑफिसला जाताना एक तरुणी दारातून त्या पणत्या उचलताना दिसली. स्वतःला आवरता आलं नाही आणि मी विचारलं,
“क्या ये दिया आपने लगाया था?”
ती म्हणाली, “हो.” ती मराठीत बोलली आणि क्षणातच मूड बदलला.
मी विचारलं, “तुम्हाला कसं कळलं की मी मराठी आहे?”
ती म्हणाली, “तुम्ही जे मराठी गाणी लावलेली असतात ती कधी कधी माझ्या घरीही ऐकू येतात.”
मी संकोचून म्हणालो, “सॉरी… गाणी ऐकण्याची आवड आहे आणि कधी कधी नकळत आवाज जास्त होतो. घर मोकळं असल्यामुळे तो घुमतो बहुतेक.”
ती म्हणाली, “मागच्या आठवड्यात या बिल्डिंगमध्ये राहायला आले.”
मी हसून म्हणालो, “तुम्हाला पाहून वाटलं नाही की तुम्ही मराठी असाल.”
ती हसत म्हणाली, “मी मुंबईत खूप वर्षे राहिलेय, आणि मला मराठी चांगलं बोलता येतं. पण मी खरं तर सिंधी आहे; लग्नानंतर दुबईला आले.”
शेवटी मी विचारलं, “माझ्या दारात पणती ठेवण्याचा त्रास कशाला घेतला?”
ती शांतपणे म्हणाली, “दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे. आपल्या घरात दिवे असतील तर शेजाऱ्यांच्या दारात अंधार दिसायला नको, म्हणून ठेवली. हरकत नसेल तर पुढचे चार दिवसही ठेवणार. रांगोळी काढणार होते पण सिक्युरिटीने परवानगी दिली नाही.”
मी घड्याळ्याकडे पाहत म्हणालो, “मला ऑफिसला जायचं आहे, पण तुमचं आभार कसं मानू हे कळत नाही. तुम्हालाही दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!”
त्या दिवशी लक्षात आलं — परदेशातले रस्ते आणि उंच इमारती जरी चमकत असल्या तरी, जर आपल्या माणसांचा सहवास, त्यांची ओढ आणि लोकांसोबत मनापासून संवाद असेल, तरच दिवाळी आपलीशी वाटते.
या छोट्याशा प्रसंगातून एक गोष्ट मात्र पक्की समजली — आनंद स्वतःपुरता ठेवायचा नसतो; तो दुसऱ्यांच्या आयुष्यात प्रकाश बनून उतरला पाहिजे.
दिवाळी ही केवळ आपल्या घरची रोषणाई नसून अंधारावर, अज्ञानावर, आणि एकटेपणावर केलेला प्रकाशाचा विजय आहे.
या प्रसंगाला आठ वर्षं झाली आहेत, पण प्रत्येक दिवाळीत तिची आठवण नकळत डोकावून जाते.
दुबईतलं ते घर सोडल्यानंतर पुन्हा कधी तिच्या फ्लोअरवर जाणं झालं नाही.
नंतर घरच्यांकडून समजलं की ती सध्या दुबईत मॉडेलिंगमध्ये करिअर करत आहे.
पण तिच्याशी पुन्हा बोलायची संधी मात्र आजतागायत मिळाली नाही...
कधी कधी काही लोक आपल्याला आयुष्यात फक्त एका क्षणासाठी भेटतात, पण त्यांची कृती आणि आठवण अशी असते की ती वर्षानुवर्षं मनात तेवत राहते — अगदी त्या दोन पणत्यांसारखीच.