खूप दिवस झाले, लाल्याचा फोन आला नाही, म्हणून मी त्याला कॉल केला. त्यावेळी तो रात्रभर हॉस्पिटलच्या पायऱ्यांवर बसलेला होता, हे कळताच मन सुन्न झालं, आणि अंतर्मनात काळोख दाटून आला.
लाल्याची आई हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होत्या, आणि तो अहोरात्र त्यांच्या सेवेत होता. त्याच्या थकलेल्या आवाजातूनच त्याच्या मनातील काळजी स्पष्ट जाणवत होती. त्यामुळे मलाही जास्त काही बोलता आलं नाही.
फोन ठेवताच मनात एकच विचार उमटला—या कठीण क्षणी मी त्याच्या सोबत का नाही? कामाच्या व्यापात इतका गुरफटलो की, माझ्या जवळच्या माणसांसाठीही वेळ देऊ शकत नाही
लाल्या हा माझ्या आयुष्यातील सर्व सुख-दुःखांचा साक्षीदार आहे. पण मी त्याच्यासाठी काहीच करू शकत नाही? कधी कधी आपल्या माणसाला भावनिक आधाराची खूप गरज असते. नेमके त्याच वेळी मी त्याच्या सोबत नाही. त्यानंतर माझ्या डोळ्यासमोर फक्त लाल्या आणि लाल्याच दिसू लागला.
शाळेत असताना लाल्या, मी आणि अभि तिघे जिवलग मित्र होतो. मी आणि अभि एका बाजूला, तर कायम मस्ती आणि मजा करणारा, आईचा लाडका लाल्या दुसऱ्या बाजूला!
लाल्या लहानपणापासूनच एक कलाकार माणूस आहे. मग चित्रकला असो, दिवाळीसाठी लागणारा आकाशकंदील असो, किंवा गणपतीचे डेकोरेशन असो—लाल्या प्रत्येक गोष्टीत जीव ओतून काम करायचा.
दिवाळीचा किल्ला आणि लाल्या यांचं वेगळंच समीकरण होतं. दरवर्षी तो वेगवेगळ्या प्रकारचे, तेही भव्यदिव्य किल्ले बनवायचा! कदाचित त्याच काळापासून त्याला इतिहासाची गोडी लागली असावी.
शाळेतील आठवणी लाल्याशिवाय कधीच पूर्ण होऊ शकत नाहीत… कारण जिथे अभि, तिथे अन्या, आणि जिथे अन्या, तिथे लाल्या! आमचं हे त्रिकूट अगदी घट्ट होतं.
अभि आमच्या वर्गातील खरा हुशार विद्यार्थी होता, त्यामुळे तो पहिल्या बाकावर बसायचा. मी आणि लाल्या मात्र शेवटून दुसऱ्या-तिसऱ्या बाकावर असायचो. आमचं लक्ष शाळेपेक्षा दुपारच्या सुट्टीतल्या खेळांवर आणि शाळा सुटल्यानंतरच्या क्रिकेट मॅचवरच असायचं!
लाल्या आणि मी तर क्रिकेट इतकं खेळायचो की शाळा भरायची वेळ झाली तरी आम्ही अजून मैदानातच असायचो. मग कसेबसे शाळेची बॅग उचलायची आणि सकाळच्या प्रार्थनेला उशिरा पोहोचायचं. नियमित उशिरा येत असल्यामुळे कधी कधी सर आम्हा दोघांना स्टेजवर उभं करायचे आणि भिंतीकडे तोंड करून हात वर करायला लावायचे, तर कधी छडीने मार देऊन शिक्षा द्यायचे!
शाळा सुटल्यानंतर आम्ही पुन्हा क्रिकेटचा डाव मांडायचो किंवा कधी पुलावर जाऊन गप्पा मारत बसायचो. त्या गप्पा, ते विषय—त्यातला आनंद दुसऱ्या कोणत्याच गोष्टीत नव्हता!
बर्याच वेळा, दुपारचं जेवण असो किंवा नाश्ता, लाल्याची आई मला नेहमी प्रेमाने वाढायची. कधी अभिच्या घरी गेलो, तरी तिथेही तसंच होत असे. त्यामुळे आमची घरं वेगळी असली, तरी आम्ही कुठेही—कोणाच्याही घरी असायचो!
