नुकतंच हाफ पँटमधून आम्ही फुल पँटमध्ये आलो होतो. आमचा दहावीचा वर्ग दुसऱ्या मजल्यावर असायचा, आणि तिसऱ्या मजल्यावर सगळे जुनिअर कॉलेज म्हणजे अकरावी आणि बारावीचे वर्ग भरायचे. जुनिअर कॉलेजच्या वर्गात नवीन बेंचेस आणि ब्लॅकबोर्ड बसवले आहेत, असं माझ्या मित्रांनी सांगितलं. आर्ट्स आणि कॉमर्सचे वर्ग सकाळीच भरायचे, त्यामुळे त्यांचे वर्ग दुपारनंतर मोकळे असायचे. आम्ही सगळे मित्र डबा खाल्ल्यानंतर बेंच बघायला तिसऱ्या मजल्यावर एका वर्गात गेलो.
तिसऱ्या मजल्यावर वर्गामध्ये थोडा वेळ बेंच आणि बोर्ड पाहिल्यानंतर माझे सगळे मित्र वर्गाच्या बाहेर पळू लागले.मला काही कळायच्या आतच सरांनी माझ्या शर्टाची कॉलर पकडली आणि पाटीवर जोरात फटका मारला.त्याच वेळी मागून आवाज आला:
"नालायकांनो! लाज वाटत नाही का तुम्हाला? हे काय वय आहे कॉलेजमध्ये येऊन पोरी बघायचं आणि छेड काढायचं?"
क्षणात होत्याचं नव्हतं झालं. सगळे मित्र गायब झाले, आणि मी मात्र सरांच्या तावडीत सापडलो होतो.
मग सर म्हणाले:"परत येणार का वर्गात? कोणी हा बोर्ड खराब केला आहे, ते पुसून टाका आणि बेंच सरळ करा! परत असं केलंत तर पालकांना बोलवेन."
सगळे बेंच नीट आणि सरळ लावल्यानंतर सरांनी मला वर्गाबाहेर सोडलं. माने सरांशी झालेली माझी ही पहिलीच भेट होती. दहावीनंतर मी आमच्या कॉलेजच्या विज्ञान शाखेत अकरावीला प्रवेश घेतला होता.. आणि पुन्हा एकदा माने सरांशी नव्याने ओळख झाली. सर अकरावी आणि बारावीच्या दोन्ही वर्गांना इंग्रजी विषय शिकवायचे.
भिंगासारखा वाटणारा जाडसर चष्मा, अंगावर शुभ्र पांढऱ्या रंगाचा अर्ध्या बाह्यांचा सुती शर्ट, एका हातात मोठा रुमाल, उंच शरीरयष्टी, आणि भारदस्त आवाज—यामुळे त्यांचा रुबाब नेहमीच उठून दिसायचा.सरांची पुस्तक पकडण्याचीही एक खास पद्धत होती—एका हातात इंग्रजीचं पुस्तक, आणि तो हात किंचितसा दुमडलेला असायचा. दुसऱ्या हातात त्यांचा मोठा रुमाल. चेहऱ्यावर हलकं स्मितहास्य, रुबाबदार चाल, आणि शिस्तबद्ध हालचालींनी ते वर्गात प्रवेश करायचे. पुस्तकाचं पान क्रमांक सांगूनच तासाची सुरुवात व्हायची.
सर इंग्रजी बोलताना असं वाटायचं, जणू आपण एखादं इंग्रजी नाटक बघत आहोत. त्या नाटकाचे दिग्दर्शकही तेच, आणि लेखकही तेच! अगदी एखाद्या एक-अंकी प्रयोगासारखं तास सुरू व्हायचा. त्यांचा भारदस्त आवाज, त्यातील चढ-उतार, आणि "R" शेवटाला आलं की "R सायलेंट असतो," असं ठामपणे सांगणं, हे त्यांच्या शिकवण्याचं वैशिष्ट्य होतं. सरांच्या शब्दांच्या उच्चारावर देखील खूप भर असायचा.
त्यावेळी बरंचसं इंग्रजी डोक्यावरून जायचं, पण ऐकायला खूपच भारी वाटायचं. विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांमध्ये तेव्हा असा गैरसमज होता की, इंग्रजी विषय फक्त पास होण्यासाठी आहे. भविष्यात याच भाषेचा रोजच्या कामांसाठी किती महत्त्वाचा उपयोग होईल, याची पुसटशीही कल्पना नव्हती.