लाल्याचे वडील क्रिकेटचे जबरदस्त चाहते होते, आणि मी त्यांना ‘साहेब’ म्हणायचो. क्रिकेट मॅच असली की ते टीव्हीसमोर खुर्ची मांडून बसायचे, आणि आम्हीही त्यांच्यासोबत गप्पा मारत क्रिकेटचा आनंद घ्यायचो.
लाल्याच्या घरी मोठा रंगीत टीव्ही होता. त्या वेळी रविवारी हिंदी सिनेमांच्या गाण्यांचे कार्यक्रम लागत असत, आणि आम्ही ते लपूनछपून बघायचो! एकंदरीत शाळा सुटल्यानंतर आणि सुट्टीत काय करायचं, याचा आमचा ठरलेला कार्यक्रम असायचा.
बघता-बघता आम्ही कॉलेजमध्ये पोहोचलो. घरच्यांचा दबाव वाढत होता, अपेक्षाही वाढल्या होत्या. लाल्याचा मोठा भाऊ अत्यंत हुशार असल्यामुळे, त्याच्याकडूनही तशाच अपेक्षा होत्या. पण त्या अपेक्षांचं ओझं त्याला पेलवलं नाही.
त्यातच, आम्ही पहिल्यांदाच अशा कॉलेजमध्ये आलो होतो, जिथे मुले आणि मुली एकत्र शिकत होते. त्यामुळे लाल्याला नेमकं काय झालं, ते त्यालाही समजलं नाही. जसजशी बोर्डाची परीक्षा जवळ येऊ लागली, तसतसा त्याचा आत्मविश्वास कमी होऊ लागला. पाठांतर करणे त्याला जमत नव्हते आणि मुख्य म्हणजे, ते मान्यही नव्हते.
"लाल्या आपला ज्युनियर कॉलेजचा 'गड' जिंकू शकला नाही. त्यानंतर आम्ही तिघेही स्वतःच्या वाटेने वेगवेगळ्या दिशांना निघून गेलो. त्यावेळी कधीच वाटलं नाही की पुन्हा आम्ही तिघे एकत्र येण्यासाठी वर्षानुवर्षे वाट पाहावी लागेल..
लाल्या पुण्यात एका कॉलेजमध्ये गेला, मी माझं पुढील शिक्षण गावातील कॉलेजमध्ये सुरू ठेवलं, आणि अभिही शिक्षणासाठी आमच्यापासून दूर गेला. नंतर मीही उच्च शिक्षणासाठी बाहेरगावी निघून गेलो.
बघता-बघता आयुष्यातली ती सहा वर्षं कशी निघून गेली, समजलंच नाही. पण लाल्या आणि मी जवळ राहात असल्यामुळे आमची वरचेवर भेट होत असे. मात्र अभि थोडा दुरावला होता, तरी तो आमच्या चर्चेमध्ये कायम असायचा.
लाल्या घरी आला की पहिल्यांदा माझ्याकडे यायचा, आणि मीही घरी आलो की सर्वात आधी त्याच्या घरी जायचो. नंतर, कामानिमित्त मीही खूप दूर निघून गेलो. त्यामुळे आमचा संपर्क फक्त फोनवरच राहिला. हळूहळू कामाच्या व्यापामुळे तोही कमी होत गेला...
एक दिवस मला समजलं की लाल्याच्या आयुष्यात 'ती' आली आहे, आणि त्यामुळे तो खूप व्यस्त आहे. मी इकडे नवीन नोकरीमुळे कामात गढून गेलो होतो. ती वेळ म्हणजे स्वतःला सिद्ध करण्याची आणि मेहनत करून वरच्या पायरीवर जाण्याची होती. त्यामुळे मीही स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं.
दिवसामागून दिवस जात होते. माझं आणि लाल्याचं अधूनमधून बोलणं होत राहायचं.
एक दिवस लाल्याच्या मित्राकडून कळलं की तो रात्री बारा वाजेपर्यंत एका कॉल सेंटरच्या बाहेर वाट बघत बसायचा. 'तिच्यासाठी' त्याने सर्वस्व पणाला लावलं होतं.