सरांच्या शिकवण्याच्या विशिष्ट पद्धतीमुळे इंग्रजी विषयाची गोडी लागली होती. आमच्या इंग्रजी विषयातील सुधारणा व्हावी आणि शब्दसंग्रह वाढावा, यासाठी सर आम्हाला टीव्हीवरच्या इंग्रजी बातम्या बघून त्या लिहून आणायला सांगत. कधी कधी इंग्रजी वृत्तपत्रातील हेडलाइन लिहून आणायला सांगायचे, आणि दुसऱ्या दिवशी तासाला कोणत्याही विद्यार्थ्याला उभं करून वाचायला लावायचे. बातमीत एखादा नवीन शब्द आला की, त्याचा अर्थही सर अगदी सोप्या शब्दांत समजावून सांगत. सरांच्या या उपक्रमामुळे आम्ही सगळे इंग्रजी बातम्या बघायला लागलो, आणि वृत्तपत्र वाचण्याची सवय लागली.
असाच अजून एक नवीन उपक्रम सरांनी वर्गात सुरू केला होता.सरांनी आम्हाला एक कविता शिकवायला सांगितली, आणि काही मुलं-मुलींची निवड केली.ती निवड नेमकी कशी झाली,याची काही कल्पना नाही. मात्र, माझं नाव त्या मुलांमध्ये शेवटच्या क्रमांकावर होतं.
आजवर कधीच स्टेजवर जाऊन बोलायचा अनुभव नसलेल्या मला, पहिल्यांदाच स्टेजवर उभं रहायचं होतं. कॉलेजमध्ये टॉपर विद्यार्थी सगळ्यांच्या नजरेत असतात, कारण तेच पुढे बोर्डाच्या परीक्षेत चांगल्या गुणांनी पास होऊन शाळेचं आणि शिक्षकांचं नाव मोठं करतात. दुसऱ्या बाजूला असतात बॅक बेंचर्स जे पास होतील की नाही, या चिंतेने शिक्षक सतत त्यांच्याकडे लक्ष ठेवतात.
बाकीचे म्हणजे आम्ही, शाळेच्या पास होण्याच्या टक्केवारीत हातभार लावणारे विद्यार्थी.गर्दीला चेहरा नसतो असं बोलतात, तर अशाच एका गर्दीचा मीही एक भाग होतो. वर्गात फक्त हजेरीच्या वेळीच माझं नाव घेतलं जातं, असं मला वाटायचं. तरीही, का कोणास ठाऊक, माझं नाव त्या कविता शिकवण्याच्या यादीत का आलं, हे एक कोडंच होतं.
बघता बघता एक आठवडा निघून गेला, आणि तो दिवस उजाडला. कवितेतील एकेक कडवे शिकवायला सुरुवात झाली. ज्यांना जसं जमलं, तसं प्रत्येकजण आपापल्या परीनं चांगलं शिकवत होते. सर मागे बसून सगळं निरीक्षण करत होते. मी मात्र निवांत होतो, कारण माझा नंबर शेवटून दुसऱ्या क्रमांकावर होता, आणि तो नंबर येण्यासाठी खूप वेळ होता. त्या दिवशी शेवटी माझा नंबर आलाच नाही.
पण ज्यावेळी मुलींनी वर्गात पुढे जाऊन शिकवायला सुरुवात केली, तेव्हा त्यांनी मुलांना प्रश्न विचारताना कसलीही कसूर सोडली नाही. इंग्रजीचा तो तास संपल्यानंतर मुलांमध्ये मी एकटाच राहिलो होतो. बाकी सर्व मुलांचे क्रमांक झाले होते. सगळ्यांनी मला सांगितलं, "तुलाही प्रश्न विचारलेच पाहिजेत!" आपल्यामधून कोणी तरी मुलींना प्रश्न विचारलेच पाहिजेत.
आता माझ्यावर दोन्ही बाजूंनी दबाव होता.एक तर स्टेजवर जाऊन सगळ्या समोर शिकवायचं, आणि वरून मुलींना प्रश्न विचारायचे! आत्तापर्यंत कधीच मुलींशी बोललेलो नव्हतो. तरीही माझे मित्र म्हणाले, "तुला प्रश्न हे विचारावेतच लागतील!"