त्यावेळी मी त्याला फोनवर सांगत असे, "लाल्या, कामाकडे थोडं लक्ष दे. कुठेतरी पार्ट-टाइम डिग्रीसाठी ॲडमिशन घे आणि आपल्या ऑफिसमध्ये हुद्दा कसा वाढवता येईल, तेही बघ."
पण ते वयच तसं होतं—प्रेम, आकर्षण या गोष्टी अगदी स्वाभाविक होत्या.
लाल्या प्रेमात अखंड बुडून गेला होता. त्याचा तो आनंद मी जवळून पाहू शकलो नाही, त्याला समजून घेण्यासाठीही मी त्याच्या जवळ नव्हतो. पण त्याच्याकडून आणि त्याच्या मित्रांकडून मला सारं कळत होतं.
पण आयुष्य पुढच्या वळणावर आपल्याला कोणते धक्के देईल, हे कोणालाच माहित नसतं...
लाल्याची 'ती' त्याला सोडून दुसऱ्या कुणासोबत निघून गेली. काही दिवसांनी कळलं की तिने लग्नही केलं आहे.
अचानक 'ती' निघून गेल्यामुळे लाल्या पूर्णपणे खचला होता. त्याचं कामाकडे आणि बाकी सर्व गोष्टींकडे लक्ष उडालं. त्याची अवस्था पाहून त्याच्या घरच्यांचीही काळजी वाढली.
त्यावेळी मी मात्र लाल्याला त्याचे आवडते गड-किल्ले आणि ऐतिहासिक कथा सांगून, तसेच आमच्या जुन्या आठवणी ताज्या करून त्याचं मन आणि लक्ष वळवण्याचा प्रयत्न करत होतो. मला जमेल तसं, शक्य तेव्हा त्याला फोन करून समजवू लागलो.
मित्रांचे आयुष्यातले स्थान हेच असते—अशा कठीण काळात त्यांनी साथ सोडता कामा नये.
लाल्याने हा धक्काही पचवला… आणि पुन्हा उभा राहिला. तो परत कामाला लागला. आणि आता तर नव्या जोमाने इतिहासाची पुस्तके वाचू लागला आणि गड-किल्ल्यांच्या ट्रेकसाठीही जाऊ लागला.
सगळं सुरळीत सुरू असतानाच, नियतीला मात्र काहीतरी वेगळंच मंजूर होतं...
कधी कधी असं वाटतं—एखाद्यावर नशीब एवढं मेहेरबान कसं असतं? लाल्यात नेमकं असं काय होतं? कोण जाणे.
एका दिवस अचानक त्याच्या आयुष्यात एक मुलगी चालून आली—अगदी स्वर्गातील अप्सरा वाटावी, अशी नखशिखांत सुंदर युवती! ती स्वतःहून लाल्याच्या आयुष्यात आली आणि त्याच्या प्रेमाचा गाडा पुन्हा सुरू झाला.
इकडे आम्ही मात्र फक्त काम आणि जबाबदाऱ्यांमध्येच गुरफटलेलो होतो. पण तिकडे लाल्या मात्र कधी बागेत, कधी कॅफेमध्ये, तर कधी तिला सोडायला किंवा न्यायला जात असायचा.
"तरुणपणी तुमच्याकडे गाडी असेल आणि तिच्या मागच्या सीटवर बसायला कोणी नसेल, तर त्या गाडीचा उपयोग काय?"
पण लाल्याची गाडी सुसाट सुटली होती! त्याच्या मागच्या सीटची शोभा त्या सुंदर मेनकेसमान तरुणीने वाढवली होती.
त्यावेळी मी मात्र काय चूक आणि काय बरोबर, असे तर्क लावत आणि विचार करण्यातच आयुष्य घालवत होतो.
"जिचा आपण स्वप्नातसुद्धा विचार करू शकत नाही, अशी मुलगी नेमकी लाल्याच्याच आयुष्यात कशी येते?"