दुसऱ्या दिवशी इंग्रजीच्या तासाला सुरुवात झाल्यावर माझा नंबर आला.मला सरांनी 'Freedom' या कवितेतील एक कडवं शिकवायला सांगितले होते. त्यामुळे काहीतरी वेगळं करायला हवं, या विचाराने स्टेजवर गेल्यावर मी त्या कवितेतील पहिलं वाक्य म्हटलं, 'What is freedom?' त्यानंतर थोडा वेळ शांत उभा राहिलो आणि मग समोर बसलेल्या ज्या ज्या मुली होत्या, त्यांना उभं केलं. त्यामुळे शिकवायला सुरुवात करण्याआधी मी प्रश्न विचारून वेगळ्या पद्धतीने सुरुवात केली. अचानक असे प्रश्न आल्यामुळे त्या देखील भांबावून गेल्या होत्या. सर आणि बाकी सर्व मुले-मुली आश्चर्याने माझ्याकडे बघत होते. त्यांच्यापैकी कोणालाही उत्तर देता आलं नाही, त्यामुळे मला थोडा आत्मविश्वास आला. मग जे उत्तर मी पाठ करून तयार केले होते, ते सांगितले. त्यानंतर, कसेबसे माझ्या वाटेला आलेलं ते कडवे शिकवून झालं, आणि मी जागेवर जाऊन बसलो. मोठा भीमपराक्रम करून आल्यासारखं मला वाटत होतं, आणि माझे मित्र मला कौतुकाने बघत होते. पण माझ्या या पराक्रमानंतर काय अंगलट येणार आहे, हे मला थोड्याच वेळात समजलं. कारण आता भेंडी त्यांच्यावर चढली होती. पण शांत बसतील त्या मुली कसल्या?
माझ्यानंतर ज्या मुलीचा नंबर होता, तिने स्टेजवर जाऊन कवितेतील कडवे शिकवायला सुरुवात केली. तेव्हा मी मात्र मान खाली घालून लपून बसायचा प्रयत्न करत होतो. तरीही, तिनं शक्य तेवढे प्रश्न मलाच विचारले! जणू काही माजावर बाणांचा वर्षाव व्हावा तसे २-३ प्रश्न विचारले आणि मला उभं केलं. मी मात्र आपला मान खाली घालून माज्या बाजूच्या मित्राला हळूच विचारलं, 'याचे काय उत्तर असेल रे? आणि एवढे अवघड प्रश्न का विचारत आहे ही?
त्यानंतर सरांनी स्वतःच सांगितलं, 'बसा खाली आणि याचे उत्तर लिहून आणा उद्या.' सर्वांचे शिकवून पूर्ण झाल्यानंतर सरांनी अभिनंदन केलं आणि शिकवण्याची कला, मंचावर जाऊन बोलण्याचं धाडस आणि त्याचं महत्त्व सांगितलं.
त्या प्रसंगामुळे माझ्यात कमालीचा बदल घडला, आत्मविश्वास आला, आणि वर्गातील मुले व मुली दोन्ही मला चांगले ओळखू लागली होती. मला मंचावर जाऊन दोन शब्द बोलता आले, याचा पण खुप आनंद झाला होता. जर त्या वेळी सरांनी स्टेजवर जाऊन समोर बोलण्याची संधी दिली नसती, तर माझ्यातला हा गुण मला लवकर समजला नसता. त्यामुळे त्यांचे एक प्रकारे उपकारच आहेत माझ्यावर, कारण त्यांनी माझी, वर्गामध्ये एक वेगळी ओळख करून दिली होती.
सरांनी अशा अनेक उपक्रमांच्या माध्यमातून, भविष्यामध्ये लागणारे कौशल्य विकसित करण्याची तयारी आमच्याकडून करून घेतली. जसे की इंग्रजी बातम्या पाहणे, वर्तमानपत्र वाचणे, आणि सर्वात महत्त्वाचं, मंचावर जाऊन बोलण्यासाठी आत्मविश्वास निर्माण करणे.
खरे त्याचे महत्त्व त्यावेळी एवढे जाणवले नाही. त्यानंतर, परत सीनियर कॉलेज आणि विद्यापीठात प्रवेश घेतल्यानंतर, माझ्यात खूप चांगले बदल घडले. मंचावर जाऊन बोलण्याची भीती तर कधीच निघून गेली, पण त्यासोबतच माझे काही चांगले मित्र आणि मैत्रिणीही झाले. त्यानंतर, मला ज्या ज्या वेळा पुढे जाऊन बोलण्याची संधी मिळाली, ती मी कधीच सोडली नाही. मी शक्य तितके प्रयत्न केले, आणि २ शब्द बोलण्याचा प्रयत्न करत राहिलो, मग तो विषय इंग्रजीत असो किंवा मराठीत.
आज ऑफिसमध्ये काम करताना अनेक वेळा मीटिंग घ्याव्या लागतात आणि त्या मीटिंग्सला जाऊन बसावं लागतं. बाहेर मोठ्या कॉन्फरन्स असतील किंवा कंपनीच्या क्लायंटसोबत मीटिंग्स असतील, तिथे बोलावं लागतं. हे सर्व करत असताना आणि इंग्रजी न्यूज बघताना कधी कधी सरांची आणि त्यांच्या शिकवणीची विशिष्ट पद्धत आठवत राहते
समाप्त