अनेकदा मला वाटायचं—हा नक्की काय जादू करतो, हेच कळत नव्हतं! कारण मुली त्याच्यावर इतक्या फिदा का व्हायच्या, याचं गणितच सुटत नव्हतं!
लाल्या मात्र अशा गोष्टींचा फारसा विचार करत नसे. त्याची एकच मत असायचे —"स्वतः आनंदी राहा आणि दुसऱ्यांनाही आनंदी ठेवा !"
जसं एखाद्या चित्रकाराने कॅनव्हासवर मुक्तहस्ताने रंग भरावेत, ब्रश फिरवत आपल्या मनासारखं चित्र काढावं, तसंच लाल्याचंही होतं. त्याची एकच जीवनशैली—"आजचा हा क्षण आनंदात जगा!"
आम्ही मात्र भविष्याचं नियोजन करण्यात इतके अडकून गेलो होतो, की आयुष्य जगायचंच विसरलो...
लाल्याला लोकांना नेमकं काय हवं आहे, हे अगदी बरोबर कळायचं. मी इकडे पुस्तके वाचायचो, तर तो तिकडे त्याच्या आजुबाजूला असणाऱ्या माणसांना समजून घेण्याचा प्रयत्न करत असे. त्यांच्या अडचणी आणि आवडी समजून घेत होता.
लाल्याच्या आयुष्यात आलेल्या त्या तरुणीने त्याचे जीवन अजून रंगतदार बनवले होते. त्याचा उत्साह वाढला होता.
इकडे आम्ही ऑफिसमध्ये मीटिंग्स आणि मेल्स लिहण्यात मग्न होतो, तर तिकडे तो तिच्यासाठी गाणी आणि कविता ऐकत असे. असले Chocolate Day, Propose Day आणि Rose Day हे मला त्याच्याकडून ऐकायला भेटत होते. आणि तो सगळं सेलिब्रेट करायचा.
इकडे मात्र आमच्या आयुष्यातील गुलाबाचे फूल पुस्तकांच्या पानांमध्ये दबून गेले होते, पण लाल्याचं आयुष्य तिकडे सगळं गुलाबी होतं.
माझ्या आयुष्यात कोणी चॉकलेट देणारे आणि गुलाब देणारे कोणीच नव्हते, पण लाल्यासाठी मी आनंदी होतो आणि थोडी काळजीही वाटत होती. परंतु, जर ती त्याला सोडून गेली तर, तो काय करेल.
दिवसामागून दिवस जात होते, इकडे मी पण कामाच्या व्यापामुळे आणि घरच्या जबाबदारीमुळे व्यस्त झालो होतो
लाल्याच्या त्या मैत्रिणीचं नंतर काय झालं, हे मात्र मला कधीच समजलं नाही, आणि मीही त्याला याबाबत जास्त कधी विचारलं नाही
त्यानंतर लाल्याने आपलं संपूर्ण लक्ष स्वतःकडे आणि करिअरवर केंद्रित केलं आणि कामाकडे अधिक लक्ष देऊ लागला. त्याने खूप मेहनत घेतली आणि बघता बघता त्याच कंपनीत दोन वेळा प्रमोशन मिळवलं. नंतर नवीन घरही घेतलं, तेही स्वतःच्या हिंमतीवर. हे करत असतानाही त्याने इतिहास वाचनाची आवड, बाहेर फिरणं, ट्रेकिंग करणं हे सुरूच ठेवलं. आणि विशेष म्हणजे, तो मित्रांना वेळ देणं विसरला नाही
सगळं अगदी मनासारखं सुरू असताना, आयुष्याच्या वळणावर पुन्हा एकदा त्याला मोठा धक्का बसला.
लाल्याच्या आई-वडिलांचं छत्र हरपलं, आणि तो पूर्णपणे पोरका झाला. त्या क्षणी मला सुद्धा माझ्या घरच्यांना गमावल्यासारखं दुःख झालं. लाल्याच्या आयुष्यात दुःखाचा मोठा डोंगर कोसळला होता. तोही त्याने पचवला... आणि कितीही वेदना झाल्या तरी, त्याच्या चेहऱ्यावर कधीच त्याची छटा उमटू दिली नाही. लाल्याच्या आई-वडिलांसोबत मी पण काही क्षण घालवले आहेत, त्यामुळे त्यांच्या सोबत असलेल्या लहानपणाच्या आठवणी आजही जिवंत आहेत, आणि त्यामुळेच ते कायम मनात राहिले आहेत.
आयुष्यात असे अनेक संकटांचा सामना करत, लाल्या पुन्हा उभा राहिला. जास्त वेळ गंभीर राहणं हे त्याचं स्वभावातच नव्हतं. त्यामुळे लाल्याच्या सहवासात कधीही तणाव जाणवत नसे. त्याच्यासोबत राहिल्यावर एक वेगळाच आनंद मिळायचा, आणि तो सहवास कधीच संपू नये असं वाटायचं.
इकडे कधी कधी सुट्टी असेल, तर नेमकं काय करायचं हे प्रश्न पडायचे, पण लाल्याकडे एवढ्या भन्नाट कल्पना असायच्या की अचानक तो बाहेर जाण्याचं किंवा काहीतरी नवीन करण्याचं नियोजन करत असे. पर्यटनाची आवड असल्यामुळे त्याला खूप माहिती असायची.
कधी 'फक्त एक कप चहा प्यायला जाऊ' म्हणत १५ किलोमीटर बाईकवर फिरवायचा, तर कधी 'चांगला नाश्ता करू' म्हणत पुण्यातली ५-६ हॉटेलं पालथी घालायचा! तो एकदम चोखंदळ आणि हौशी माणूस आहे. पण खरं सांगायचं, तर लाल्यासोबत बाईकवर फिरण्यात जी मजा आहे, ती महागड्या गाडीतही येणार नाही!
आयुष्यात दोन प्रकारचे लोक मला भेटले. एक म्हणजे जे फक्त मित्र म्हणवतात, पण वेळेला कधीही येऊ शकले नाहीत. दुसरे म्हणजे लाल्या, जो कोणतंही काम असो, तुमच्या खांद्याला खांदा लावून उभा राहायचा. मैदानात कायम तो तुमच्यासोबत असेल. कोणताही उपदेश देणार नाही, पण काम करायला मदत करत असे.
घरी कोणताही कार्यक्रम असो, कुठलंही काम असो—लाल्या तिथे हजर असायचाच. कोणाचंही लग्नकार्य असो, मुलाचा वाढदिवस असो, किंवा अजून काहीही... त्याला मित्रांनी हक्काने बोलावलं की तो आनंदाने धावत यायचा. मनात ना अहंकार, ना कसलं बंधन!
घरातील स्त्रियांना साड्या घ्यायच्या असोत, किंवा कोणतीही खरेदी करायची असो—लाल्या सोबत असेल, तर काही चिंता नाही! पुण्यात कुठे काय मिळतं, याची त्याला इतकी चांगली माहिती होती की, ती दुकानदारालाही नसेल! शिवाय, काम करताना कंटाळा नावाचा प्रकारच नाही. जणू काही त्याच्या अंगात बारा हत्तींचे बळ आहे !
लाल्या शिवाय दिवाळी साजरी होत नाही, आणि लाल्या शिवाय कोणताही सण रंगत नाही. त्याचा उत्साह आणि निखळ आनंद देण्याची वृत्ती यामुळे प्रत्येक सण अधिकच खास वाटतो.
तो इतका सहज आणि सरळ स्वभावाचा आहे की तो आपलाच माणूस आहे, असं नेहमी वाटतं.
आयुष्यात तुम्ही कितीही मोठे झाला तरी, तुमच्या आयुष्यात लाल्यासारखा बिनधास्त आणि मनमोकळा मित्र असायलाच हवा, ज्याच्यासोबत मनातील सगळं बोलता आलं पाहिजे.
लाल्या तुमच्यासोबत असेल, तर तुम्हीही जीवन जगण्याची कला शिकाल—दुःख कमी होईल आणि आनंद दुपटीने वाढेल
कारण लाल्या हा केवळ एक व्यक्ती नाही, तो एक विचार आहे—जो समाजाच्या चौकटीपलीकडे जाऊन, मनसोक्त आनंद घेऊन जगायला शिकवतो.
समाप्त